* स्नेहा सिंह
आता त्याला भेटण्यासाठी मन आतूर होत नाही. सर्वकाही सोडून त्याच्या जवळ जाण्याची तितकीशी इच्छा राहिलेली नाही. गप्पांचे विषय संपले आहेत. भावना केवळ कर्तव्य बनून राहिल्या आहेत. शरीराचे आकर्षण संपले आहे. ज्या स्पर्शामुळे अंगावर रोमांच उभे राहायचे तो स्पर्श आता काटयासारखा टोचत आहे. संस्कार, वचन, नातेसंबंध आणि समाजाने आतापर्यंत एकमेकांसोबत जोडून ठेवले आहे, पण सत्य आणि न सांगता येणारे वास्तव हेच आहे की, पहिल्यासारखी त्याची सोबत हवीहवीशी वाटत नाही.
जेव्हा तुमचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असतात तेव्हा ते टिकवून ठेवण्यासाठी त्यातील बरे-वाईट नेहमीच तपासत राहिले पाहिजे. धंद्यात संबंधांचे तत्त्व आणि संबंधांत धंद्याचे धोरण अवलंबले तर दोन्ही बाजूंनी काहीच समस्या येणार नाही. तुम्ही महिला आहात. तुम्हाला आवडीच्या पुरुषासाठी नेहमीच स्वत:ला आकर्षक ठेवावे लागेल.
स्वत:ला आकर्षक ठेवावे लागेल
सामाजिक जबाबदारी आणि मुलांमध्ये महिला अशा काही गुंतून जातात की, पतीसाठी स्वत:ला आकर्षक ठेवणे विसरून जातात. असेच पतीच्या बाबतीतही होते. पैसे आणि नाव कमावण्याच्या नादात ते स्वत:ला व्यवस्थित ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. प्रेमसंबंधांतही असेच घडते. स्वत:ला आकर्षक ठेवणे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे चांगल्या पद्धतीने तयार होणे.
मानसिक अपग्रेडेशन
एक घर चांगल्या प्रकारे चालण्यामध्ये गृहिणीची भूमिका फार मोठी असते, पण घर सांभाळण्याच्या व्यापात त्या संबंध सांभाळायला विसरतात. तुम्ही गृहिणी असाल म्हणून काय झाले? मानसिक रूपात स्वत:ला अपग्रेड म्हणजे अद्ययावत ठेवू शकता आणि तसे ठेवायलाच हवे. गृहिणींनी वाचन करायला हवे, चांगले चित्रपट बघायला हवेत. चांगली गाणी ऐकायला हवीत, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी त्यांना माहीत असायला हव्यात.
शरीर
शरीराला सांभाळणे आणि सुडौल राहाणे ही महिलांसाठी एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. कंबर लवचिक नसली तरी चालेल, पण तिथे चरबीचे साम्राज्य असेल तर मात्र अजिबात चालणार नाही. लैंगिक जीवनासाठी शरीर व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते. वॅक्स, अंडरआर्म्स, बिकिनी वॅक्स करत राहायला हवे. खासगी अवयवांची स्वछताही तितकीच गरजेची असते.
मॅनर्स
पतीच्या अनुपस्थितीत त्याचा व्हॉट्सअप उघडून वाचणे, त्याने कोणाला कॉल केले हे पाहाणे हे मॅनर्सला धरून नाही. पतीनेही पत्नीसोबत असे वागू नये. तुम्ही खूप छान जेवण बनवत असाल, पण ते वाढायलाही यायला हवे. ताटातली भाजी कुठे वाढायची आणि चपाती कशा प्रकारे ठेवायची, हे सर्व माहिती असायला हवे. किती बोलायचे? कुठे थांबायचे, याचेही ज्ञान हवे. पती तुम्हाला वेळ देत नसल्याची तक्रार सतत करता कामा नये.
अभिव्यक्ती
कुठलेही संबंध टिकवून ठेवण्यासाठी अभिव्यक्ती खूपच गरजेची असते. तुमचे जोडीदारावर किती प्रेम आहे? तुम्हाला एकमेकांची किती आठवण येते? तुम्हाला दोघांना काय आवडते? काय आवडत नाही, हे एकमेकांना सांगणे आवश्यक असते. अनेक लोक सांगतात की आम्ही अंतर्मुख आहोत, पण अंतर्मुख राहूनही तुमच्या वागण्यातून प्रेम व्यक्त होऊ शकते.