* पूनम अहमद
कोरोनाने सर्वांना आपापल्या घरात कैद होण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत आपल्याकडे दोनच मार्ग आहेत, एकतर या वेळेला सतत दोष देत बसणे किंवा या वेळेचा अशा प्रकारे वापर करणे की, आपले मन प्रसन्न होईल. मग या वेळेत असा एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे, जो धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेला.
तुमच्या स्क्रॅपबुकवर काम करणे असो, तुमच्या बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, असे अनेक छंद आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही हा वेळ मजेत घालवा.
वेळेचा सदुपयोग करा
तुम्हाला शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम कसे करावे हे माहीत असेल आणि बऱ्याच काळापासून हा छंद तुम्ही जोपासला नसेल, तर या वेळेचा फायदा घ्या, तुम्ही क्रॉस स्टिचिंग, आर्म विणकाम, लूम विणकाम आणि सुई पॉइंट असे बरेच प्रयोग करू शकता. तुमच्या प्रियजनांसाठी चांगल्या, नवीन, वेगळया भेटवस्तू तयार करू शकता आणि ठेवू शकता.
नेहा अस्वस्थ होती. ऑगस्टमध्ये तिने एका मुलीला मुंबईत जन्म दिला तेव्हा प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे बाळासाठी तिला कोणतीही पूर्वतयारी योग्य प्रकारे करता आली नाही. त्यानंतर संसर्गाच्या भीतीने ती बाजारात जाणे टाळत होती, बाळासाठी तिला कपडे हवे होते, कारण जे होते ते पावसामुळे नीट सुकत नव्हते.
नेहाला अस्वस्थ पाहून तिच्या शेजारी अनिता म्हणाल्या, ‘‘का काळजी करतेस? बाजारात जाऊन धोका कशाला घेतेस, तुझ्याकडचे जुने कपडे मला दे, मी त्यातून बाळाला काहीतरी नवीन शिवून देईन.’’
नेहा आश्चर्यचकित झाली, ‘‘तुम्हाला शिवणकाम येते का काकी?’’
‘‘ते आधीपासूनच येत होते, पण आता वर्षानुवर्षे त्याची गरजच भासली नाही, पण तुझ्यासाठी मी प्रयत्न करेन.’’
काहीतरी वेगळे करा
नेहाने अनिताला जुने कुरते आणि सलवार दिली. अनिताच्या घरी तिचा नवरा आणि मुलगा घरातून काम करायचे. ते कामात व्यस्त असायचे. अनितालाही आजकाल खूप कंटाळा येत होता. काहीतरी कल्पक, नाविन्यपूर्ण करावे, असे तिला वाटत होते, पण काय करावे ते कळत नव्हते. नेहाला काहीतरी मदत करण्याचा विचार त्यांच्या मनात येताच त्यांच्यात नवा उत्साह संचारला. त्यांनी त्यांचे शिलाई मशीन साफ केले. ते पुन्हा काम करण्यायोग्य करण्यासाठी त्यांना वेळ लागला. मशीन नीट होताच त्या उत्साहाने कपडे शिवायला लागल्या.
पती आणि मुलानेही त्यांचा उत्साह वाढवला. २ दिवसांत त्यांनी बाळाच्या गरजेचे अनेक कपडे शिवले. ते पाहून नेहा आणि तिचा नवरा अनिल आश्चर्यचकित झाले. ते अनिता यांचे आभार मानत राहिले तर आपला छंद पुन्हा जोपासता आल्याचा आनंद अनिता यांना झाला.
त्यांचे शिलाई मशीन सुरू झाले आणि त्यांच्या हातात जणू जादूची कांडी आली. हळूहळू त्यांनी जुन्या कपड्यांमधून सुंदर डिझायनर टॉप्स शिवले. त्यातील एक टॉप घालून त्या भाजी आणायला गेल्या तेव्हा तिथे भेटलेल्या मैत्रिणीने टॉपचे कौतुक केले आणि स्वत:साठी तसाच एक टॉप शिवून देण्याची विनंती केली.
नीताला तो कुरता प्रचंड आवडला. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, नंतर तिसऱ्यापर्यंत असे करत हळूहळू अनिताच्या या कौशल्याची चर्चा इमारतीभोवती रंगू लागल्या. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांच्या अनेक गरजा होत्या. ते बाहेर पडू शकत नव्हते आणि त्यांना अशा काही गोष्टींची गरज होती, ज्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. हळूहळू अशी बरीच कामे अनिता यांच्याकडे आली. त्या भरतकामही उत्तम करायच्या.
असा वाढवा आत्मविश्वास
अशीही वेळ आली की, लॉकडाऊन उघडल्यानंतरही अनिता यांनी घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कामासाठी जागा बनवली जिथे त्या आरामात काम करू लागल्या. काम करताना त्यांना वेळेचे भान राहायचे नाही. हळूहळू त्या व्यावसायिक झाल्या. बरेच लोक त्यांच्याकडून खरेदी करू लागले. ज्यांना बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा स्वच्छ घरातून सामान आणणे जास्त सुरक्षित वाटत होते त्यांना अनिता यांच्या रुपात नवा पर्याय सापडला. अनिता यांच्याकडून केलेल्या खरेदीमुळे त्यांच्या घराला नवी झळाळी मिळाली. लॉकडाऊनमुळे मरगळलेल्या घरात ठेवलेल्या या नव्या वस्तूंमुळे त्यांच्या घरातील वातावरण प्रसन्न झाले.
तुमचा वेळ नवीन भाषा शिकण्यासाठी वापरा. याचे अनेक फायदे असतात. आजकाल अनेक अॅप्स आणि ऑनलाइन प्रोग्राम्स उपलब्ध आहेत, ज्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्ही कोणतीही नवीन भाषा शिकू शकता. सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नवीन गोष्टींशी कनेक्ट झाल्याने तुम्हाला चांगला अनुभव मिळेल.
छंदातून आनंद
आजकाल तुम्ही यूट्यूबवर काहीही शिकू शकता. प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ उपलब्ध आहेत. इकडेतिकडे निरर्थक गोष्टीत मौल्यवान वेळ वाया घालवून हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे काहीतरी कल्पक करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मानसिक आणि आर्थिक फायदा होईल. कोणतीही नवीन गोष्ट शिकणे कधीही नुकसानकारक नसते.
आजचे युग फ्युजनचे आहे, नवीन आणि जुन्या गोष्टी एकत्र करा आणि काहीही बनवा. शिवणकाम आणि भरतकामाचा छंद स्त्रियांसाठी खूप चांगला ठरू शकतो, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ही कला थोडीफार असतेच. फक्त ती चांगल्या प्रकारे जोपासून तिचा सदुपयोग करण्याची गरज असते.
छंद किंवा आवड गरजेची
आधुनिकीकरणाने छंदाला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे आता काम सुरू राहील की नाही याची चिंता राहिलेली नाही. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यांचे प्रशिक्षण शहरांपासून खेडयांपर्यंत दिले जाते. काळ महामारीचा असल्याने लोकांना फारसे बाहेर जावेसे वाटत नाही, पण वाटल्यास महिला घरात राहूनही या वेळेचा पुरेपूर उपयोग करुन घेऊ शकतात. यासाठी त्या कोणत्याही प्रशिक्षकाकडून अभ्यासक्रम किंवा ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात.
ही कला शिकण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही, फक्त छंद, आवड हवी. संधीबाबत बोलायचे तर, शिवणकाम, भरतकाम हे फॅशन डिझायनिंग अंतर्गत येते. त्याने बॉलीवूडपासून ते सर्वसामान्यांच्या जीवनातही आपले स्थान निर्माण केले आहे. आता प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे आहे. त्यासाठी ड्रेसवर खूप लक्ष दिले जाते. या कलेत आपले कौशल्य दाखवून अनेक महिला आज प्रसिद्ध फॅशन डिझायनर बनल्या आहेत.
कटिंग आणि टेलरिंग
तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कटिंग आणि टेलरिंगसह डिझायनिंगचेही ज्ञान असायला हवे. सोबतच बाजारात येणाऱ्या कपडयांच्या नवनवीन डिझाईन्स आणि ते तयार करण्याचे कौशल्यही शिकून घेतले पाहिजे. आता तुम्ही यूट्यूबच्या मदतीने खूप काही शिकू शकता.
हे कौशल्य शिकण्याचा हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी की, तुम्ही येथे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहू शकता. जसे की, तुम्हाला तुमचे स्वत:चे कुरते शिवायचे असतील तर तुम्ही येथे ते शिवण्याचे अनेक मार्ग बघू शकता, शिवाय सर्व काही विनामूल्य असेल. पैसे वाचवण्यासोबतच शिवणकाम आणि भरतकाम शिकण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे शिवू शकता. शिंप्याकडे जाण्यासाठीचा वेळ वाया जात नाही. तुम्हाला पाहिजे त्या वेळेत तुम्ही ते शिवू शकता.
स्वावलंबी होणे गरजेचे
महिलांनी स्वावलंबी असणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मुंबईत जन्मलेल्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. एकेकाळी त्यांनी २ मशिनच्या मदतीने शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला होता. आज संपूर्ण जगाला त्यांचे नाव माहीत आहे. त्यांचे ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत.
त्यांचे नाव २०१७ च्या सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांमध्ये गणले जाते आणि आज त्यांची गणना जगातील सर्वात यशस्वी महिलांमध्ये केली जाते. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, धाकटया बहिणीसोबत त्यांनी हे काम घराच्या बाल्कनीतून सुरू केले होते.
तुम्हीही तुमचा एखादा छंद तुमच्या आतच दबून जाऊ देऊ नका. टीव्हीवरील निरर्थक अंधश्रद्धाळू कार्यक्रम पाहणे बंद करा आणि काहीतरी नवीन शिका, पुढे जा. स्वत:चा वेळ काहीतरी चांगले करण्यासाठी सार्थकी लावा. तुम्हाला अनेक फायदे होतील.