* प्रतिनिधी
लोकरीचे सुंदर कपडे कसे विणायचे, याचे रहस्य तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर चला, आमच्यासोबत विणकामात नैपुण्य मिळविण्याच्या काही सोप्या पद्धती शिकून घ्या.
चांगल्या लोकरीची निवड
एखादा पोशाख तयार करण्यासाठी वापरलेल्या लोकरीच्या दर्जावरूनच त्या पोशाखाची ओळख ठरते. विणकाम कशासाठी करणार आहात, हे नजरेसमोर ठेवून त्यानुसारच लोकर निवडा. अगदी मनापासून आणि मेहनतीने विणकाम करणार असाल तर लोकरीच्या दर्जाशी कधीच तडजोड करू नका.
योग्य नंबरच्या सुईची निवड
विणकाम सुरू करताना सर्वप्रथन एक वीण घालून हे पाहून घ्या की, ती जास्त घट्ट किंवा जास्त सैल तर होत नाही ना? यासाठी योग्य नंबरच्या सुईची निवड करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे केलेली योग्य सुईची निवड तुम्ही विणून तयार केलेल्या पोशाखाला अधिकच उठावदार करेल.
नियमितपणे तुम्ही केलेले काम तपासून पहा
जेव्हा तुम्ही विणकाम करता तेव्हा नियमितपणे तुम्ही केलेले काम तपासून पहा. यामुळे झालेल्या छोटया, मोठया चुका वेळेवर लक्षात येऊन त्या सुधारता येतील आणि तुमचे विणकाम अधिक चांगल्या प्रकारे होईल. असे केल्यास चुकीच्या वीण उसवण्यासाठी पुढे जो काही जास्तीचा वेळ लागतो तोही वाचेल.
एक साखळी एकाच बैठकीत पूर्ण करा
ही छोटीशी युक्ती नेहमी लक्षात ठेवा. विणकाम थांबवण्यापूर्वी ते मध्येच कुठेतरी न थांबवता एक संपूर्ण साखळी एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा साखळी अर्धवट ठेवून ती नंतर पूर्ण केल्यास त्यातील तफावत तो पोशाख परिधान केल्यानंतर जाणवत राहील.
पॅटर्न लक्षपूर्वक पाहून घ्या
विणकाम करण्यापूर्वी तुम्ही जो कोणता पॅटर्न तयार करणार असाल त्याची लक्षपूर्वक माहिती करून घ्या. व्यवस्थित अभ्यास करा. तो पॅटर्न तयार करण्यापूर्वी वीण कशा प्रकारे घातल्या आहेत, हे समजून घ्या. सोबतच त्या कशा पूर्ण करीत जावे लागेल याचा अंदाज घ्या. यामुळे एक चांगला पोशाख तयार करण्यासाठी तुम्हाला मदत होईल.