* दीपिका विरेंद्र

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. गर्भात वाढणारं मूल आईला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं. संवदेनशील बनवतं, प्रेम करायला शिकवतं. त्यामुळे गरोदर महिला स्वत:ची विशेष काळजी घेतात. कारण अशावेळी महिला फक्त स्वत:साठीच नाही तर बाळासाठीही अन्न ग्रहण करत असतात.

नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना सतत थकवा जाणवतो. ८-९ तास ऑफिसमध्ये काम केल्याने त्या जास्त थकतात. याशिवाय महिलांना घरातली कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस श्रमाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांचा आहार कसा असावा.

असा असावा नाश्ता

तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच स्वयंपाक आणि घरातली इतर कामं सुरू करत असाल तर हे योग्य नाही. सकाळी उठताच सर्वात आधी ग्रीन टी प्या. दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने झाली तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. त्यानंतर अंघोळ करून फ्रेश व्हा. दुपारचं जेवण तुम्ही स्वत: करत असाल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. सकाळी सगळं तयार मिळालं तर जेवण करणं डोकेदुखी ठरणार नाही. जेवण करून झाल्यावर सर्वात आधी नाश्ता करा. नाश्त्याला उकडलेली अंडी, चपाती आणि भाजी खा. त्यानंतर आपला डबा तयार करा. डब्यात फळं, सुका मेवा आणि जेवण भरा. दही किंवा ताक घ्यायला विसरू नका.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर

ऑफिसला पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर थोडा आराम करा. काम सुरू करण्याआधी डाळिंब किंवा सफरचंद खा. हे तुमच्यासह बाळाच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे. शक्य असेल तर केळं खा. त्यानंतर आपलं काम सुरू करा.

दुपारचं जेवण चांगलं घ्या

डाळ-भात, भाजी-चपाती, दही किंवा ताक जे तुम्ही आणलं असेल ते व्यवस्थित चावून खा. घाईघाईत खाऊ नका. जेवणासोबत काकडी खा. सलाड तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संध्याकाळचा नाश्ता

बऱ्याचदा असं दिसून येतं की गरोदर महिला संध्याकाळच्या नाश्त्याला समोसा, जिलेबी इत्यादी पदार्थ खातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात, पण आरोग्यदायी नसतात. त्यामुळे घरून सुकामेवा घेऊन या आणि तोच खा. चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर पिऊ शकता. हे दोघांसाठीही फायदेशीर असेल. संध्याकाळी नाश्त्याच्या नावाखाली पूर्ण पोट भरू नका. कारण रात्रीचं जेवणही जेवायचं आहे.

घरी पोहोचण्यासाठी घाई करू नका. ऑफिसची कॅब असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे आरामात निघा. थोडा उशिर झाला तरी चालेल. पण घरी आरामात सुरक्षित पोहोचा. घरी पोहोचल्यावर थोडा आराम करा, पाणी प्या. त्यानंतर घरातली कामं करा.

रात्री पौष्टिक जेवण करा

रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. एकवेळ डाळ नक्की खा. सोबत चपाती, सलाड आणि बेबीकॉर्न, ब्रोकोली, पनीर इत्यादी भाज्या खा.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं फिरा. दिवसभरात एक ग्लास दूध नक्की प्या. बाळंतपणादरम्यान दूध अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या.

ऑफिससोबत घरातलं काम मॅनेज करायला जमत नसेल तर मेड ठेवा. सगळं काम स्वत:वर घेऊ नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...