दिर्घ कथा * मीना गोगावले
(भाग दूसरा)
पूर्व कथा : राजन त्याच्या वहिनीशी, राधिकाशी खूपच मोकळेपणानं बोलायचा. त्यानं त्याच्या मनातील भावी पत्नीबद्दलचे विचार राधिकाला सांगितले. त्याच्या स्वप्नातली सुंदरी कशी अन् कुठं शोधायची ते राधिकाला समजेना.
शेवटी एकदाची ती स्वप्नं सुंदरी सापडली, खूप थाटात लग्न झालं. पण घरात नव्यानं प्रवेश करणाऱ्या नववधूनं सुरूवातीपासूनच आपले रंग दाखवायला सुरूवात केली. घरातलं वातावरण तंग झालं होतं. पण स्वप्नसुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राजनला ते काही कळत नव्हतं. खूप शिकलेली आहे. होस्टेलला राहिल्यामुळे मोकळ्या स्वभावाची आहे हे त्यानं मान्य केलं होतं...
आता पुढे वाचा :
सुंदरी रात्री घरी परतली, तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बाबांनी सहजच खिडकीतून बघितलं तर सुंदरी कुणा मुलाच्या हातात हात घालून खिदळत कारमधून उतरताना दिसली.
बाबांना कसंबसं झालं. त्यांचं घराणं सात्विक शालीन माणसाचं, सुसंस्कारी माणसांचं होतं. असा थिल्लरपणा तिथं अपेक्षितच नव्हता. सगळीकडे नववधूच्या या वागण्याची चर्चा होणार याची त्यांना कल्पना आली. कारण सगळ्यांच्या खिडक्यांमधून दिवे लागलेले अन् माणसं उभी होती. चकित होऊन बघत होती.
पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. सुंदरीला घरी सोडून तो तरूण जायला निघाला तसं बाबांनी त्याला थांबवलं.
‘‘नाव काय रे बेटा तुझं?’’
‘‘अनुभव...’’
‘‘चांगल्या घरातला दिसतोस...सुंदरीला कधीपासून ओळखतोस?’’
‘‘आम्ही एकत्र शिकत होतो.’’ तो जायला निघाला बाबांनी त्याला थांबवलं. अत्यंत शांत, संयम सुरात ते म्हणाले, ‘‘तुला आमच्या घराण्याचीही रीत कळायला हवी. आता फक्त सुंदरीशीच तुझा संबंध नाही तर तिच्या कुटुंबाशीही आहे. तुझी क्लासमेट होती सुंदरी, पण आता ती विवाहित आहे. कुणा दुसऱ्याची पत्नी आहे. आमच्या घराण्याची सून आहे, त्यामुळे तिचं असं सतत तुझ्याबारेबर भटकणं बरोबर नाही.’’
अनुभव काहीही न बोलता निघून गेला. इकडे सुंदरी आपल्या खोलीत येऊन राजनवर भडकली. ‘‘बाबांना हा भोचकपणा कुणी सांगितलाय? विनाकारण त्याला बोलले. घराण्याची रीत, मर्यादा याचं स्तोम माजवतात. काय करू मी या मर्यादेचं लोणचं घालू? सगळा दिवस घरात बसून राहू? मला नाही जमणार...माझा मित्र मला घरापर्यंत सोडायला आला तर बिघडलं कुठं?’’