कथा * मोनिका अग्रवाल
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आज सायंकाळी आम्ही दोघं गरमागरम चहाचे घोट घेत गप्पा मारत आहोत. आज लोकांच्या दृष्टीनं आम्ही आदर्श नवराबायको आहोत. आमचं एकमेकांवर खरोखर खूप प्रेम आहे. पण मधल्या काळातली परिस्थिती खूपच वेगळी होती. त्यावेळी आमचं नातं पार धुरकटलं होतं. काळजी अन् धुराचे ठसके...सगळंच असह्य झालं होतं.
दोन वर्षं कोर्टात केस चालली होती. नवरा-बायकोच्या घटस्फोटाचा खटला होता. घटस्फोटाची कारणं खरं तर अगदीच फुसकी होती. घरात घडलेल्या एका अगदीच किरकोळ घटनेबद्दल माझ्या नणंदेनं नीलेशला खूपच वाढवून अन् आक्रस्ताळेपणानं सांगितलं. नीलेशनं एकदम संतापून माझ्या थोबाडीत मारली...मला हा अपमान सहन झाला नाही. माझा आत्मसन्मान प्रचंड दुखावला. खरं तर घरात मला तसं महत्त्व नव्हतंच. घरकामाची मोलकरीण एवढीच माझी ओळख. घरातल्या कुठल्याही गोष्टीत दखल दिली की सासूबाईंना वाटायचं की, मी त्यांची सत्ता हिसकावून घेते आहे. नणंदेला वाटायचं, तिच्या भावाच्या प्रेमातला मोठा वाटा मी घेतेय. त्यावरून रोजच धुसफुस व्हायची. नीलेशचाही माझ्यापेक्षा त्याच्या आईकडे व बहिणीकडे ओढा अधिक होता. तरीही आमचा संसार रूटुखुटू सुरू होता. एक मुलगाही झाला अन् मग तो प्रसंग घडला. मी ताबडतोब मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून आले. मला अशी आलेली बघून आईवडिल घाबरलेच. त्यांनी माझी खूप समजूत घातली पण मी ठरवलं होतं, आता वेगळं व्हायचं...शेवटी त्यांनीही हात टेकले.
दोन्ही बाजूंनी कोर्टात दावा दाखला झाला. खरं तर थोडी तडजोड करून प्रकरण मिटवता आलं असतं. पण नीलेशला तो आपला अपमान वाटला. नातलगांनी मध्ये लुडबुड करून प्रकरण अधिकच अवघड करून ठेवलं. नातलगांच्या मते हा प्रकार घराण्याच्या इभ्रतीवर बट्टा लावणं होतं. कुटुंबाचं नाक कापलं गेलंय असं काही म्हणाले. काहींनी अकलेचे तारे तोडले ‘अशा बायका प्रामाणिकही नसतात अन् पतिव्रता तर नसतातच...अशा बाईला घरा ठेवणं म्हणजे मुदतीचा ताप शरीरात सांभाळत बसणं आहे.’