* सुवर्णा पाटील

‘‘हॅलो आई, काय म्हणते? कशी आहेस?’’

‘‘मी बरी आहे रे संभव, पण तू उद्या नक्की ये. तू प्रॉमिस केलं आहेस. मागच्या वेळेसारखं करू नको.’’

‘‘हो गं आई, आता नक्की सांगितले ना. माझी महत्त्वाची मीटिंग आहे, नंतर बोलतो.’’

फोन ठेवताच संभवच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. त्याला इतक्यात लग्न करायचे नव्हते. पण त्याचे घरचे ऐकायलाच तयार नव्हते. त्याचे कुणावर प्रेम होते असेही नाही. पण त्याला आता करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. आईच्या वाढत्या आजारपणामुळे तो तिच्या या इच्छेला नाकारूही शकत नव्हता. म्हणून अनिच्छेने का होईना तो यावेळी मुलगी बघायला तयार झाला. घडाळयाकडे लक्ष जाताच त्याने पटकन आवरले व ऑफिसात गेला.

संध्याकाळी परत आल्यावर संभवने पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलची वेळ पहिली आणि स्टॉपला जाऊन उभा राहिला. ट्रॅव्हल थोडी उशिराच आली. त्यात त्याचा शेवटचा स्टॉप असल्याने गाडी पूर्ण प्रवाश्यांनी भरलेली होती. फक्त एका युवतीशेजारील जागा रिकामी होती. त्याने तिची बॅग हळूच उचलून खाली ठेवली व तिथे बसला. संभवने पाहिले ती युवती झोपलेली होती. तिच्या पूर्ण चेहऱ्यावर रुमाल होता. त्याची नजर ट्रॅव्हलच्या खिडकीतून बाहेर गेली. पौर्णिमेच्या चंद्राचे छान असे चांदणे पडले होते. त्या चांदण्याच्या प्रकाशात त्या युवतीचे लांबसडक सोनेरी केस चमकत होते. बाहेरच्या गार वाऱ्याने ते केस रुमालाच्या बंधनाला झुगारून संभवच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. क्षणभर का होईना संभव त्या स्पर्शाने मोहरून गेला. पण त्याने लगेच स्वत:ला सावरले व तो थोडे अंतर ठेवून बसला.

दिवसभरच्या दगदगीने त्यालाही लवकर झोप लागली. पण ड्रायव्हरने जोरात गाडीचा ब्रेक मारल्याने सर्वच प्रवासी घाबरून उठले. सर्वांनी विचारल्यावर ड्रायव्हरने सांगितले की, पुढे मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे गाडी थांबली आणि पुढचे ४-५ तास तरी वाहतूक सुरळीत होणार नाही.

‘‘का? हे, या सर्व गोष्टी आजच घडायच्या होत्या का. उद्या सकाळी पुण्याला नाही पोहोचले तर आई मला नक्की रागवेल….आता काय करू?…नेमकी फोनलाही रेंज नाही…’’

संभव शेजारील युवतीची ती अखंड चालणारी चिंतायुक्त बडबड ऐकत होता. तिच्या चेहऱ्यावरील रुमाल आता खाली आला होता. तिचे हळुवारपणे हलणारे गुलाबी ओठ, लांबलडक केसांना एका बाजूने घातलेली सागरवेणी, कपाळावर छोटीशी टिकली, पाणीदार डोळयातील रेखीव काजळ, चंद्राच्या प्रकाशात तिची गोरी कांती खुपच खुलून दिसत होती. किती सिंपल तरीही आकर्षक दिसत होती.

त्या युवतीचे संभवकडे लक्ष गेले. तो एकटक आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर ती सावरून बसली. संभवलाही थोडे ऑकवर्ड वाटले. त्याने त्याची नजर दुसरीकडे वळवली. पण तिची चुळबूळ काही कमी होत नव्हती हे पाहून संभव तिला म्हणाला, ‘‘मॅडम, काळजी करू नका. लवकरच वाहतूक सुरळीत होईल. तुम्हाला अर्जंट फोन करायचा असेल तर तुम्ही माझा फोन घेऊ शकता, माझ्या फोनला रेंज आहे.’’

त्या युवतीने संभवचे निरीक्षण केले. त्याच्या व्यक्तिमत्त्वावरून तर तो एक सभ्य तरुण वाटत होता आणि तिला आता त्याच्या फोनची गरजही होती. तिने त्याचा फोन घेऊन घरी कॉल केला

‘‘हॅलो आई…मी सुरभी बोलते…’’

‘‘हा कुणाचा नंबर आहे गं, इतक्या रात्री का फोन केला…आणि तू येतेस आहे ना उद्या…’’

‘‘हो गं बाई, हो सांगितले ना, माझे ऐकून तर घे. मी निघाली, पण इथे पुढे एका गाडीला अपघात झाला आहे. वाहतूक बंद आहे. मी दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून तुला कॉल करत आहे. तू काळजी करू नकोस. मी येते सकाळपर्यंत…’’

‘‘बरं…पण काळजी घे…आणि हो आतापर्यंत ती लोक आपल्या घरी तुला पाहण्यासाठी येतील तर उशीर करू नको.’’

सुरभीने संतापातच फोन कट केला. इथे मी अडकली आहे आणि तिला त्या पाहुण्यांची पडली आहे. संभव तिच्याकडे बघत होता. ‘तिची होणारी तारांबळ, आईवरील लाडीक संतापात तर ती खुपच गोड दिसत होती, नाव पण किती सुंदर…सुरभी…’

‘‘सॉरी हं…मी माझा राग तुमच्या फोनवर काढला.’’ सुरभीच्या शब्दांनी संभव भानावर आला.

‘‘इट्स ओके. पण काळजी करू नका. सकाळपर्यंत तुम्ही पुण्याला पोहोचाल. सॉरी हं…मी तुमचे फोनवरील संभाषण ऐकले. बाय द वे…मी संभव …मीही पुण्यालाच जात आहे.’’

‘‘मी सुरभी…तुमचे खूप खूप आभार. तुमच्या फोनमुळे मला घरी कॉल करता आला…’’ तेवढयात गाडीतील काही मुलांचा घोळका सामान घेऊन खाली उतरताना दिसला. संभवने त्यांना विचारले,  ‘‘काय रे भाऊ, तुम्ही सगळे कुठे चाललात…?’’

‘‘अरे दादा, आम्ही नेहमीच या रस्त्याने प्रवास करतो. इथे नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. इथून २-३ किलोमीटरची पायवाट आहे. पुढे लहान गाडया असतात, त्या पुण्याला जातात…तिथूनच जात आहोत.’’

‘‘पण इतक्या अंधारात…रस्ता सुरक्षित आहे का…?’’

‘‘ हो, आम्ही बऱ्याचदा जातो याच रस्त्याने आणि आमच्याकडे टॉर्चही आहे.’’

संभवने सुरभीकडे पाहिलं. सुरभीही विचार करू लागली. त्या मुलांच्या घोळक्यात २-३ मुलीही होत्या. जरी ती कोणाला ओळखत नसली तरी कराटे चॅम्पियन असल्याने काही घडलेच तर ती स्वत:ला सांभाळू शकणार होती. विशेष म्हणजे संभवचे वागणे तिला खुपच विश्वासाचे वाटत होते. म्हणून तिनेही लगेच होकार दिला. ते दोघेही त्या मुलांच्या घोळक्यासोबत खाली उतरून त्या पायवाटीवर चालू लागले.

ती मुले मुली एका कॉलेजचीच होती. त्यांच्यासोबत मैत्री करून हे दोघेही त्यांच्यासोबत चालू लागले आणि सोबतीला मोबाईल वरील सुरेल गाणे…रस्ता दाट जंगलाचा होता पण पौर्णिमेचा चंद्र त्याच्या शितल छायेचे अस्तित्व जाणवून देत होता. त्यामुळे वाट तितकी बिकट वाटत नव्हती. चालतांना अचानक एका दगडावरून सुरभीचा पाय निसटला. तिचा तोल जाणारच होता, पण संभवने तिला सांभाळले. क्षणभर का होईना तो स्पर्श दोघांना मोहरून गेला. ते काही क्षण ते एकमेकांच्या मिठीतच होते. तेवढ्यात मोबाईलवर गाणे सुरू झाले…

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली

मिटले चुकून डोळे हरवून रात गेली…

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी

कळले मला न केव्हा निसटून रात गेली…

मुलांच्या हसण्याने ते भानावर आले. सुरभी लाजून संभवपासून दूर झाली.

संभवलाही कुठं बघू असे झाले.

‘‘ईट्स ओके यार, असं होतं कधी कधी…पण सांभाळून चला आता…’’

पण सुरभीला चालतांना त्रास होऊ लागला. दगडावर घसरल्याने बहुतेक तिचा पाय थोडासा मुरगळला होता. ती तशीच लंगडत चालत होती. संभवने तिला विचारले,  ‘‘सुरभी, तुझ्या पायाला जास्त लागले का, तू अशी लंगडत का चालत आहे…?’’

आताच घडलेल्या प्रसंगाने सुरभी संभवच्या नजरेला नजर देण्याचे टाळत होती. ती संभवच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित तर होतीच, पण त्याचा आश्वासक स्पर्श व डोळयातील काळजीने ती त्याच्यात गुंतत होती. आपण घरी कशासाठी चाललो हे तिला आठवले. तिने आजपर्यंत शिक्षणाचे कारण सांगून लग्नाचा विषय टाळला होता, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर ती टाळू शकत नव्हती. उद्या घरी तिला त्याच कारणासाठी जायचे होते.

‘‘सुरभी, काय म्हणतो आहे मी…तुझे लक्ष कुठे आहे?…आपण थोडं थांबायचे का…?’’

‘‘नको…नको…मी ठीक आहे. थोडासा पाय मुरगळला आहे, पण मी चालू शकते…’’

तरीही संभवने तिला आधार दिला. ‘‘हे बघ, सुरभी आपली काही तासांचीच ओळख आहे पण तुला इथून पुण्यापर्यंत सुरक्षित नेणे मी माझी जबाबदारी समजतो. तू मनात दुसरे कोणतेच विचार आणू नको…चल.’’

संभवचा हात तिच्या हातात होता. काय होते त्या स्पर्शात… विश्वास, मैत्री, काळजी. सुरभी त्याला नकार देऊच शकली नाही. खरंतर कोणत्याही मुलीशी असे वागण्याची संभवची ही पहिलीच वेळ होती, पण सुरभीबद्दल त्याला काय वाटत होते हे त्याला कळतच नव्हते. तिची प्रत्येक अदा, बोलण्याची लकब, तिच्या हाताचा कोमल स्पर्श व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने त्याच्यावर दाखवलेला विश्वास…या सर्व गोष्टीचा तो विचार करत होता.

‘‘संभव, तुला माझ्यामुळे उगाच त्रास होत आहे.’’

‘‘सुरभी, तू असे का म्हणतेस. असे समज एक मित्र दुसऱ्या मित्राची मदत करत आहे.’’ आणि तो छानसे हसला.

‘‘तुझी  स्माईल काय किलर आहे.’’

‘‘काय…?’’

आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर सुरभीने जीभ चावली. पण संभवने हसून तिला दाद दिली. कॉलेजातील मुलांच्या गटाबरोबर गप्पा गोष्टीत केव्हा रस्ता संपला हे लक्षातच आले नाही. ते जंगलातून एका छोटया रस्त्याला लागले. तिथे एक लहानसे हॉटेल होते. संभवने सुरभी व त्याची ऑर्डर दिली. सुरभी फ्रेश होऊन हात पाय धुवून आली. पाण्याचे ओले तुषार अजूनही तिच्या लांबसडक केसांवर बिलगले होते.

‘‘ही किती गोड दिसते यार… हिचे प्रत्येक रूप मला वेडच लावत आहे. पण काय उपयोग या एका भेटीनंतर तिच्या व माझ्या वाटा कायमच्या वेगळया होतील.’’ हा विचार  करताना त्याच्या चेहऱ्यावर उदासीचे भाव उमटले.

‘‘संभव, काय झाले…? या चांदण्या रात्रीत गर्लफ्रेंडची आठवण आली का…?’’

सुरभीच्या चेहऱ्यावरील खटयाळ भाव पाहून संभवचे विरहाचे विचार तिथंच विरघळले.

‘‘नाही गं बाई, मला कुणी गर्लफ्रेंड नाही. चल जेवू या लवकर.’’ त्याच्या या वाक्याने खरंतर सुरभी सुखावली होती. तिने त्याच आनंदात जेवण संपवले. तोपर्यंत मुलांनी गाडीची सोय केली होती. गाडीतही सुरभी व संभव जवळजवळच बसले होते. त्यांच्या जीवाला हुरहूर लावणाऱ्या प्रवासाचा तो शेवटचा टप्पा होता. गाडी सुरु झाल्यावर थकव्याने सुरभीची मान अलगद संभवच्या खांद्यावर विसावली. संभव थकला असूनही हे सुंदर क्षण तो मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवत होता.

ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक लावला तशी सुरभी उठली. तिचा स्टॉप आला होता. सुरभीने जाता जाता पुन्हा एकदा प्रेमाने संभवचा हात हातात घेतला. ‘‘संभव, मी हा प्रवास कधीच विसरणार नाही. तो नेहमी माझ्या सुंदर आठवणीतील एक असेल…’’ तिला खूप काही बोलायचं होतं, पण शब्द साथ देत नव्हते. शब्द केव्हा अश्रू होऊन डोळयातून ओघळले हे तिलाच समजले नाही. संभवचीही हीच स्थिती होती. त्याने अलगद तिला थोपटले आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन भरलेल्या डोळयांनी तो गाडीत बसला.

संभव घरी पोहोचला. त्याने आईशी काहीही न बोलता जाण्याची तयारी केली. आईला वाटले प्रवासाने थकला असेल. ते ठरलेल्या वेळी पाहुण्यांच्या घरी गेले. संभवचे कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नव्हते. मुलीची आई मुलीचे कौतुक करत होती.

‘‘आमची सूर खूपच हुशार आहे. तिच्या हाताला तर अशी चव आहे…’’ संभवला या सर्व गोष्टीचा खूप राग येत होता. त्याच्या नजरेसमोरून सुरभीचा चेहरा जातच नव्हता. आईला माझे लग्नच हवे आहे ना, मग मी कुठूनही सुरभीला शोधेन. त्याने मनाशी पक्का निर्णय केला व मान वर करून म्हणाला, ‘‘थांबवा हे सगळे, मला हे लग्न…करायचे…’’ पण पुढचे शब्द ओठातच राहिले, कारण…समोर चहाचा ट्रे घेऊन सुरभी उभी होती. त्याच्या लक्षात आले… या घरातील सूर म्हणजे माझी सुरभीच आहे.

‘‘काय झाले संभव…? काही सांगायचे आहे का तुला…?’’ आईच्या शब्दांनी संभव भानावर आला. तो खाली बसला व म्हणाला, ‘‘मला हे लग्न करायचे आहे. मला मुलगी पसंत आहे…’’

त्याच्या या वाक्याने सर्वांना आश्चर्य तर वाटले, पण त्याहून जास्त आनंद झाला. सुरभीच्या रडून रडून सुजलेल्या डोळयांतूनही आनंद अश्रू आले, पण ते फक्त संभवलाच दिसले.

सर्वांच्या नजरांपासून नजर लपून या  दोन प्रेमी जीवांचे  मनोमिलन सुरू होते. यावेळी त्यांना हेच गाणं आठवत होतं…

अधीर मन झाले, मधुर घन आले

धुक्यातुनी नभातले, सख्या…प्रिया…

सरातुनी सुरेल, धुंद हे स्वर आले…

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...