* प्रतिनिधी
काय म्हणताय, तुम्हालाही फिरायला आवडते, पण कोणाची सोबत नसल्याने तुम्ही फिरायला जात नाही, तर मग आता तयार व्हा जगाची सफर करायला. एकटं असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगाची सफर करू शकत नाही. खरं सांगायचे तर एकटयाने प्रवास करण्याची मजा इतरांसोबत नसते. अशा प्रवासात मुलाच्या तब्येतीची चिंता नसते किंवा जोडीदाराची काळजी घेण्याची जबाबदारीही नसते. मनमुरादपणे आणि तणावमुक्त राहून सहलीचा आनंद घेता येतो. एकटे फिरण्याचे कितीतरी फायदे आहेत, जे माहिती करून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एकट्या फिरायला सुरुवात कराल :
स्वत:ला भेटण्याची संधी
तुम्ही घरी असता तेव्हा मुलगी, कार्यालयातील सहकारी आणि मित्रांदरम्यान मैत्रिणीची भूमिका निभावता. पण मग तुमचे स्वत:चे असे काही अस्तित्व नाही का? तुमची स्वत:ची अशी ओळख नाही का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकट्याच सहलीला जा. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. जेव्हा तुम्ही एकटया फिरायला जाता, तेव्हा नेहमीच स्वत:च्या मनाचे ऐकता. तुमच्या मनात जे येते ते करता. तुमच्यावर कोणताही दबाव नसतो. स्वत:ला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची संधीही मिळते, जी विचारात सकारात्मकता आणते आणि निवांतही वाटते.
आत्मविश्वासाने तुम्ही असाल परिपूर्ण
तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर सोलो ट्रिप तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते, कारण प्रवासादरम्यान बरेच नवीन लोक भेटतात, तर कधीकधी काही अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या स्वत:लाच सोडवाव्या लागतात. एवढेच नव्हे तर, अनेकदा धाडसी निर्णयही स्वत:लाच घ्यावे लागतात, ज्यामुळे तुमच्यातील साहस आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो.
अनुभवांची शिदोरी
असे म्हटले जाते की अनुभव मिनिटांत बरेच काही शिकवतो, ज्यामुळे जीवनाचा मार्ग सोपा वाटू लागतो. आपल्या अनुभवांमधून शिकण्यासाठी तुम्हाला नवीन अनुभव घ्यावे लागतील, जे घरात बसून शक्य नाही. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावे लागेल. जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरायला जाल, तेव्हाच तुम्हाला जगातील अशा लोकांना भेटता येईल, ज्यांना तुम्ही आजपर्यंत भेटलेला नाही. त्यांच्यासोबत तुम्ही अशा काही अनुभवांचे साक्षीदार व्हाल, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अनुभवले नसतील.





