* गीता सिंह

एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असणाऱ्या रोलीसोबत लग्न करून शिशिर खूप आनंदी आणि समाधानी होता. सुंदर, स्मार्ट आणि नोकरदार स्त्री पत्नी म्हणून मिळाल्यावर कोणत्या तरुणाला अभिमान वाटणार नाही, पण काही दिवसांनंतर बायकोचं उशिरापर्यंत घराबाहेर राहणं आणि घरी आल्यावर रात्ररात्रभर लॅपटॉपवर आपल्या प्रोजेक्टवर्कमध्ये अडकून राहणं त्याला असह्य होऊ लागलं. त्यातून पुन्हा सतत कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी टूरवर जाणं.

अखेरीस एक दिवस हिंमत करुन शिशिरने तिच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.

रोलीने त्याला समजावलं, ‘‘हा तर माझ्या कामाचा भाग आहे, शिशिर. ‘‘आणि लग्नापूर्वी या सर्व गोष्टींची कल्पना मी तुला दिली होती.’’

‘‘अगं पण कल्पना असणं आणि वास्तवात ते सहन करणं यात खूप फरक आहे. या वैवाहिक आयुष्याला अर्थ काय राहिला मग?’’

‘‘मलाही वाटतं आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटावा, पण आता मी काय करू शकते?’’

‘‘तू आपल्या बॉसना सांगून वेळ कमी का करून घेत नाहीस कामाची आणि बाहेरगावच्या टूरवर जायला नकार नाही का देत तू?’’

‘‘काय बोलतोस हे, शिशिर? अरे हा माझ्या करियरचा प्रश्न आहे. लवकरच माझं प्रमोशन होईल आणि मग माझं पॅकेजही वाढेल. अशावेळी मी माझ्या बॉसला कामाची वेळ कमी करायला सांगू? तू असा विचार तरी कसा करू शकतोस, शिशिर?’’

खरंच, रोलीच्या बोलण्यात तथ्य होतं. आजकाल जवळजवळ सर्वच करियर ओरिएण्टेड पतिपत्नींमध्ये त्यांचं करियर आणि त्यांचं दाम्पत्यजीवन यामध्ये अशीच रस्सीखेच चालू असते. एकीकडे पतिपत्नी दोघांनीही नोकरी करणं काळाजी गरज बनली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातली सुख.

काळाची गरज

आजच्या काळात नोकरदार पतिपत्नीचं आयुष्य खूप आव्हानात्मक झालं आहे. पूर्वी जेव्हा पती नोकरी करायचा आणि पत्नी घर सांभाळायची, तेव्हा बऱ्याच गोष्टी साध्यासोप्या होत्या. दोघंही एकमेकांच्या क्षेत्रात हस्तक्षेप न करता आपापल्या परिघात समाधानी होते.

परंतु आजकाल परिस्थितीच्या मागणीनुसार काळाच्या गरजेनुसार दोघांच्या भूमिका काही बाबी सोडल्या, तर जवळजवळ एकसारख्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

हस्तक्षेप करू नका

प्रत्येक कामाची आपली एक गरज आणि एक स्वरूप असतं. या गोष्टी पतिपत्नींनी योग्यप्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. परंतु बऱ्याच वेळा पत्नीबाबत पतीचा एक मालकी दृष्टिकोन दिसून येतो.

‘‘तू अमुक एकीकडे टूरवर जायचं नाहीस, तू रात्री उशिरापर्यंत घराबाहेर रहायचं नाहीस, बॉसच्या पार्टीमध्ये तू हा ड्रेस घालून जाऊ शकत नाहीस. मुलाची तब्येत बरी नाही, तर तू तुझी महत्त्वाची मीटिंग रद्द करून सुट्टी घे, तू ऑफिसमध्ये इतकं काम करतेस, तू एखादा खास बोनस मागून घे, पगारवाढ मागून घे, तुझ्या बॉसना सांगून फॅमिली हॉलीडेसाठी एखादं टूरिस्ट पॅकेज कबूल करून घे,’’ इत्यादी.

केवळ पतीच नाही, तर कितीतरी पत्नी ज्यांना कॉर्पोरेट विश्वाबद्दल काहीही माहिती नाही, आपल्या पतीच्या कामात हस्तक्षेप करतात.

एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रवीणच्या चांगल्या चाललेल्या करियरचा त्याची पत्नी अश्विनीच्या हस्तक्षेपामुळे सत्यानाश झाला. ती रोज प्रवीणला उचकवायची, ‘‘ तू इतक्या मोठ्या पोस्टवर आहेस, मग तुला इकॉनॉमी क्लासचं विमानाचं तिकिट का मिळतं? तू बिझनेस क्लासची मागणी कर. इतकी मेहनत करतोस कंपनीसाठी, कमीतकमी थ्री स्टार हॉटेलमध्ये तरी त्यांनी तुझी राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपल्यासाठी एखाद्या आरामशीर मोठ्या गाडीची मागणी कर कंपनीकडे.

प्रवीण मेहनती कर्मचारी होता. परंतु चांगलं पॅकेज देऊनही रोजरोज त्याच्या मागण्या ऐकवून त्याने त्याच्या बॉसचा मूड खराब केला. परिणामी त्याला नोकरीवरुन कमी करण्यात आलं.

पत्नीचे असे बरेच युक्तिवाद असता की हे सगळं तर ती आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच तर करते. पतीचंही आपल्या पत्नीवर प्रेम असल्याने ते आपल्या पत्नीच्या सर्व इच्छांचा आदर करतात. तेही या घोळात अडकून मग आपल्या चांगल्या करियरची माती करतात.

व्यवसायामध्ये तडजोड आवश्यक

खरं तर लग्न हीच एक तडजोड आहे. परंतु आजकाल वैवाहिक आयुष्यात अधिक समजूतदारपणाची आणि तडजोडीची गरज आहे. पतिपत्नी दोघंही करियर ओरिएण्टेड असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या आवडीनुसार जोडीदाराची निवड केली असेल तर त्याची जबाबदारी अधिक वाढते.

उदाहरणार्थ, त्यांनी एकमेकांच्या कामाच्या प्राथमिकता आणि गरजा ओळखून त्यांमध्ये योग्य समन्वय साधला पाहिजे. उत्तम आयुष्य आणि सर्व सुखसोयीयुक्त जीवनासाठी जर दोघांनीही करियरचा मार्ग स्वीकारला असेल, तर त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा आणि असुविधांचा दोघांनी मिळून सामना करायला हवा.

आजकाल चित्रपट, मॉडेलिंग म्हणजेच फॅशन, जाहिरात क्षेत्रातील पती-पत्नींनी एकमेकांच्या ग्लॅमरचा मोकळ्या मनाने स्वीकार करायला हवा. त्याच्याशी सलग्न त्रासांचा अस्वीकार केल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात भांडणं, वादविवाद आणि शेवटी घटस्फोट  अशा बाबी आजकाल सामान्य होत चालल्या आहेत.

भविष्याचा विचार करा

बऱ्याच वेळा पतिपत्नी एकमेकांच्या चालू कामाबद्दल असमाधानी राहून एकमेकांची सतत निर्भर्त्सना करत राहतात. एकमेकांच्या कामामध्ये विनाकारण नाक खुपसत राहतात. अधिक कामामुळे कुटुंबाला वेळ देऊ न शकल्याची सल तर दोघांच्याही मनात राहते, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दरवेळा परिस्थिती एकसारखी नसते.

वैवाहिक आयुष्याच्या प्राथमिकताही काळानुसार बदलतात. म्हणूनच योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. बऱ्याच वेळा पतिपत्नी एकमेकांच्या नोकरीवर असमाधानी राहून सल्ले देत राहतात की तुझ्या कष्टाच्या मानाने पगार खूपच कमी आहे.

बेरोजगारीच्या या काळात दुसरी नोकरी मिळवणं काही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच आपल्या जोडीदाराच्या कामधंद्यात विनाकारण हस्तक्षेप न करता दूरदर्शीपणा दाखवा. उदाहरणार्थ, आज आपल्या जोडीदाराच्या कामाचं जे स्वरूप आहे त्यासोबतच भविष्यातील शक्यतांचाही विचार करणं आवश्यक आहे. काही कंपन्या सुरूवातीला तितकासा चांगला पगार किंवा सोयीसुविधा देत नाहीत, पण जसजशी कंपनीची प्रगती होत जाते तसतसा ते आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर सोयीसुविधा वाढवतात. म्हणूनच भविष्यात घडणाऱ्या सकारात्मक बदलांकडेही लक्ष द्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...