* वीणा सुखीजा
तुम्हाला त्याच्या मित्रांची नावं माहीत आहेत. तुम्हाला त्याच्या आवडत्या चित्रपटांची नावं ठाऊक आहेत. तुम्हाला त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक विशिष्ट घटनांची माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता. कधीकधी तो तुम्हाला रागावतो. तरीदेखील तुम्ही त्याची कुणाकडेही तक्रार करत नाही, अगदी तुम्हाला याचं वाईटही वाटत नाही. तुम्हाला त्याच्या बोलण्याची लकब ठाऊक आहे. त्याच्या मनात काय सुरू असतं, याचाही तुम्हाला अंदाज असतो.
प्रश्न - अखेरीस तुमचा तो कोण आहे?
तुम्ही तिच्याकडून अपेक्षा बाळगता की तिने तुमच्या पसंतीचा पेहराव करावा. जेव्हा तुम्ही दोघे लंच करायला बसता तेव्हा तिने वाढावं अशी तुमची इच्छा असते. तुम्ही काही बोलत असाल, मग भले ते रागाने असेल तरी तिने ते निमूटपणे ऐकून घ्यावं, त्यावेळी उलट उत्तर देऊ नये, नंतर भले ती ओरडली तरी चालेल असं वाटतं.
तुम्ही तिला आपल्या भविष्यातील योजना सांगता, प्रवासादरम्यान घडलेल्या मजेदार गोष्टी सांगता. तुम्ही तिच्यासोबत बसून काम करण्याच्या उत्तम रणनीतीवर विचार करता.
प्रश्न - अखेरीस ती तुमची कोण आहे?
होय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पती आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पत्नी. परंतु थांबा, हे सामान्य जीवनातील पतिपत्नी नाहीत. हे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ आहेत. वर्क हझबंड म्हणजे कार्यस्थळी वा कार्यालयातील पती. अशाचप्रकारे वर्क वाइफचाही अर्थ आहे. कार्यस्थळ वा कार्यालयातील पत्नी. ऐकायला हे भले थोडं विचित्र वाटत असेल वा संकोच वाटेल, परंतु वास्तव हेच आहे. कामाची नवी संस्कृती भरभराटीला येण्यासोबतच जगभरात अशा पतिपत्नींची संख्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या जवळपास ४० टक्के आहे.
१९५०च्या दशकात अमेरिकेत अशा नात्यांसाठी मोठ्या शिताफीने एका शब्दाचा वापर केला जात असे - वर्क स्पाउज. हे वर्क वाइफ, वर्क हझबंड हे शब्द वास्तविक त्याचीच विस्तारीत रूपं आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कार्यक्षेत्र जगतातील हे काही नवं नातं नाही. नवीन आहे ते इतकंच की या नात्याला जगाच्या बहुतेक देशांमध्ये स्पष्टरीत्या स्वीकारालं जाऊ लागलं आहे.