* प्राची भारद्वाज
कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.
जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?
अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :
- दिनक्रम बिघडू देऊ नका
जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.