* रीना जैस्वार
अरेंज्ड किंवा लव्ह, लग्न कसेही झाले तरी, सासरच्या लोकांमध्ये आपसांतील मतभेद, वैचारिक मतभेद यासारख्या तक्रारी ही घर-घरची कथा आहे, कारण आपल्या समाजात लग्न फक्त २ व्यक्तींचे नाही तर २ कुटुंबांचे असते, जिथे लोक एकमेकांच्या विचारांबद्दल आणि स्वभावाबद्दल अनभिज्ञ असतात. आजकाल मुलं-मुली लग्नाआधी एकत्र येतात आणि एकमेकांना समजून घेतात, पण कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना समजून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते. ज्याप्रमाणे सून सासरचे लोक कसे असतील याबाबत संभ्रमात असते, त्याचप्रमाणे सासरचे लोकसुद्धा सूनेच्या वर्तणुकीबद्दल अनभिज्ञ असतात. सासरी पती व्यतिरिक्त, सासू-सासरा, नणंद, दीर, जेठ-जेठाणीसह अनेक महत्त्वाची नाती आहेत.
जर ४ लोक एकाच छताखाली राहत असतील, तर वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा तो आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा संबंधांमध्ये कटुता येते.
आपापसांतील मतभेदाची कारणे
जनरेशन गॅप, कल्पना लादणे, अधिकार गाजविण्याची मानसिकता, वाढत्या अपेक्षा, पूर्वग्रह, आर्थिक समस्या, फसवणुकीला बळी पडणे, प्रेमात फूट पडण्याची भीती इत्यादी कारणांमुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कधी-कधी स्वत: नवरासुद्धा सासू-सुनेमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण बनतो. या सगळयांशिवाय आजकाल सासू-सुनेच्या नात्यावर आधारित टीव्ही मालिकाही आगीत तेल टाकण्याचे काम करत आहेत.
विवाहित अंजली म्हणते, ‘‘घरात पती आणि २ मुले वगळता सासू, नणंद, दीर, जेठ-जेठाणी आणि त्यांची मुले आहेत. घरात अनेकदा एकमेकांमध्ये भांडण आणि दुराव्याचे वातावरण असते, कारण सासू-नणंदेला वाटते की आम्ही सूना म्हणजे फक्त काम करणारी यंत्रे आहोत. आमचे हसणे-बोलणे त्यांना काट्यासारखे टोचत असते. परिस्थिती अशी आहे की कुटुंबातील सदस्य आपापसात बोलतही नाहीत.’’
मुंबईतील सोनम म्हणते, ‘‘माझ्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. माझ्या लक्षात आले आहे की माझे पती एकतर आईचे ऐकतात किंवा आमच्यातील मतभेदांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, जे मला योग्य वाटत नाही. पती हा पत्नी आणि घरातील इतर सदस्यांमधील दुवा आहे, जो दोन्ही पक्षांना जोडतो. तो जरी कोणत्याही एका बाजूचे समर्थन करत नसेल, परंतु योग्य-अयोग्यबद्दल एकदा त्याने अवश्य विचार केला पाहिजे.’’