ड्रेसिंग टेबल असे ठेवा व्यवस्थित

– प्राची भारद्वाज

ड्रेसिंग टेबल खोलीतील ते फर्निचर आहे, जे प्रत्येक स्त्रीच्या मनाची भावना समजते, तिला सुंदर दिसण्यात मदत करते. परंतु बऱ्याचवेळा आपण ड्रेसिंग टेबलला इतर टेबलांप्रमाणे वस्तू साठवण्याचे ठिकाण समजतो आणि त्यावर अनावश्यक वस्तू ठेवतो. म्हणून आपले ड्रेसिंग टेबल व्यवस्थित ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असेल, तेव्हा आपणास कामाच्या वस्तू त्वरित मिळू शकतील आणि हे देखील जाणून घ्या की ती कोणती कॉस्मेटिक साधने आहेत, जी मेकअप करताना पूर्णपणे हाताशी असावीत.

सर्वप्रथमदररोज आपल्याला कोणत्या कॉस्मेटिक साधनांची आवश्यकता आहे याचा विचार करा. त्यांना समोर ठेवा. मग आपल्या ड्रेसिंग टेबलच्या रचनेत किती जागा आहे ते पहा. प्रत्येक ड्रॉव्हरमध्ये एक ड्रॉव्हर लाइन ठेवा, जेणेकरून वस्तू इकडे तिकडे सरकणार नाहीत. वरच्या ड्रॉव्हरमध्ये मेकअप अॅक्सेसरीज आणि खालच्या ड्रॉव्हरमध्ये हेअर स्टाईलिंग टूल्स ठेवा. आतल्या ड्राव्हरमध्ये कमी वापरले जाणारी मेकअप उपकरणे आणि अॅक्सेसरीज ठेवा. चला, याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया :

कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात

* दररोज त्वचेची देखभाल करणाऱ्या उत्पादनांची आवश्यकता असते – ऑफिससाठी तयार होताना किंवा संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जाताना. म्हणून मॉइश्चरायझर, टोनर, परफ्यूम किंवा डिओड्रेन्ट, फेस क्रीम, हँड लोशन, सनस्क्रीन आणि गुलाबजल आपल्या ड्रेसिंग टेबलवर एकत्र ठेवा. या सर्वांसाठी एक खुले बास्केट आणणे चांगले राहील आणि त्यांना ड्रेसिंग टेबलवर सगळयात वरती हाताशी ठेवा.

* ड्रेसिंग टेबलच्या वरील काउंटरवर रात्री वापरले जाणारे अंडर आय जेल, नाईटक्रीम, स्किन लोशन इ. एकत्र ठेवा.

* आता आपल्या मेकअप उत्पादनांचे २ भागांमध्ये विभाजन करा -आपल्याला दररोज आवश्यक असलेल्या वस्तू आणि पार्टी मेकअपसाठी आपल्याला आवश्यक असलेली सौंदर्यप्रसाधने.

* दररोज वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने जसे की बीबी क्रीम, कॉम्पॅक्ट, कन्सीलर, आयलाइनर, काजळ, आयब्रो पैंसिल, लिपलाइनर, लिपस्टिक, फेस क्लीनिंग वाइप्स इत्यादींना आपण वरच्या ड्रॉव्हरमध्ये एका जागी ठेवले पाहिजे, जेणेकरुन दररोज सकाळी तयार होताना तुमचा वेळ वाया जाणार नाही.

* केवळ पार्टी लूकसाठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने जसे की फाउंडेशन, आयशॅडो, लिक्विड आयलाइनर, मस्कारा, ब्लशर, कंन्टूरिंग ब्रश, हायलाइटर इत्यादी एखाद्या व्हॅनिटी पाउचमध्ये एकत्र ठेवले पाहिजेत. आपण त्यांना खालच्या ड्रॉव्हरमध्येदेखील ठेवू शकता, कारण ते अधूनमधूनच वापरले जातील.

* सर्व मेकअप ब्रशेस विशेष करून सांभाळले पाहिजेत, जेणेकरून ते अस्वच्छ होऊ नयेत आणि आरोग्यदायी राहतील. यासाठी स्वतंत्र पाउच आणा. यासह आपण पापण्यांसाठी आयलॅश कर्लर आणि फाउंडेशन लावण्यासाठी ब्यूटी ब्लेंडरदेखील ठेवू शकता. हे केवळ तेव्हाच कामी येईल, जेव्हा आपणास एखाद्या विशेष प्रसंगासाठी तयार व्व्हायचे असेल.

* त्याच अॅक्सेसरीज परिधान केल्या जातात, ज्या सहजतेने उपलब्ध होतात. ज्यांना आपण अधिकच सांभाळून खूप आतमध्ये ठेवतो, ते बहुतेकदा पडूनच राहतात. म्हणून ऑर्गनायजरच्या मदतीने आपले सामान हाताशी ठेवा, जेणेकरून आपण अदलून-बदलून नेकलेस, कर्णफुले आणि बांगडया घालू शकाल.

* एकाच वेळेस वापरले जाणारे सामान एकत्र साठवा जसे की पॅडीक्योर आणि मॅनीक्योरमध्ये वापरली जाणारी साधने एकत्र आणि फेशियलमध्ये कामी येणारे एकत्र.

कसे ऑर्गनाइज करावे

बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपले ड्रेसिंग टेबल सहजपणे ऑर्गनाइज करू शकता :

* जर ड्रेसरचा ड्रॉव्हर खोल असेल तर आपण त्यामध्ये अक्रेलिक ऑर्गनायझर ठेवून त्यात असलेल्या कप्प्यांमध्ये विविध वस्तू ठेवू शकता. जसे की फणी एकत्र, मेकअपचे सर्व ब्रशेस एकत्र, काजळ, आयलाइनर इत्यादी पेन्सिल्स एकत्र, केसांचे क्लच आणि रबर बँड एका कप्प्यात.

* केसांच्या पिनांना चुंबकाला चिकटवून एका ठिकाणी ठेवता येईल.

* लिपस्टिकसाठी लिपस्टिक ऑर्गनायझर आणा. सर्व लिपस्टिक सहज यामध्ये साठवल्या जाऊ शकतात. ऑर्गनायझरमध्ये शेडनुसार लिपस्टिक ठेवा. प्रथम मॅट आणि नंतर ग्लॉसी शेड्स किंवा मग ब्राइटहून लाइट शेड. असे करून जेव्हा आपल्याला ज्या प्रकारचा मेकअप करण्याची आवश्यकता असेल, तेव्हा आपण वेळ न गमावता लगेच आपल्या पसंतीची लिपस्टिक शेड निवडू शकता.

* नेल पेंट्सदेखील त्याचप्रमाणे गडद ते हलक्या शेडमध्ये ठेवा. त्याच ऑर्गनायझरमध्ये नेल पेंट रीमूव्हर आणि कॉटन बॉलदेखील ठेवा. नेल फाइलर आणि बफर वगैरेदेखील येथे ठेवा, जेणेकरून जेव्हा जेव्हा हात आणि नखे सजवायची असतील तेव्हा सर्व गोष्टी सहजपणे एकाच ठिकाणी सापडतील.

* हेअर ड्रायर, हेअर कर्लर इत्यादी केशरचनेची साधने तळाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवा आणि केबल क्लिपने त्यांचे तार बांधा.

* खाली असलेल्या ड्रॉव्हरच्या उर्वरित जागेत आपण पाउचमध्ये अतिरिक्त टिकल्या, मेकअप पॅलेट, फाउंडेशन इत्यादी सामान जे कमी वापरले जाते, ठेवू शकता.

* आपण बांगडया ठेवण्यासाठी एक बांगडी स्टँड आणू शकता, जे ड्रेसिंग टेबलच्या आत सहज बसू शकते. बांगडया क्रॅकदेखील होणार नाहीत आणि आपल्याला आरामात मॅचिंग रंगाच्या मिळतील.

* केसांचे ब्रश ठेवण्यासाठी आपण जुने मग किंवा मेणबत्ती होल्डरदेखील वापरू शकता. हे सुंदरदेखील दिसते आणि वापरण्यास सुलभ असते.

* ड्रेसिंग टेबलवर रनरदेखील अंथरू शकता, ज्याच्या दोन्ही बाजूंना खिशे असतील. या खिशांत तुम्ही परफ्युमच्या बाटल्या, टिशू पेपर, नॅपकिन्स इत्यादी ठेवू शकता.

आपल्याकडे ड्रेसिंग टेबल नसल्यास कोणत्याही टेबलाच्या वरती, भिंतीवर आरसा टांगून ड्रेसिंग टेबलासारखे उपयोग करू शकता. जवळच कार्ट, ऑर्गनाइझर ठेवू शकतात, ज्यात भरपूर जागा असते.

योग्य प्रकाश असू द्या

मेकअप करत असताना चेहऱ्यावर योग्य प्रकाश पडणे फार महत्वाचे आहे, म्हणून आपल्या ड्रेसिंग टेबलवर योग्य प्रकाशाची व्यवस्था ठेवा, नाहीतर असे व्हायला नको की जेव्हा आपण मेकअप केल्यानंतर बाहेर पडाल तेव्हा चेहऱ्याचा काही वेगळा अवतार दिसू लागेल.

या चुका करु नका

* आपले ड्रेसिंग टेबल व्यवस्थित करताना आपल्या सौंदर्यप्रसाधनांच्या कालबाह्यतेची तारखादेखील तपासा. कालबाह्य सौंदर्यप्रसाधनांना जतन करण्यात कोणताही लाभ नाही.

* कमी वापरले जाणारे आणि दररोज वापरले जाणारे मेकअप आयटम मिसळू नका, अन्यथा जेव्हा तुम्हाला मेकअप करायचा असेल तेव्हा तुम्ही बराच वेळ वाया घालवाल. या दोघांना वेगळे ठेवणे शहाणपणाचे आहे.

* ऑर्गनाईज करताना फॅन्सी सजावट करण्याऐवजी उपयुक्त पद्धतीकडे लक्ष द्या.

* फक्त ड्रेसिंग टेबल सजवण्यासाठी व्यर्थ सामग्री खरेदी करू नका, कारण ड्रेसिंग टेबल एक उपयुक्त फर्निचर आहे, ड्रॉईंग रूममध्ये सजावटीची वस्तू नाही.

* एकदा ऑर्गनाईज करणे सोपे आहे परंतु ते टिकवून ठेवणे अवघड आहे. ज्या वस्तुंसाठी आपण आपल्या ड्रेसिंग टेबलवर जागा बनविली आहे, त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवत जा, अन्यथा तुमची मेहनत वाया जाईल.

आपले ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करणे केवळ हाच उद्देश नाही, तर ते वापरण्यास सुलभ असणे हाच योग्य उद्देश आहे.

थंडीच्या मोसमात केस राहतील मऊमुलायम

* प्रतिनिधी

थंडीचा मोसम सुरू झाला आहे, याचा केसांवर खूपच दुष्परिणाम होतो. पण घाबरू नका, कारण या थंडीत केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत :

आईच्या टीप्स

* केस रुक्ष झाल्यास जास्तीत जास्त पाणी प्या, तुम्ही जितके जास्त पाणी प्याल, तितके तुमचे शरीर हायड्रेट राहील.

* एका भांडयात दोन लिंबांचा रस काढून त्यात थोडे पाणी घालून हलवा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला लावून बोटांनी हळूवार मालीश करा. थोडा वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसातील ओलावा टिकून राहील.

* अंडे केसांसाठी एक नॅचरल कंडिशनर आहे. म्हणून एका भांडयात दोन अंडी फोडून त्यात लिंबाचा रस आणि थोडे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करून ते डोक्याच्या त्वचेला लावा. सुकल्यावर सौम्य शाम्पूने केस धुवा.

* कोरफडीचा रस आणि दही समप्रमाणात एकत्र करून डोक्याच्या त्वचेला लावा आणि ३०-४० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. आठवडयातून दोनदा हा उपाय केल्यास केसांचा रुक्षपणा कायमचा निघून जाईल.

* जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचे तेल रुक्ष केसांसाठी चांगले असते. म्हणून आठवडयातून दोनदा यापैकी कोणत्याही एका तेलाने केसांची मालीश करून त्यांनतर केस कापडाने झाकून झोपून जा. सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवा.

तज्ज्ञांचा सल्ला

मुंबईतील प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर मुर्थे यांनी सांगितले की आठवड्यातून दोन ते तिनदा नारळाचे तेल, अॅवोकाडो ऑईल, कॅस्टर ऑईल आणि बदामाचे तेल समप्रमाणात एकत्र करुन टाळूच्या त्वचेला लावून बोटांनी हळूवार मालीश करा. रात्रभर केस तसेच ठेवून सकाळी सौम्य शाम्पूने धुवा. असे केल्याने केसांना सर्व प्रकारचे पोषण एकत्रित मिळते.

डाएटमध्ये बदल गरजेचा

केवळ बाह्य उपचारानेच नव्हे तर खाण्यापिण्यातील बदलामुळेही केसांतील मुलायमपणा आणि चमक परत मिळते. फक्त गरज आहे ती तुमच्या आहारात या घटकांचा समावेश करण्याची :

* लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील लाल पेशी चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत, जे आपल्या शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतात. डोक्याच्या त्वचेपर्यंत ऑक्सिजन पोहोचू न शकल्यामुळे केसांची वाढ खुंटते. म्हणून जेवणात लोहयुक्त पदार्थ जसे की पालक, लाल मांस, बीन्स, ब्रोकोली, मासे, टोमॅटो, मसूर डाळ आदींचा समावेश करा.

* झिंक शरीरातच नाही तर डोक्याच्या त्वचेतीलही हार्मोन्सची लेव्हल बॅलन्स करून केसांचे गळणे कमी करते. याच्या कमतरतेमुळे केसांचे प्रोटीन स्ट्रक्चर खराब होते आणि यामुळेच केस कमजोर होतात. झिंक केसांचे टिश्यूज वाढवण्यासाठीही मदत करते. म्हणूनच लांब आणि घनदाट केस हवे असतील तर आहारात बीन्स, नट्स, अंडी, रताळी आणि अॅवोकाडोचा नक्की समावेश करा.

* मॅग्नेशियम केसांच्या पेशींना ठीक करून केसांच्या वाढीस मदत करते. याच्या कमतरतेमुळे डोक्याच्या त्वचेवर कॅल्शियम जमा होऊ लागते. यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि केस गळू लागतात. जर तुमचे केसही खूप गळत असतील तर आपल्या जेवणात मासे, सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, केळी, हिरव्या पालेभाज्या, डार्क चॉकलेट, दही, बीन्स, नट्स, डाळी यांचा समावेश करा.

* प्रोटीन, फायबरच्या मदतीमुळे केस घनदाट होतात. याच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. म्हणून जास्त केस गळत असतील तर त्यांनी मासे, डाळी, अंडी, दूध, पनीर, खजूर, मोड आलेली कडधान्ये, बीन्स, चिकनसारखे पदार्थ खावेत.

व्हिटॅमिन्स केसांसाठी खूपच गरजेचे आहे. विशेष करून व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘इ’ जे डॅमेज केसांच्या टिश्यूजना दुरुस्त करून पेशींच्या वाढीस मदत करतात. ते टाळूच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुरळीत करतात. व्हिटॅमिन ‘ए’च्या पूर्तीसाठी रताळी, अंडयातील पिवळा बलक, दूध, पालक, आंबा, लोणी, गाजर आणि ब्रोकोली खा. व्हिटॅमिन ‘ए’ची कमतरता दूर करण्यासाठी बदाम, मासे, पालक, पपई, अॅवोकाडो, ब्रोकली, किवी, पिस्ता, भोपळी मिरची, टोमॅटो यांचे सेवन करा.

तज्ज्ञांचे मत

डॉक्टर मुर्थे यांच्या मते या खाद्यपदार्थांव्यतिरिक्त तुम्ही बायोटिनयुक्त टॅब्लेट्स खाऊ शकता जे केसांच्या अंतर्गत देखभालीसाठी गरजेचे असतात. याशिवाय सप्लिमेंट म्हणून तुम्ही मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचेही सेवन करू शकता. केसांच्या वाढीसाठी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे खूपच गरजेचे आहे. म्हणून आयर्न टॅब्लेट्स खा. या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात.

डॉ. रिंकी सांगतात की आहार हा ओमेगा आणि फॅटी अॅसिडयुक्त असावा. जे मांसाहारी आहेत त्यांनी समुद्री मासे, लाल मांस आणि अंडी खायला हवीत आणि जे शाकाहारी आहेत, त्यांनी अॅवोकाडो, जवस, ओट्स, दुग्धजन्य पदार्थ खावेत. याच्यासोबतच गाजर, बीट, लाल पालेभाजी, सफरचंद इत्यादी गडद रंग असलेली फळे आणि भाज्या खाव्यात.

प्रोफेशनल ट्रीटमेंट घ्या

प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट शाहजाद खान यांचे म्हणणे आहे की अनेकदा स्रियांचे केस इतके रुक्ष होतात की त्यांना प्रोफेशनल ट्रीटमेंटची गरज असते. ही ट्रीटमेंट तुम्ही डर्मेटोलॉजिस्ट किंवा प्रोफेशनल सलूनमध्ये घेऊ शकता.

कॅरोटीन ट्रीटमेंट

ही एक प्रकारची प्रोटीन ट्रीटमेंट आहे जिथे केसांच्या आतील स्तर, कोटेक्स दुरुस्त केला जातो. या ट्रीटमेंटमध्ये कोरडया आणि रुक्ष, तुटलेल्या, गळणाऱ्या केसांना नीट केले जाते. यामुळे केस चमकदार होतात, सोबतच मजबूत आणि घनदाटही होतात.

सिस्टीन ट्रीटमेंट

हीदेखील कॅरोटीनसारखीच प्रोटीन ट्रीटमेंट आहे, जी खास करून गुंतलेल्या केसांना नीट करण्याचे काम करते. ही ट्रीटमेंट त्यांच्यासाठी आहे ज्यांचे केस कुरळे तसेच रुक्ष असतात.

तज्ज्ञांचे मत

डॉ. मुर्थे यांनी सांगितले की रुक्ष, निर्जीव केसांसाठी २ प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. एक आहे लेझर ट्रीटमेंट. यात लेझर कोंबच्या मदतीने केसांच्या आतील स्तर दुरुस्त केला जातो आणि दुसरी आहे मिजो थेरपी. याद्वारे एक प्रकारच्या कॅण्डीकेटेड मिश्रणाला टाळूच्या त्वचेच्या आत घालून केसांच्या मुळांना प्रोटीन पुरवले जाते. या दोन्ही ट्रीटमेंट खूपच प्रभावी आहेत.

डॉ. रिंकी सांगतात की, निर्जीव आणि रुक्ष केसांसाठी क्यूआर ६७८ थेरपीच्या ८ ते १० सिटिंग्स गरजेच्या आहेत, तर पीआरपी थेरपी, ज्याला वैंपायर थेरपीही म्हणतात, हीदेखील खूपच प्रभावी समजली जाते. यात शरीरातील काही रक्त काढून ते टाळूच्या त्वचेत इंजेक्ट केले जाते.

या प्रोडक्ट्सचा वापर करा

हेअर स्टायलिस्ट रश्मी धुळे सांगतात की अनेकदा काही महिला चुकीचे प्रोडक्ट वापरून डोक्याची त्वचा डॅमेज करतात. म्हणून त्याच प्रोडक्ट्सचा वापर करावा जे केसांचे नुकसान होण्यापासून वाचवतात.

बोअर ब्रिस्टल ब्रश

हे केसांतील नैसर्गिक तेल टाळूच्या त्वचेवर चांगल्या प्रकारे पसरवायला मदत करते. यामुळे केसांचा कुरळेपणा कमी होऊन टाळूच्या त्वचेमधील रक्तप्रवाह वाढतो.

हीट प्रोटेक्टिंग स्प्रे

तुम्ही जर जास्त करून स्टायलिंग टूल्सचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी हे प्रोडक्ट खूपच गरजेचे आहे. हेअर स्ट्रेटनर असो किंवा ड्रायर, यांच्या वापरापूर्वी हीट प्रोटेक्टिंग स्प्रे वापरा, हा केसांवर एक स्तर तयार करतो, ज्यामुळे केस डॅमेज होत नाहीत.

लिव इन कंडिशनर

याच्या वापरामुळे केस दीर्घकाळ मऊ, मुलायम राहतील आणि त्यांना सांभाळणेही तुमच्यासाठी सोपे होईल. केस धुतल्यावर याला केसांच्या मध्य भागापासून टोकापर्यंत लावा आणि तसेच राहू द्या, कारण हे धुवून टाकण्याची गरज पडत नाही.

तज्ज्ञांचे मत

डॉक्टर मुर्थे यांच्या मते केसांसाठी नेहमी कमी इनग्रीडिएंट असलेले शाम्पू वापरा. खूपच सौम्य आणि सोप फ्री शाम्पू केसांसाठी चांगला असतो. केसात कोंडा असल्यास साबणयुक्त शाम्पू वापरावा.

डॉक्टर रिंकी सांगतात की ज्या स्त्रियांना बाहेर जाऊन काम करावे लागते, त्यांनी नियमित शाम्पू करणे गरजेचे असते. अशावेळी केसांचे नुकसान न होता शाम्पू करायचा असेल तर सल्फेट फ्री मेडिकेटेड शाम्पूचा वापर करावा

हनिमून स्पेशल मेकअप टीप्स

– मधु शर्मा कटिहा

हनिमूनला जिथे पती आपल्या पत्नीवर प्रेमाची उधळण करू इच्छितो, तिथे पत्नीला वाटत असते की तिचा जोडीदार तिच्या रुपावर फिदा व्हावा. तिला फक्त आपल्या जोडीदारासाठीच नटायचे-सजायचे असते, पण तिच्याकडे मेकअप करण्यासाठी वेळ फारच कमी असतो आणि लग्नात खूप नटल्यामुळे त्यानंतर विना मेकअप सौंदर्याची चमक फिकी वाटू लागते. हनिमूनला मेकअपसाठी जास्त सामान घेऊन जाणेही शक्य नसते.

काही खास टीप्स खास तुमच्यासाठी ज्यामुळे कमी वेळेतही तुम्ही आकर्षक दिसू शकता :

चंद्रासारखा उजळ चेहरा

मेकअपपूर्वी बीबी, सीसी किंवा डीडी क्रीम लावा. यांचे वैशिष्टय हे आहे की अनेक प्रकारच्या क्रीमचे काम हे एकटेच करते. हे लावल्यानंतर प्रायमर, कंसीलर, फाऊंडेशन किंवा सनस्कीन लावण्याची गरज नाही.

बीबी क्रीमला ब्लेमिश बाम किंवा ब्यूटी बाम असेही म्हणतात. ते चेहऱ्याला पूर्णपणे कव्हर करते आणि चेहरा चमकू लागतो. चेहऱ्याचा रंग एकसारखा नसेल तर सीसी क्रीम वापरा. हे त्वचेवर सहजपणे एकरूप होते आणि चेहऱ्याचा रंग उजळतो. हेच कारण आहे की याला कलर कंट्रोल क्रीम असेही म्हणतात. जर चेहऱ्यावर पिग्मेंटेशन किंवा डाग असतील तर डायनॅमिक डू ऑल किंवा डेली डिफेन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीडी क्रीमचा वापर योग्य ठरेल. चेहऱ्यासोबतच मानेवरही क्रीम लावणे योग्य ठरते.

गुलाबी गाल

आपल्या त्वचेनुसार ब्लशरचा वापर करून गाल सुंदर बनवता येतात. नववधू हनिमूनला गेली असेल तर पीच किंवा चेरी पिंक कलरच तिच्या गालावर जास्त खुलून दिसतो. फिकट रंगाच्या कपडयांसह प्लम किंवा मरून आणि गडद रंगाच्या ड्रेससह फिकट तपकिरी किंवा बदामी रंग चांगला दिसतो. त्वचेनुसार शुष्क किंवा सर्वसामान्य त्वचेसाठी केक आणि क्रीम बेस्ड ब्लशर, तर तेलकट त्वचेवर पावडर बेस्ड ब्लशर सुंदर दिसू शकतात. ब्लशसाठी जास्त वेळ लागत नाही पण याच्या वापरामुळे गालांसह चेहऱ्यावरही लाली येऊन तो गुलाबासारखा खुलतो.

काळेभोर डोळे

डोळयांना काजळ लावा. ते वॉटरप्रुफ असेल तर अधिक चांगले. जर मेकअप करण्यास पुरेसा वेळ असेल तर ड्रेसच्या रंगाशी मिळतीजुळती आयशॅडो लावा. हनिमूनला जाताना सोबत चांगल्या कंपनीच्या २ किंवा ३ शेड्सचा पॅक पुरेसा ठरतो. यात फिके आणि गडद दोन्ही छटा असतात. ज्या दिवशी वेळ कमी असेल त्यादिवशी आयलायनरचा वापरही करता येईल. भुवया नीट नसतील आणि ट्रीम करायला वेळ नसेल तर त्यांना आयब्रो पेन्सिलने नीट आकार देता येईल.

मस्कारा डोळयांचे सौंदर्य वाढवते, पण लक्षात ठेवा की हनिमूनवेळी केवळ पारदर्शक आणि वॉटरप्रुफ मस्कराच वापरा. पारदर्शक मस्कारा लावल्याने मेकअप हलका होईल आणि पापण्याही दिसतील.

दरवळेल तनमन

लग्नाच्या वेळी नववधूच्या रुटीन मेकअप ट्रीटमेंटदरम्यान नको असलेले केस काढून टाकले जातात. तरीही हनिमूनवेळी ते अडसर ठरत असतील तर वॅक्सिंग क्रीम वापरून काढून टाका. यासाठी डेपिलेटरी क्रीमही वापरता येईल.

स्वच्छ शरीरावर डिओ किंवा परफ्यूम लावा. जोडीदाराची आवड लक्षात घेऊन परफ्यूमची निवड केल्यास उत्तमच. चॉकलेट किंवा वुडी परफ्युम सर्वांनाच आवडतो.

ओलसर ओठ

विविध प्रकारच्या लिपस्टिकच्या अनेक शेड्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रसंगानुरूप वेगवेगळया प्रकारच्या लिपस्टिकची निवड केली जाते.

हनिमूनच्या काळात ओठ आकर्षक दिसण्यासाठी योग्य शेड आणि योग्य प्रकारच्या लिपस्टिकची निवड करून ओठांचे सौंदर्य वाढवा.

अशावेळी किस-प्रुफ लिपस्टिक हा सर्वात चांगला पर्याय आहे. बाहेर फिरायला जाताना दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक वापरणे चांगले. कुठल्याही प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबी, कोरल आणि कॉफी शेड्स चांगले दिसतात.

ओठांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी शिमर किंवा ग्लॉस लिपस्टिकचा वापर केला जाऊ शकतो. या प्रकारात, गडद व्हायलेट, चॉकलेटी, गडद लाल आणि लाल तसेच तपकिरी रंगाने बनवलेली मरसाला शेड खूप सुंदर दिसते.

ओठ सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी तसेच दीर्घकाळ रंगवलेले ठेवण्यासाठीचा उत्तम पर्याय लिप स्टेन हा आहे. हे बहुतेक द्रव स्वरूपात येते, जे तेल आणि रंग एकत्र करून बनविलेले असते. हे लावल्यानंतर ओठ कोरडे होतात, त्यामुळे याचा वापर करण्यापूर्वी क्रीम किंवा लिप बाम लावणे चांगले असते.

हनिमूनवेळी ओले ओठ पतिला मोहित करतील आणि अशा मदभऱ्या ओठांनी प्रेम व्यक्त करण्यातली मजा काही वेगळीच असेल.

सुंदर हात

हातांचे सौंदर्य मोठया प्रमाणात नखांवर अवलंबून असते. आजकाल नेल आर्ट ट्रेंडमध्ये आहे. हनिमूनवेळी नखे सजवण्यासाठी बराच वेळ देणे शक्य नसते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अशावेळी सर्वात चांगला पर्याय म्हणजे रेनबो, मिंट ग्रीन किंवा मॅट ब्लॅक अशा काही वेगळया पण आकर्षक नेलपेंट्स स्वत:सोबत घेऊन जाणे.

हातात लग्नाचा लाल चुडा असेल तर फिकट रंगाच्या नेलपेंटही चांगल्या दिसतात. जर चुडयाऐवजी हातात ब्रेसलेट किंवा थोडया बांगडया असतील तर नेल पॉलिशनंतर ‘ग्लिटर डस्ट’ वापरता येईल. ते वापरणे सोपे आहे.

रेशमी केस

केसांचे सौंदर्य नेहमीच स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते. स्वत:सोबत शाम्पूसह कंडिशनर ठेवायला विसरू नका. छोटे केस दररोज धुता येतात, पण लांब केसांसाठी हे शक्य नाही. म्हणून ओला कंगवा किंवा ब्रशने केस सोडवून त्यांना हेअर क्रीम लावा.

वेळेअभावी सुंदर हेअरस्टाईल करणे शक्य नसते. केस कुरळे असल्यास मोकळे सोडा. सरळ असलेले केसदेखील मोकळे सोडलेलेच चांगले दिसतात. पण जर तुम्हाला केसांना वेगळा लुक द्यायचा असेल तर वरचे केस घेऊन फ्रेंच टेल किंवा हाफ बन किंवा अर्ध्या केसांचा पोनी हा चांगला पर्याय आहे.

एक सोपी पद्धत म्हणजे दोन्ही बाजूंचे थोडे थोडे केस घ्या, ते गुंडाळून बांधा आणि त्यावर क्लिप लावा. काळया किंवा आयवेरी रंगाचे क्लिप कुठल्याही रंगाच्या ड्रेसवर शोभून दिसतात.

सुंदर पाय

पायांना लावलेली चमकविरहीत गडद नेलपॉलिश प्रत्येक ड्रेसवर शोभून दिसते. स्कर्ट किंवा कॅपरीसह एका पायात पैंजणही घालता येईल. सॅन्डल अँकलेट घातले असाल तर प्रियतमाला म्हणावेच लागेल की हे सुंदर पाय जमिनीवर ठेवू नकोस. याची जागा नेहमीच माझ्या हृदयात राहील.

हनिमूनचा आनंद वाढविण्यात मेकअपची असलेली भूमिका नाकारता येत नाही. पण याकडे लक्ष द्या की मेकअपचे दर्जेदार सामानच खरेदी करा. स्वस्त आणि खराब प्रोडक्ट्समुळे त्वचा आणि ओठांना अॅलर्जी होते, यामुळे हनिमूनची मजा खराब होऊ शकते.

ट्रेडिशनल लुकसाठी मेकअप ट्रिक्स

* पूजा भारद्वाज

उत्सवप्रसंगी जेव्हा काही खास परिधान करण्याचा विचार सुरू असतो, तेव्हा महिला साडी, सूट, लहंगासारख्या ट्रेडिशनल खरेदीला पसंती देतात, कारण त्यांना एकदम हटके दिसायचे असते. पण त्यांनी हेसुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे की फक्त एथनिक वेअर परिधान करून त्यांना अट्रॅक्टीव्ह लुक मिळणार नाही, पण योग्य प्रकारे केलेला मेकअप हा त्यांचा आणि त्यांच्या ड्रेसचा ओव्हरऑल लुक चेंज करतो.

फेस्टिव्ह मेकअपच्या वेळेस या गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या :

फाउंडेशन आणते ग्लो

तुम्ही साडी नेसणार असा, लहंगाचोली किंवा मग सलवार सूट. फाउंडेशन प्रत्येक आउटफिटमध्ये तुमचा ग्लो टिकवून ठेवते. कारण ते फक्त चेहऱ्याच्या स्किनलाच हलके करते असे नाही तर चेहऱ्यावरील डाग लपवायलाही हे मदत करते. हे त्वचेला चमकदार बनवते. फाउंडेशन हे स्किनला एकसारखे बनवते. त्यामुळे मेकअप करताना कंसीलरसोबत फाउंडेशनचा वापर करा.

हायलाइटर देतो परफेक्ट लुक

आपल्या ट्रेडिशनल लुकला पूर्ण करण्यासाठी फाउंडेशन नंतर मॅट हायलाइटरचा वापर करा, कारण हा तुम्हाला परफेक्ट कॅमेरा लुक देतो. जर तुम्ही ब्लॅक, आयव्हरी, ब्ल्यू, ग्रीन इ. रंगांचा ड्रेस घालणार असाल, तर आपल्या नोज ब्रीज, चीकबोन्स आणि चीनला गोल्ड कलरने हायलाइट करा. असे केल्याने तुमचे फिचर्स उठून दिसतील. तुम्हाला आवडत असल्यास आपल्या स्किननुसार ब्रॉन्झ, पीच, पिंक शेड हायलाइट तुम्ही निवडू शकता.

डोळयांना बनवा सुंदर

डोळे हे चेहऱ्याचा सर्वात सुंदर भाग असतात आणि मेकअप करून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलवता येते. यासाठी ट्रेंडी आयशॅडो, मस्कारा आणि काजळने आपला लुक एकदम बदलून टाका. हल्ली विंग्ड आयलाइनर इन आहेत, जे डोळयांना परफेक्ट लुक देतात. याशिवाय कलर्ड आयलाइनरही फॅशनमध्ये आहे.

ओठ डिफरंट दिसण्यासाठी

लिपस्टिक लावल्यावरच मेकअप लुक पूर्ण होतो. म्हणूनच आपल्यासाठी योग्य शेडची निवड करा, तुम्ही हवे तर मॅट किंवा ग्लॉसी लिपस्टिक निवडू शकता. जर तुमचा आय मेकअप डार्क असेल तर चेहऱ्यावर मेकअपचा बॅलन्स राखण्यासाठी ओठांवर लाइट शेड जसे की बेबी पिंक किंवा लाइट पीचच लावा किंवा रेड शेड लावून तुम्ही आपल्या मेकअपला बोल्ड लुकही देऊ शकता.

बॅलन्स आहे जरुरी

ट्रेडिशनल, एथनिक वेअरमध्ये एम्ब्रॉयडरी ब्लाउज, लेहंगा, हेवी साडी यांचा समावेश होतो. त्यामुळे हे आवश्यक असते की तुमचा मेकअप आणि ड्रेस एकमेकांना पूरक असला पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही हेवी ड्रेस आणि हेवी ज्वेलरी घालणार असाल तर तुमचा मेकअप हा मॅट असला पाहिजे आणि जर कंटेपररी लुक हवा असेल तर न्यूड मेकअप करावा.

हे सुद्धा जाणून घ्या

* हल्ली न्यूड मेकअपसुद्धा खूप फॅशनमध्ये आहे. हा मेकअप तुम्हाला एकदम वेगळा लूक देतो. बऱ्याचशा सेलिब्रिटीजही या लुकला पसंती देत आहेत.

* हल्ली विंग्ड आयलाइनरची फार क्रेझ आहे. अनेकदा मुली ट्रेडिशनल वेअरसोबत पूर्ण आय मेकअप न करता फक्त विंग्ड आयलाइनर लावून हटके दिसण्याचा प्रयत्न करतात.

* लाल लिपस्टिक फार पूर्वीपासून ट्रेंडमध्ये आहे, जी बोल्ड लुक देते.

* डोळयांचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तुम्ही कृत्रिम आयलॅशेस वापरा. यामुळे डोळे टपोरे आणि मोठे दिसतील.

* ट्रेडिशनल लुकसोबत स्मोकी आइज मेकअप छान दिसतो, पण या दिवसांत प्लेन स्मोकी लुकआउट ऑफ फॅशन आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅचिंग कलर डोळयांवर अॅड करू शकता.

* जर तुम्हाला टाइमलेस लुक हवा असेल, तर जेल आयलाइनर लावा, जो तुम्हाला एक शानदार लुक देईल.

सँडलच नाही पायसुद्धा असावेत सुंदर

– प्राची भारद्वाज

केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला आपल्या पायांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या मते पायांची घेतलेली काळजी आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्तता देण्यात सहाय्यक ठरू शकते. यासाठी तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे :

पायांना मोकळा श्वास घेऊ द्या

* अंघोळीनंतर ओल्या पायांना संपूर्ण कोरडे करूनच चपला किंवा सँडल्स घालावेत, कारण ओलसरपणामुळे तिथे सहज बॅक्टेरिया उत्पन्न होऊ शकतात. अनेकदा पायांच्या बोटांमध्ये चीर पडते किंवा खाज येते, हे फंगस असल्याचे लक्षण आहे.

* ऑफिस किंवा पार्टीवरून घरी आल्यावर ताबडतोब पायातले शूज काढून पायांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. सुती मोजे घालावेत, पण काही वेळातच पाय सुती मोज्यातही घामाने भिजू लागतात.

ब्लड सर्क्युलेशनही तेवढेच आवश्यक

* बराच वेळ पाय खाली अधांतरी ठेवू नका. काही वेळ पाय वर घेऊन बसावे, जेणेकरून त्यांच्यात रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहील.

* आपल्या पायाचे अंगठे आणि इतर बोटे दिवसातून २-३ वेळा ५ मिनिटे मागेपुढे करून हलवावेत. टाचासुद्धा वरखाली फिरवल्या पाहिजेत.

काही चांगल्या सवयी लावा

* अंघोळ करताना प्युमिक स्टोन, फूट स्क्रब किंवा फाइलरने पाय स्वच्छ करायची सवय करून घ्या. यामुळे पायाच्या मळासोबत मृत त्वचाही निघून जाते.

* दररोज झोपण्यापूर्वी पायांना मॉइश्चरायझर जरूर लावावे. पायांवर शीया बटर, कोको बटर लावून सुती मोजे घालावेत.

* जर तुम्हाला मासग्रंथीच्या गाठीची समस्या असेल तर मसाज क्रीम विकत घेताना सॅलिसिलिक अॅसिड किंवा युरिया असलेले क्रीम घ्यावे, ज्यामुळे पायाच्या गाठी गळून जायला मदत होईल.

* पाय फुटण्याच्या समस्येसाठी पेट्रोलॅटम किंवा लॅक्टिक असिड असलेले क्रीम वापरा.

* जर तुमच्या पायांना घाम येण्याची समस्या असेल तर कॅलेंडुला किंवा क्लोट्रिमाजोलसारखी औषधी पावडर शिंपडू शकता.

* नखांना क्युटिकल क्रीम, व्हिटॅमिन ई किंवा पेट्रोलियम जेली लावून मसाज करावा.

या गोष्टीही विसरू नका

* आपल्या पायांची नखे वेळोवेळी कापत जा. वाकडी तिकडी, तुटलेली नखे खराब तर दिसतातच पण चपला घातल्यावर त्रासही देतात.

* नेलपॉलिश फार वेळ लावून ठेवू नये. काही वेळ नखे विना नेलपॉलिश ठेवली तर त्यांच्यात फ्रेशनेस येतो.

* जुन्या नेलपॉलिशवर कधीही नवा थर चढवू नका, आधी जुने नेलपॉलिश काढून टाका.

* जर तुमची नखे बेरंग, जाडी, तुटलेली असतील तर त्यांना लपवण्यासाठी नेलपॉलिश लावू नका. परिस्थिती बिघडण्याआधी डॉक्टरला दाखवा.

फुटवेअर

* दररोज उंच टाचेच्या चपला घातल्याने पायांच्या हाडांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हाय हील्स हे कधीतरीच वापराव्यात.

* जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही कापडी किंवा चामडयाचे शूज वापरा.

* सँण्डल किंवा शूज यांची योग्य फिटिंग असणे फार महत्वाचे आहे. दिवसभर टाइट सँडल्स किंवा शूज घालून पायांना सूज येऊ शकते तर शिवाय सँडल किंवा शूज घातल्याने पाय लचकण्याचीही शक्यता असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें