रीना मधुकर ‘मन उडू उडू झालं’साठी आहे उत्सुक!

* सोमा घोष

ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे अभिनेत्री रीना मधुकर उर्फ रीना अगरवाल हिच्या बाबतीत.

अभिनेत्री रीना मधुकरने आतापर्यंत तिचा सोशल मिडीया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात तिने आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’ हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेसिंक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं आणि ‘३१ दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. थोडक्यात काय तर, रीना मधुकरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं. आता रीना झी मराठीवरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे.

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, “‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं आणि मला आवडलेलं. हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. झी मराठी वाहिनी ही देखील माझ्यासाठी खास संधी आहे कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे. तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होमच चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो.”

यापूर्वी रीनाने मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे, त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या. ग्लॅमरस रीनाचा ऑनस्क्रिन नवा लूक आणि नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रिट ठरणार हे नक्की.

‘कुसुम’ सोनी मराठी वाहिनीवर!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का? ‘सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली  वाटते.

ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी!

* सोमा घोष

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही  रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची  जबाबदारी संभाळतेय.  वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

साहिल अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही.  वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो.

वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी  उत्सुकतेचं असणार आहे.

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दली आणि त्यांच्याकडून  बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत  पाहायला मिळेल. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी  प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

पाहा, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, सोम. -शनि.,  संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘जिंदगानी’ या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच!

*प्रतिनिधी

कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत आता अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार असून नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

‘जिंदगानी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या ‘प्रभाकर’ आणि ‘सदा’ या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत.

जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

स्वातंत्र्यदिन विशेष, कोण होणार करोडपती

स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत.

कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी  खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराईसामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे याभागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटक सृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार  अभियनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम  कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत.

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला

मनोज बाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत. मनोज बाजपेयींनी  हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज बाजपेयी  यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावेपाहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही  सांगितलं आहे.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’

कर्मवीर विशेष, १४ ऑगस्ट, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीर.

‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भाग

*सोमा घोष

या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील येणार आहेत. भास्करराव पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला ‘आदर्श गाव’ पुरस्कार मिळाला आहे. गावाला आत्तापर्यंत विविध २२ पुरस्कारही मिळाले आहेत. दर १५ मिनिटांवर हात धुण्याची सोय, स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स, शेतीसाठी गावात पाणी आणण्याची सोय, एक गाव एक गणपती योजना, अद्ययावत शाळा; असे अनेक उपक्रम भास्कररावांनी आपल्या गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी राबवले आहेत.

भास्कररावांनी महासत्ता म्हणजे नेमकं काय आणि ती कशी असावी, याबद्दलही सांगितलं. त्यांना वाचनाची आवड आहे. वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि आपल्या गावाचा विकास करणं त्यांना आवडतं. गावात प्रत्येकानी शिक्षित असावं, आपल्या पायांवर उभं असावं असा त्यांचा प्रयत्न असतो. माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून भास्कररावांचा सन्मान झाला आहे. या आदर्श गावाला अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी भेट दिली आहे.

कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ‘घरबसल्या लखपती’ होण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती – प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि/किंवा हॉट सीटवर येण्याची संधी.

पाहा, ‘कोण होणार करोडपती – कर्मवीर विशेष’ ३१ जुलै, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

मी अभिनयासाठी फारसा संघर्ष नाही केला – किरण ढाणे

* सोमा घोष

मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही… मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.

पहिल्यांदा अभिनयाच्या इच्छेबद्दल पालकांना सांगताना त्यांचे भाव कसे होते?

त्यांनी अगोदर नकार दिला, तसं माझ्या कुटुंबियांनी मला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय, परंतु फिल्म इंडस्ट्रीबद्दल गैरसमज होते. त्यांना वाटायचं की मुली तिथे सुरक्षित नाहीएत. याशिवाय साताराहून मुंबईला जाऊन राहणं आणि संघर्ष करणं माझ्यासाठी खूप कठीण असेल. मीदेखील अभिनयाची इच्छा थिएटरने पुर्ण करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या पालकांनी मला सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला सांगितलं. मग अभिनय सोडून अभ्यास सुरु केला. यादरम्यान अभिनय शिकविणाऱ्या एका सरांनी माझ्यासाठी एक ‘वन अॅक्ट’ नाटक लिहिलं, परंतु मी अभिनय करण्यास नकार दिला, परंतु त्यांनी विनंती केल्यानंतर मी केलं आणि मला त्यावर्षी युनिव्हर्सिटीचं बेस्ट अॅक्ट्ररेसचा पुरस्कार मिळाला.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

‘वन अॅक्ट’ नाटक करत असताना मला ‘पळशीची पी. टी.’च्या दिग्दर्शकांनी पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. यापूर्वीदेखील मला दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, परंतु मी नकार दिला. या चित्रपटाची कथा ऐकून ती करण्याची इच्छा झाली त्यानंतर घरातल्यांची परवानगी घेऊन मी तो चित्रपट केला. त्या चित्रपटाचे लेखक तेजपाल वाघ एक नवीन मराठी मालिका ‘लागिर झालं जी’ लिहित होते. त्यांनी चित्रपटाच्या सेटवरच माझी ऑडिशन घेऊन त्या मालिकेच्या चॅनेलला पाठवलं. यामध्ये मी नकारात्मक प्रमुख भूमिका साकारली होती.

तुला हिंदीमध्ये काही करण्याची इच्छा आहे का?

मी काही दिवसांपूर्वी वेब सिरीजच हिंदीमध्ये पायलट शूट केलं होतं, परंतु पुढे काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मला हिंदीत अभिनय करण्याची इच्छा आहे. मराठी मालिकेनंतर मला हिंदीत निगेटिव्ह भूमिकेसाठी ऑफर आली होती, परंतु मला ते करायचं नव्हतं. ‘लागिर झालं जी’मध्ये मी नकारात्मक भूमिका जयडी साकारली होती आणि आणि ती मालिका यशस्वी झाल्यामुळे लोकं मला त्याच नावाने अजूनही ओळखतात.

मराठी फिल्म इंडस्ट्रित तुला कधी कास्टिंग काऊचला समोर जावं लागलं का?

मला इंडस्ट्रित काम करण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही कारण मला समोरूनच पाहिली ऑफर मिळाली. त्या सेटवर मला दुसरी मालिका मिळाली, त्यानंतर माझा अभिनय पाहून ‘एक होती राजकन्या’मध्ये काम मिळालं. मी मराठी चित्रपट अगोदर केला होता, परंतु मालिका अगोदर टीव्हीवर आली आणि नंतर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं, कारण हा चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. मला २०१८ साली डेब्यू बेस्ट अॅक्ट्ररेस म्हणून ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मिळाला, ज्यामुळे मला मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळाली आणि काम मिळणं सहजसोपं झालं. अजून मी तीन चित्रपटांचं चित्रीकरण केलंय, परंतु लॉकडाऊनमुळे डबींगचं काम बाकी आहे, जे लॉकडाऊननंतर करायचं आहे. सगळं काम पूर्वीचा अभिनय पाहून मिळालंय. मला मुंबईला जाऊन अभिन्यासाठी काम शोधावं नाही लागलं. साताराला काम मिळाल्यानंतर मुंबईत आली. त्यामुळे मला कास्टिंग काऊच वा नेपोटीजमबद्दल माहिती नाहीए.

सध्या तुझी दिनचर्या कशी असते?

मला वेगवेगळया भूमिका साकारायची इच्छा आहे आणि याची मी वाटदेखील पाहतेय. याशिवाय सध्या आगामी प्रोजेक्टसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. त्याचा सराव करते, ज्यामध्ये आरशात पाहून स्वत:शी बोलणं, भाव वेगळया पद्धतीने प्रकट करणं इत्यादी करते.

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमर तुला किती आकर्षित करतं?

मी सुरुवातीला जेव्हा काम करायला आली होती, तेव्हा इंडस्ट्रीचं काम पाहून घाबरल्यामुळे मला ते करावंसं वाटत नव्हतं, कारण इंडस्ट्रीत माझ्या मागून लोकं काहीही बोलायची, जे मला नंतर समजायचं. गैरसमज पसरविणारी लोकं मला आवडत नाहीत. खरं म्हणजे ते माझ्या यशावर जळतात, खरंतर त्यांचं आणि माझं काम पूर्णपणे वेगळं होतं. यासार्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत मी पुढे काम करत गेली, तेव्हा चांगली लोकं मिळाली.

तू किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

मला वेगवेगळे पेहराव घालायला आवडतात, मी ते घालत असते. शॉपिंग खूप आवडते. मी खूप फुडी आहे आणि वेगवेगळया डिश आवडतात. तणावात असते तेव्हा अधिक खाते. आईच्या हातचं चिकन खूप आवडतं. मी गुलाबजाम खूप छान बनवते.

तू पावसाळयात स्वत:चं सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दिवसभराचा मेकअप उतरवणं गरजेचं आहे, कारण यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येतात. मी पाणी खूप पिते आणि चेहऱ्यावर फक्त नॅचरल प्रॉडक्ट्स लावते. साताऱ्यातदेखील मी नैसर्गिक गोष्टींनी बनलेल्या स्किन केयर प्रॉडक्ट्सने त्वचेची काळजी घ्यायची.

आवडता रंग – सर्व रंग, खास काळा, बॉटल ग्रीन, इंद्र्रधनुष्य रंग.

आवडता पेहराव – भारतीय पेहराव, साडी, सलवार सूट.

पर्यटन स्थळ – परदेशातील मालदीव, भारतात केरळ आणि काश्मीर.

आवडतं पुस्तक – अट्मोस्ट हॅप्पीनेस -अरुंधती रॉय.

वेळ मिळाल्यावर – चित्रपट पाहणं आणि पुस्तकं वाचणं.

परफ्यूम – अर्माफ

स्वप्नातील राजकुमार – शाहरुख खान वा शाहिद कपूरसारखा.

जीवनातील आदर्श – गरजवंत आणि पेट्सची मदत करणं.

सोशल वर्क – आजूबाजूला राहणाऱ्या गरजवंताना मदत, तेदेखील जात, धर्म न जाणून घेता.

हास्यजत्रेच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लीवर

*प्रतिनिधी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून, दर रविवारी रात्री ८ ते १० असा २ तासांची ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं केलं आहे. प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन व्हावं यासाठी आता रविवारी २ तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. १८ जुलैला ‘रविवारची हास्यजत्रा’च्या भागात कॉमेडी किंग दस्तुरखुद्द जॉनी लीवर येणार आहेत. जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. कॉमेडी किंग येणार आणि मंचावर येणार नाहीत असं कसं शक्य आहे. या भागात हास्याच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्व स्किट्स पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि एवढंच नाही तर त्यांनी सर्व कलाकारांचं आणि हास्यजत्रेचं तोंडभर कौतुक केलं.

प्रेक्षकांना या भागात भरपूर धमाल, मस्ती आणि मनोरंजन यांनी ठासून भरलेली  स्किट्स पाहायला मिळणार आहेत. पाहा, ‘रविवारची हास्यजत्रा’ १८ जुलैपासून दर रविवारी रात्री ८ वा.

पद्मश्री नाना पाटेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर…

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत.

‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या  भागात पद्मश्री अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत  तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.

पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेष, १७ जुलै, शनिवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें