* सोमा घोष
मराठी मालिका ‘लागीर झालं जी’मधून अभिनयाला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री किरण ढाणे महाराष्ट्रातील साताऱ्याची आहे. तिने या मालिकेत जयश्री (जयडी) ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिका हिट झाल्यामुळे किरणला घरोघरी ओळख मिळाली, परंतु तिने ही मालिका मध्येच सोडून ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत अभिनय करण्यासाठी गेली, कारण यामध्ये किरणची सकारात्मक प्रमुख भूमिका होती. तिला सकारात्मक भूमिका साकारायला आवडते. किरणला पहिला ब्रेक ‘पळशीची पी. टी’ या मराठी चित्रपटात वयाच्या विसाव्या वर्षी मिळाला, ज्यामध्ये तिने धावपटू पी. टी. उषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांनी खूपच कौतुक केलं आणि या चित्रपटाला तीन नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. किरणच्या या प्रवासात तिची आई राणी ढाणे, वडील मारुती ढाणे आणि बहीण प्रतीक्षा ढाणे यांची खूप मदत झाली. विनम्र आणि हसतमुख स्वभावाच्या किरणला प्रत्येक नवीन कथा आकर्षित करते. प्रत्येक व्यक्तीरेखेशी ती स्वत:ला जोडते. किरणशी तिच्या प्रवासबद्दल बातचीत झाली. सादर आहेत काही खास अंश :
अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
मी अभिनयबद्दल फारसा विचार केला नव्हता, परंतु लहान वयातच मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. कॉलेजमध्ये शिकत असताना युथ फेस्टिवलसाठी मी नाट्य स्पर्धेत शिक्षकांच्या सांगण्यावरून भाग घेतला आणि सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी मला अभिनय करण्याचा सल्ला दिला. हे खरंय की मला अभिनयात एक वेगळी व्यक्तीरेखेत जगायला आवडायचं, कारण ते जगून तो भाव दाखवणं एक आव्हान होतं. याव्यतिरिक्त मला वाचायला आवडतं आणि वाचन करताना पूर्ण दृश्य व्हीज्युअलाईज करू लागायची. गोष्टीत मी स्वत:ला पहायला लागायची. त्यानंतर मी अभिनयात जाण्याचं ठरवलं. लहानपणी मी वेगवेगळया क्षेत्रात जाण्याबद्दल विचार करायची. कधी पोलिस, कधी एअर हॉस्टेस, तर कधी आणखीन काही... मग विचार केला या सगळया व्यक्तीरेखा अभिनयात करता येतील आणि अभिनय माझ्यासाठी योग्य आहे.