* डॉ. सोनल अग्रवाल
स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक काळापासून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत आल्या आहेत. मात्र, पूर्वी ही सौंदर्यप्रसाधने हळद, लिंबू, मेंदी, चंदन, फुले यांपासून तयार केली जात असत. त्यांच्या वापराने कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता, सौंदर्यवर्धनच होत होते. मात्र, आज बहुतेक सौंदर्यप्रसाधनांत अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो.
याबरोबरच, आज प्रसिद्ध कंपन्यांच्या प्रसाधनांप्रमाणे दिसणारी स्वस्त, नकली प्रसाधने बाजारात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे, काही महिला स्वस्तच्या नादात ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याऐवजी, नकली व सामान्य प्रसाधने खरेदी करून स्वत:वर संकट ओढवून घेतात. या डुप्लिकेट सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये खालच्या दर्जाचा आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.
या, जाणून घेऊ की सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी :
सौंदर्यप्रसाधनांचे संभावित दुष्परिणाम
सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या वेगवेगळया रसायनांच्या प्रभावामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना श्वसन तंत्राची अॅलर्जी होऊ शकते. त्वचेमध्ये लालसरपणा, खाज, फोडया, चकत्या इ. होऊ शकतात. मग अॅलर्जीमुळे सर्दी, डोळयांची जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, एवढेच नव्हे, तर दमाही होऊ शकतो.
अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये कोलतारचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर, हा कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकतो. याच्या दुष्परिणामाने मूत्राशयाचा कॅन्सर, नॉनहॉजकिन लिंफोमा इ.चीही शक्यता वाढते.
काही चेहऱ्यांवर डाग, मुरमे, डाग घालविणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने संवेदनशील त्वचा असणाऱ्यांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांप्रती संवेदनशीलता उत्पन्न झाल्याने फोडया, मुरमे नष्ट होण्याऐवजी आणखी वाढू शकतात.
टाल्कम, डस्टिंग पावडर, कॉम्पॅक्ट इ.चा वापर केल्याने त्वचेची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरमे, सुरकुत्या, चकत्या होऊ शकतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक कोमलता नष्ट होते. त्याचप्रमाणे, त्वचा शुष्क, निस्तेज व अनाकर्षक होते.
निकृष्ट प्रतिच्या लिपस्टिक दीर्घकाळ लावल्यास ओठांची श्लेष्मा पापुद्रे आकुंचित होतात. ओठ काळे, निस्तेज होऊन फुटतात. लिपस्टिकमध्ये असलेली रसायने थोडयाशा प्रमाणात शरीरात जातात, त्यामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतो.
नेलपॉलिशचा जास्त वापर केल्याने, नखांची नैसर्गिक चमक कमी होते. ती कमकुवत, खरखरीत होऊन तुटू शकतात. काही तरुणींना अॅलर्जीमुळे नखांच्या पेरांना फोडया किंवा खाज येऊ शकते.