* गरिमा पंकज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
मुलांची काळजी कशी घ्यावी?
मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.
कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.
तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.