* सोमा घोष
मुंबईच्या इतिहासात काळा घोडा कला महोत्सवाचे खूपच महत्वाचे स्थान आहे. विविध कलांचा अनोखा मेळ घालणारा काळा घोडा फोस्टीव्हल पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आणखी भव्य स्वरुपात आणि मोठ्या विस्तारात आयोजित केला जाणार आहे. काळा घोड्यातील रस्त्यांचे रुपांतर एका जत्रेत होईल आणि प्रत्येकाचे मनोरंजन होईल यात शंका नाही. कला, संस्कृती, वारसा, नाटक, गाणे आणि नृत्याची रेलचेल असलेला हा फेस्टीव्हल तुमची वाट पाहाणार आहे. तेव्हा तुम्ही तयार व्हा काळ्या घोड्याच्या पंखावर स्वार होऊन कलेच्या नव्या सफरीचे साक्षीदार होण्यासाठी.
गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण जग बंद झाले होते. मात्र काळा घोडा फेस्टीव्हलमध्ये खंड पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जगातील सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) त्याच्या डिजिटल अवतारासह जागतिक झाला होता आणि नऊ दिवसांमध्ये ७० हून अधिक ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आता फेब्रुवारी २०२२ मध्ये काळा घोडा आर्ट फेस्टीव्हल KGAF एका नव्या 'उडान' थीमसह समोर येणार आहे. १०० वर्षे जुनी हेरिटेज इमारत – छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ज्यात बाल संग्रहालय, कुमारस्वामी हॉल, अॅम्फीथिएटर, लॉन आणि काही ठिकाणे आहेत, यासह ९ दिवस मुख्य ठिकाणांवर या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात सुंदर मैदानी जागा; मॅक्स म्युलर भवन – ज्यामध्ये कला आणि वास्तुकला, NGMA ऑडिटोरियम, हॉर्निमन सर्कल गार्डन, किताब खाना, या भागातील रस्ते आणि काळा घोडा परिसरात महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी रस्त्यांवर स्टॉल्स उभारले जाणार नसल्याने ग्राउंड इंस्टॉलेशन्स अत्यल्प आहेत. यात उडान या थीमला अनुसरून, डेकोर लाइटिंगने भरलेले बहुतेक एरियल व्हिज्युअल आर्ट्स इंस्टॉलेशन्स असतील.
काही इमारतींच्या दर्शनी भागावर भित्तीचित्रे रंगवली गेली आहेत. KGAF यावर काम करीत असून ही भित्तीचित्रे या नियमित परिसराच्या पलीकडेही असणार आहेत. कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन, वॉक-इन टाळण्यासाठी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच सामाजिक अंतर कायम ठेवणेही आवश्यक आहे.