* साधना शाह
पावसाळयाचा मौसम उन्हापासून सुटका करत असला तरी यामुळे दुसऱ्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांत डासांमुळे होणारे आजार जसे की, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया इत्यादींचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या बाजारात डास पळवून लावणाऱ्या कॉइलपासून ते कॉर्डपर्यंत आणि स्प्रेपासून ते क्रीमपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत.
याशिवाय डास मारणारे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व अॅप्सही उपलब्ध आहेत. अल्ट्रासाऊंड अँटीमॉस्क्युटो उपकरणेही बाजारात आली आहेत. ही उपकरणे तयार करणाऱ्या कंपनींचा असा दावा आहे की, ही उपकरणे हाय फ्रीक्वेन्सीवर एका विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. हा अल्ट्रासोनिक साऊंड डासांना जवळ येण्यापासून रोखतो.
प्रत्येक घरात विविध कंपन्यांची कॉइल्स, फवारण्या, क्रीम वगैरे वापरले जात आहे. मार्केटमध्ये प्रत्येक वेळी नवीन रिपलेंट्स येत असतात. परंतु याचा वापर करुनही डास पळून जात नाहीत. यावरुन हे स्पष्ट होते की, हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. भारतात हा ५-६ कोटींचा व्यवसाय आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी या व्यवसायात ७ ते १० टक्क्यांपर्यंतची वाढ होत आहे. परंतु, रिपलेंटच्या व्यवसायाची जितकी भरभराट होत आहे तितकाच डासांचा प्रादुर्भावही वाढत आहे.
संशोधक असे सांगतात की, बाजारात जितके शक्तिशाली रिपलेंट येते तितकीच डास त्याच्याविरुद्ध लढण्यासाठीची ताकद स्वत:मध्ये निर्माण करतात. जर असे असेल तर याचा असा स्पष्ट अर्थ आहे की, बाजारात जितके अॅडव्हान्स रिपलेंट येते तितकेच माणसासाठी ते जास्त धोकादायक ठरते, कारण डास त्याला न घाबरता सहज हरवतात.
रिपलेंटचा आरोग्यावर परिणाम
रिपलेंट बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडे नोंदणी करावी लागते. पण मंडळाचे काम एवढेच आहे. एकदा नोंदणी प्रक्रिया संपली की आरोग्यावर होणाऱ्या कीटकनाशकांच्या दुष्परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. रिपलेंट्ससोबतच आज बाजारात पर्सनल केअर उत्पादन, रूम फ्रेशनर्सपासून सुगंधी साबण आणि डिटर्जंट पावडरपासून ते कपडे धुऊन देण्यापर्यंतची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की, उत्पादन एखाद्या सुप्रसिद्ध कंपनीचे असले तरीही त्यात रासायनिक सुगंधाचा वापर केलेला असतो, ज्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.