स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

* नम्रता पवार

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी ‘अस्तित्व’,  दुपारी ‘मोरूची मावशी’ तर सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अस्तित्व’ या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

याबद्दल भरत जाधव म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही  नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.”

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा

* सोमा घोष

राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा! ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल  हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून  स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे  पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

पाहायला विसरू नका, ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, लग्नसोहळा महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’

* नम्रता पवार

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन-रोहन यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर चंदन कांबळे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. अंकित मोहन आणि मंदार मांडवकर यांच्यावर चित्रीत झालेले हे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. हळदी समारंभ गाजवणाऱ्या या गाण्यातील हूक स्टेपही लवकरच ट्रेंडिंगमध्ये येईल.

Link : https://youtu.be/AmsU97AWVmc?si=lNKO6jWI4iEVJ9CN

या गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” कोळी आगऱ्यांची हळद म्हणजे तुफान धमाल असते. त्यामुळे या चित्रपटातही असे उत्साहाने भरलेले एखादे गाणे असायलाच हवे, असा अट्टाहासच होता. त्यामुसार ‘दादल्या’ गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. या गाण्यात काही ठराविक स्टेप्स सोडल्या तर आम्ही नृत्यासाठी प्रत्येकाला मोकळीक दिली होती. त्यामुळे हे गाणे अतिशय कमाल चित्रित झाले आहे. त्यात रोहन-रोहनच्या जबरदस्त संगीताने यात अधिकच रंगत आणली आहे आणि या सगळ्याला जोड लाभली आहे ती गाण्याचे बोल आणि गायकाची. त्यामुळे पुढे आता हळदी संभारंभात हे गाणे आवर्जून वाजणार हे नक्की!”

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली असून चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, मंदार मांडवकर, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेचे ६०० भाग पूर्ण

* सोमा घोष

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ मिळाली.

आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे. वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली होती, पण आता हॉस्पिटलमध्येच रुग्णांची सेवा‌ करून बयो आपले शिक्षणही घेते आहे.

मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली. सोबतच वडिलांचा शोध आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी बयोही आपण पहिली. ही भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे. मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला. या वेळी मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते. इराची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा गायकवाडही उपस्थित होती. त्याशिवाय ६०० भागांचं निमित्त म्हणून लहानपणीच्या बयो आणि इरा यांनीही उपस्थिती लावली आणि एकत्र साजरा केला ६००वा भाग.

या वेळी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली हा ६०० भागांचा टप्पा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय पूर्ण करू शकलो नसतो. प्रेक्षकांचे प्रेम जर असेच पाठीशी राहिले तर आम्ही अजून जोमाने काम करू. मालिकेच्या संपूर्ण चमूने एकत्र येऊन हा महत्त्वपूर्ण  टप्पा साजरा केला आणि आनंद व्यक्त केला. आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल. इरा आणि बयो यांच्यामधील वाद पुढे आता काय वळण घेईल हेही आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल.

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही मालिका!

सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

* सोमा घोष

अपारशक्ती खुरानाचा आगामी चित्रपट ‘बर्लिन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत असताना आता या चित्रपटाचा मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन प्रीमियर होणार आहे.

इंस्टाग्रामवर ही खास गोष्ट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले #बर्लिनचा थरारक प्रवास सुरूच आहे! प्रतिष्ठित @iffmelbourne ✨#IndianFilmFestivalOfMelbourne च्या १५ व्या आवृत्तीत हा चित्रपट ऑस्ट्रेलियन प्रीमियरसाठी सज्ज आहे!

बर्लिन’ एका मूकबधिर तरुणाची कथा सांगणार आहे ज्याला गुप्तहेर म्हणून ब्युरोने अटक केली आहे. एक वेधक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कुतूहलाच्या रोलरकोस्टरवर नेण्याचे वचन देतो. अतुल सभरवाल दिग्दर्शित या चित्रपटात इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी यांच्याही भूमिका आहेत.

‘बर्लिन’ व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना ‘स्त्री 2’ मध्ये दिसणार आहे ज्यामध्ये तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती भूमिका ‘बिट्टू’ पुन्हा साकारताना दिसेल. तो सध्या लंडनमध्ये ‘बदतमीज गिल’साठी शूटिंग करत आहे ज्यामध्ये तो परेश रावल आणि वाणी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय त्यांच्याकडे ‘फाइंडिंग राम’ नावाचा डॉक्युमेंटरीही आहे.

‘बाबू नाय… बाबू शेठ’

* नम्रता पवार

बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर ‘बाबू’नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ आगस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलिया भट्ट ‘अल्फा’च्या शूटिंग सेटवर दिसली !

* सोमा घोष

बॉलीवुड सुपरस्टार आलिया भट्टने या आठवड्यात तीच्या मोठ्या अ‍ॅक्शन एंटरटेनर, YRF स्पाय यूनिव्हर्स फिल्म ‘अल्फा’च्या शूटिंगची सुरुवात केली आहे. आम्हाला इथे पक्का पुरावा मिळाला आहे की आलियाला ‘अल्फा’च्या सेटवर दिसली आहे

आम्ही पुष्टी करू शकतो की हा चित्रपटामधील आलियाचा लुक नाही, कारण प्रोडक्शनशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आलियाला आज सकाळी सेटमध्ये जाताना दूरवरून क्लिक केले गेले होते, जिथे सेटची मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली आहे!

पहिली फीमेल लीड YRF स्पाय यूनिव्हर्सचा चित्रपट म्हणून प्रचारित, ‘अल्फा’मध्ये आलिया एक सुपर-एजेंटची भूमिका साकारत आहेत. याचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत, ज्यांनी पूर्वी YRF ची ग्लोबल हिट आणि सर्वानुमतेने प्रशंसित नेटफ्लिक्स सीरीज ‘द रेलवे मेन’चे दिग्दर्शन केले होते, जे भोपाल गॅस त्रासदीच्या घटनांवर आधारित आहे.

YRF स्पाय यूनिव्हर्सने आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, ज्यात ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठान’ आणि ‘टायगर 3’ यांचा समावेश आहे. YRF स्पाय यूनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट सध्या प्रोडक्शनमध्ये आहे, तो म्हणजे ‘वॉर 2’ ज्यात हृतिक रोशन आणि एनटीआर जूनियर मुख्य भूमिकेत आहेत।

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान आहे!’ :  भूमि पेडनेकर

* सोमा घोष

अभिनेत्री, अधिवक्ता आणि क्लाइमेट वारियर, भूमि पेडनेकर पाच भारतीयांपैकी एक आहे ज्यांची जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लीडर्स (YGL) समुदायाचा भाग होण्यासाठी निवड केली आहे: द क्लास ऑफ 2024. भूमी सध्या जिनिव्हामध्ये आहे. जगातील एक यंग ग्लोबल लीडर म्हणून समावेश करण्यात आला आहे!

या महिन्याच्या सुरुवातीला, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 40 वर्षांखालील सुमारे 90 चेंजमेकर्सची यादी प्रसिद्ध केली आहे जे भविष्याला आकार देत आहेत आणि सार्वजनिक आरोग्य, आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि टिकाऊपणा या क्षेत्रांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याद्वारे सकारात्मक बदलांना गती देत आहेत.

एका निवेदनात, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे की 2024 ची यादी राजकारण, व्यवसाय, नागरी समाज, कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील उगवत्या ताऱ्यांच्या उल्लेखनीय गटाने बनलेली आहे.

भूमीशिवाय, या यादीत Nykaa Fashion चे CEO अद्वैत नायर यांचाही समावेश आहे; सोबतच अर्जुन भरतिया, ज्युबिलंट ग्रुपचे संचालक; प्रिया अग्रवाल हेब्बर, वेदांत लिमिटेडच्या बिगर कार्यकारी संचालक; आणि शरद विवेक सागर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, डेक्सटेरिटी ग्लोबल यांचा ही समावेश आहे.

भूमी म्हणते, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील एक यंग ग्लोबल लीडर असल्याचा मला अभिमान आहे! हे मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट सामाजिक हितासाठी समर्पित करण्यास प्रवृत्त करते. ही ओळख आणखी खास आहे कारण पुढच्या वर्षी सिनेमात माझे १० वर्ष पूर्ण होत आहे !”

ती पुढे म्हणते, “जगाच्या विविध भागांतील बदल घडवणाऱ्यांशी संवाद साधून मला सतत प्रेरणा मिळते जे बदल घडवून आणण्यासाठी चर्चा करत आहेत. हे आश्चर्यकारकपणे प्रतिष्ठित व्यासपीठ मला अशा तेजस्वी मनांशी जोडण्याची आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग मागे सोडण्यासाठी शक्ती एकत्र करण्याची संधी देते.

ती पुढे म्हणते, “एक अभिनेता, उद्योजक आणि क्लाइमेट वारियर या नात्याने मला कृतीशील बदलासाठी काम करायचे आहे. माझे मुख्य फोकस क्षेत्र शाश्वततेसाठी रुजत आहे आणि मी आपला ग्रह निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करू इच्छिते. मी सहकार्य करण्याच्या, कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या आणि जागतिक स्तरावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या संधींची वाट पाहत आहे.”

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दशकांपासून, तरुण जागतिक नेत्यांचा मंच आघाडीवर आहे, जो जगातील सर्वात गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी समर्पित असलेल्या नेत्यांचा एक अद्वितीय समुदाय तयार करण्यात आघाडीवर आहे.

बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी नर्गिस फाखरीला हे व्हायचं होतं !

* सोमा घोष

‘रॉकस्टार’ ते ‘मैं तेरा हिरो’पर्यंत अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण प्रवासात काही सर्वात मोठे हिट चित्रपट दिले आहेत. ‘रॉकस्टार’ मुलीने ‘मद्रास कॅफे’, ‘अझहर’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध केलं आहे. ती बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे नर्गिसने स्वतःच उघड केले आहे.

या बद्दल सांगताना नर्गिस म्हणते “मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतच नातं हे सुंदर आहे पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैदयकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं. वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे ”

अलीकडेच ‘मैं तेरा हिरो’ रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरी ने जुन्या आठवणी ना उजाळा दिला. वर्क फ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.

‘‘महिलांनी नेहमीच विचारांवर ठाम राहावे’’ – अश्विनी कासार

* सोमा घोष द्य

सावळया रंगाची, रेखीव आणि कमनीय बांध्याची ३१ वर्षीय मराठी अभिनेत्री अश्विनी कासार मुंबईची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. वकिलीची इंटर्नशिप करत असताना तिला अभिनयाची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. अश्विनीने २०१४ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. तिची पहिली मराठी मालिका ‘कमला’ होती, ज्यामध्ये तिने कमलाची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि तिने अनेक पुरस्कारही मिळवले. त्यांनतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. अश्विनी ‘गृहशोभिका’ वाचते आणि यात प्रसिद्ध झालेले लेख तसेच कथा तिला मोठया प्रमाणावर प्रेरित करतात.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासूनच अश्विनी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होती, तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती भरतनाट्यम् नृत्यांगनाही आहे. सोनी टीव्ही मराठीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत ती एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी तिला तिच्या प्रत्यक्ष आयुष्याशी खूपच मिळतीजुळती वाटते. चला, तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याकडूनच जाणून घेऊया.

या मालिकेत तुझी भूमिका काय आहे? ही मालिका तुझ्या वास्तविक आयुष्याशी किती मिळतीजुळती आहे?

मी अनुजा हवालदारच्या भूमिकेशी शारीरिक बनावटीच्या रूपात खूपच मिळतीजुळती आहे. जेव्हा मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पाहाते तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्टया सुदृढ राहाण्यासोबतच एक ठराविक ध्येय असल्याचेही पाहाते. त्यांचे ध्येय त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते नेहमीच काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सुदृढ शरीरातून त्यांची चपळता झळकते. मला वाचायला आणि लोकांसाठी काहीतरी करायला आवडते. याशिवाय, मी फिटनेस प्रेमी आहे आणि नेहमीच स्वत:ला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते. दररोज व्यायामासाठी वेळ काढते, कारण दैनंदिन जीवनात व्यायाम गरजेचा असतो. माझी प्रशिक्षक सिद्धी ढगे नसेल तर मी धावायला किंवा चालायला जाते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही, मी वकील आहे आणि ६ महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होते. तेव्हा मला वाटले की, मी या क्षेत्रासाठी बनलेले नाही, कारण मी महाविद्यालयात असताना नृत्य आणि नाटक करायचे. मी भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. माझी एकंदरीत आवड अभिनयात होती, माझे करिअर काय असेल हे मला माहीत नव्हते. याबद्दल मी माझ्या आईवडिलांशी बोलले, त्यांनी खूपच पाठिंबा दिला. मी माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे, असा सल्ला दिला. मी पुन्हा पुन्हा ऑडिशनला जाऊनही मला काम मिळत नव्हते आणि तरीही त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आणि शिक्षणातून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळाली.

तुला कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले?

माझे कुटुंब उच्च शिक्षित आहे, मी १५ सदस्यांसह एकत्र कुटुंबात राहाते. माझे आईवडील तसेच कुटुंबातील इतर मला नेहमीच पाठिंबा देतात. मला कधी, कोणीही रोखले नाही. माझ्या मते कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, कारण यश मिळाले, पण कुटुंब नाराज असेल तर त्या यशाला अर्थ उरत नाही. हे क्षेत्र अतिशय अनिश्चित असल्याने ते माझ्यासाठी थोडे चिंतेत असायचे. माझे वडील डॉ. उल्हास कासार शास्त्रज्ञ होते. आईचे नाव सीमा कासार असून बहीण डॉ. शरयू कासार शास्त्रज्ञ तर भाऊ मानस कासार दंतवैद्य आहे.

तुला पहिला ब्रेक कसा आणि कधी मिळाला?

मी उच्च न्यायालयात एका खटल्यासाठी काम करत होते. त्याचवेळी मला ‘कमला’ या मालिकेसाठी एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला. मी मुख्य भूमिकेत होते. ही मालिका विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकावर आधारित होती. फेसबुकवर माझा फोटो पाहिल्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, पण तेव्हा मी माझ्या वकिलीच्या कामात व्यस्त होते आणि मला ऑडिशनला जायची इच्छा नव्हती. त्यांनी मला दुसऱ्यांदा  बोलावल्यावर मी गेले आणि माझी निवडही झाली. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर मला काम मिळाले. या क्षेत्रातील घराणेशाही मला कधीच समजली नाही आणि मी मराठी इंडस्ट्रीत माझ्यासमोर ती कधी पाहिलीही नाही, कारण मी नेहमीच स्वत:साठी स्वत: संघर्ष केला आहे.

तू संघर्ष किती केला?

मी माझ्या कुटुंबासह महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये राहाते आणि तेथूनच मला कामासाठी दूरवरचा प्रवास करावा लागतो. केवळ एक मालिका मिळून फारसा फरक पडणार नव्हता, कारण मला सिद्ध करून दाखवायचे होते की, मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि त्यासाठी मला आणखी कामाची गरज होती. खरंतर कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळया भूमिका साकारण्यासाठीचा संघर्ष मोठा असतो. मी पहिल्या मालिकेत ‘कमला’ या आदिवासी मुलीची भूमिका साकारली. एका सत्य घटनेवर आधारित ही मालिका होती. अशा प्रकारे पहिल्या मालिकेत मी एक अशिक्षित मुलगी दुसऱ्यामध्ये शिक्षण घेतलेली पहिली मुलगी आणि आता आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. पहिली मालिका ‘कमला’मधूनच मला ओळख मिळाली.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे आणि ऑडिशनही द्यायचे आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अंतर्गत दृश्यांची मागणी असेल तर त्यासाठी माझी काहीच हरकत नाही.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

औचित्य पाहून मी फॅशन करते. याशिवाय मी काहीही छान घालू शकते. मी खवय्यी आहे आणि माझी आई खूप छान स्वयंपाक करते. मी साधे जेवण बनवू शकते.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची काळजी तू कशी घेतेस?

मी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावते. केसांच्या संरक्षणासाठी स्कार्फ घालते, त्यामुळे उन्हाळयात केसांचे उन्हापासून संरक्षण होते. उन्हाळयात हायड्रेट राहाणे आवश्यक असते, त्यासाठी मी लिंबू पाणी, कोकम सरबत इ. पीत राहाते.

सत्ता हाती आल्यास तू काय बदलू इच्छितेस?

मला सर्वांची विचारसरणी बदलायची आहे. होय, कारण ती कुटुंब, समाज आणि देश बदलू शकते आणि त्यामुळेच देश पुढे जातो.

तुला काही संदेश द्यायचा आहे का?

माझा संदेश असा आहे की, महिलांनी नेहमी त्यांच्या विचारांवर ठाम राहावे. जे काही काम त्यांना स्वत:साठी करायचे असेल ते त्यांनी करावे आणि त्यातूनच पुढे जावे.

आवडता रंग – जांभळा.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

आवडता परफ्युम – वर्सासे.

आवडते पर्यटनस्थळ – जपान, केरळ.

वेळ मिळाल्यास – झोप, खाणे, वाचन.

जीवनातील आदर्श – स्वत:शी प्रामाणिक राहाणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलींसाठी काहीतरी करायचंय.

स्वप्नातील राजकुमार – वाचन, फिरण्याची आवड आणि महिलांचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – काम करा आणि समाधानी राहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें