दिर्घ कथा * राकेश भ्रमर
एखाद्याला विसरायला दहा वर्षांचा काळ तसा कमी नसतो. पण आठवणीत कडवटपणाचं विष भिनलेलं असेल तर मात्र विसरणं तेवढंसं सोपं नसतं. गेली दहा वर्षं डॉ. आशीष हे विष पित होता. आता कुठं तोंडाचा कटवटपणा जरा कमी झाला होता, तेवढ्यात विषाचं प्रमाण दुप्पट झालं.
दुपारी दीडचा सुमार. यावेळी डॉक्टर क्लिनीक बंद करतात. पण अजून एक पेशंट उरला होता. त्यांनी त्या पेशंटला आत पाठवायला सांगितलं अन् शेजारच्या स्टुलावरचा पेपर बघायला सुरूवात केली.
पेशंट दार उघडून आत आल्यावरही त्यांची नजर पेपरवरच होती. त्यांनी एका हातानं पेशंटला बसायची खूण केली अन् पेपर बाजूला करून पेशंटकडे बघितलं अन् ते एकदम दचकले.
डोळ्यापुढे काजवे चमकल्याचा भास झाला. चेतना लुप्त झाल्यासारखी वाटली. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य…ते पापणी न हलवता समोर बसलेल्या स्त्रीकडे बघत होते. मग भानावर येत त्यांनी म्हटलं, ‘‘तू…? म्हणजे तुम्ही?’’
स्थिर आवाजात ती म्हणाली, ‘‘होय, मीच.’’ तेवढं बोलून ती गप्प बसली अन् टक लावून डॉक्टरांकडे बघत राहिली. दोघंही एकमेकांकडे बघत होती. डॉक्टर आशीषला पुढे काय बोलावं ते सुचेना.
थोडा वेळ असाच गेल्यावर डॉक्टरांनी आपल्या डोक्यातील निरर्थक विचार परतवून लावत स्वत:ला संयत केलं अन् मग व्यावसायिक डॉक्टरप्रमाणे प्रश्न केला, ‘‘बोला, काय त्रास होतोय तुम्हाला?’’
आशीषच्या या प्रश्नावर ती स्त्री जरा बावरली. किंचित कापऱ्या आवाजात म्हणाली, ‘‘मला काही आजार नाहीए, मी फक्त तुम्हाला भेटायला आले आहे. एरवी तुमची भेट होणं शक्य नव्हतं. म्हणून पेशंट होऊन आले. माझं काही म्हणणं आहे, ते ऐकून घेण्यासाठी थोडा वेळ काढला का?’’ तिच्या स्वरात याचना होती.
डॉक्टर अत्यंत सज्जन व सहृदयी होते. क्वचित कधी चिडले असतील. चुकीच्या गोष्टींचा संताप आला तरी ते तो राग दाखवत नसत. टोकाच्या प्रतिक्रिया कधी देत नसतं. आजही त्या स्त्रीला बघून ते अस्वस्थ झाले. जुन्या आठवणी, कडू जहर विषासारख्या त्रास देऊ लागल्या. पण त्या स्त्रीचा त्यांना राग आला नाही. खरं तर याच स्त्रीनं दहा वर्षांपूर्वी त्यांचं आयुष्य विषाक्त करून सोडलं होतं. अजूनही ते विष ते घोट घोट पचवताहेत.
पण आज अवचित ती स्वत:हून त्यांच्यासमोर येऊन बसली होती. तिच्या येण्याचा उद्देश काय? का आली आहे ती इथं? कारण आता तिचा त्यांचा काहीही संबंध नाहीए…एकदा वाटलं सरळ नकार द्यावा, पण विचार केला, बोलल्याखेरीज तिच्या येण्याचा उद्देश तरी कसा समजणार?
स्वत:वर ताबा ठेवत ते म्हणाले, ‘‘ही वेळ माझी घरी जाण्याची असते. तुम्ही सायंकाळी येऊ शकाल?’’
अत्यंत उत्साहानं तिनं विचारलं, ‘‘किती वाजता?’’
‘‘मी सायंकाळी इथंच असेन, सातच्या सुमाराला या.’’
‘‘ठीक आहे,’’ प्रथमच त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं.
‘‘बराय, मी येते सायंकाळी.’’ म्हणत ती उठून उभी राहिली.
ती गेल्यावर डॉक्टर पुन्हा आठवणींच्या दाट जंगलात हरवले. आपल्याला घरी जायचंय, हेसुद्धा ते विसरले. त्यांच्या अटेंडंटनं सुचवलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं.
घरी बायको वाट बघत होती. ‘‘आज उशीर झाला?’’ तिनं विचारलं.
‘‘आमच्या धंद्यात असं होतं. अचानक कुणी पेशंट येऊन धडकतो, अटेंड करावाच लागतो.’’ त्यांनी बोलता बोलता हात धुतले अन् ते जेवायला बसले.
बायकोसमोर ते अगदी नेहमीसारखेच नॉर्मल वागत होते. पण मन थाऱ्यावर नव्हतं. शांत तळ्यात कुणी उगीचच दगड फेकून तरंग उठवावेत तसं झालं होतं. पण हा काही बारकासा दगड नव्हता तर अख्खा डोंगर कुणी पाण्यात ढकलून दिला होता.
‘‘आज जरा दमलोय थोडा आराम करतोय. डिस्टर्ब करू नको,’’ असं सांगून ते खोलीत गेले.
बायकोनं संशयानं त्यांच्याकडे बघितलं, ‘‘डोकं दुखतंय का? बाम चोळून देऊ?’’
‘‘नाही…तसं काहीच नाहीए. पण दमलोय.’’ एवढं सांगून ते अंथरूणावर आडवे झाले.
बायकोला थोडं नवल वाटलं. असं डॉक्टर सहसा वागत नाहीत. पण तिला बरीच कामं होती. फारसा विचार न करता ती आपल्या कामांना लागली. मुलगा शाळेतून यायचा होता. कामाची बाई आता येणार. मुलाचं खाणंपिणं आटोपून आधी त्यांचा होमवर्क करून घ्यायचा, मग त्याला ग्राउंडवर पाठवायचं. सायंकाळचा डॉक्टरांचा चहा, खाणं. मग ते क्लीनिकला गेले की तिला थोडा वेळ आराम करायला मिळायचा.
बेडवर पडून डोळे मिटून घेतले होते तरी डॉक्टर जागेच होते. झोप येणार नव्हती. मेंदूत खूप खळबळ सुरू होती. मनांत आठवणींचं वादळ घोंघावत होतं. उगीचच ते कूस पालटत होते. असंबद्ध आठवणी हळूहळू नीट वळणावर आल्या…खरं तर डॉक्टरांना त्या आठवणी अजिबात नको होत्या. पण ते माणसाच्या हातात नसतं.
विद्यार्थी दशेत असल्यापासूनच आशीष हुषार आणि थोडा गंभीर स्वभावाचा होता. हुषारीच्या बळावरच त्याला कुठंही डोनेशन द्यावं लागलं नाही. मेडिकल कॉलेजला अॅडमिशन झालं. एमबीबीएसनंतर एमडीही झाल्यावर एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. पण तिथं त्याचा जीव रमत नव्हता. त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी हवी होती. त्यासाठी तो प्रयत्न करत होता.
एव्हानां लग्नासाठी स्थळं सांगून येऊ लागली होती. वडील सरकारी नोकरीत होते. आईदेखील नोकरी करत होती. छोटंसं कुटुंब होतं. आईवडिलांनी त्याला कशी मुलगी हवीय हे विचारून घेतलं. त्याच्या स्वभावाला साजेशीच मुलगी ते बघत होते.
गंभीर अन् अभ्यासू वृत्तीचा असला तरी आशीष खडूस आणि माणूसघाणा नव्हता. तारूण्यातलं प्रेम आणि रोमांस त्याच्या आयुष्यातही डोकावून गेलंच. प्रेमाचं सप्तरंगी इंद्रधनुष्य त्याच्या आयुष्यात उगवलं. अनेक तरूणी त्याच्याकडे आकर्षिंत व्हायच्या तर त्यालाही अनेकजणी आवडायच्या, पण खूप खोलवर प्रेम रूजलं नाही. भेटल्या तशा मुली दुरावल्याही…
प्रेमाचा मुसळधार पाऊस नव्हता, पण रिमझिम होती. मनानं तो त्यात भिजत होता. पण वाटेवरच्या वळणावर एकेक जण गळायला लागली. एक खरं की आशीषची कुणाबद्दल तक्रार नव्हती. कुणाची आशीषबद्दल तक्रार नव्हती. आयुष्यात खूप खुसपटं न काढणाऱ्यांचंच भलं होतं. आशीष त्यामुळे सुखी होतं.
आशीषची ‘बायको कशी असावी’ याबद्दल काहीही अट नव्हती. त्यानं सगळंच त्याच्या आईवडिलांवर सोपवलेलं होतं. जी मुलगी ते निवडतील तिच्याबरोबर तो आपलं सर्व आयुष्य काढणार होता. त्याला काही डॉक्टर मुलीही सांगून येत होत्या. पण आई व बाबा जी मुलगी बघून पसंत करतील, असं म्हणून त्यानं डॉक्टर मुली नाकारल्या होत्या. महानगरातली मुलगी बघावी की साध्या शहरातील यावरही आईबाबांची चर्चा झाली.
शेवटी एक मुलगी सर्वांनाच पसंत पडली. ती एमबीए झाली होती. एका मोठ्या कंपनीत एचआर डिर्पाटमेंटमध्ये सीनियर मॅनेजर म्हणून काम करत होती.
एकमेकांना पाहणं, पसंत करणं वगैरे औपचारिक गोष्टी आटोपल्यावर नंदिता व आशीषचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांतच आशीषला जाणवलं की नंदिताच्या प्रेमात नव्या नवरीची ओढ नाहीए. वैवाहिक आयुष्याबद्दल कुठलाही उत्साह नाहीए. रात्रीदेखील अंथरूणात तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद नसतो. ती अगदी थंड असते.
आशीष डॉक्टर असल्यामुळे मानवी शरीराची त्याला पूर्ण ओळख होती. आधुनिक जीवनात मुली किती स्वतंत्र अन् स्वच्छंद असतात हे ही तो जाणून होता. कदाचित नवेपणामुळे ती बुजत असेल, हळूहळू मोकळी होईल, जसजशी ओळख वाढेल तसतसं प्रेम वाढेल असा विचार करून आशीष फार बोलला नाही.
पण तो काही मानसशास्त्रज्ञ नव्हता. नंदिताच्या मनांत नेमकं काय आहे, ती उदास अन् अबोल का असते. कुठल्याच बाबतीत ती उत्साह का दाखवंत नाही, घरकामातही तिला गती नव्हती, मुळात आवडच नव्हती, असं का त्याला कळत नव्हतं.
घरात ती दोघंच होती. कामाला एक बाई होती. घरातली बहुतेक सगळी कामं तिच करायची. तिची नोकरी व आशीषचं क्लीनिक यानंतर दोघांकडेही एकमेकांसाठी पुरेसा वेळ असे. पण नंदिता कधी आशीषशी बोलण्याचाही प्रयत्न करत नव्हती.
ऑफिसातून आली की ती इतकी थकलेली असायची की सरळ अंथरूणातच शिरायची. कोमेजलेला चेहरा, थकलेला देह, जणू हजारो किलोमीटर अंतर पायी तुडवून आली आहे. रात्री तिच्याशी प्रणय करताना तर आशीषला वाटायचं आपण एखाद्या प्रेताशी संभोग करतो आहोत.
डॉक्टर आशीषला एवढं लक्षात आलं होतं की नंदिता कुमारी नाही. तिच्या शरीरानं यापूर्वीही देहसुख भोगलेलं आहे. लग्नापूर्वी ती कुणाशी तरी बांधील होती. पण लग्नानंतरही ती त्याच कुणाशी बांधील आहे. आशीष तिचा नवरा असला तरी तिचं मन, तिचं शरीर आणखी कुणाचं तरी आहे. दिवसा ती त्या व्यक्तीबरोबर असते अन् स्वत:च्या हक्काच्या घरी पतल्यावरही ती इथली नसतेच.
काही दिवसातच ही बाब आशीषच्या लक्षात आली. पण ती त्याच्यापासून दूर का असते, उदास का असते. नवीन लग्न झाल्यावर इतक्या चांगल्या पतीबरोबर ती प्रेमानं का नांदू शकत नाही, हे त्याला कळत नव्हतं. आशीष व नंदिनी नवरा बायको होती. तिला जर हे संबंध आवडत नव्हते तर तिनं लग्नाला होकार का दिला. सरळ नकार देऊन मोकळी का झाली नाही? घरच्यांच्या दबावामुळे तिला हे लग्न करावं लागलंय का? दुसऱ्या कुणाशी तरी शरीरानं, मनानं गुंतलेली असल्यावर त्याच्याशीच लग्न करायचं होतं…तो माणूस आधीच विवाहित होता का? तसं असेल तर ती आजही त्याच्याशी संबंध ठेवून का आहे? स्वत:चं लग्न झाल्यावर तर ती त्याच्याशी संबंध तोडू शकते ना? स्वत:चा संसार चांगला करावा ना?
आशीषला ठाऊक होतं. नंदिता स्वत:हून काहीच सांगणार नाही. पुढाकार त्यालाच घ्यायला हवा. उगीच उशीर करण्यात अर्थ नाहीए. जी आग दुसऱ्या कुणी लावली आहे, त्या आगीत आपण का व्यर्थ होरपळायचं?
एका सायंकाळी अगदी शांत आणि गंभीर आवाजात त्यानं म्हटलं, ‘‘नंदिता, तुझ्या भूतकाळाबद्दल मी तुला काही विचारणार नाही, आत्ताबद्दलही काही बोलणार नाही, पण तुला एवढंच सांगतो की ज्या आगीत तू होरपळते आहेस, त्यात मला होरपळायला लावू नकोस. माझा काय अपराध आहे? माझा अपराध इतकाच की तुझ्याशी लग्न केलंय. पण तेवढ्यासाठी मी ही काळ्यापाण्याची शिक्षा भोगू शकत नाही. तुझी काय इच्छा आहे, ते एकदा मला अगदी स्पष्ट सांगून टाक.’’
नंदिता भकास चेहऱ्यानं त्याच्याकडे बघत होती. ती काही विचार करत होती. क्षणभर तिचे डोळे ओलावल्याचा भास झाला…मग वाटलं आता ही रडायला सुरूवात करेल. तिनं मान खाली घातली अन् ती कापऱ्या आवाजात बोलू लागली, ‘‘मला माहीत होतं, एक दिवस हे होणार आहे. मला खरं तर तुमचं आयुष्य असं नासवायचं नव्हतं. पण समाज आणि कुटुंबाची काही बंधनं, आपल्याला हवं ते, हवं तसं करू देत नाहीत. घरच्यांशी इच्छा अन् त्यांचा दबाव इतका असतो की आपल्याला झुकावंच लागतं. त्यामुळे मी असं आयुष्य जगतेय, जे माझं नाही, घरच्यांचं किंवा माझ्या कुटुंबाचंही नाही अन् समाजाचं तर नाहीच नाही.’’
‘‘तुझी कोणती असहायता किंवा नाईलाज आहे ते मला ठाऊक नाही पण तू सांगितलंस तर आपण त्यावर काही उपाय शोधू शकू.’’
‘‘नाही, माझ्या समस्येवर काही तोडगाच नाहीए. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी जाणूनबूजुन तुमची उपेक्षा करते असं समजू नका. खरं तर माझ्या मनात असलेल्या अपराधाच्या जाणीवेमुळे मी इतकी अपसेट असते की तुमच्याशी मोकळेपणानं वागू शकत नाही. माझ्या अपराधामुळे मला नीट वागताच येत नाही. आतल्या आत मी जळतेय…कुढतेय.’’
‘‘तुझ्या हातून काही अपराध घडला असेल तर तू त्याचं प्रायश्चित घेऊ शकतेस.’’
‘‘तेच तर अवघड आहे, माझा अपराध माझा पिच्छा सोडत नाहीए.’’
आशीषला काहीच कळलं नाही. त्यानं नंदिताकडे अशा नजरेनं बघितलं की तिला काही सांगायचं असेल तर तिनं सांगावं.
नंदिता म्हणाली, ‘‘तुमच्यापासून काही लपवण्याचं कारणच नाहीए. मी तुम्हाला सांगते, कदाचित त्यामुळे माझ्या मनातली अपराधाची भावना थोडी कमी होईल. मला कळतंय की मी जी चूक करतेय, त्याला क्षमा नाही…मी प्रयत्न करूनही त्यापासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही..तो ही माझा पिच्छा सोडत नाहीए.’’
‘‘तर मग तू माझा पिच्छा सोड. मी तुला मुक्त करतो. तू त्याच्याशी लग्न कर.’’
हे ऐकून नंदिता अवाक् झाली. ती थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यात भीती दाटून आली. ती एकदम किंचाळली, ‘‘नाही, तो माझ्याबरोबर लग्न करू शकत नाही…त्याचं लग्नं झालेलं आहे.’’ आशीषला वाटलं आपल्या डोक्याच्या चिंध्या होताहेत. नंदिता हा कोणता खेळ खेळतेय. एकीकडे तिला स्वत:च्या नवऱ्याशी चांगले संबंध ठेवता येत नाहीएत अन् ज्याच्याशी तिचं लग्न झालेलं नाही, होऊ शकत नाही तो तिचं सर्वस्व आहे.
त्याच्याबरोबरचे अनैतिक संबंध ती तोडू शकत नाही. तो हलकट नंदिताच्या शरीराशी, तिच्या आयुष्याशी खेळतोय. स्वत:च्या सार्वजनिक छबीसाठी तो माणूस आपलं कुटुंब, पत्नी, मुलंबाळं सोडू शकत नाही, पण त्याच्यासाठी नंदिता आपलं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. या पोरीला विवेक नाही. ती भावनाविवश होतेय, मोहात गुरफटतेय, पुन्हापुन्हा चुका करतेय अन् नेमकी कोणती वाट निवडावी, ज्यामुळे आपलं आयुष्य सुखी होईल हे तिला कळत नाहीए.
डॉक्टर आशीषला कळेना की तिला नेमकं काय हवंय? त्याच्या मनात बरेच प्रश्न होते, पण तो काहीच बोलला नाही.
नंदिताच सांगू लागली, ‘‘तो माझं पहिलं प्रेम होता. मी भाबडी, हळवी होते, तो लबाड, चतुर होता. त्यानं माझ्या भावनांना हात घातला. मी बहकले. सरळ देह त्याच्या स्वाधीन केला. नंतर समजलं तो विवाहित आहे, तरीही मी त्याला आयुष्यातून हाकलून लावला नाही. मी त्याच्याशी संबंध तोडू शकत नाही, त्याला बघितलं की मी वेडी होते. माझं भान हरपतं, काहीतरी विचित्र आकर्षण आहे त्याच्यात. त्याचं बोलणं मला गुंगवून ठेवतं. मी ओढली जाते त्याच्याकडे.
‘‘लग्नानंतर मी खूप प्रयत्न केले, त्याला भेटायचं नाही असं ठरवलं, त्याच्या समोर जायचंच नाही असं ठरवलं पण जेव्हा तो माझ्यासमोर नसतो, तेव्हा मी त्याचाच विचार करत असते. त्याला भेटण्यासाठी तळमळत असते. त्याच्याशिवाय कुणाचा विचार मी करूनच शकत नाही…तुमचासुद्धा नाही.
‘‘माझं शरीर मी तुम्हाला देते तेव्हाही माझं मन त्याच्याजवळ असतं. मला कळतंय, मी तुमच्याशी एकनिष्ठ नाही. मी तुमचा विश्वासघात करतेय. वैवाहिक जीवनात प्रामाणिकपणे समर्पण करण्याऐवजी मी तुम्हाला त्रास देते आहे…पण माझा माझ्यावर ताबा नाही. मी एक दुबळी स्त्री आहे. हाच माझा गुन्हा आहे.’’
‘‘कुणीही पुरूष किंवा स्त्री दुर्बळ नसते. आपण केवळ भावना आणि प्रेमाचं कारण पुढे करतो. जगात आपण इतक्या गोष्टी सोडून देत असतो. नातलग, आईबाप, कितीतरी आवडत्या गोष्टी आपण सोडतो, तर मग एखादी वाईट गोष्ट आपण का त्यागू शकत नाही? कदाचित वाईट गोष्टींचं आकर्षण जास्त असतं म्हणून. तुझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय मला ठाऊक नाही…पण…एकदा लग्न झाल्यावर तू त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न का केला नाहीस?’’
‘‘केला, खूप केला. पण मन त्याच्याकडेच ओढ घेतं. तो माझ्या ऑफिसातही नाहीए. दुसरीकडे काम करतो. तो मला फोनही करत नाही, पण मग मी बेचैन होते. स्वत:च त्याला फोन करून बोलावून घेते. मी काय करू?’’
आशीषकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्याच्या लक्षात आलं नंदिता दृढ निश्चयी किंवा दृढ चरित्र्याची मुलगी नाहीए. ती भावुक आहे. अपरिपक्व आहे. तिचा विवेक कमी पडतो. ती परिस्थितीला शरण जाते. चांगलं वाईट कळलं तरी वाईटाला सोडायची तिची तयारी नाहीए…त्यातच तिला सुख वाटतंय, आनंद मिळतोय…भले ही तो आनंद निर्मल नाही, अनैतिक पद्धतीनं मिळवलेला आहे.
– क्रमश :