कर्माचं फळ

कथा * गिरीजा पाठक

आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं, कुठं जावं हेच त्याला समजेनासं होतं. सुनयना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती. काही क्षणांत तिचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

आज सकाळी सुशांत त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. सहजच काही वाक्य तिच्या कानांवर पडली. ‘‘ओ. के. डियर, बरोबर पाच वाजता मी पोहोचतोय, हो, हो. नक्षत्र हॉटेलमध्ये…आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय अन् प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस.’’ असं म्हणून त्यानं फोनवरच तिचा मुका घेतला. हे बघून सुनयनाला धक्काच बसला.

सुनयना मध्यमवर्गीय कुटुंबातली, शिक्षण अर्धवट सुटलेलं…रूप मात्र देखणं, त्यामुळेच गर्भश्रीमंत सुशांतशी लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोगताना ती सुशांतला दबून असायची. बंगला, शोफर ड्रिव्हन तिची स्वत:ची कार, स्वयंपाकी, घरगडी, मोलकरीण, माळी असं सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती. पूर्णपणे समर्पित होती. दागदागिने, कपडालत्ता, हौसमौज कशातच उणीव नव्हती, पण आज हे काय भलंतच? तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा. तीही पाच वाजण्याच्या प्रतिक्षेत होती. नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती. खात्री करून घेणार होती.

पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेलपासून काही अंतरावर पार्क केली अन् ती हॉटेलच्या लाउंजमध्ये येऊन बसली. तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता. काळा गॉगलही लावला होता. हातात वाचायला पुस्तक होतं. त्यामुळे चेहरा झाकला जात होता.

बरोबर पाच वाजता ऐटबाज कपडे घातलेला सुशांत गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला. त्याचवेळी एक मुलगीही तिथं आली. दोघांची गळाभेट झाली अन् हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाली. नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केलेली असणार.

सुनयनाचे डोळे भरून आले. घशाला कोरड पडली. तिला वाटलं आता इथंच आपण जोरजोरात रडू लागणार. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं. काही वेळ स्तब्ध बसून राहिली. जरा शांत झाल्यावर उठली, गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली. आता ती मुक्तपणे रडू शकत होती. बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं. ती विचार करत होती, तिच्या प्रेमात, तिच्या सेवेत, तिच्या समर्पणांत कुठं उणीव राहिली होती म्हणून सुशांतला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ वाटली? ती जरी फार शिकलेली नाही, तरी सुसंस्कृत, चांगल्या वळणाची आहे. सुंदर आहे, निरोगी आहे…सुशांतची काळजी घेते. त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही…तरीही?

तिनं तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. सुप्रियाला सुनयनाच्या आवाजावरूनच काही तरी बिनसलं आहे हे लक्षात आलं. ‘‘काय झालं सुनयना? तू बरी आहेस ना?’’

सुनयनला पुन्हा रडू फुटलं. कशीबशी तिनं सर्व हकिगत सुप्रियाला सांगितली. तिला समजंवत म्हटलं, ‘‘तू शांत हो अन् धीर सोडू नकोस. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतातच…दुसऱ्यावरचा काय, स्वत:वरचाही विश्वास उडेल असं कित्येकदा घडतं. अगं, मलाही खूपदा भीती वाटते, मी अजून लग्न केलं नाहीए. न जाणो, कुणाच्या प्रेमात पडले अन् त्यानं विश्वासघात केला तर? पण म्हणून रडत बसायचं नाही. उलट आपलं मन इतरत्र रमवायचं.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय गं! पण मी तर माझं सगळं आयुष्यच सुशांतला वाहिलेलं आहे ना?’’

‘‘पण असं फक्त तुझ्याच बाबतीत घडतंय असं नाही…सुनयना, तुला नेहा आठवतेय?’’

‘‘नेहा? तिची आई आपल्या शाळेत क्लर्क म्हणून काम करायची, ती?’’

‘‘हो गं! तीच, तिला मी अधूनमधून माझ्या आईच्या मदतीला बोलावून घेत असते. सध्या ती कुठंतरी नोकरीही करते आहे. आमच्या घराजवळच राहते. तिचीही एक कहाणीच आहे. लव्ह मॅरेज केलं होतं…नवरा बदफैली निघाला.’’

‘‘अगंबाई…तीही माझ्यासारखीच रडते ना?’’

‘‘छे! ती बरी पक्की आहे. नवऱ्याला तिनं चांगलंच खडसावलं. यापुढे नीट राहिला नाही तर ती घटस्फोट देणार आहे त्याला. तिनं पोलिसातही तक्रार दिलीय.’’

‘‘चांगलं केलं तिनं…पण मी असं नाही करू शकणार…या सुखासीन आयुष्याची सवय लागलीय…शिक्षण बेताचं…’’ निराश सुरात सुनयनानं म्हटलं.

‘‘अगं, होतं असं कधीकधी, काय करावं याचा निर्णय असा पटकन् घेता येत नाही. विशेशत: ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, तोच असा विश्वासघात करतो, आपल्या प्रेमाची किंमत मातीमोल ठरवतो, तेव्हा फारच वाईट वाटतं…तू आत्ता फार विचार करू नकोस. शांत मनानं झोपायचा प्रयत्न कर…नंतर यावर विचार करता येईल.’’

‘‘ही गोष्ट इतकी छोटी नाहीए प्रिया, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे…’’

‘‘कळतंय मला. तरीही आता फोन बंद कर.’’ प्रियानं एका झटक्यात फोन बंद करून टाकला.

सुनयनानंही हातातला रिसीव्हर खाली ठेवला. ती पलंगावर आडवी झाली. मन मात्र परत परत त्याच प्रसंगावर केंद्रित होत होतं. सुशांतचं फोनवरून किस करणं, त्या दोघांची गळाभेट, हातात हात घालून लिफ्टकडे जाणं.

अन् हे काही प्रथमच घडलंय असंही नाही. यापूर्वीही रेवाबरोबर त्याचे घनिष्ट संबंध होते. पण तेव्हा सुशांतनं तिची क्षमा मागितली होती. रेवा त्याची जुनी मैत्रीण आहे. तिला दुखवायचं नाही म्हणून मैत्री ठेवतो वगैरे म्हणाला होता.

सुनयानानं तेव्हा फार त्रागाही केला नव्हता. कारण ती सुशांतवर मनापासून प्रेम करत होती. त्यांनही तिला त्याच्या प्रेमाची ग्वाही दिली होती. शिवाय सुशांतची श्रीमंती व शिक्षणामुळे तिला स्वत:ला फारच न्यूनगंड जाणवायचा. त्यानं काही कारणामुळे तिला घरातून हाकूलनच दिलं तर? या प्रश्नानं तिची झोप उडायची. त्याच्यामुळेच आपण इतकं सुखासीन आयुष्य जगतोय हेही तिला मान्य होतं…तरीही आज तिला सुशांतचा राग आला. रेवाशी त्याची मैत्री होती, कदाचित प्रेमही असेल पण आज जे काही होतं, ती फक्त वासना होती. शारीरिक सुखाची ओढ होती.

रात्री उशीरा घरी परतलेला सुशांत जणू काहीच घडलं नाहीए असं वागत होता. सुनयननाही शांतच होती. नियतीचा खेळ मुकाट्यानं बघण्याखेरीज तिच्या हातात याक्षणी काहीच नव्हतं. मागच्या वर्षीच तिच्या लक्षात आलं की सुशांत अधूनमधून ड्रग्ज घेतो. प्रचंड आटापिटा करून तिनं त्यातून त्याला बाहेर काढलं होतं.

दोन महिने असेच गेले. सुनयना शांतपणे सुंशातवर नजर ठेवून होती. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की त्याचे दोनतीन स्त्रियांबरोबर संबंध आहेत. एकदोनदा तिनं त्याला म्हणतात तसं ‘रंगे हाथों’ पकडलं पण तो निर्लज्जपणे हसला होता. इतका बेडरकारपणा सुशांत करू शकतो हे बघून तिलाच लाज वाटली होती.

मनातल्या मनात ती झुरत होती. एकदा तिनं आईला फोन करून सांगायचा प्रयत्न केला. पण आईनं ऐकूनच घेतलं नाही. श्रीमंत जावयाबद्दल काहीही ऐकून घ्यायला ती तयार नव्हती. उलट, ‘‘तो तुला कमी करत नाहीए ना? मग राहा तिथंच सुखानं…इतक्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडू नकोस.’’ आईनं तिलाच दटावलं होतं.

काय करावं? घर सोडायचं? घटस्फोट घ्यायचा? पण मग जगायचं कसं? गरीब माहेरी तिला कुणी आधार, आश्रय देणार नव्हतं. शिक्षण बेताचं…नोकरी तरी कशी मिळणार? सुखासीन आयुष्याची सवय झालेली…कष्ट करणं जमेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल, कशी असेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल याची खात्री नाही…त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे. निदान समाजात इभ्रत, अब्रू, मानसन्मान आहे. सुनयना तासन्तास विचार करत होती…निश्यच होत नव्हता.

एक दिवस सकाळीच प्रियाचा फोन आला. ‘‘अगं, एक बातमी आहे. आपली नेहा…नवऱ्याला सोडून आली आहे. तिनं त्याला घटस्फोटाची नोटिस दिलीय.’’

‘‘काय सांगतेस?’’ सुनयनानं दचकून विचारलं, ‘‘इतका मोठा निर्णय तिनं तडकाफडकी घेतलादेखील?’’

‘‘हो ना, चांगला निर्णय घेतला. त्याला धडा शिकवला तिनं. मला तर वाटतं तूही तसंच करायला हवंय.’’

सुनयनानं फोन ठेवला. दिवसभर, रात्रभर ती तळमळत होती…काय करावं हा विचार डोकं पोखरत होता. शेवटी सकाळी तिचा निर्णय झाला. ‘‘ठीक आहे. मीही आता नेहासारखा घर सोडायचाच निर्णय घेते. सुशांतला धडा शिकवते. माझ्या प्रेमाची समर्पणाची किंमत नाहीए त्याला. स्वत:च्या श्रीमंतीचा माज आहे…तुझी श्रीमंती तुला लखलाभ…’’ पटकन् तिनं आवरलं अन् नीटनेटकी तयार होऊन पर्स घेऊन ती घराबाहेर पडली. सुशांतला काही सांगावं, त्याचा निरोप घ्यावा या भरीला पडलीच नाही. त्यानं पुन्हा क्षमा मागितली तर तिचा निश्चय डळमळेल म्हणून न सांगताच बाहेर पडली. सुशांतनं केलेला विश्वासघातही नको अन् त्याची बायको म्हणून सुरक्षित, सुखनैव आयुष्यही नको…काय व्हायचं ते होईल.

नवऱ्याचं घर सोडलं, माहेरी जाणं शक्य नाही…काय करायचं? बराच वेळ मेट्रो रेल्वेच्या स्टोजवर ती सुन्न, बधीर होऊन बसली होती. तेवढ्यात सुप्रियाचा फोन आला. ‘‘कुठं आहेस तू? घरचा फोन लावला तर सुशांतनं उचलला. तू घरी नाहीएस म्हणाला. तुझा मोबाईलही तू उचलत नव्हतीस. बरी आहेस ना?’’

‘‘मी…मी घर सोडलंय…’’ दाटलेल्या कंठानं ती एवढंच बोलू शकली.

सुप्रियाही हादरलीच… ‘‘आता कुठं जाणार आहेस? मुळात तू आहेस कुठे?’’

‘‘आहे. मेट्रो रेल्वे स्थानकावर…कुठं जायचं तेच कळत नाहीए.’’

‘‘ताबडतोब माझ्या घरी ये. मी आज रजा टाकतेय, निवांतपणे तुझ्या आयुष्याची दिशा ठरवूयात. लगेच निघ. मी वाट बघतेय.’’ सुप्रियानं म्हटलं. खरोखर ती धाडसी अन् विचारी होती. ती ही एकटीच होती. दोघी एकत्र राहिल्यावर एकमेकींचा आधार होईल.

सुनयनानं आल्याबरोबर प्रियाला मिठी मारली अन् भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रियानं तिला मनसोक्त रडू दिलं. मग पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवून तिनं चहा केला. चहा घेताघेता म्हणाली, ‘‘जे काही रडणं आहे ते फक्त आज. यापुढे फक्त लढायचं आहे. स्वत:ला सिद्ध करायचं तू. मनांतली सगळी भीती काढून टाक. मी तुझ्या पाठीशी आहे.’’

सुनयनाला सावरायला थोडा वेळ हवा होता. प्रियानं तिला सुचवलं की ती शिवण काम छान करायची. थोड्या सरावानं ती पुन्हा ते काम करू शकते. घरात बसून काम होईल…पैसा हातात येऊ लागेल. सध्या शिवणावर बायका व पुरूष टेलरही खूप पैसा मिळवत आहेत.

सुनयना तयार झाली. शिवणाचं मशीन सुप्रियानं विकत आणलं. कापड आणलं. त्यातून काही पोषाख, ब्लाउज वगैरे तयार झाले. सोसायटीतच ग्राहक भेटले. कामं मिळू लागली.

काही दिवस गेले अन् सुनयनाला जाणवलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांकडे तपासून घेतल्यावर तर पक्कीच खात्री झाली. सुशांतपासून दूर झाली तरी सुशांतशी संबंध संपलेच नव्हते…काय करावं? ती पुन्हा घाबरी झाली. सुप्रियानं पुन्हा धीर दिला. ‘‘हे बाळ आपण वाढवू…तू काळजी करू नकोस,’’ असं समजावलं. सुनयनाबद्दल ती खूप काळजी घेत होती. दिवस पूर्ण भरले अन् सुनयना एका गोंडस मुलीची आई झाली.

सुप्रियाला नोकरीत भराभर बढत्या मिळत गेल्या. तिनं शहराच्या लांबच्या भागात चांगला फ्लॅट घेतला. सुनयनाचा आता जुन्या जगाशी, सुशांतशी काहीच संबंध नव्हता. मधल्या काळात तिची आईही वारली. आता तर माहेरचाही संबंध संपला. पण ती सुप्रिया, आपली लेक अन् स्वत:चं काम यात अगदी रमली होती. आनंदात होती. तिचं कामही जोरात सुरू होतं. मुलीला उत्तम शाळेत अॅडमिशन मिळाली होती. इकडे सुशांतची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक फटका बसला होता. पैशासाठीच त्याला जवळ करणाऱ्या त्या सर्व मुली त्याला सोडून गेल्या होत्या. त्याच्या वागण्यामुळे पुरूष मित्रही दुरावले होते. फारच एकटा पडला होता. तब्येतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या होत्या. सुनयनाची फार आठवण यायची. तिचं प्रेम, साधं वागणं, समर्पण आठवून तो हळवा व्हायचा…तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. कुणाला विचारणार? पोलिसात तक्रार देणं त्याच्या इभ्रतीला शोभलं नसतं.

एक दिवस असाच निराश मन:स्थितीत तो टीव्हीसमोर बसून चॅनेल बदलत होता. एका चॅनलनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. ‘सुपर चाइल्ड रिएलिटी शो’ नामक कार्यक्रम सुरू होता. प्रेक्षकांमध्ये समोरच सुनयना दिसली त्याला. तो लक्षपूर्वक बघू लागला.

स्टेजवर एक लहानशी मुलगी अतिशय सुरेख गाणं म्हणत तेवढंच सुंदर नृत्यही करत होती. सुशांत भान हरपून बघत होता. तिचं नृत्य संपलं तेव्हा सर्व परीक्षक व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करू लागले.

सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परीक्षकांनी त्या कलाकार मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारलं, तेव्हा कॅमेरा सुनयनावर स्थिरावला. चकित होऊन सुशांत बघत होता…म्हणजे ही मुलगी सुनयनाची आहे? म्हणजे त्याचीच ना? की तिनं दुसरं लग्न केलंय?

मुलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनयना व सुप्रियाला हातानं धरून स्टेजवर आणलं…‘‘मला बाबा नाहीएत…पण दोन ‘आई’ आहेत. याच दोघी माझे आईबाबा आहेत. मी जी काही आहे ती यांच्या कष्टामुळे, संस्कारामुळे आहे.’’

‘सुपर चाइल्ड’, ‘सिंगल मदर’ सगळेच अभिनंदन करत होते. प्रेक्षकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या. सुशांतला कळत नव्हतं या मुलीचे बाबा कोण? तो की कुणी दुसरा? सुनयनाला कुठं अन् कसं भेटावं? मुलीला प्रेमानं मिठीत घ्यावं असं वाटत होतं. पण तो फक्त रडत होता.

सुनयना लेकीला मिठीत घेऊन रडत होती. आनंद, अभिमान, कष्टाचं सार्थक, मुलीबद्दलची अपार माया तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती. प्रियानं तिला आधार दिला होता.

सुशांत फक्त अश्रूभरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होता. एकटाच!! असहाय!!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें