कामात कुटुंबियांचा खंबीर पाठिंबा – रश्मी अनपट

* सोमा घोष

मराठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री रश्मी अनपटला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नसले तरी तिला मात्र प्रेक्षकांसमोर एखादी भूमिका साकारायला खूप आवडायचे. पुण्याची असलेल्या रश्मीची कामादरम्यान अभिनेता आणि पती अमित खेडेकरशी ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २ वर्षांनी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी मुलगा अभीर झाला. तो वर्षाचा झाल्यानंतरच तिने अभिनयातील कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. तिच्या कामात संपूर्ण कुटुंब तिला पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे तिचा कुटुंबासोबत कामाचा चांगला ताळमेळ बसला आहे. सुंदर आणि हसतमुख रश्मी सध्या सन मराठीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. चित्रिकरणाचा व्यस्त दिनक्रम असूनही तिने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’साठी गप्पा मारल्या. चला, तिच्याच तोंडून तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनयाच्या क्षेत्रात नव्हते. मी वयाच्या १० व्या वर्षांपासून व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली. एक ऐतिहासिक नाटक होते, त्यात मी ५ वर्षांपर्यंत राजाराम महाराजांची भूमिका केली. त्यानंतर दोन वर्षे काहीही केले नाही. बारावीनंतर पुन्हा व्यावसायिक नाटक करू लागले. ग्रॅज्युएशननंतर मुंबईत येऊन मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी काम करू लागले. ८ वर्षांपर्यंत मी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीकडे वळले.

आता या मालिकेत काय काम करत आहेस? त्यात तुझी भूमिका काय आहे?

यामध्ये मी एका महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे, जिथे तिच्याबद्दलचे सर्व निर्णय तिचे वडील घेतात. तिच्या जेवणापासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा दिनक्रम वडिलांनीच ठरवलेला असतो आणि ती आनंदाने त्याचे पालन करते. ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा आहे, ज्यात एक वडील मुलीची काळजी घेणारे, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे आणि मुलीबद्दल मोठे स्वप्न पाहणारे आहेत.

तुझ्या अभिनय कारकिर्दीत कुटुंबाचे सहकार्य किती मिळाले?

सगळयांनी खूप साथ दिली. अनेकदा रात्री जेव्हा मी नाटक संपवून घरी परतायचे किंवा एखाद्या नाटकात काम करायला जायचे तेव्हा माझे वडील मला नाट्यगृहातून घ्यायला यायचे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांचेही मला चांगले सहकार्य मिळत आहे. माझे पतीही मला खूप पाठिंबा देतात. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

टीव्ही इंडस्ट्रीत पहिला ब्रेक मिळण्यासाठी तुला किती वेळ लागला?

पुण्यात राहून मी टीव्हीवरील मालिकांसाठी दोन ते तीन वेळा ऑडिशन दिले होते. नंतर मला प्रोडक्शन हाऊसचा फोन आला. मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, त्यावेळी मी मास्टर डिग्री घेण्यासाठी रांगेत उभी राहून शुल्क भरणार होते. तितक्याच प्रोडक्शन हाऊसचा फोन आल्यामुळे मी गोंधळून गेले. मी काय करू? अभिनय की शिक्षण? शुल्क भरण्याची रांग सोडून मी सर्वात आधी वडिलांना भेटून त्यांचे मत विचारले. त्यांनी मला जे आवडेल ते करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी मुंबईत अभिनयासाठी आले.

मुंबईत आल्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता?

मी अनेक मोठया मराठी कलाकारांसोबत काम केले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा हा प्रवास जवळपास १३ वर्षांचा आहे. मला या काळात कोणताही वाईट अनुभव आला नाही. लोक मनोरंजन क्षेत्राबद्दल खूप काही बोलतात, पण मला कधीच तसे काही जाणवले नाही. मुळात प्रत्येक व्यक्तीसाठी या इंडस्ट्रीचा अनुभव वेगळा असतो. करिअर म्हणून हे क्षेत्र निवडल्याचा मला आनंद आहे.

पती अमित खेडेकरशी तुझी कशी ओळख झाली?

मी जे पहिले मराठी नाटक केले त्यात माझा पतीही अभिनय करत होता. नाटकादरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि दोन वर्षांनी मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले. माझा मुलगा ४ वर्षांचा आहे.

मुलासोबत काम करण्यासाठी तू कसे जुळवून घेतलेस?

गरोदर राहिल्यानंतर काही दिवसांनी मी कामातून ब्रेक घेतला. त्यानंतर मुलगा एक वर्षाचा झाल्यावर, पुन्हा काम सुरू केले. माझे आई-वडील आणि सासू-सासरे मिळून त्याची काळजी घेत होते. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी अवघड नव्हते. माझा मुलगा अजिबात त्रास देत नाही. त्याला दोन्ही घरातल्या आजी-आजोबांसोबत राहायची सवय झाली आहे.

तू आतापर्यंत कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेस? कोणती भूमिका तुझी सर्वात आवडती आहे? कोणत्या भूमिकेने तुला ओळख मिळवून दिली?

माझ्या पहिल्या मालिकेत मला नकारात्मक भूमिका साकारायची होती. त्यावेळी मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारले होते की, मला अशी भूमिका का मिळाली, मी नकारात्मक दिसते का? त्यांनी हसून मला समजावले की, स्वत:च्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पहिल्याच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार असल्यामुळे मला खूपच निराश झाल्यासारखे वाटत होते. स्वत:पेक्षा वेगळी भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड होते, पण हळूहळू सवय झाली. दिग्दर्शकांनी खूप मदत केली. या मालिकेनंतर मी अनेक सकारात्मक भूमिकाही साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काही ना काही आव्हान असतेच. भूमिका कुठलीही असो ती कलाकारासाठी खूप खास असते आणि ती साकारण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करतो.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेत मी ‘ईश्वरी’च्या मुख्य भूमिकेत होते. या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले. त्या मालिकेमुळे माझी ओळख मिळाली. त्यादरम्यान बाहेर गेल्यावर लोक माझे कौतुक करायचे. एका महिलेने तिच्या मुलीचे नाव इश्वरी ठेवले होते, माझ्यासाठी हे खूपच हृदयस्पर्शी होते. एकदा मी पुण्याला गेले होते, तिथे बाईकवरील एक काका-काकूने मला ओळखले. गाडी थांबवून ते माझ्याशी बोलले आणि रडू लागले. मी घाबरले, विचारल्यावर समजले की, मालिकेत एके दिवशी माझ्या सासूने माझ्या कानाखाली मारले होते. ते पाहून खूप वाईट वाटले, असे काकूंनी रडत सांगितले. ती जखम बरी झाली आहे की नाही, हे मी पाहातेय, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन मालिकांशी प्रेक्षकांचे घट्ट नाते असते. ते अनुभव खूप वेगळे असतात. प्रेक्षकांची आवड हेच तिथे मी काम करण्यामागचे कारण आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.

तुला कधी नकाराचा सामना करावा लागला का? त्यावेळी तू त्याला कशी सामोरी गेलीस?

रिजेक्शन किंवा नकार हा अभिनयाचा एक भाग आहे. कधीकधी त्याला सामोरे जावे लागतेच, कारण कधीकधी चेहरा हा व्यक्तिरेखेला साजेसा नसतो. मी यावर जास्त विचार न करता पुढे जाते. यामुळे अनेकदा तणाव येतो. अशावेळी मी माझ्या पतीने सांगितलेले आठवते. तो म्हणतो की, एक काम झाले नाही तर तर दुसरे खूप जास्त छान होईल. तो तणाव येऊ देत नाही, मीही त्याने सांगितल्याप्रमाणेच वागते. मी नेहमी सकारात्मक विचार करते.

हिवाळयात सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

मी नेहमीच माझ्या आहाराकडे जास्त लक्ष देते. मध्येच भूक लागल्यावर सुका मेवा, फळे खाते, पण मला वडापाव खायला खूप आवडतो. तो मी कधीतरी खाते. मी खवय्यी आहे. मी साधारण डाएट करते. सकाळी उठून गरम पाणी, ब्राऊन ब्रेड, लोणी, पोहे, उपमा इत्यादी खाते. माझ्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती, हिरव्या पालेभाज्या, डाळ इत्यादी असते. पुरेसे पाणी पिते.

आरोग्याची काळजी कशी घेतेस? काही संदेश द्यायचा आहे का?

मी योगासने, व्यायाम करते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स इत्यादींचा माझ्या आहारात समावेश असतो. या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मी जंक फूड खाणे टाळते. मी सर्व महिलांना नैसर्गिक अन्न, तूप, पाणी, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करण्याचा सल्ला देईन.

आवडता रंग – लाल.

आवडते वस्त्र – पारंपरिक साडी.

आवडते पुस्तक – स्वामी, रणजीत देसाई.

वेळ मिळाल्यावर – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्यूम – जाराचे सिक्रेट.

पर्यटन स्थळ – जम्मू आणि काश्मीर, लंडन.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

सामाजिक कार्य – अनाथ आणि वृद्धांसाठी काम करणे.

स्वप्न – समाजासाठी काहीतरी करायचेय.

प्रतिक्षा शिवणकरः मालिका शोधण्याची गरज भासली नाही

* सोमा घोष

‘कॉलेज डायरी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा शिवणकर. ती गडचिरोलीची आहे. तिची आई भारती सुनील शिवणकर आणि वडील सुनील एकनाथ शिवणकर हे दोघेही शिक्षक असून कलाप्रेमी आहेत. त्यामुळेच त्यांनी मुलींना लहानपणापासूनच कलेच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रतिक्षा शिवणकर सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. प्रतिक्षाचे लग्न नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. अभिषेक साळुंके यांच्यासोबत थाटामाटात झाले. ते मूळचे बारामतीचे असून मुंबईत रेडिओलॉजिस्ट आहेत. प्रतिक्षाला अभिनयासोबतच नृत्याचीही प्रचंड आवड आहे. महाविद्यालयात असताना ती कायम सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची. अभिनयाची प्रचंड आवड तिला प्रशांत दामले यांच्या टी स्कूलपर्यंत घेऊन गेली. प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

सोनी मराठीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत प्रतिक्षा रेवतीची प्रमुख भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये ती कन्नड कुटुंबातील मुलगी आहे. ही मुलगी घरात काहीही बोलायला घाबरते, पण बाहेर बिनधास्तपणे वागते.

लहानपणापासूनच प्रतिक्षाला कलेची प्रचंड आवड आहे, मात्र भविष्यात अभिनेत्री होऊ, असे तिला वाटले नव्हते. ही भूमिका तिच्या व्यक्तिगत आयुष्याशी मिळतीजुळती आहे, कारण ती घरात कोणाला काही बोलत नसली तरी बाहेर बिनधास्त राहाते. मालिकेतील रेवती हे पात्र बरेचशे प्रतिक्षासारखे आहे. या मालिकेसाठी प्रतिक्षाने बरेच ऑडिशन्स दिले होते. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रिकरणात व्यस्त असूनही प्रतिक्षाने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’शी गप्पा मारल्या. त्यातील हा काही खास भाग :

तू अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार कसा केलास?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातील नाही. माझे पालक शिक्षक आहेत. लहानपणापासूनच मी नृत्य शिकले. शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात मी माझ्या वडिलांनी लिहिलेल्या छोटया एकांकिका स्टेजवर सादर करायचे. माझे आई-वडील खूपच हौशी आहेत आणि त्यांनी मला लहानपणापासूनच क्रीडा, नृत्य, नाटक इत्यादींमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. माझी लहान बहीणही खूप चांगली नृत्यांगना आहे.

तुला कुटुंबीयांचे किती सहकार्य मिळाले?

सुरुवातीला माझ्या आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला, पण हळूहळू त्यांनी माझी इच्छा समजून घेतली. माझे आजोबाही शिक्षक होते, त्यामुळे हे क्षेत्र समजून घेणे त्यांच्यासाठी अवघड होते, कारण त्यांना वाटत होते की, मी चुकीचे काहीतरी बोलत आहे. नंतर सर्वांनीच सहकार्य केले. आता मी मराठी मालिकेसह ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातही आहे. तिथे मला पहिला ब्रेक मिळाला तेव्हा माझे घरचेही आनंदी झाले, कारण मी प्रशांत दामले यांच्या नाटकात काम करणार होते. अशा महान दिग्दर्शकासोबत नाटकाच्या माध्यमातून अभिनयाचे थेट सादरीकरण करणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

तूला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला ‘कॉलेज डायरी’तून ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून मला खूप मोठा ब्रेक मिळाला. यात खूप मोठमोठे कलाकार आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकायला मिळाले. त्यानंतर मला मालिका मिळाली. त्यासाठी मी अनेक ऑडिशन्स दिल्या.

तूला किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष करावाच लागतो, पण मला तो जास्त करावा लागला नाही, कारण जेव्हा मी नाटकात काम करत होते, त्यावेळी माझ्याकडे अनेक मालिकाही होत्या. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केले होते. मला मालिका शोधण्याची गरज भासली नाही. त्यामुळे मला जास्त संघर्ष करावा लागला नाही.

डॉ. अभिषेक साळुंके यांना तू कशी भेटलीस?

हे एक अॅरेज्ड कम लव्ह मॅरेज आहे. मी २०१७ मध्ये प्रशांत दामले यांच्या पुण्यातील टी स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तिथे अभिनय, गाणे आणि नृत्य शिकवले जायचे. तिथे अभिषेकही गाण्यासाठी आला होता. तेथेच आमची ओळख झाली. त्याच दरम्यान मी एका नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेत गेले. तिथून आल्यावर अभिषेकने मला लग्नासाठी मागणी घातली. आम्हाला फिरायला जाण्याची फारशी संधी मिळाली नाही, कारण ६ महिन्यांतच आमचे लग्न झाले.

तुला लग्नानंतर अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना काही अडचणी आल्या का?

ज्याप्रमाणे माझ्या घरातील कोणी अभिनय करत नाही, त्याचप्रमाणे अभिषेकच्या घरातही कोणी अभिनय क्षेत्रात नाही. त्यामुळेच त्याला माझा अभिमान असून माझा गर्व वाटतो. माझी प्रत्येक मालिका तो आवडीने पाहातो आणि नातेवाईकांनाही मालिका पाहाण्यास सांगतो.

हिंदी मालिका, वेब सिरीज, चित्रपटांमध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे का? एखादे स्वप्न आहे का?

हिंदीबाबत अजून विचार केलेला नाही, कारण मी एकावेळी एकच काम करते, जेणेकरून त्या कामाकडे शंभर टक्के लक्ष देऊ शकेन. हिंदीतली एखादी चांगली स्क्रिप्ट आली तर मला आवडेल. रणवीर सिंहसोबत एखादा हिंदी चित्रपट करायला मिळाला तर मला खूप आवडेल. त्याला पाहताच मी एकतर जोरजोरात उडया मारायला किंवा रडायला लागेन.

पावसाळयात तू त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेतेस?

मला जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा मी त्वचेला आणि केसांना दही लावते. याशिवाय बेसन, हळद आणि त्यात दूध मिसळून पेस्ट तयार करून ती चेहऱ्याला लावते. भरपूर पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवते. हायड्रेशन सीरमही लावते.

तू किती खवय्यी आणि फॅशनेबल आहेस?

मला खायला प्रचंड आवडते. चायनीज, मेक्सिकन, पंजाबी, दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले मासे, चिकन खूप आवडतात. आईने बनवलेली डाळ-खिचडी खूपच आवडते. फॅशन मला आवडते. मी स्वत: पुरणपोळी आणि वडापाव चांगला बनवते. मला पारंपरिक लुक जास्त आवडतो. साडी आणि पंजाबी ड्रेस आवडतात. मला नृत्यही फार आवडते, पण वेळेअभावी मी ते फारच कमी करते. मी कथ्थक शिकायचा खूप प्रयत्न केला, पण वेळ मिळत नाही.

आवडता रंग – काळा.

आवडता पेहेराव – पारंपरिक, पंजाबी ड्रेस आणि साडी.

आवडते पुस्तक – ययाती.

आवडता परफ्यूम – अत्तर.

आवडते पर्यटन स्थळ – देशात केरळ आणि विदेशात अमेरिकेतील सेन हौजे.

वेळ मिळाल्यावर – झोपणे आणि स्वयंपाक बनवणे.

जीवनातील आदर्श – माझ्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये.

सामाजिक कार्य – वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एकत्र उघडणे.

ड्रीम प्रोजेक्ट – स्पोर्ट्स परसन आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे बायोपिक.

चांगले काम मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला – संचिता कुलकर्णी

* सोमा घोष

24 वर्षीय अत्यंत सुशील, हसतमुख आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री संचिता कुलकर्णी ही ‘प्रीती परी तुझ्यावरी’ या मराठी मालिकेतील कसदार अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने अनेक चित्रपटांतही काम केले आहे. संचिताची आई प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेकरीचा व्यवसाय आहे. तिचे वडील क्रिकेट खेळण्यासोबतच सरकारी नोकरीही करायचे. संचिताला सुरुवातीपासूनच एखाद्या कल्पक क्षेत्रात किंवा मीडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिला आईवडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. सध्या ती सोनी मराठीवर ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणात व्यस्त असूनही तिने मनमोकळया गप्पा मारल्या. इंडस्ट्रीत तिने स्वत:च्या अभिनयाचा ठसा कसा उमटवला? जीवनात तिला कसा संघर्ष करावा लागला? हे जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

अभिनय क्षेत्रात येणे हा योगायोग होता, कारण चित्रपटात अभिनय करण्याचा विचार मी कधीच केला नव्हता, पण एखाद्या कल्पक क्षेत्रात किंवा मीडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिथूनच माझा प्रवास सुरू झाला. माझ्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्रात नव्हते.

तुझं मुंबईला येण्यामागचे कारण काय?

मी नागपूरची आहे. तिथेच लहानाची मोठी झाले. या क्षेत्रात येण्यासाठी मला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. सर्वच पुढारलेल्या विचारांचे आहेत. मला आणि माझ्या बहिणीला कोणतीच बंधने नव्हती. माझी आई माझा आदर्श आहे. वडिलांनीही मनाप्रमाणे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. नेहमी प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. माझ्या करिअर निवडीत माझ्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार करू शकले.

तुझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?

पहिल्यांदा मी अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत घरच्यांना संगितले तेव्हा त्यांनी त्याकडे सकारात्मकपणे पाहिले. मी बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला, कारण शिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. यश आणि अपयश हे दोन्ही पचवता यायला हवे, आईवडिलांनी मला सांगितले. निराश होऊ नकोस, हार मानू नकोस, असा सल्ला दिला. त्यामुळेच मला काम करणे सोपे झाले. करिअर म्हणून चित्रपटात काम करणे चांगले नाही, असे शेजारी, नातेवाईकांनी त्यांना सांगितले, पण समाजाच्या याच विचारांकडे मी आव्हान म्हणून पाहिले.

तूला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

स्टार प्रवाहवरील ‘प्रीती परी तुझ्यावरी’ या मराठी मालिकेपासून माझ्या करीअरची सुरुवात झाली. या मालिकेत माझी प्रीती आणि परी अशी दुहेरी भूमिका होती. मालिका पूर्णपणे माझ्यावर केंद्रित होती. मी दुहेरी भूमिका करत असल्याचा मला आनंद होता. हा माझ्यासाठी प्रमुख भूमिका असलेला एक चांगला ब्रेक होता. ही भूमिका मला स्वबळावर मिळाली होती. ऑडिशन दिल्यानंतरच माझी निवड झाली होती.

तुला कशा प्रकारचा संघर्ष करावा लागला?

माझा संघर्ष वडापाव खाऊन दिवस ढकलण्यासारखा नव्हता. चांगले काम मिळवण्यासाठी मला खूप वेळ लागला. बराच संघर्ष करावा लागला. पदवीधर असल्यामुळे मला नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. फिल्म सिटीमध्ये पहिले ऑडिशन देऊन परतत असताना मला पुन्हा तेथून फोन आला आणि मला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावण्यात आले. माझी प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. ही मालिका सुमारे दीड वर्ष चालली आणि मी घराघरात पोहोचले. लोक मला माझा आवाज आणि चेहऱ्यावरील तिळावरून ओळखू लागले.

तू चित्रपटातील अंतर्गत दृश्य सहजतेने करू शकतेस का?

बिकिनी घालावी लागेल म्हणून मी काही हिंदी चित्रपट नाकारले आहेत. मला अशा ड्रेसमध्ये सहजतेने वावरता येत नाही.

प्रत्यक्ष जीवनात तू कशी आहेस?

सध्या मी जी मालिका करत आहे त्यात माझ्या भूमिकेचे नाव काव्या आहे. मी काव्यासारखीच आहे. काव्या पुढारलेल्या विचारांची आहे. तरीही ती प्रत्येकाशी विचारपूर्वकच वागते. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेते. मीही माझ्या आईला पाहिले आहे. मी एकत्र कुटुंबात वाढले आहे. माझी आई बेकरीचा व्यवसाय करायची. त्यासाठी तिला सकाळी लवकर जावे लागत असे, पण ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायची. घरातील सर्वांचा नाश्ता, जेवण बनवूनच कामावर जायची. मी तिला कधीच दुसऱ्याला दोष देताना पाहिले नाही. तिचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यावेळी दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत माझ्या आईव्यतिरिक्त कोणीच स्त्री कामाला जात नव्हती. माझे वडील महाराजा रणजी ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळायचे. सोबतच सरकारी कामही करायचे. ५ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.

जीवनातील काही संस्मरणीय क्षण, ज्यांना उजाळा द्यायला तुला आवडेल?

मला काम न मिळण्यामागचे कारण माझा सावळा रंग होता, कारण कधी कोणी सावळे म्हणून, कोणी लहान मुलीसारखा चेहरा असल्याचे सांगून तर कोणी मी दिसायला सर्वसामान्य आहे, असे कारण देऊन मला काम द्यायला नकार देत होते. त्यामुळे मी निराश व्हायचे. त्यावेळी कुटुंबातील सर्वांशी बोलल्यामुळे मला दिलासा मिळायचा. इंडस्ट्रीत हे सर्वांसोबतच घडते. तिकडे दुर्लक्ष करून आणि पुढे जा, असे ते मला सांगायचे. या क्षेत्रात प्रचंड संघर्ष आहे. माझी मालिका सुरू असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. तरीही त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी मला चित्रीकरणासाठी परत यावे लागले. दैनंदिन मालिका केल्यामुळे वैयक्तिक आयुष्य उरत नाही. जी मुले इंडस्ट्रीला साधे समजून अभिनय करण्यासाठी येतात त्यांना मला इतकेच सांगायचे आहे की, हा मार्ग सोपा नाही.

तुला अभिनयाव्यतिरिक्त वेळ मिळाल्यास काय करतेस?

अभिनयाव्यतिरिक्त स्वयंपाक करणे, पुस्तक वाचणे, गाडीतून दूरवर फेरफटका मारणे इत्यादी करायला मला आवडते. मी बनवलेले पनीर टिक्का, नान सर्वांनाच खूप आवडते.

तुला कधी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे का?

मला माझ्या सावळया रंगामुळे अनेक नकार मिळाले, पण मी जिथे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक झाले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मी चांगले काम करू शकत आहे.

तू फॅशनेबल आणि खवय्यी आहेस का?

मला लहानपणापासूनच फॅशन आवडते, पण ट्रेंडनुसार कपडे घालायला आवडत नाही. जे आवडतात तेच कपडे मी घालते. नागपूरच्या टेलरकडे जाऊन मी कपडे शिवून घेते, कारण मला काय आवडते, हे त्याला चांगले माहीत असते. मला वाटते की, फॅशन कधीच जुनी होत नाही. कपडे, दागिने आणि चपलांनी माझी तीन कपाटं भरली आहेत.

खवय्यी तर मी खूप जास्त आहे. मला डायटिंग करायला आवडत नाही. रात्रीचे जेवण व्यवस्थित जेवते. जेवणासोबत रोज २ चमचे तूप ठरलेलेच असते. माझ्या मते, मस्त खाणारी मुलगीच नेहमी सुंदर दिसते. आईने बनवलेले सर्वच पदार्थ मला प्रचंड आवडतात.

आवडता रंग – सफेद, लाल आणि काळा.

आवडीचा ड्रेस – भारतीय (चिकनकारीचा) आणि पाश्चिमात्य.

आवडते पुस्तक – द फाउंटन हेड.

आवडता परफ्यूम – बरबेरी आणि इसिमिया.

जीवनातील आदर्श – प्रामाणिकपणे काम करणे, जगा आणि जगू द्या.

आवडते पर्यटन स्थळ – देशात गोवा आणि विदेशात न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, मालद्वीप.

सामाजिक कार्य – अनाथाश्रम आणि वृद्धांची सेवा.

‘‘ग्लॅमरमुळे नव्हे तर प्रतिभेच्या जोरावर काम मिळाले’’ – शीतल कुलकर्णी-रेडकर

* सोमा घोष

मला घडवताना आईची भूमिका काय होती आणि ती मला कधी समजली, याबद्दल मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने काय सांगितले…

कोविड आणि ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर मराठी इंडस्ट्रीत कलाकारांची मागणी आणि त्यांची विचारसरणीही बरीच बदलली. आता दिसण्यापेक्षा जास्त अभिनय क्षमतेवर भर दिला जातो. माझी उंची कमी आहे, पण माझ्या अभिनयाचे कौतुक सर्वच जण करतात. म्हणूनच कोणीही गॉडफादर नसतानाही मी इंडस्ट्रीत चांगले काम करू शकते, असे मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने हसत सांगितले. अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची तिची इच्छा होती आणि त्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील चंद्रकांत कुलकर्णी आणि आई चारुशीला कुलकर्णी याना तेव्हा आनंद झाला जेव्हा त्यांनी शीतलला छोटया पडद्यावर अभिनय करताना पाहिले. शीतलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोटया भूमिकांद्वारे केली. सोबतच ती लघुपटातही काम करायची. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मराठी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दुपारच्या जेवणावेळी तिने खास ‘गृहशोभिके’शी गप्पा मारल्या. चला, जाणून घेऊया, तिच्या जीवनातील काही गोष्टी ज्या तिने स्वत:हून सांगितल्या.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

शाळेत असताना मला नृत्य आणि अभिनयाची आवड होती, मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईपर्यंत अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याबाबत विचार केला नव्हता. महाविद्यालयात आल्यानंतर आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत मी भाग घेऊ लागले. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मराठी व्यावसायिक नाटकात काम करायची संधी मिळाली. ते नाटक केल्यानंतर मला २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्या नाटकातील माझ्या अभिनयासाठी मला अनेक पुरस्कारही मिळाले. येथूनच माझ्या अभिनयातील कारकिर्दीला खऱ्या अर्थी सुरुवात झाली. त्यानंतर एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे काम मिळत गेले. मी मूळची मुंबईची आहे. लग्नानंतर आता सासरी टिटवाळयाला राहाते.

पती संदीप यांच्याशी कशी ओळख झाली?

आमची ओळख महाविद्यालयात असताना झाली. अभिनयातील कारकिर्दीस आम्ही दोघांनीही एकत्रच सुरुवात केली. तोही व्यावसायिक नाटक करतो. याशिवाय मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करतो.

तुला अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवायची आहे, असे पालकांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

माझे घरचे खूप खुश झाले. कोणाचीही काहीच तक्रार नव्हती, कारण मी लहानपणापासून गुरू राजश्री शिर्के यांच्याकडून कथ्थक शिकत होते आणि कथ्थकमधूनच अभिनयाचा प्रवास सुरू होतो.

तुला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक कसा मिळाला?

निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘मधु इथे, चंद्र तिथे’ ही मालिका येणार होती, त्यात मी काम केले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिले, मात्र कुठे एका दिवसाचे तर कुठे दोन दिवसांचेच काम असायचे. हे करत असतानाच मला चरित्र अभिनेत्रीचे काम मिळू लागले. पुढे मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ ची विजेती ठरले. हा एक विनोदी शो आहे आणि त्यानेच मला सर्वात मोठा ब्रेक मिळवून दिला.

सध्या तू काय करतेस?

सध्या मी स्टार प्रवाहच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत छोटी जाऊबाई असलेल्या अपर्णा कानेटकरची भूमिका साकारत आहे. ही कथा कानेटकर कुटुंबाची आहे, जे नेहमी एकत्र राहतात आणि आनंद असो किंवा दु:ख, कुठल्याही परिस्थितीला मिळून सामोरे जातात. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. त्यामुळे यात भूमिका साकारताना मला फार छान वाटत आहे.

वास्तविक जीवनातही तू हीच भूमिका जगतेस का?

ही भूमिका माझ्या जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी टिटवाळयाच्या माझ्या सासरच्या ११ माणसांच्या कुटुंबात राहते. म्हणूनच ही मालिका मला माझ्या अगदी जवळची वाटते.

इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागला?

चांगल्या भूमिकेसाठी माझी धडपड सतत सुरूच असते, पण मी नेहमी शांत राहाते. हे खरे आहे की, गॉडफादरशिवाय आणि कोणत्याही गटात सामील झाल्याशिवाय काम होत नाही, पण शेवटी तुमच्यातील प्रतिभेचीच कसोटी लागते. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, माझी उंची कमी आहे, माझा रंग सावळा आहे, त्यामुळेच बरे दिसण्यासाठी मी सतत धडपड करते, कारण प्रत्येक वेळी मला थोडे गोरे आणि सुंदर दिसायचे असते. प्रत्यक्षात मी फारशी ग्लॅमरस नाही. मला आजवर जे काही काम मिळाले ते ग्लॅमरमुळे मिळालेले नाही, तर माझ्यातील प्रतिभेच्या जोरावर मिळाले. याशिवाय विनोदी शो, ज्यामध्ये टायमिंग आवश्यक असते ते मी अचूक साधू शकते.

कुठल्या  मालिकेमुळे तुझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ या शोची मी विजेती आहे. सोनी मराठीवरील या शोमुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. या मालिकेमुळेच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना लोक मला ओळखू लागले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, याशिवाय हा शो करताना मी गरोदर राहिले.

आईची जबाबदारी पार पाडताना तू कामाशी कसे जुळवून घेतेस?

माझा मुलगा साकेत आता अडीच वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात राहात असल्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा खूप आधार मिळतो. माझा मुलगा माझ्यासोबत चित्रिकरणासाठी यायचा हट्ट करायचा. त्यावेळी त्याची समजूत काढली. मला काय काम करावे लागते, हे त्याला सांगितले. आजीला त्रास देउ नको, असेही प्रेमाने समजावले. कोविडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर, मी चित्रिकरणासाठी सिल्वासामध्ये दीड महिने होते. त्यावेळी माझा मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहिला, कारण तेव्हा काम मिळणे कठीण होते आणि गरजेचेही होते. त्यावेळी घरातल्या सदस्यांनी मला पाठिंबा दिला.

आईशी तुझे नाते कसे आहे?

माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. मी आईशी भांडते, पण आई ही आईच असते, हे मी स्वत: आई झाल्यावर चांगल्या प्रकारे अनुभवले. मुलांना ओरडणे, त्यांना एखादा गोष्टीसाठी नकार देण्यामागचे आईचे कारण नेहमीच खास असते, कारण तिला मुलाला चांगल्या प्रकारे घडवायचे असते. आईला माझ्याबद्दल सर्व गोष्टी माहिती असतात. माझ्या मुलासोबतही मला अशाच प्रकारेचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण करायचे आहे.

तुला खायला किती आवडते? तू किती फॅशनेबल आहेस?

मला खायला प्रचंड आवडते. कथ्थक शोच्या वेळी मी कोलकाता, लखनऊला जायचे, तिथे गेल्यावर तिथले खास पदार्थ शोधून खायचे. याचप्रकारे मला फॅशनही आवडते, पण मला जे घालायला सोयीचे वाटते तीच माझ्यासाठी फॅशन असते, ज्यामध्ये मी साडी जास्त नेसते. याशिवाय जीन्स टी-शर्ट आणि फ्रॉक घालते.

हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक अंतरंग दृश्य असतात. ती तू सहजतेने करू शकतेस का?

कथानकाची गरज असेल तर अशी दृश्य करण्यात काहीच गैर नाही, कारण अनेक अभिनेत्रींनी कथेची हीच गरज पूर्ण करून हिंदीतही खूप चांगले काम केले आहे.

मातृदिनानिमित्त काही संदेश द्यायचा आहे का?

माझ्या मते, आई हा एक स्वभाव आहे, जो मी आई झाल्यावर अनुभवला. आई एक सुंदर अनुभव, एक प्रेमळ वर्तन असते. त्याला जपायला हवे. आई कुठल्याही साच्यात चपखल बसते, तिला न सांगता सगळे समजते. निसर्गाने स्त्रीला आई बनण्याची जी क्षमता दिली आहे ती अद्भुत आहे

आवडता रंग – पांढरा आणि निळा.

आवडता पोशाख – भारतीय (साडी).

वेळ मिळेल तेव्हा – कथ्थकचा सराव, पुस्तक वाचणे आणि मित्रांशी बोलणे.

आवडता परफ्यूम – इंगेजचा व्हॅनिला बॉडी मिस्ट.

पर्यटन स्थळे – देशात हिमाचल आणि परदेशात स्वित्झर्लंड.

जीवनातील आदर्श – कोणाचीही फसवणूक न करणे. कोणालाही दु:ख न देणे, मनात अपराधीपणाची भावना नसणे.

सामाजिक कार्य – गरीब मुलींना नृत्य शिकवणे.

संकल्प का करू इच्छित नाही – अक्षया गुरव

* सोमा घोष

अक्षया गुरव ही मराठीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी मुंबईत लहानाची मोठी झाली. ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेत प्रमुख भूमिका साकारून तिने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि त्यामुळेच ती घरघरात पोहोचली. मुंबईत मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि पुढे मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या अक्षयाच्या वडिलांनी पोलीस दलात काम केले आहे, तर आई गृहिणी आहे. कुटुंबातील कोणीही मनोरंजन क्षेत्रात नसल्यामुळे अभिनय क्षेत्रात प्रवेश करणे अक्षयासाठी सोपे नव्हते. अक्षयाला जेवण बनवायला प्रचंड आवडते. मेथीचे पराठे बनवायचे काम अर्धवटच सोडून तिने माझ्याशी गप्पा मारल्या, ज्या खूपच मनोरंजक होत्या. चला, तिचा प्रवास तिच्याच तोंडून जाणून घेऊया.

तुला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नाही, पण माझ्या आजोबांना विविध वाद्ये वाजवायची आवड होती. तबला, वीणा, सतार, हार्मोनियम इत्यादी वाद्ये त्यांच्याकडे होती. गावात कुठलाही उत्सव असला की ते वाद्य वाजवून गायचे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘एकच प्याला’ या मराठी नाटकात काम केले होते, हे मला माझ्या आत्येकडून समजले. हा त्यांचा छंद होता. कदाचित त्यांच्यामुळेच आम्हा भावंडांमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली असेल. माझे वडील सेवानिवृत्त, आई गृहिणी तर भाऊ इंजिनीअर आहे. मी अभिनय क्षेत्रात भवितव्य घडवावे, असे माझी आत्या मला सतत सांगायची. मला मात्र अभिनयाची आवड नव्हती.

२००९-१० मध्ये मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि तेथूनच अभिनय क्षेत्रातील माझा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर मी बरेच ऑडिशन्स दिले आणि अभिनयालाही सुरुवात केली.

तुला अभिनय क्षेत्रात काम करायचेय, असे पहिल्यांदा आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

माझ्यापेक्षा जास्त उत्साही माझे आईवडील होते. त्यांचे म्हणणे होते की, जे कोणते काम करशील ते उत्तम आणि प्रामाणिकपणे कर, जेणेकरून तुझे नाव होईल. संपूर्ण कुटुंब नेहमी तुझ्यासोबत असेल. गेल्या १० वर्षांपासून मी काम करत आहे. मला कधीच तणाव आला नाही, कारण माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. अनेकदा वेळेवर काम न मिळाल्यामुळे मला वाईट वाटायचे, पण त्या प्रत्येक वेळी कुटुंबाचा भक्कम आधार मिळाला. फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या बहीण आणि भावाच्या पाठीशीही ते ठामपणे उभे राहतात. प्रत्येक मुलगा आणि मुलीसाठी त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत असणे गरजेचे असते, जेणेकरून तुम्ही कोणत्याही समस्येचा सहज सामना करू शकता.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

वर्षभर मी ऑडिशन्स देत होते. पहिला ब्रेक २०१३ मध्ये ‘मेंदीच्या पानावर’ या मराठी मालिकेतून मिळाला. यात मी प्रमुख भूमिका साकारली. मी नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मला नकारात्मक भूमिका आवडत नाहीत. मी महिला प्रधान चित्रपट जास्त केले आहेत. सुरुवातीला मी मराठी नाटकांमधूनही काम केले, ज्यामुळे मी मराठी भाषेतील अचूक, स्पष्ट उच्चार, बोलण्याची पद्धत, शब्दफेक, इत्यादी शिकले. माझ्या मते, रंगभूमीच कलाकाराला घडवते. पहिल्या दोन मालिकांदरम्यान मी अभिनयातील बारकावे शिकले.

तुला किती नकारांचा सामना करावा लागला?

पहिल्याच मालिकेत मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, मात्र मी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याच मालिकेत मला सकारात्मक भूमिका मिळाली. टीव्हीवरील मालिका केल्यानंतर मी मराठी चित्रपटांसाठी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मोठया पडद्यावर काम करण्याची माझा इच्छा होती,  पण त्यात मला यश मिळाले नाही, कारण मी रोज टीव्हीवर दिसत असल्यामुळे मला चित्रपटात काम द्यायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळे  ७-८ वर्षांपर्यंत मी मालिकांमध्येच काम केले. त्यानंतर ब्रेक घेतला आणि नंतर चित्रपटात काम करू लागले. आजकाल बरेच कलाकार टीव्हीसह चित्रपट आणि वेब सीरिज असे सर्व सोबतच करत आहेत.

कोणत्या मालिकेमुळे तुझे जीवन बदलले?

‘मानसीचा चित्रकार’ या मालिकेतील तेजस्विनीच्या भूमिकेमुळे मी घराघरात पोहोचले. ‘दिया और बाती’ या मालिकेचा हा रिमेक होता. या मालिकेने माझे जीवन बदलले. शूटिंगच्यावेळी मला भेटण्यासाठी आजूबाजूचे लोक तेथे यायचे. मी घरी गेल्यानंतरही लोक मला घरी भेटायला यायचे. सर्व जण माझ्या आईवडिलांना माझ्या नावाने ओळखू लागले होते.

नकारात्मक किंवा खलनायिकेची भूमिका न करण्यामागचे तुझे काही खास कारण आहे का?

मला नेहमीच असे वाटत आले आहे की, सकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांकडे आदरपूर्वक पाहिले जाते. त्यांचे फोटो मोठमोठया होर्डिंग्जवर झळकतात. लोक त्यांचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतात. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्यांना असा मान मिळत नाही. शिवाय माझा चेहराही खलनायिकेसारखा दिसत नाही. बहुसंख्य चित्रपटांचे कथानक हिरोभोवती फिरणारे असते. अभिनेत्री किंवा महिलांवर आधारित फार कमी चित्रपट बनतात. मला मात्र महिलांना केंद्रबिंदू ठेवून तयार केलेले चित्रपट आवडतात.

हिंदी चित्रपटात काम करण्याची तुझी इच्छा आहे का?

मी मागील दोन वर्षांपासून हिंदीत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे, कारण मराठीत मी खूप काम केले आहे. हिंदीत वेब सीरिज, चित्रपट किंवा मालिका यापैकी काहीही करायला आवडेल.

हिंदी वेब सीरिजमध्ये अंतर्गत दृश्य बरीच असतात. ती तू सहजपणे करू शकतेस का?

कथानकाची गरज, सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक हे सर्व पाहून त्यानुसार अंतर्गत दृश्य करायला काहीच हरकत नाही. मी मात्र स्वत:साठी काही मर्यादा आखून घेतल्या आहेत आणि त्यांचे उल्लंघन करायला मला आवडणार नाही.

पती भूषण वाणीशी तुझी कशी ओळख झाली?

एका चित्रपटासंबंधी बोलायला मी माझ्या फ्रेंडसोबत एका निर्मात्याच्या घरी गेले होते. तिघे भूषणने स्वत:हून आमच्या सर्वांसाठी कॉफी बनवली. ते पाहून मी गमतीने म्हटले की, हा मुलगा खूप चांगला आहे आणि मला आवडला. माझे हेच बोलणे नंतर खरे ठरले. भूषणने ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री १२ वाजता लोणावळयातील नवीन वर्षाच्या पार्टीत मला लग्नासाठी मागणी घातली आणि मी होकार दिला. त्यानंतर ६ महिन्यांनी आम्ही लग्न केले.

पतिमधील एखादी खास गोष्ट, ज्यामुळे तो तुला आवडतो?

खूपच शांत, गुणी आणि दयाळू आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर त्याच्याकडे असते. म्हणूनच मी त्याला सांताक्लॉज किंवा पॅडीमॅन म्हणते.

तू किती फॅशनेबल आहेस? खाण्यावर तुझे किती प्रेम आहे?

मला फॅशन करायला जराही आवडत नाही. माझा छोटा भाऊ गणेश गुरव आणि नवरा भूषण दोघांनाही फॅशन आवडते. खाण्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळेच डाएट करणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. मी सर्व प्रकारचे नॉनव्हेज बनवू शकते. आईच्या हातचे वरण भात, तूप आणि भाजी खायला मला खूप आवडते.

काही संकल्प केला आहेस का?

कुठलाच संकल्प नाही, कारण संकल्प मध्येच तुटतात. पण हो, चांगले काम करण्याची माझ्या आपल्या सर्व माणसांसोबत मिळून निरोप देण्याची इच्छा आहे.

आवडीचा रंग – सफेद.

आवडता पेहराव – भारतीय.

आवडते पुस्तक – स्मिता, स्मित आणि मी.

बेस्ट कॉम्प्लिमेंट – मी महान अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासारखी दिसते असे अनेकांनी सांगणे.

वेळ मिळाल्यास – व्यायाम, कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्युम – बलगरी अक्का.

जीवनातील आदर्श – चांगले आणि मेहनतीने काम करणे.

सामाजिक कार्य – एखाद्या गरजवंताची मदत करणे.

संघर्षातूनच ओळख मिळते – तन्वी बर्वे

– सोमा घोष

संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो आणि मलाही तो करावा लागत आहे. संघर्षापासून पळ काढून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. संघर्षातून मिळालेली कुठलीही गोष्ट अनमोलच असते. असेच काहीसे सांगत आहे मुंबईतील २२ वर्षीय मराठी अभिनेत्री तन्वी बर्वे, जिला लहानपणापासूनच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायला आवडायचे. यासाठी तिला नेहमीच आईवडिलांचे सहकार्य मिळाले. किशोरवयात तन्वीला जत्रेला जायला खूप आवडायचे. सुंदर चेहरा, नम्र स्वभाव आणि हसतमुख तन्वी सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. यात ती प्राची कानिटकरची भूमिका साकारत आहे. वेळात वेळ काढून तिने आमच्यासोबत फोनवर संवाद साधला. चला, तिच्या प्रवासाबाबत तिच्याकडूनच जाणून घेऊया.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

मला अभिनयाची आवड नव्हती. माझी मोठी बहीण शाळेत असताना नाटकात काम करायची. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी तिच्या शिक्षिकेला तिची आठवण झाली. त्यांचा नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी माझ्या बहिणीसोबत मलाही त्यांच्या ग्रुपमध्ये घेतले. तिथूनच माझ्यामध्ये अभिनयाची आवड वाढू लागली. मी मोनो अॅक्ट, आंतरराज्य शालेय स्पर्धेत भाग घेऊ लागले. तिथूनच मला अभिनयाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयात असताना मी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आणि पुरस्कारही मिळवले. त्यानंतर काही प्रायोगिक नाटकंही केली. यातून मला खूप काही शिकायला मिळाले.

महाविद्यालयात असतानाच मला पहिली टीव्ही मालिका मिळाली. त्यामुळे सर्वजण मला ओळखू लागले आणि मला आणखी काम मिळत गेले. ही माझी तिसरी मालिका आहे.

अभिनय क्षेत्रात करियर करण्यासंदर्भात पहिल्यांदाच तू घरी सांगितलेस तेव्हा पालकांची प्रतिक्रिया काय होती?

माझे वडील एका मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि आई गृहिणी आहे. आई घरूनच दागिन्यांचा व्यवसायही करते. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे की नाही, हे ठरवायला मला बराच वेळ लागला, कारण त्यावेळी मी महाविद्यालयात शिकत होते. मला कधी मुख्य भूमिका तर कधी छोटया भूमिका मिळायच्या. घरून मला कधीच विरोध होत नव्हता, पण मला कधी घरी यायला उशीर व्हायचा तर कधी मी घरी जाऊच शकायचे नाही, कारण रिहर्सल अर्थात तालमी सुरूच असायच्या. त्यामुळे माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटायची. त्यांना या क्षेत्राबद्दल काहीच माहित नव्हते. हळूहळू त्यांनी माझे काही शो पाहिले, माझा अभिनय बघितला. यामुळे त्यांना माझ्या कामाची माहिती झाली आणि त्यांनी मला परवानगी दिली. आईची मला खूपच मदत मिळते. मी काहीही केले तरी ते तिला आवडते, पण माझे वडील खूप मोठे टीकाकार आहेत. माझे प्रत्येक काम ते अतिशय बारकाईने पाहातात आणि मला सल्ला देतात.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

मी अकरावीत असताना मला मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आमच्या कुटुंबाशी मैत्रीचे नाते आहे आणि मी छोटेमोठे कामे करते, हे त्यांना माहीत होते. त्यांनी मला या चित्रपटातील एका छोटया भूमिकेसाठी काम करण्याची संधी दिली. महाविद्यालयात असताना मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. टीव्ही मालिकांसोबतच मी चित्रपटही करते. मला मराठी चित्रपटातील भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. माझा ‘फनरल’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेत काम करण्यामागील तुझं खास कारण काय आहे?

हे एक पारंपारिक, एकत्र राहणारे कुटुंब आहे, जिथे आधुनिक विचारसरणी असलेल्या माझ्या मैत्रिणीचे माझ्याच भावासोबत लग्न होते आणि ती आमच्या घरची सून होते. या मालिकेत मी कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान बहिणीची भूमिका साकारत आहे. कुटुंबात माझा भाऊ आणि त्याची बायको नेहमी छोटयाशा गोष्टीवरूनही भांडतात. त्यांचा राग घालवण्यासाठी माझे वडील आणि घरातील सर्व तरुण काहीतरी युक्ती शोधून काढतात.

ही भूमिका तुझ्या जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

वास्तविक जीवनातील माझे कुटुंब खूपच छोटे आहे, पण मालिकेतील मोठया कुटुंबासोबत चित्रिकरण आणि त्यांच्यासोबत मजा करायला मला आवडते. वास्तव जीवनात मला एक विवाहित बहीण आहे. तिला भेटायला मला क्वचितच वेळ मिळतो.

अभिनयाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडते?

मी पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर, मी बराच वेळ घरी होते. त्यानंतर मी काही दिवस टीव्ही वाहिनीवरील एका काल्पनिक कथानक असलेल्या मालिकेसाठी सहाय्यक क्रिएटिव्हिटी म्हणून काम केले. हा माझ्यासाठी एक अनुभव होता आणि असे काम करण्याची माझी इच्छाही होती. ज्या क्षेत्रात मी पडद्यावर काम करते त्याच क्षेत्रात पडद्यामागे काम करण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी अभिनय क्षेत्रात शिकता येत नाहीत त्या मला येथे शिकायला मिळाल्या.

तुला काही संघर्ष करावा लागला का?

मला पहिले काम काहीही संघर्ष न करताच मिळाले, मात्र काम टिकवून ठेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पहिले काम मला एका ओळखीतल्या दिग्दर्शकाने दिले होते. त्यामुळे काही लोकांना वाटते की, मला संघर्ष करावा लागत नाही आणि आरामात काम मिळाले आहे. म्हणूनच माझ्या अभिनयाचे ते कौतुक करत नाहीत. हा शिक्का पुसून काढण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

‘मोलकरीण बाई’ ही माझी पहिली मालिका होती. त्याआधी मी इतक्या मोठया स्तरावर काम केले नव्हते. या मालिकेमुळे लोक मला ओळखू लागले. या मालिकेमुळे मी खूप काही शिकले. त्याचा उपयोग मला आता होत आहे.

हिंदी चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मी प्रयत्न करत आहे, जिथे ऑडिशन्स होतात तिथे मी ऑडिशन देत आहे. हाही माझ्यासाठी एक संघर्ष आहे, ज्याद्वारे मी मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत ही संधी मला मिळेल, अशी आशा आहे.

अंतर्गत दृश्य तू सहजतेने करू शकतेस का?

मी ते कधीच केले नाही, पण जर कथेची मागणी असेल तर ते मी करू शकते. माझी सहकलाकार आणि मी त्या दृश्यावर जर चर्चा करू शकलो तर असे दृश्य करायला मला काहीच अडचण नसेल.

कोणत्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांसोबत तुला हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल?

मी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, कारण त्यांनी चित्रपटातील नायिकेला इतक्या उंचीवर नेले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी इंडस्ट्रीत नायक नेहमीच वैभवात जगणारे दाखवले जातात आणि नायिका एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातली असते. असे पूर्वी हिंदी चित्रपटांमध्येही दाखवले जायचे, पण आता हे चित्र बदलत आहे. संजय लीला भन्साळींनी नायक कितीही मोठा केला तरी तो नायिकेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी स्वर्गीय अनुभव असेल. याशिवाय मला अभिनेता विकी कौशलसोबत काम करायचे आहे.

तू खवय्यी, फॅशनेबल आहेस का?

मला सर्व काही खायला आणि बनवायला आवडते. सुट्टीच्या दिवशी मी घरीच काहीतरी बनवते आणि सेटवरही घेऊन जाते. सगळे एकत्र जेवतात. मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे. मला माझ्या आईच्या हातची डाळ-ढोकळी खूप आवडते. गोड पदार्थांमध्ये माझी आई लापशी खूपच छान बनवते.

फॅशनबद्दल मी फारशी जागरूक नाही, पण इंडस्ट्रीत राहायचे तर काहीतरी वेगळे करावेच लागते. मला पारंपरिक कपडे जास्त आवडतात. मी पारंपरिक छापील कापड विकत घेऊन स्वत:साठी ड्रेस शिवते. मला कपडयांच्या डिझाईनबाबत थोडेफार समजते. मला फॅशन आणि शॉपिंग खूप आवडते.

आवडता रंग – निळा.

आवडता ड्रेस – पाश्चिमात्य कपडे.

आवडते पुस्तक – कृष्णकिनार (अरुणा ढेरे).

आवडते परफ्यूम – अत्तर.

जीवनातील आदर्श – परिस्थिती कशीही असो, आईवडिलांचा आदर करणे.

वेळ मिळाल्यास – बाहेर फिरायला जाणे.

स्वप्नातला राजकुमार – माझ्या क्षेत्रातील असावा, सहनशील आणि कर्तव्यदक्ष असावा.

सामाजिक कार्य – गरजूंना मदत करणे.

‘‘माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे’’ – वैष्णवी शिंदे

* सोमा घोष

२२ वर्षीय वैष्णवी शिंदे औरंगाबादची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिची ही आवड सोशल मीडियावर टाकून सर्वात अधिक लाईक्स मिळवणारी मुलगी बनली. हा तिचा छंद बनला आणि अभ्यासानंतर जेव्हादेखील वेळ मिळायचा तेव्हा ती नृत्य व अभिनय करायची. वैष्णवीला कधीच असं वाटलं नव्हतं की ती चित्रपटात अभिनय करू शकेल. वैष्णवी अभ्यासात खूप हुशार होती. तिने मॅथमॅटिक्समध्ये एमएस्सी केले आणि आता स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहे आणि तिचं स्वप्न आयएएस बनण्याचं आहे. परंतु चित्रपटांच्या चांगल्या ऑफर आल्या तर ती अभिनयदेखील करू शकते.

आयएएस बनल्यावर वैष्णवीला औरंगाबादला उत्तम रस्ते बनवायचे आहेत. जे कधीच कोणी केलं नाही. याबरोबरच क्लीन आणि ग्रीन इंडिया बनविण्याची तिची इच्छा आहे. तिचा मराठी चित्रपट ‘जिंदगानी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कन्सेप्ट वातावरण संरक्षित करण्याबाबत आहे. ज्याचा प्रभाव वास्तविक आयुष्यामध्ये देखील पूर्ण जगात पाहायला मिळत आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मला लहानपणापासूनच नृत्य, नाटक पाहणं आणि फोटोग्राफीची आवड होती. माझी आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे. तिला पाहूनच मी अभिनेत्री व्हायचं ठरवलं. परंतु यासाठी काय करायचं हे काही मला समजत नव्हत. मी लहान वयातच सोशल मीडियाशी जोडली गेले आणि काही नवीन गोष्ट म्हणजे नृत्य असो वा अभिनय मी सोशल मीडियावर टाकत गेले. यामुळे मला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली. मला सर्वांचे रिएक्शन पाहण्याची आवड होती. मला यामध्ये मजादेखील यायची. आता तर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्या कुटुंबातील मी पहिली कलाकार असल्यामुळे माझं या क्षेत्रांमध्ये येणं काही नातेवाईकांना आवडलं तर काहीजणांना अजिबात आवडलं नाही. त्यांना वाटत होतं की हे क्षेत्र माझ्यासाठी उत्तम नाही आहे. मुलींसाठीदेखील सुरक्षित नाही आहे. परंतु माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सर्वांची रिएक्शन पॉझिटिव्ह येऊ लागली. त्यांना माझा अभिनय आवडला आणि तो कायम राखण्यासाठी ते मला आता सल्ले देत असतात.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मराठी अभिनेता विनायक साळवेचं माझ्या घरी येणं-जाणं होतं त्यांना माहीत होतं की मी सोशल मीडियावर छोटयाछोटया रिल्स टाकते आणि सर्व तरुणाईला ते आवडतं. त्यांनी एक संवाद अभिनयासोबत बोलायला सांगितला. माझा अभिनय त्यांना थोडाफार बरा वाटला. त्यांनी त्यामध्ये काही बदल सुचविले. मी त्यांनी सांगितल्यानुसार पुन्हा अभिनय केला आणि त्यांना माझा अभिनय आवडला. त्याचवेळी त्यांनी मला चित्रपटात अभिनय करण्याच्याबद्दल विचारलं, मी होकार दिला आणि मला तो चित्रपट मिळाला.

चित्रपटामध्ये अभिनय करण्याबद्दल तू पालकांना सांगितलं तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? सर्व प्रथम कॅमेरासमोर भीती वाटली का?

माझी आई सुनीता शिंदेला खूप आनंद झाला, कारण पीएचडीचा अभ्यास करूनदेखील त्यांना चित्रपटाची आवड आहे. माझे वडील संपत शिंदे पोलीसमध्ये आहेत. त्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, म्हणून अभिनय क्षेत्रात येणं सहजसोपं झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सर्वांना माझं काम आवडलं आहे. माझे को-स्टार विनायक साळवे आणि शशांक शिंदे आहेत.

चित्रीकरणाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण होता. परंतु शूटिंग सर्वांसोबत होतं. सर्व मोठमोठे कलाकार होते. सर्वांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली होती, त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. सर्वांना ही गोष्ट समजत होती आणि सर्वांनी मला ताण न घेण्याचा सल्ला दिला. माझा पहिला शॉर्ट एवढा छान झाला की सर्वांनी टाळया वाजविल्या.

या चित्रपटामध्ये तुझी भूमिका कोणती आहे?

यामध्ये मी मोनीची भूमिका साकारली आहे. जी दिसते खूप शांत परंतु राग आल्यानंतर डेंजर बनते. खूप छान मुलगी आहे आणि कोणाशीही तिला अधिक बोलायला आवडत नाही.

पहिल्यांदा चेक मिळाल्यानंतर तू काय केलं?

मी सर्वप्रथम माझ्या आईच्या हातात चेक दिला आणि नंतर मी खूप शॉपिंग केलं. आई माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. ती माझी आवड नावड खूप चांगली समजते.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला फॅशन खूप आवडते. मी वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही घालते. मी डिझायनर कपडे घालत नाही. स्वत: मिक्स अँड मॅच करून वापरते. मला वेगवेगळया डिश ट्राय करायला खूप आवडतात, परंतु यामध्ये चाट मला अधिक आवडतं. मिठाईदेखील आवडते. आईच्या हातचा बनलेला गाजराचा हलवा खूप आवडतो. मला पोळी भाजी बनवता येते.

हिंदी आणि मराठी कलाकारांकडून तुला काय शिकायला आवडतं?

मला अभिनेत्री कैटरीना कैफ खूप आवडते. कारण तिने दुसऱ्या देशातून येऊन संघर्ष करून स्वत:ला एस्टॅब्लिश केलं आहे. अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा खूप आवडतो. मराठीमध्ये स्मिता पाटील यांचं काम आवडतं. अनेक लोकांनी मला मी स्मिता पाटीलसारखी दिसते असं सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरदेखील स्त्रिया घरगुती अत्याचार, बलात्कार इत्यादींना बळी पडत आहेत.

महिला दिनाबद्दल तू काय विचार करतेस?

माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत त्या दुसऱ्यांवर अवलंबून राहतील तोपर्यंत त्या मानसिक व शारीरिकरित्या त्रास भोगत राहतील. यासाठी खरंतर समाज आणि कुटुंबदेखील जबाबदार आहे, जे आपल्या मुलांना लहानपणापासून आई, बहीण, मुलगी आणि पत्नीच्या वेगवेगळया रूपात समजावून सांगत नाहीत. ज्यामुळे अशी मुलं मोठी होऊन कोणत्याही स्त्रीचा सन्मान करणं विसरून जातात आणि वाईट वागतात. या व्यतिरिक्त कायदयानेदेखील वाईट विचार ठेवणाऱ्या विरुद्ध लवकरच निष्पक्ष होऊन आपला निर्णय द्यायला हवा.

आवडता रंग : हिरवा.

आवडता पेहराव : भारतीय.

आवडते पुस्तक : द सीक्रेट.

पर्यटन स्थळ : देशात राजस्थान, परदेशात स्वित्झलँड.

वेळ मिळाल्यावर : झोपते आणि चित्रपट पाहते.

आवडता परफ्युम : पोसेस.

जीवनातील आदर्श : पालकांना अभिमान वाटेल असं.

स्वप्न : रोहित शेट्टीसोबत चित्रपट करणं.

सामाजिक कर्तव्य : रक्तदान प्रसार.

स्वप्नातील राजकुमार : लॉयल, हार्ड वर्किंग.

‘‘घराणेशाहीबद्दल काय म्हणणे आहे’’- स्वानंदी टिकेकर

* सोमा घोष

कलेच्या वातावरणात जन्मलेल्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि नाटयक्षेत्रात अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी एका मराठी कार्यक्रमात काम केले, त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी थिएटर आणि तदनंतर सुमारे ५ वर्षांनी त्यांनी टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. प्रतिभावान आणि आनंदी स्वभावाच्या स्वानंदीने पूर्वी कधी अभिनयाचा विचार केला नव्हता, पण लहानपणापासूनच तिने कला क्षेत्राशी संबंधित लोकांना ये-जा करताना पाहिले आहे, त्यामुळे तिच्या मनात असा विचार आला की ती अभिनय क्षेत्रातही काम करू शकेल आणि त्यानंतर तिला पहिली असाइनमेंट ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये मीनल शिवालेची भूमिका मिळाली, ज्यामध्ये तिच्या कामाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली. मराठी व्यतिरिक्त स्वानंदीला हिंदीत काम करण्याची खूप इच्छा असून ती चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे. सध्या स्वानंदी मराठीवर चालणाऱ्या इंडियन आयडॉल मराठी या म्युझिकल शोमध्ये अँकरिंग करत आहेत. व्यस्त वेळापत्रकातही तिने वेळ काढून आमच्याशी चर्चा केली, जी खूपच मनोरंजक होती.

अँकरिंग आणि अभिनय यात काय फरक आहे आणि तुम्ही कधी नॉस्टॅल्जिक होता?

दिवसभर संगीत चालते, जे मला आवडते. या शोचे जज संगीत दिग्दर्शक अतुल अजय जे मुलांना मार्गदर्शन करतात, त्यात मलाही खूप काही शिकायला मिळते, ज्यामध्ये उच्चार, श्वास घेण्याच्या पद्धती, भावना ओतण्याच्या पद्धती वगैरे सगळं सांगतात. अभिनयातही एखादी भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची चर्चा होते. वास्तविक कलेसाठी कोणताही विशिष्ट असा नियम नाही, कारण सार्वत्रिकपणे अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्व कला प्रकारांसाठी लागू होतात.

अभिनय क्षेत्रात येण्याचे कारण काय होते? कोणाकडून प्रेरणा मिळाली?

मी पुणे येथे कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिकत असतानाच मी आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले होते. तिथे मला अभ्यासापेक्षा नाटकात अभिनय करायला जास्त आवडू लागलं होतं. माझे वडील उदय टिकेकर हेदेखील अभिनेते आहेत, माझ्या कुटुंबात सुरुवातीपासूनच कला आणि फॅशनवर खूप भर दिला गेला आहे. त्यामुळे मला कधीच कुठल्याही गोष्टीसाठी त्रास झाला नाही आणि मला जे आवडते ते मी करू शकते.

आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धांमध्ये काम करत असतांना मी स्वत:ला सुधारले. प्रेक्षकांकडून माझ्या अभिनयाचे कौतुक होण्याबरोबरच मला पुरस्कारही मिळू लागले. यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. याशिवाय मास्टर्स केल्यानंतर मला न्यूयॉर्क विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स इन ग्लोबल अफेअर्समध्येही प्रवेश मिळाला आणि त्या वेळी मला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या नाटक आणि टीव्ही शोमध्ये ऑफरदेखील मिळाली. मला कळत नव्हते की मी काय करावे? जेव्हा मी माझ्या पालकांशी बोलले तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे सांगितले की ते सर्व कलेशी संबंधित आहेत आणि कलेला महत्त्व देत आले आहेत, म्हणून त्या दोघांनीही मला अभिनयात जाण्याचा सल्ला दिला, जेणेकरून काही वर्षांनी मला माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ नये.

मराठी चित्रपटसृष्टीत घराणेशाही किती काम करते, याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?

माझ्या मते घराणेशाही तुम्हाला पहिले काम मिळवून देऊ शकते, त्याने करिअर बनू शकत नाही, पण तुमच्यात टॅलेंट असेल तर तुमचे करिअर घडू शकते. मी टॅलेंटला जास्त महत्त्व देते. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, ज्याबद्दल मी ऐकले आहे. मला हे मराठीत ऐकायला मिळाले नाही, कारण इथे टॅलेंटलाच जास्त संधी मिळते.

तुम्हाला तुमचा पहिला ब्रेक कधी मिळाला? कोणत्या शोमुळे तुम्ही घराघरात नावारूपाला आलात?

मला पहिला ब्रेक २०१४ मध्ये ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या शोमधून मिळाला होता, ज्यामध्ये माझ्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली आणि घरोघरी माझी ओळख झाली, कारण मी आहे तशीच यात येऊ शकले, हे काही सामान्य कौटुंबिक नाटक नव्हते. ६ मित्रांची कथा होती आणि हे सर्व मित्र एकत्र राहत होते. त्यांच्या आयुष्यातील पुढचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आजही प्रेक्षक मला मीनल या नावाने ओळखतात. यामुळे मला खूप आनंद होतो.

तुझा काही संघर्ष राहिला आहे का?

संघर्ष नेहमीच असतो, कारण योग्य प्रकल्पच तुम्हाला योग्य यश देतो. आजचे कलाकार नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करतात. मला कोणत्याही ‘उंदीरांच्या शर्यतीत’ सहभागी व्हायला आवडत नाही. तुम्हाला आयुष्यात दररोज चांगले काम मिळू शकत नाही, चढ-उतार येतच राहतात. आज लोक पराभवाला घाबरले आहेत आणि विजयाच्या मागे लागले आहेत. कोविडच्या काळात घरी बसून मला स्वत:लाही बजवावे लागले आहे की जे माझ्यासाठी नाही ते मला मिळणार नाही, त्याबद्दल ताण घेण्याने काही फायदा होत नाही, नुकसानच होते. प्रयत्न करत राहायचे आहे, अशाने तुम्हाला नक्कीच संधी मिळते.

तुम्ही म्युझिकल शोशी जोडले जाणे किती खास आहे?

मला म्युझिकल शो खूप आवडतात, कारण मी गाणे शिकले आहे आणि गातही असते, माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण संगीताशी जोडला गेला आहे. माझे आजी-आजोबा गायचे, आई गाते. यामुळे दिवसभर संगीत ऐकणे आणि त्यात अँकरिंग करणे, सर्वांना आनंद देणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. याआधी मी अभिनय केला आहे, अँकरिंग नाही. हे खूप अवघड काम आहे, स्क्रिप्ट दिल्यानंतरही तुम्हाला काही गोष्टी सेटवर त्वरित बोलाव्या लागतात. अँकरिंग हे अभिनयासारखे नसते, जिथे काही चुकले तर कट बोलून पुन्हा परत करता येईल.

तुमचे काही स्वप्न आहे का?

बेगम अख्तर, फरीदा खान यांसारख्या गझल गायिकांवर जर चित्रपट बनवले गेले तर मला त्यात मुख्य भूमिका करायला आवडेल.

आवडता रंग – पिवळा.

आवडते पोशाख – पाश्चात्य आणि भारतीय.

आवडते पुस्तक – नर्मदे हर हर – जगन्नाथ कुंटे.

आवडते पर्यटन स्थळ – देशातील ईशान्य, परदेशात प्राग.

सवड मिळाल्यास – गाणी ऐकणे, रियाज करणे आणि चित्रपट पाहणे.

आवडता परफ्यूम – वर्सास डायमंड.

स्वप्नांचा राजकुमार – प्रेमळ, संवेदनशील व्यक्ती.

जीवनाचे आदर्श – सत्यता, सर्वांशी स्नेह बाळगणे आणि प्रामाणिकपणे कार्य करणे.

सामाजिक कार्य – मुलांचे शिक्षण आणि मतिमंद मुलांसाठी कार्य.

स्विमिंग कॉस्ट्यूमसाठीच मी चांगली बॉडी बनवलीय – रीना मधुकर

* सोमा घोष

मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री रिना मधुकरने मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिनाचा जन्म पुण्यात झाला. तिथे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मॉडलिंग करू लागली. तिथूनच तिला सुरुवातीला मराठी आणि नंतर हिंदी इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली. ‘क्या मस्त है लाईफ’ या हिंदी मालिकेत काम केल्यानंतर तिला लगेचच ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यात तिला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने ‘तलाश’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत पोलिसाची भूमिका साकारली. सध्या ‘मन उडू उडू झालं’ या झी मराठीवरील मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ नावाची भूमिका साकारत आहे, जी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली आहे. विनम्र आणि स्पष्टवक्ती असलेल्या रिनाने खास ‘गृहशोभिके’सोबत गप्पा मारल्या. त्यातील हा काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात यायची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली?

अभिनय क्षेत्रात अपघातानेच आली, पण काही दिवसांनंतर मला असे वाटू लागले की, मला येथेच काम करायचे आहे. या क्षेत्रातील माझी सुरुवात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटाने झाली. मुळात मी लोकनृत्य करणारी डान्सर आहे. माझी नृत्याची कंपनीही होती. मराठी इंडस्ट्रीतील एका आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात नितीन देसाई यांच्याशी माझी ओळख झाली. तिथे मला त्यांच्यासोबत एक फोटो काढायची इच्छा होती. तुला अभिनयाची आवड आहे का, असे तिथेच त्यांनी मला विचारले. मी कधीच अभिनय केला नव्ह्ता. त्यांनी मला प्रयत्न करून बघ, असे सांगितले. मला त्यांचा नंबर दिला आणि मुंबईत येऊन भेटायला सांगितले. मराठी चित्रपट ‘अजिंठा’साठी त्यांना एका चांगल्या डान्सरची गरज होती. मला ऑडिशनसाठी बोलावले आणि माझी निवड झाली. तिथूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रातील माझी वाटचाल खऱ्या अर्थी सुरू झाली.

तू नृत्याच्या क्षेत्रात कसे पदार्पण केलेस?

मी लोकनृत्यामध्ये मास्टरी केली आहे. शाळेत असल्यापासूनच मला नृत्याची आवड होती, पण त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मी वयाच्या १५ व्या वर्षापासून घ्यायला सुरुवात केली. भारतीय संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी मी १६ वर्षे अमेरिका, लंडन, मॉरिशस इत्यादी अनेक ठिकाणी मी नृत्य सादर केले. राष्ट्रीय स्तरावरही मी कार्यक्रम करू लागले.

तुला कुटुंबाचे किती सहकार्य मिळाले?

कुटुंबाचे सहकार्य नेहमीच मिळत गेले, कारण मी कधीच चुकीचे काम करणार नाही, असा त्यांना पूर्ण विश्वास होता. या आधी मी अनेकदा परदेशात एकटी गेले आणि तिथे माझी कला सादर केली. कुटुंबाच्या संपूर्ण पाठिंब्याशिवाय काम करणे कधीच शक्य होत नाही. माझे वडील वायुदलात अधिकारी होते, आता सेवानिवृत्त झाले आहेत.

तूला पहिला ब्रेक मिळाल्यानंतर प्रवास किती सोपा झाला?

पहिला ब्रेक मला २०११ मध्ये ‘अजिंठा’ या चित्रपटामुळे मिळाला. त्यानंतर अभिनेता आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘तलाश’ या हिंदी चित्रपटात काम मिळाले. त्यानंतर कधी मराठी तर कधी हिंदी, अशा प्रकारे काम सुरूच राहिले. सोबतच नाटकातही काम करते. सध्या ‘मन उडू उडू झालं’ ही माझी मराठी मालिका सुरू आहे. अशा प्रकारच्या मालिकेत काम करण्यासाठी मी खूप 11 वर्षांपासून वाट पाहत होते. चांगले आणि आव्हानात्मक काम करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती. मी कधीच स्वत:ला मर्यादेत बांधून घेतले नाही.

तुला किती संघर्ष करावा लागला?

पहिला आणि दुसरा चित्रपट अगदी सहज मिळाला. त्यानंतर मात्र काम मिळणे अवघड झाले, कारण मी दोन मोठया प्रोडक्शन हाऊससोबत काम केले होते. त्यामुळेच त्यापेक्षा चांगले किंवा त्या तोडीचे काम मिळणे माझ्यासाठी अवघड झाले होते. संघर्ष नेहमीच खूप मोठा आणि तणावपूर्ण असतो, पण मी वाट पाहते.

एखादी अशी मालिका जिने तुझ्या आयुष्याला कलाटणी दिली?

माझ्या सर्वच कामांना प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली, पण ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सर्व महाराष्ट्रीयन प्रेक्षक, जे विदेशातही आहेत त्यांनाही आवडत आहे. अमेरिकेहूनही मला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. सर्व जण मला सानिका म्हणून ओळखू लागले आहेत.

तू सध्या अभिनय क्षेत्रात काम करत आहेस. अशा वेळी नृत्याची आठवण येते का?

नृत्याची आठवण अनेकदा येते. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे. जेव्हा कधी मी कोणाला एखाद्या पुरस्कार वितरण सोहळयात व्यासपीठावर नाच करताना पाहते तेव्हा मलाही नाचावेसे वाटते. मी त्या संधीची वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे की, ही संधी मला नक्की मिळेल. मीही कधीतरी अशा एखाद्या व्यासपीठावर नक्कीच नाचेन.

पुढे काय करायचा तुझा विचार आहे?

लग्नातील संगीतासाठी कोरिओग्राफी म्हणजे नृत्य शिकवणे हे माझे  वैशिष्टय आहे. यात मी नवरा किंवा नवरीचे वडील, आई, आत्ये, काका, काकी इत्यादींना नृत्य शिकवते, कारण त्यांनी कधी स्टेजवर नृत्य केलेले नसते. त्यांना नृत्य शिकवणे आणि त्यासाठीचा आत्मविश्वास मिळवून देणे, हे मला मनापासून आवडते. ज्याला आधीपासूनच नाचता येते त्याला शिकवण्यात काहीच मजा येत नाही. नृत्य शिकवणे ही माझी आवड आहे.

तू किती फॅशनेबल आणि खाद्यप्रेमी आहेस?

माझे आईवडील मला लहानपणापासूनच खूप छान ड्रेस घालायचे. माझ्याकडे चपलांचे १५० ते २०० जोड आहेत. मला फॅशन करायला आवडते. कुठल्याही प्रसंगी चांगले कपडे घालायला मनापासून आवडते. माझी पर्सनल स्टायलिस्ट निकिता बांदेकर आहे. मी कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ती मला तयार करते. खाद्यप्रेमाबद्दल सांगायचे तर, माझी आई कोकणातली आहे. मला तिच्या हातचे मालवणी पद्धतीने केलेले मासे खायला खूपच आवडतात.

चित्रपटात अंतरंग दृश्य तू किती सहजतेने करू शकतेस?

मी स्क्रिप्ट वाचल्यानंतरच निर्णय घेते. गरज नसल्यास अंतरंग दृश्य करत नाही. याशिवाय ज्यांच्यासोबत मी काम करत आहे ते माझे सहकारी आणि दिग्दर्शक कसे आहेत, हेही पाहते. स्विमिंग कॉस्ट्यूम घालायला मला काहीच हरकत नाही, कारण त्यासाठीच मी माझा बांधा कमनीय बनवला आहे. स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये कोणी अश्लील तर कोणी निखळ सुंदरही दिसू शकते. या दोघांमध्ये एक अस्पष्ट रेषा असते. यात दिग्दर्शक आणि कॅमेरामनचा सर्वात मोठा हात असतो.

मेकअप करायला तुला किती आवडते?

सेटवर मेकअप करावा लागतो, पण सेटच्या बाहेर मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. मात्र डोळयात काजळ घालायला आवडते. सेटच्या बाहेर मी लिपस्टिक लावत नाही. लिप बाम लावते.

लग्नाला तुझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे? लग्न टिकून रहावे यासाठी काय गरजेचे आहे?

लग्नाला माझ्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. मी लग्न केले आहे आणि माझा नवरा जसा मला हवा होता त्यापेक्षाही खूप जास्त चांगला आहे. लग्न म्हणजे नवऱ्याच्या रूपात तुम्हाला समजून घेणारा जोडीदार हवा. जात, धर्म आणि ठिकाण याला कसलेच महत्त्व असता कामा नये. नवरा आणि त्याच्या कुटुंबाचे विचार चांगले असतील तर तुम्ही कुठलाही विचार न करता बिनधास्तपणे लग्न करायला हवे. याशिवाय नवरा हा दोघांमधील छोटया-छोटया समस्या सोडवणारा आणि तुम्हाला समजावणारा माणूस असणे खूप गरजेचे आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पोशाख – भारतीय पोशाखात साडी आणि पाश्चिमात्य पोशाखात आरामदायी वाटेल असे कुठलेही ड्रेस.

वेळ मिळाल्यास – चांगली झोप घेणे आणि सीटू (मांजर) बरोबर खेळणे.

आवडता परफ्युम – बबरी ब्लश.

आवडते पर्यटन स्थळ – भारतात चंदिगढ आणि दिल्ली. परदेशात स्वित्झर्लंड.

जीवनातील आदर्श – तेच काम करावे जे घरातले आणि स्वत:लाही योग्य वाटेल.

एखादे स्वप्न – बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीची भूमिका साकारणे.

बेस्ट कॉम्प्लिमेंट – माझ्या डोळयांसाठी मिळालेली, याशिवाय पालकांनी मुलांना दिलेला माझ्यासारखे बनण्याचा सल्ला.

सामाजिक कार्य – मांजरे, भटकी कुत्री आणि प्राण्यांसाठी काम करणे.

सण-उत्सव कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायला आवडतात – रूचिरा जाधव

* सोमा घोष

उच्चशिक्षित कुटुंबातील मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही छोटया पडद्यावरील मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे मराठी इंडस्ट्रीजमध्ये चर्चेत आली. यानंतर तिने टीव्हीवरील बरेच कार्यक्रम आणि चित्रपटांतही भूमिका साकारल्या. तिच्या या प्रवासात तिच्या पालकांनी तिला खूपच सहकार्य केले. म्हणूनच ती या क्षेत्रात पुढे जाऊ शकली. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या रुचिराने अथक परिश्रमाने आपल्या अस्तित्वाचा ठसा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत उमटवला आहे. नुकतेच तिचे एक मराठी चित्रपट आणि हिंदी वेब शोचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी रुचिरा उत्सुक आहे. तिने फोनवरून या क्षेत्रातील आपल्या प्रवासाबाबत सांगितले, जो खूपच मनोरंजक आहे. सादर आहे यातीलच काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात माझ्याव्यतिरिक्त इतर कुठलाही सदस्य अभिनय क्षेत्रात नाही. या कुटुंबातील मी पहिली अभिनेत्री आहे. महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला मला आवडायचे. याव्यतिरिक्त महाविद्यालयात असताना मी एका नाटकाची संहिताही लिहिली होती आणि अभिनयही केला होता. त्या नाटकासाठी मला राज्यस्तरावर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार आणि त्या नाटकाच्या लेखनासाठीही द्वितीय पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘इंडियन नॅशनल थिएटर’ स्पर्धेतही सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशा सर्व गोष्टी एकाच वेळी जुळून आल्यामुळे मी याच क्षेत्रात कारकीर्द घडवायचे ठरविले. त्यानंतर मला नाटक, चित्रपट, टीव्ही आणि वेब सर्वांकडूनच कॉल येऊ लागले आणि अभिनय हाच माझा पेशा झाला.

अभिनय क्षेत्रात काम करणार असल्याचे पहिल्यांदाच घरी सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

सुरुवातीला खूपच अवघड होते, कारण पूर्वी जेव्हा मी नाटकात काम करायचे तेव्हा मला महाविद्यालयातून घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळे घरून ओरड खावी लागायची. माझ्या पालकांना इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. जेव्हा मला पुरस्कार मिळू लागले आणि माझे नाव वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा त्यांना वाटले की, मी काहीतरी चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते मला सर्वतोपरी सहकार्य करू लागले. हे खरे आहे की, इंडस्ट्रीत कधीच कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि मी अजूनही तो करीत आहे. पण मला स्वत:वर विश्वास आहे. महिनाभर जरी काम मिळाले नाही तरी तणाव वाढतो.

गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत काम करणे किती अवघड असते?

सुरुवातीला संघर्षाकडे मी तणाव म्हणून पाहायचे. आता मात्र हसून त्याला सामोरी जाते. सध्याच्या कोरोना काळात घरातून ऑडिशन द्यावे लागते, पण माझे घर लहान आहे. माझ्यामुळे घरातल्यांना मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. माझ्याकडे स्वत:ची कार नाही. त्यामुळे शूटिंग म्हणजे चित्रिकरणासाठी मला ठाणे येथून खासगी टॅक्सी करून जावे लागते. चित्रिकरण १२ ते १३ तास चालते. मात्र मुंबईत वाहतूक कोंडीमुळे आणखी काही तास वाया जातात. त्यामुळे झोपण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच प्रसन्न चेहऱ्याने चित्रिकरण करणे हे मोठे आव्हान असते. मी जास्त करून कॅबने प्रवास करते. बाहेरून सर्वांना वाटते की, इंडस्ट्रीत केवळ ग्लॅमर आहे, पण त्याआड जी प्रचंड मेहनत करावी लागते ती कोणालाही दिसत नाही. मी काम मनापासून एन्जॉय करीत असल्यामुळे कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव मला होत नाही. अनेकदा जेव्हा एक किंवा दोन महिने झाले तरी काम मिळत नाही तेव्हा मात्र मी खूपच तणावाखाली येते. म्हणूनच काम कितीही दूर आणि प्रचंड मेहनतीचे असले तरी मी नकार देत नाही.

या इंडस्ट्रीजशी संबंधित नसल्यामुळे चांगले काम मिळविण्यासाठी तुला अडचणी आल्या का?

या ६ वर्षांत बराच संघर्ष केला आहे. इंडस्ट्रीला नवशिके नव्हे तर थेट प्रतिभावान कलाकार हवे असतात. मात्र ही प्रतिभा अभिनयातून आणि त्यातून मिळत जाणाऱ्या अनुभवातून गवसते. अभिनयाव्यतिरिक्त तुमची पोहोच आणि या क्षेत्रातील प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळविणे फारच गरजेचे असते. पण मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, कारण यामुळे परफॉर्मन्स खराब होतो.

तुझे राहणीमान, बोलण्याच्या पद्धतीमुळे कधी काही सहन करावे लागले आहे का?

मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. फॅशन डिझायनर बनण्याची माझी इच्छा होती. पण घरातल्यांचा विरोध होता. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अभ्यासासोबतच मी नाटकात काम करू लागले. माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. ही समज माझ्यात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे कधी कोणाकडून त्यासाठी ऐकून घ्यावे लागले नाही. याशिवाय नाहक बडबड करण्यापेक्षा मी नेहमीच शांत राहते. कॅमेरा, दिग्दर्शक आणि संवाद या तीन गोष्टींवर नेहमीच लक्ष केंद्रित करते.

कोणत्या मालिकेमुळे तुझ्या जीवनाला कलाटणी मिळाली?

मी बरेच ऑडिशन दिले. काम मिळत राहिले. पण हो, मिळेल त्या कामाला मी होकार देत नाही. जे काम करायचे मी ठरवले आहे तशी भूमिका असेल तरच ती स्वीकारते. तेच काम करण्याची माझी इच्छा असते. स्क्रिप्ट, दिग्दर्शक आणि बॅनर पाहूनच मी चित्रपटाची निवड करते. मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. यात मी ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारली. माझ्या आईचे नावही माया आहे. माझ्यासाठी आईच्या नावासोबत काम करणे ही मोठी गोष्ट होती. या भूमिकेने मला ओळख मिळवून दिली. सर्वांना मी माहीत झाले. अनेकदा मराठी मालिकांमध्ये ग्लॅमर फार कमी असते, पण या मालिकेत माझ्या भूमिकेतील अभिनयातच ग्लॅमर होते. यामुळे मला कामाव्यतिरिक्त खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मला विविध भाषेत वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात.

तुझे स्वप्न काय आहे?

बायोपिकवर आधारित भूमिकेपेक्षा महिला केंद्रित विषयांवर काम करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे आव्हान स्वीकारायला मला निश्चितच आवडेल. ऐतिहासिक पात्रांमध्ये मला द्र्रौपदीची भूमिका साकारायला आवडेल, कारण यात प्रत्येक चरित्राशी द्रोपदीचे कुठल्या ना कुठल्या रूपातील नाते जोडले गेलेले आहे.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो. सण-उत्सवांमुळेच आपण आपले कुटुंब, मित्रांशी जोडलेले राहतो. दिवाळीत कंदिल, रांगोळी, पणत्या, चांगले कपडे घालणे, असे सर्व एकत्रच जुळून येते. याशिवाय आई अनेक पारंपरिक पदार्थ बनवते. ते मला सर्वात जास्त आवडतात. दिवाळीत फटाके फोडणे मला आवडत नाही. यामुळे प्रदूषण होते, शिवाय फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून लपून राहण्याइतकी जागाही जीवजंतूंसाठी शिल्लक राहिलेली नाही.

आवडता रंग – गुलाबी, निळा, काळा, पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

वेळ मिळाल्यास – मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणे.

आवडता परफ्युम – नॅचरल इसेन्स.

आवडता पदार्थ – आईच्या हातचे जेवण.

आवडते पर्यटन स्थळ – देशात काश्मीर, विदेशात मालद्वीप.

जीवनातील आदर्श – ज्या गोष्टीमुळे कोणी दुखावले जाईल ती न करणे किंवा असे काहीच न बोलणे.

आवडते काम – अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात प्रत्यक्ष जाऊन काम करणे. आर्थिक मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – बाहुबलीसारखा असण्याची गरज आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें