मायक्रोव्हेवमध्ये ठेवू नका ही भांडी

* डॉ. निताशा गुप्ता

तुम्हाला हे माहिती आहे का, की जेवण प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून ओवनमध्ये गरम केल्यास तुम्हाला वांझपणा, मधुमेह, लठ्ठपणा, कॅन्सर (कर्करोग) इत्यादी होण्याचा धोका असतो?

प्रत्यक्षात विविध संशोधाद्वारे असे निदर्शनास आले आहे की, प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून ओवनमध्ये जेवण बनवणे किंवा गरम केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो. मेंदूच्या कार्यप्रणालीचे नुकसान होते. यासारखे इतर अन्य भयंकर दुष्परिणाम समोर आले आहेत. मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये प्लॅस्टिकचे भांडे गरम झाल्यावर त्यातील रसायने ९५ टक्क्यांपर्यंत वितळतात.

प्लॅस्टिक आरोग्याचा शत्रू

प्लॅस्टिकची भांडी तयार करण्यासाठी बिस्फेनोल ए या औद्योगिक रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन सर्वसाधारणपणे बीपीए या नावाने ओळखले जाते. या रसायनामुळे वांझपण, हार्मोन्समध्ये बदल आणि कॅन्सरमध्ये वाढ होऊ शकते. हे रसायन लैंगिक लक्षणांमध्ये बदल घडवून आणते. म्हणजेच ते पुरुषी गुणांनाही कमी करते. मेंदूतील संरचनेचे नुकसान करते आणि लठ्ठपणा वाढविण्याचेही काम करते.

प्लॅस्टिकमध्ये पीव्हीसी, डायऑक्सीन आणि स्टायरिनसारखे तत्त्व असतात, ज्यांचा थेट संबंध कॅन्सरशी असतो.

आश्चर्याची गोष्ट अशी की, जेव्हा प्लॅस्टिकच्या भांडयांमध्ये वस्तू ठेवून मायक्रोव्हेव ओवनमध्ये जेवण बनवले जाते तेव्हा प्लॅस्टिकच्या भांडयात असलेली रसायने ओवनच्या उष्णतेमुळे वितळून खाद्यपदार्थांमध्ये मिसळतात. जेवण गरम झाल्यावर प्लॅस्टिकच्या गरम भांडयातून निघणाऱ्या रसायनांच्या संपर्कात येते आणि दूषित होते.

जेव्हा मायक्रोव्हेचा वापर कराल तेव्हा त्याच्यापासून लांब रहा, कारण विविध संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, मायक्रोव्हेवचा वापर करताना हानीकारक किरण बाहेर पडतात. पण बहुतांश प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, मायक्रोव्हेवमध्ये जेवण बनवणे किंवा गरम करणे नुकसानदायक नाही. पण हो, जर मायक्रोव्हेमध्ये चुकीच्या भांडयांचा वापर केल्यास तो तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. म्हणूनच प्लॅस्टिकचा वापर टाळा.

काचेची भांडी जास्त सुरक्षित

जेवण ठेवण्यासाठी काचेची भांडी जास्त सुरक्षित असतात. ती प्लॅस्टिकप्रमाणे रसायन बाहेर सोडत नाहीत आणि जेवण गरम करण्यासाठीही सुरक्षित असतात. तुम्ही जेवण गरम न करताही जेवू शकता. पण तो खाद्यपदार्थ कोणता आहे, यावर तो गरम करायचा की नाही, हे अवलंबून असते.

सध्या प्लॅस्टिकचा वापर सर्वत्रच होऊ लागला आहे, त्यामुळे त्याच्या वापरापासून स्वत:ला दूर ठेवणे खूपच कठीण आहे. पण प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करुन तुम्ही तुमचे जेवण आणि पेयपदार्थांना त्याच्या विषारी परिणामांपासून जास्तीत जास्त दूर ठेवू शकता आणि शरीरातील बीपीएचा स्तर कमी करू शकता.

आवडीला बनवा कमाईचे साधन

* पूनम पांडे

बऱ्याचदा जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी घराच्या छतावरच बागकाम केले जाते. याद्वारे निसर्गावरील आपले प्रेमही जोपासले जाते. कुंड्यांमध्ये आवडीची फुलझाडे किंवा भाज्यांची लागवड करण्यासोबतच इतरही अनेक रोपटी लावली जातात. अशाच प्रकारे एका महिलेने आवड जोपासत आपल्या घराचे संपूर्ण छत हिरव्यागार नर्सरीत रुपांतरीत केले. मीना नावाच्या या महिलेला तेव्हा आश्चर्य वाटले जेव्हा छतावर लावलेल्या कुंड्या त्यांच्या कमाईचे साधन ठरल्या. प्रत्यक्षात घडले असे की, एके दिवशी दुपारी शेजारी राहणाऱ्या तरुणाने त्यांच्याकडे येऊन कडिपत्ता मागितला.

उदार मनाच्या असल्यामुळे छतावर जाऊन हवा तेवढा कडिपत्ता तोडून घे, असे त्यांनी तरुणाला सांगितले. छतावर गेल्यानंतर त्याने पाहिले की, तेथील काही कुंड्यांमध्ये कडिपत्ता लावला आहे. योग्य किंमत देऊन ती छोटी छोटी रोपटी विकत घेण्याची तयारी त्याने दाखवली. त्याच्या तोंडून रोपटयांसाठीची चांगली किंमत ऐकून महिलेला आश्चर्य वाटले. तरुणाने सांगितले की, कडिपत्त्याचा वापर विविध पदार्थ तसेच औषधींच्या रुपातही केला जातो. याची पाने खूपच सुवासिक असतात.

म्हणूनच पोहे, डाळ, भाज्या तसेच अन्य अनेक पदार्थांमध्ये कडिपत्ता वापरला जातो. त्याच दिवसापासून महिलेने छतावर जास्तीत जास्त रोपटी लावण्यास सुरुवात केली आणि फक्त २ महिन्यांमध्येच आश्चर्य घडले. विविध प्रकारच्या रोपटी, झाडांनी त्यांचे छत बहरले.

याची माहिती सर्वत्र पसरताच काही जण फोटोग्राफी कार्यशाळेसाठी काही तासांसाठी छत भाडयावर घेऊ लागले. त्या महिलेवर निसर्गाच्या रुपात जणू लक्ष्मी प्रसन्न झाली, कारण आता त्यांचे छत त्यांना उत्पन्न मिळवून देऊ लागले होते.

रोपटयांची लागवड

काही झाडे अशीही असतात ज्यांची अतिशय कमी खर्चात लागवड करून त्यांना कमाईचे माध्यम बनवता येते. काही शोभेची रोपे वरचेवर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमध्ये मोठया प्रमाणावर विकली जातात. त्यांची लागवड करणे खूपच स्वस्त असते. मातीत रोवताच काही दिवसांतच ती बहरतात.

नर्सरीचा व्यवसाय कोणीही करू शकतो. तसे तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पैसे आणि योग्य नियोजनाची गरज असते. पण यासाठी लागणार पैसा आणि मेहनत ही इतर व्यवसायांच्या तुलनेत तशी कमीच असते.

तर चला, माहिती करून घेऊया कशी सुरू करायची घराच्या छतावर नर्सरी.

सर्वप्रथम छतावर किती जागा आहे याचे मोजमाप घेऊन त्यानुसार कुंड्या इत्यादींची खरेदी करा. सुरुवातीला रिकाम्या बाटल्या, डबे, मडक्यात रोपटी लावा. ती तग धरू लागली की त्यानंतर कुंड्यांमध्ये वाढवून तुम्ही ती विकू शकता.

नर्सरीसाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपयुक्त व्यवस्थेचे नियोजन करणे. याचा अर्थ कमी जागेत जास्तीत जास्त रोपटी उगवतील आणि अशी व्यवस्था असेल जिथे मोठया कुंड्यांमध्ये भाजीपाल्याच्या बिया टाकून रोपटी विकसित केली जातील. जवळपास सर्वच नर्सरी चालवणारे अशीच व्यवस्था करतात.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास जर एखाद्या मोठयाशा ड्रममध्ये योग्य नियोजनानुसार धने, बडीशेप, ओवा इत्यादीचे उत्पादन घेता येईल. रूम फ्रेशनर म्हणून याची मोठया प्रमाणावर विक्री होते.

रोपटयांची निवड करताना

नर्सरीसाठी रोपटी निवडताना काही विशेष गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वात आधी असा घाऊक विक्रेता शोधा जो कमीत कमी किमतीत तुम्हाला भरपूर रोपटी देईल आणि ती वाढविण्यासाठीचा सल्लाही देईल. घाऊक विक्रेते शेकडो एकर जमिनीवर हा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे ते अशा छोटया उद्योजकांसाठी अनेकदा खूपच उपयोगी ठरतात. त्यांच्याकडून खत आणि बियाही कमी दरात मिळतात.

अशा प्रकारे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले तर नर्सरीसाठी रोपटी, बिया, कुंड्या, माती खरेदीपासून ते सिंचनापर्यंत तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही.

सर्वसामान्यपणे या कामासाठी १० ते १२ हजारांची गुंतवणूक पुरेशी आहे. पण जर तुम्हाला नवनवे प्रयोग करायची आवड असेल तर तुम्ही तुमच्याकडील जमवलेल्या पैशांचा वापर यासाठी करू शकता किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करू शकता. बँका लघू उद्योगांसाठी कर्ज देतात. इतरही अनेक योजनांअंतर्गत पालिका, ग्रामपंचायत तसेच काही संस्थाही लघू उद्योगांसाठी कर्ज देतात.

आवश्यक सामग्री जमा केल्यानंतर नियोजनानुसार काम सुरू करणे हे नर्सरीसाठी उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल असते. रोपटयांसाठी योग्य ग्राहक शोधणे आणि त्यासाठी योजना आखणे हेही फायदेशीर ठरते. यासाठी काही खर्च होत नाही. याशिवाय नर्सरीसाठी विजेची सोय, व्यवस्थित माहिती घेऊन बिया पेरणे, रोपटयांची निवड करणे आणि कमी पाण्यात तग धरून राहणारी जास्तीत जास्त रोपटी लावणे गरजेचे असते, कारण अशी रोपटी हातोहात विकली जातात.

हा उपाय अचानक मोठा फायदा करून देतो. मागील ५ वर्षांच्या आकडेवारीनुसार लग्न, वाढदिवस, सेवानिवृत्ती, सत्कार सोहळे, राष्ट्रीय समारंभ इत्यादी वेळी नर्सरीतून लाखोंच्या संख्येने रोपटयांची खरेदी करण्यात आली. यात कमी पाणी लागणाऱ्या रोपटयांना अधिक मागणी होती.

गुरुग्राममधील एका नर्सरी मालकाने डझनाहून अधिक जुन्या बाटल्या कापून त्यात शोभेची झाडे लावून ठेवली होती. त्यांना आठवडयातून एकदा पाणी घातले तरी पुरेसे होते. अचानक एका मंगल कार्यालयाचा प्रतिनिधी आला आणि १० पट जास्त किंमत देऊन ती झाडे विकत घेऊन गेला.

बियांची निवड

सर्वात आधी हे ठरवायला हवे की, नर्सरीद्वारे तुम्हाला नेमके काय करायचे आहे. जसे की, तुम्हाला रोपटी विकायची आहेत किंवा बिया, तुळस, बेल अथवा भाज्या किंवा फक्त विदेशी रोपटी विकायची आहेत, हे निश्चित करा.

तुम्ही लिंबाच्या प्रजाती, आंबा, पेरू, डाळिंब, गवती चहा, तुळस, भोपळा, दुधी भोपळा, मिरच्या, टोमॅटो, कडिपत्ता, पालक, गोंडा, सदाबहार, जीनिया इत्यादी लावू शकता. काही वेलीही लावा, ज्या कुठल्याही मोसमात मिळतात. आता तर या वेलींजवळ उंचावर उगवणारी विदेशी रोपटीही चांगल्या प्रकारे वाढीस लागतात. तुम्ही बी पेरून त्याद्वारे छोटी रोपटी उगवून ती विकायचा विचार करीत असाल तर त्यासाठी आधी यासंदर्भातील सर्व माहिती व्यवस्थित मिळवा. त्यानंतर बिजाची निवड करा.

जर तुम्ही केवळ रोपटी विकून पैसे कमवू इच्छित असाल तर मोठे शेत असलेल्या एखाद्या शेतकऱ्याशी करार करा. दरमहा त्याच्या शेतातून रोपटी आणून ती आपल्या छतावर लावून त्याची देखभाल करा व ग्राहकानुसार विका. हे तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

नर्सरी तयार झाली तरी रोपटयांसाठी सतत कसदार माती तयार करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते. शेवटी रोपटे मातीवरच अवलंबून असते. अगदी कमी किमतीत माती सहज उपलब्ध होते. हे जमीन खरेदी करण्याइतके महागडे नाही. यासाठी एकापेक्षा एक कितीतरी सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. सोबतच याकडे नेहमी लक्ष द्या की, निवडण्यात आलेल्या कुंड्या पुरेशा मोठ्या असतील. यामुळे बीज अंकुरित होताना त्याला कुठलीच अडचण जाणवणार नाही.

तुमचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा असे वाटत असेल तर तुम्हाला रोपटयांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागेल. चांगल्या आणि उच्च गुणवत्तेच्या बिजासाठी शेणखत किंवा पालापाचोळयाचे खत गरजेचे असते. हे यासाठी आवश्यक आहे की, जर कधी कीड वगैरे लागली तर कुंड्यांमधील माती बदलावी लागते. त्यावेळी हे काम अवघड होत नाही. अगदी ४-५ मिनिटांत कुंड्यांमधील माती बदलता येते.

सर्वात मुख्य काम आहे मार्केटिंग

नर्सरी व्यवसायाची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी मार्केटिंग म्हणजे बाजाराचा शोध घेणे ही आहे. यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमच्या स्थानिक बाजारात ग्राहक शोधा. विविध ठिकाणी तुमच्याकडील रोपटी आणि बिया तुम्हाला विकता येतील. अशा कितीतरी संस्था आहेत ज्या रोपटी आणि बिया खरेदी करीत असतात.

दरवर्षी जून ते ऑगस्टदरम्यान लाखो खासगी संस्था झाडे लावतात. प्रत्येक जिल्ह्यातील शेकडो सरकारी संस्था वृक्षारोपण किंवा बिया पेरण्याचे काम करतात.

प्रत्येक नगरातील नगरपालिकेला दरवर्षी पावसात कमीत कमी १ ते २ लाख रोपटी लावायची असतात. त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे. ही संख्या दुप्पट किंवा चौपटही असू शकते. तुम्ही जर यासंदर्भात वर्तमानपत्रातील माहितीकडे लक्ष दिले किंवा स्वत: सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये जाऊन थोडीशी मेहनत घेतली तर वर्षभराची गुंतवणूक तुम्ही केवळ या ४ महिन्यांत सहज परत मिळवू शकता.

तुम्हाला जर तुमच्या कामासाठी जवळपासच बाजार मिळत असेल तर यामुळे तुमचा वाहन खर्चही वाचेल आणि त्यामुळेच उत्पन्नही अधिक वाढेल. तुमचे वागणे मैत्रीपूर्ण असेल तर शेजारी, ओळखीतले आणि मित्रही ग्राहक संख्या वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

प्री वेडिंग शूट बनवा संस्मरणीय

* इंजी आशा शर्मा

आजकाल प्रत्येक कपलला आपले प्री वेडिंग शूट इतरांपेक्षा चांगले करायचे असते. त्यांची इच्छा असते की हा थाटमाट सोहळयाला आलेल्यांच्या आठवणीत कायमचा राहावा. लग्नानंतरही त्याचीच चर्चा व्हावी आणि फोटोग्राफरनेही त्यांचेच शूट उदाहरणादाखल इतरांना दाखवावे. चला, जाणून घेऊया की याला शानदार आणि संस्मरणीय कसे बनवायचे ते.

लग्नानंतर जवळीक वाढविण्यासाठी जसा हनीमून गरजेचा आहे, तसेच एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या प्रक्रियेत प्री वेडिंग शूट उपयोगी ठरू शकते. कारण सोबत राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बऱ्याच गोष्टी समजतात. त्याच्या सवयी लक्षात येतात.

यासोबतच सामान्यत: प्री वेडिंग शूट करणारा फोटोग्राफरच लग्नाचे शूटिंग करतो. साहजिकच त्या जोडप्याशी त्याचे चांगले टयूनिंग जुळते. त्यामुळे शूट करणे त्याच्यासाठी सहज सोपे होते. आणि याच सहजतेमुळे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शानदार आणि संस्मरणीय ठरतात.

कोठे कराल

प्री वेडिंग शूटसाठी सर्वप्रथम योग्य ठिकाणाची निवड करणे खूपच गरजेचे आहे. प्रत्येकाची स्वत:ची अशी आवड असते. कुणाला नदी, पर्वत आवडतात, तर कुणाला समुद्र किंवा किल्ले, महाल. काहींना थीम शूटिंग आवडते.

वरवधूने एकमेकांची आवड आणि सोय लक्षात घेऊन ठिकाण निवडले पाहिजे. देशात आणि देशाबाहेर अशी बरीच ठिकाणे आहेत, जी आजकाल प्री वेडिंग शूटसाठी तरुणांची पहिली पसंती आहेत. जसे महाल, किल्ल्यांसाठी राजस्थानातील जयपूर आणि उदयपूर, समुद्र किनाऱ्यांसाठी गोवा, केरळ आणि पाँडेचेरी व उद्याने, वनांसाठी नॅशनल पार्क इत्यादी.

आपल्या बजेटचा विचार करून तुम्ही आसपासच्या एखाद्या रमणीय ठिकाणाचीही निवड करू शकता.

अजून बरेच पर्याय आहेत

वेडिंग फोटोग्राफर नरेश गांधी सांगतात की छोटया शहरांतील तरुण-तरुणी जे डेस्टिनेशन शूट करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सेट्सचा एक नवा ट्रेंड आला आहे. होय, चित्रपट आणि मालिकांप्रमाणेच आजकाल प्री वेडिंग शूटसाठीही खास सेट बनवले जात आहेत. याचा फायदा असा होतो की तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व लोकेशनचे बॅकग्राउंड मिळते. एकटयाने बाहेर जावे लागेल, हा संकोच दूर होतो आणि खिशावर बजेटचा भारही पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आउट डोअर शूटिंगवेळी कपडे बदलताना येणाऱ्या अडचणीतूनही सुटका होते.

शूट कसे असावे

स्टिल फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूट बहुतांश कपल्सची इच्छा असते की एखाद्या चित्रपटाच्या जोडप्याप्रमाणे त्यांची गोष्टही सर्वांसमोर यावी. जसे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यांचे भेटणे किंवा फिल्मी स्टाईल एकमेकांना धडकणे. मग थोडे लटके, भांडण. त्यानंतर प्रपोज आणि होकार इत्यादी आणि हे सर्व केवळ व्हिडिओ शूटद्वारे शक्य आहे, पण हे प्रत्यक्ष त्याच लोकेशनवर शूट करणे कठीणच नाही तर बजेटच्या बाहेरचेही होऊ शकते.

व्हिडिओ शूटसाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कम्फर्टेबल असणे खूपच गरजेचे आहे, कारण एका व्हिडिओ शूटमध्ये १०-१५ सेकंदांपर्यंत कम्फर्टेबल राहावे लागते.

काय खास असावे

प्री वेडिंग शूटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांमधील केमिस्ट्री. तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर वाटायला हवात. यासाठी गरजेचे आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत काही वेळ एकांतात घालवायला हवा. तुम्ही फोनवर गप्पा मारल्या असाल किंवा व्हिडिओ चॅटद्वारे एकमेकांची आवडनिवड समजून घेतली असेल, ते भाव तुमच्या देहबोलीतून जाणवायला हवेत.

अशा प्रकारच्या शूटमध्ये मित्रमैत्रिणींनाही सोबत घेता येईल. तुम्ही सर्व डान्स करत किंवा सहलीत मौजमजा करत असताना दिसलात तर ते क्षण निश्चितच अतिरिक्त ऊर्जेने भरलेले दिसतील.

पावसात भिजतानाच्या तुमच्या शूटमध्ये नॅचरल रोमान्स दिसेल. विविध प्रकारचे प्रॉप्स वापरुनही तुम्ही तुमच्या शूटला युनिक बनवू शकता.

थोडेसे रोमँटिक व्हा

नेहमीच्या आणि पारंपरिक शूटपेक्षा वेगळे असे काही व्हिडिओ जे थोडे रोमँटिक आणि सेक्सी असतील तर सोन्याहून पिवळे होईल. गरजेचे नाही की हे फोटो किंवा व्हिडिओ सर्वांसमोर पाहिले जावेत. यांना भविष्यातील त्या क्षणांसाठी सांभाळून ठेवता येईल, जेव्हा लग्नाच्या काही वर्षांनंतर आपसात मतभेद किंवा पती-पत्नीत वाद होतील. आपल्या फोटोग्राफरशी बोलून असे खासगी सेक्सी व्हिडिओ शूट करून घेता येईल.

काय आहे सोशल मिडियाचे व्यसन

– गरिमा पंकज

अनेकदा एकटेपणा किंवा कंटाळा घालवण्यासाठी आपण सोशल मिडियाचा आधार घेतो आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. कालांतराने ही सवय कधी आपणास व्यसनाच्या जाळयात अडकवते हे कळतदेखील नाही. त्यावेळी मनात असूनही आपण यापासून दूर राहू शकत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे सोशल मिडियाचे व्यसनही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक स्तरावरही नकारात्मक प्रभाव पाडते.

अमेरिकन पत्रिका ‘प्रिव्हेंटिव मेडिसिन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधानानुसार जर आपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब, इंस्ट्राग्राम आदींवर एकटेपणा घालवण्यासाठी जास्त वेळ घालवत असाल तर परिणाम उलट होऊ शकतो.

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, तरुण जितका जास्त वेळ सोशल मिडियावर घालवतात आणि सक्रिय राहतात, त्यांना तितकेच जास्त समाजापासून अल्प्ति राहावेसे वाटेल. यासंदर्भात संशोधनकर्त्यांनी सोशल मिडियावरील सर्वात लोकप्रिय ११ वेबसाईट्सच्या वापराबाबत १९ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या १,५०० अमेरिकी तरुणांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचे विश्लेषण केले.

अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्रमुख लेखक ब्रायन प्रिमैक यांच्या मतानुसार, ‘‘आपण सामाजिक प्राणी आहोत, पण आधुनिक जीवनशैली आपल्याला एकत्र आणायचे सोडून आपल्यातील अंतर वाढवत आहे. मात्र आपल्याला असे वाटते की सोशल मिडिया सामाजिक अंतर संपवण्याची संधी देत आहे.’’

सोशल मिडिया आणि इंटरनेटचे काल्पनिक जग तरुणांना एकटेपणाचे शिकार बनवत आहे. अमेरिकेची संघटना ‘कॉमन सैस मिडिया’च्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलांनाही जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडिया आणि व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधायला जास्त आवडते. १३ ते १७  वर्षे वयोगटांतील १,१४१ किशोरवयीन मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. ३५ टक्के किशोरवयीन मुलांना व्हिडिओ मेसेजद्वारे मित्रांशी संपर्क साधायला जास्त आवडते. सोशल मिडियामुळे मित्रांना भेटताच येत नाही, हे ४० टक्के मुलांनी मान्य केले. तर फोन किंवा व्हिडिओ कॉलशिवाय राहूच शकत नाही, असे ३२ टक्के मुलांनी सांगितले.

इंटरनेटच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक विकासावर अर्थात सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सातत्याने काल्पनिक जगात रमणारे किशोरवयीन खऱ्या जगापासून अलिप्त होतात. यामुळे ते निराशा, हताशपणा, उदासिनतेची बळी ठरू शकतात.

सोशल मिडियाचे जाळे हळूहळू मोहजालात अडकवून आपले किती नुकसान करत आहे, हे लक्षात घ्या. आजकाल घरात जास्त कुणी नसल्याने आईवडीलच मुलांचे मन रमावे यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. त्यानंतर एकटेपणामुळे कंटाळलेली मुले स्वत:च स्मार्टफोनमध्ये आपले जग शोधू लागतात. सुरुवातीला सोशल मिडियावर नवेनवे मित्र जोडणे त्यांना खूपच आवडते, पण हळूहळू या काल्पनिक जगाचे वास्तव समजू लागते. याची जाणीव होते की जग जसे एका क्लिकवर आपल्यासमोर येते, तसेच एका क्लिकवर गायबही होते आणि आपण राहतो एकटे, एकाकी, खचून गेलेले. त्याचप्रमाणे जी मैलो न् मैल दूर राहूनही आपल्या मनासह विचारांवर ताबा मिळवतात अशी खोटी नाती काय उपयोगाची?

एकदा का कोणाला सोशल मिडियाची सवय लागली की तो सतत आपला स्मार्टफोन विनाकारण चेक करत राहतो. यामुळे त्याचा वेळ फुकट जातोच, शिवाय काहीतरी चांगले करण्याची क्षमताही तो गमावून बसतो.

माणूस सामाजिक प्राणी आहे. समोरासमोर बोलून जे समाधान, आपलेपणा आणि कुणीतरी सोबत असल्याची सुखद जाणीव होते, ती सोशल मिडियावर तयार होणाऱ्या नात्यांमधून कधीच होत नाही. शिवाय सोशल मिडियावर असता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. सातत्याने खूप काळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्याही निर्माण होतात.

आरोग्यावर होतो परिणाम

सतत स्मार्टफोनचा वापर केल्याने झोप कमी येते. दृष्टी कमजोर होऊ लागते. शारीरिक हालचाल कमी होत असल्याने अनेक प्रकारचे आजार जडतात. स्मरणशक्तीही कमी होते.

आजकाल लोकांना प्रत्येक समस्येचे तात्काळ उत्तर हवे असते. त्यांना इंटरनेटवर प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर मिळते. यामुळे ती सारासार विचार करण्याची क्षमता गमावू लागतात. बुद्धीचा वापर कमी होत जातो. हे एखाद्या नशेप्रमाणे आहे. लोक तासन्तास अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करत राहतात, पण साध्य काहीच होत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें