सरिता

कथा * देवेंद्र माने

ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी…अन् अगदी अकस्मात! तिने खरं तर मला बघितलंही असावं पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कुणी परका, अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो…पण माझा तिच्यावर कोणताच, कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला अडवणार होतो? विचारावं वाटलं होतं, कशी आहेस? काय करतेस हल्ली? पण…न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकून वाटला असेल…मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल…कशाला हा दिसला असंही वाटलं असेल…

ही तीच मुलगी होती. म्हणजे पूर्वीची मुलगी. आता एक विवाहित स्त्री, कुणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती. माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी.

आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षांला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सीनिअर्सने तिला एकटीला गाठलं अन् तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा  कमीज (टॉप) यापैकी एक काही तरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला, मग सीनियर्स संतापले, चेकाळले त्यांनी तिला थोबाडायला सुरूवात केली.

ती जोरजोरात रडायला लागली. एकेक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा अन् अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोहोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं.

तिचे वडील शहरातले फार मोठे व्यावसायिक होते. त्यांनी सरळ पोलिसात तक्रार केली. त्यांच्या पोलिसात, राजकारणी लोकात भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे पोरं घाबरली, सरळ धावत इस्पितळात पोहोचली. वडिलांसमोर मुलीची क्षमा मागितली. चक्क पाय धरले. विषय तिथेच संपला.

तिच्या वडिलांनी माझे आभार मानले. गरिबाचे आभार मानताना त्याला पैसे दिले जातात. ‘प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस’ असं म्हटलं जातं. मला तर पैशांची नितांत गरज होती. मी पैसे घेतले. एक कोट्यधीश व्यावसायिक, समाजात मानसन्मान, राजेशाही बंगला, दारात चमचमत्या चारपाच मोटारी, गेटपाशी वॉचमन. हे सगळं बघून खरं तर मी दबून गेलो. पार बुडालो.

कॉलेजच्या मुलांना ती कोण आहे हे आधी ठाऊक असतं तर हा प्रकार घडलाही नसता. त्यानंतर मात्र सगळेच तिच्याशी व्यवस्थित वागू लागले. पण ती मात्र कुणालाही भाव देत नव्हती फक्त माझ्याशीच बोलायची. सुरुवात तिनेच केली.

‘‘हॅलो, मी सरिता,’’ तिने हात पुढे केला.

‘‘मी देवदत्त,’’ मीही हात पुढे केला.

दोन हात एकमेकांत गुंफले. चार डोळे एकमेकांना भेटले. माझ्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. हळूहळू आम्ही एकमेकांचे जिवलग झालो. एकमेकांना फोन करत होतो. मेसेजेसची देवाणघेवाण करत होतो. आम्ही प्रेमात सगळं जग विसरलो होतो.

कॉलेजची ट्रिप एका हिलस्टेशला जाणार होती. माझी गरिबी…मी पैसे भरू शकत नाही म्हणून मी ट्रिपला जायला नकार दिला. पण तिने माझे पैसे भरले अन् मला ट्रिपला जावंच लागलं.

तिथल्या रम्य वातावरणात आम्ही दोघंच तळ्याकाठी बसलो असताना तिने म्हटलं, ‘‘मी प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’

‘‘प्रेम मीही करतोय तुझ्यावर…पण याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय?’’

‘‘परिणाम काय असणार? सगळ्यांचं जे होतं तेच?’’

‘‘मी फार गरीब आहे.’’

‘‘म्हणून काय झालं?’’

‘‘तुझ्या वडिलांना विचारून बघ…’’

‘‘कमाल करतोस, प्रेम मी केलंय, लग्न मला करायचंय, आयुष्य माझं आहे, मीच ते जगणार आहे तर यात माझ्या वडिलांचा संबंध कुठे येतो?’’

‘‘तेही वडिलांनाच विचार.’’

ती एकदम चिडली. मी तिला समजावलं, तिचा रुसवा काढला. किती प्रयत्न केले तेव्हा ती खळखळून हसली. स्वच्छ खळखळणाऱ्या गंगेप्रमाणे पवित्र भासली ती मला.

त्यानंतर आमचं प्रेम वाढतच गेलं. आमच्या भेटी वाढल्या. सगळ्या कॉलेजात आमच्या प्रेमाचीच चर्चा होती. कित्येक मुलं माझ्यावर जळायची.

‘‘मला तुझ्या घरी घेऊन चल,’’ एक दिवस सरिताने मला म्हटलं, ‘‘तुझ्या घरातल्यांशी माझी ओळख करून दे.’’

मी एकदम घाबरलोच! माझी गरिबी बघून तिला काय वाटेल? ती माझ्यापासून फारकत घेईल का? घरात विधवा आई अन् लग्नाच्या वयाची असूनही केवळ पैसे नाहीत म्हणून लग्न न झालेली बहीण आहे. दोन खोल्यांचं विटामातीचं घर. वैधव्य, गरिबी, हतबलता यामुळे कायम चिडचिड करणारी अन् करवादून बोलणारी आई. तिच्या कष्टामुळे शिकत असलेला मुलगा नोकरी करून पैसा मिळवेल याच एका आशेवर आहे ती अन् मी…? बहिणीच्या लग्नाआधी स्वत:चंच लग्न ठरवलं हे बघून तिला काय वाटेल?

सरिता हटूनच बसली. शेवटी मी तिला घरी आणली. ती आईला भेटली, बहिणीला भेटली. छान बोलली. आईने गोडाचा शिरा केला, बहिणीने चहा केला. निरोप घेऊन सरिता निघून गेली. आई मात्र त्यानंतर गप्प गप्प होती. ती बोलली जरी नाही तरी मला सर्व समजलं. मला लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्या जबाबदाऱ्या आहेत या, त्यानंतर इतर गोष्टी. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण मला यश येत नव्हतं. सतत नकार मिळाल्याने माझं मन आता अभ्यासासाठी लागत नव्हतं. मला फार असहाय वाटत होतं. एकच उपाय होता, मी सरिताशी लग्न करून घरजावई व्हायचं अन् या गरिबीतून कायमचं मुक्त व्हायचं. पण स्वाभिमान आडवा येत होता.

सरिता कोट्यधीश बापाची एकुलती एक कन्या होती. प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे ती महालातून झोपडीतही येऊन राहायला तयार होती. ती मला झोपडीतून राजमहालातही घेऊन जायला तयार होती. पण काय करू ते मलाच समजत नव्हतं. एका पवित्र खळाळत्या स्वच्छ नदीला मी माझ्या गरिबीच्या दलदलीत आणून सोडू? ती किती दिवस हे सहन करेल? प्रेमाची धुंदी उतरल्यावर ती माझ्याजवळ या गरिबीत राहू शकेल? पण तिला इतकं करायला लावण्याचा मला काय हक्क आहे? तिच्या घरी जाऊन घरजावई म्हणून राहू? पण स्वाभिमान तसं करू देत नव्हता. आईचा एकमेव आधार मी होतो. आईला काय वाटेल?

‘‘तुझी अडचण काय आहे?’’ सरिताने विचारलं.

‘‘मला दोन्ही चालणार आहे. एक तर तू तुझ्या गरिबीतून बाहेर पड, नाहीतर मला येऊ दे तुझ्या घरात. मला फक्त तू, तुझी सोबत हवीय. गरीब, श्रीमंत, महाल, झोपडी, कशानेच फरक पडणार नाही. तू तिथे मी. तुझ्याशिवाय मला महालात स्वास्थ्य नाही.’’

मी गप्प होतो.

‘‘तू बोलत का नाही?’’ वैतागून तिने विचारलं.

‘‘काय बोलू? मला थोडा वेळ दे…’’

वेळ तर झपाट्याने पुढे जात होता. कॉलेज संपलं. मी नोकरी शोधत होतो. मला कुठेही, कसलीही नोकरी मिळेना. सरिता भेटायची, फोनवर बोलायची. मी खरं तर पार मोडून पडलो होतो. अन् सरिताने लग्नाचा धोशा लावला होता. तिच्या प्रेमाचा हक्कच होता तो.

सरिताचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिने तिच्या वडिलांशी माझ्या बाबतीत बोलून ठेवलं. मला म्हणाली, ‘‘बाबांनी घरी बोलावलंय. त्यांना काही बोलायचं आहे.’’

मी त्या अवाढव्य बंगल्यापुढे उभा होतो. आत दांडगी अल्सेशियन कुत्री भुंकत होती. मला बघून दरवानाने दार उघडलं.

बाहेरच्या हिरवळीवरच सरिताचे बाबा चहा घेत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी बसण्याची खूण केली. तेवढ्यात नोकर माझ्यासाठी चहा घेऊन आला. मी भेदरून बसलो होतो. आपण किती खुजे आहोत या जाणीवेने मी खूपच नव्हर्स झालो होतो.

त्यांनी दमदार आवाजात विचारलं, ‘‘काय हवंय?’’

‘‘नाही…काहीच नाही,’’ मी कसाबसा बोललो.

‘‘सरिताशी लग्न करण्याची हिंमत आहे?’’

‘‘न…नाही.’’

‘‘घरजावई व्हायची तयारी आहे?’’

‘‘नाही….’’

‘‘मग पुढे काय ठरवलंय?’’

मी गप्प.

‘‘लग्न तू करू शकत नाहीस. तुला नोकरीही मिळत नाही. गरीब घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य संपेल तुझं. माझ्या पोरीचं कसं व्हायचं? तू तिला नाही म्हण…उगाचच वेळ घालवून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नकोस.’’

मी गप्पच होतो. काय बोलणार?

‘‘तू तर तुझा आत्मविश्वासही घालवून बसला आहेस. हे बघ देव, एक तडजोड सुचवतो. वाटल्यास त्याला सौदा म्हणूयात.’’

मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांच्याकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं.

‘‘माझ्या मित्राच्या कंपनीत तुला सुपरवायझर म्हणून नोकरी देतो. बहिणीच्या लग्नासाठी बिनव्याजी कर्जही देतो. पगार भरपूर आहे. तझ्या आईला बरं वाटेल. तिचे पांग फेडल्यासारखं होईल. फक्त तुला सरितापासून दूर व्हावं लागेल.’’

मला नोकरी लागली. बहिणीच्या लग्नासाठी पैसेदेखील मिळाले. म्हातारी, कातावलेली, थकलेली आई जरा हसऱ्या चेहऱ्याने बोलू लागली.

सरिताला त्यानंतर मी भेटलो नाही. काही दिवस माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्याने सरिताशी संपर्कच झाला नाही. वडिलांनी तिला सांगितलं की त्याने जबाबदारी अन् प्रेम यापैकी जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं. त्याला घरजावई म्हणून राहायचं नव्हतं. तेव्हा तू त्याला विसर.

आज इतक्या वर्षांनंतर सरिता अशी जवळून निघून गेली, पुसटशी ओळखही तिने दाखवली नाही तेव्हा मी जबाबदाऱ्यांची काय किंमत दिलीय हे मला जाणवलं.

तिच्या मागेच माझा कॉलेजचा मित्र दिसला. रॅगिंग मास्टर समर खोत. ‘‘अरे देव, कसा आहेस?’’

‘‘मी बराय, तू सांग.’’

‘‘माझं छान चाललंय…मजेत आहे मी…’’

‘‘अरे मी कुणा कपाडिया, एस. नामक व्यक्तिला भेटायला आलोय.’’

तो मनमोकळे हसला. ‘‘अरे मीच कपाडिया एस. समर कपाडिया. मीच बोलावलंय तुला.’’

मी चकित! ‘‘कसं शक्य आहे? तू तर समर खोत आहेस. फिरकी घेतोस काय?’’

त्याने मला कॉफी घ्यायला चल म्हटलं. मी एजंट होतो. तो माझा क्लायंट होता. त्याच्याबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं.

समरने कॉफी मागवली. मग मी फॉर्म काढले. त्याला विचारून फॉर्म भरू लागलो. नॉमिनेशनमध्ये सरिता कपाडिया नाव आलं अन् माझा हात थबकला.

‘‘माझ्या हातावर थोपटत समरने म्हटलं, ‘‘तू नकार दिल्यामुळे सरिता पार बावरली होती. सैरभैर झाली होती. कापलेल्या पतंगासारखी अवस्था झाली होती तिची. मीही मध्यमवर्गीयच होतो. मला थाटामाटाचं, श्रीमंती आयुष्य जगायचं होतं. असं समज, तो कापलेला पतंग मी लुटला. मी तिच्या वडिलांना भेटलो. घरजावई व्हायला तयार झालो. सरिताला प्रेमाने बोलून, समजावून नव्याने आयुष्य जगायला उद्युक्त केलं. तिने सावरावं म्हणून अतोनात प्रयत्न केलेत. खरं तर मीही तिच्यावर प्रेम करत होतो. पण ती तुझ्या प्रेमात असल्याने मी गप्प होतो. माझं प्रेम, माझे कष्ट यामुळे ती सावरली. तिच्या वडिलांची अट मान्य करून मी आडनाव अन् जातही बदलली. तिला प्रेमाने जिंकलंच, तिच्या वडिलांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकाप्रमाणे मानून त्यांनाही जिंकलं. आज माझ्याजवळ सरिता आहे. मानसन्मान, पैसाअडका सगळंच आहे. मीच कपाडिया शेठ.’’

तेवढ्यात सरिता तिथे आली. मला बघून म्हणाली, ‘‘हे इथे कसे?’’

‘‘बऱ्याच दिवसांपासून पॉलिसी घ्यायला फोन करत होता. मी ओळखलं त्याला, पण त्याने मला ओळखलं नाही.’’

सरिता म्हणाली, ‘‘कसे ओळखणार? तुम्ही तर आडनाव, जात सगळंच बदललं. प्रेमात जात, धर्म काहीच आडवं येत नाही…’’

समर हसला. त्याने सरिताने मारलेला टोमणा सहज पचवला.

‘‘देव, घरी सगळे कसे आहेत?’’

‘‘आई मागेच वारली.’’

‘‘तुझी बायको, मुलं?’’

‘‘लग्न नाही केलं मी. बहीण विधवा होऊन दोन मुलांसकट माहेरी परत आली. आता त्यांचंच सगळं करतो आहे. सुपरवायझरची नोकरी सोडून दिली; कारण ती उपकाराच्या ओझ्याखाली काम करण्याची जाणीव देत होती. आता विमा एजंट झालोय. दिवसरात्र तुझ्यासारखे कस्टमर क्लायंट शोधत असतो.’’

‘‘जी माणसं आयुष्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, मोठे निर्णय घेताना कचरतात त्यांचं आयुष्य असंच जायचं,’’ सरिताने म्हटलं. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

जुनं प्रेम पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून समरने घाई केली. ‘‘चल सरिता, आपल्याला निघायला हवं. देव, उद्या भेटतो तुला. हे काम तुझं झालं म्हणून समज.’’ अन् तो सरितासोबत निघून गेला.

घरजावई न होण्याचा स्वाभिमान दाखवून मी काय मिळवलं? जे मिळवलं त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक घालवलं. सरिता शेवटी सागराला मिळाली. वर वर ती सुखी दिसली तरी ती तृप्त नाही हे मला कळत होतं. केवळ माझ्यामुळे ती दु:खी आहे ही सल माझ्या मनात नेहमीच राहील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें