– रोचिका शर्मा
श्वेता आणि प्रियांका सिनेमाला गेल्या होत्या. सिनेमा पाहून परतताना श्वेता म्हणाली, ‘‘हिरोइन किती सुंदर दिसत होती. तिचे ड्रेसेसही किती छान होते. खरंच मीसुद्धा असे ड्रेस घालू शकले असते तर…’’
श्वेताचे बोलणे ऐकून प्रियांका टिचकी वाजवत म्हणाली, ‘‘मग घाल ना, तुला कोणी रोखले आहे…’’
‘‘कोणी रोखले नाहीए, पण माझे वयही बघ ना. या वयात तसे कपडे घातले, तर लोक मला हसणार नाहीत का? कुठे २०-२२ वर्षांची हीरोइन आणि कुठे मी,’’ श्वेताने उत्तर दिले.
‘‘यात हसण्यासारखी कोणती गोष्ट आहे? प्रत्येक माणसाची स्वत:ची आवड असते. केवळ ड्रेसिंग सेन्स चांगला असला पाहिजे. मग मजेत आपल्या आवडीचे कपडे घाला आणि तरुण दिसा.’’
गोष्ट खरी आहे. ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, तर तुम्ही सर्व प्रकारचे कपडे वापरू शकता.
एफ सलूनच्या मालकीण पारुल शर्माला जेव्हा मी विचारले की आपले वय कमी दिसण्यासाठी घातलेल्या कपड्यांची काही भूमिका असते का? तेव्हा ती म्हणाली, ‘‘ऑफकोर्स असते. सर्व महिलांना आपल्या वयापेक्षा कमी दिसायचे असते. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करतात, परंतु या सर्वांबरोबरच वय कमी दाखवण्यात घालण्यात आलेल्या कपड्यांचीही महत्त्वाची भूमिका असते. आपले शरीर आणि आवडीनुसार कपड्यांची निवड आपल्याला तरुण दाखवण्यास खूप मदत करते.’’
मी विचारले की अनेक महिला आपल्या टीनएजर्स मुलींप्रमाणे फॅशनेबल कपडे वापरतात. त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? एका ४० वर्षीय महिलेने जर असे कपडे घातले, तर ती वाईट दिसणार नाही का? तेव्हा यावर ती म्हणाली, ‘‘नाही मुळीच नाही, केवळ त्या महिलेला तसे ड्रेस घालण्याची आवड असावी आणि तिला माहीत असावे की तो ड्रेस कसा कॅरी करायचा आहे.’’
तसे हे आवश्यकही नाही की जे कपडे टीनएजर यंग दिसण्यासाठी घालतात, ते ४० वर्षीय महिलेनेही घालावेत, पण हो, त्या ट्रेंडच्या हिशोबाने मिळते-जुळते आणि जास्त सॉफिस्टिकेटेड पॅटर्न घालू शकता.
तरुण दिसण्यासाठी छोटे आणि बॉडी हगिंग टाइट कपडे वापरणे आवश्यक आहे का? विचारल्यावर तिचे उत्तर होते, ‘‘जर कोणाला आवडत असतील, तर जरूर वापरा. केवळ स्वत:चा स्वत:वर विश्वास असला पाहिजे की, मी छान दिसतेय. मी असे म्हणेन की आपण छोटे, पारदर्शी किंवा टाइट कपडे घातल्यावरच तरुण दिसाल, हे आवश्यक नाही. ट्रेंडी राहाल, तर नक्कीच आपण आपल्या वयापेक्षा लहान दिसाल. कपडे व्यवस्थित घाला. जर ड्रेस घालण्याचा नीटनेटकेपणा नसेल, तर तुम्ही तरुण दिसण्याऐवजी अजागळ दिसू शकता.’’
ट्रेंडची माहिती कुठून घ्यावी? याच्या उत्तरादाखल त्यांचे मत आहे, ‘‘लेटेस्ट ट्रेंड्सच्या वेबसाइट्स आणि चांगले फॅशन कॅटलॉग्स पाहा. मी स्वत: ते पाहते आणि सर्च करते की कोणता ट्रेंड चालू आहे, कोणते फॅब्रिक आणि पॅटर्न फॅशनमध्ये आहे वगैरे.’’
फिटनेसमुळे चेहराही उजळतो
माझी मैत्रिण जिया सांगते, ‘‘मला फॅशनेबल कपडे वापरणे खूप आवडते. त्यामुळे जिममध्ये वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवते. जिमचा एक फायदा हाही आहे की अॅक्टिव्ह राहिल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन रीलिज होते. त्याला हॅप्पीनेस हार्मोनही म्हणतात. जर आपण आनंदित राहाल, तर त्यामुळे चेहऱ्यावरही उजळपणा दिसेल, जेव्हा चेहरा उजळ दिसेल, तेव्हा नक्कीच आपण तरुण दिसाल. म्हणून आवडते कपडे घाला, खूश राहा आणि तरूण दिसा.’’
माझी आणखी एक मैत्रीण जी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियातून परतली आहे, ती सांगते, ‘‘मला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात आणि त्यात मला कंफर्टेबलही वाटते. वेस्टर्नसोबत डोक्यावर हॅटही खूप छान दिसते. मी रोज बाहेर जाता-येताना हॅट घालते. सूर्याची तीव्र किरणे जेव्हा चेहरा आणि डोक्यावर पडतात, तेव्हा त्वचेचा रंग काळा आणि निस्तेज होतो. केसही निस्तेज होऊ लागतात. अर्थात, हॅट घातल्याने शौक तर पूर्ण होतोच, त्याचबरोबर सुर्याच्या हानिकारक किरणांपासून माझ्या त्वचेचं व केसांचेही संरक्षण होते. त्यामुळे स्किन एजिंग होत नाही. ही गोष्ट मला माझ्या वयापेक्षा कमी दाखवण्यास मदत करते.’’
ट्रेंडी दिसण्यासाठी काही टीप्स
- मला माझ्या कॉलेजच्या काळापासूनच ट्रेंडी कपडे वापरण्याची खूप आवड होती. तरुण दिसण्यासाठी काही महिला केवळ ब्युटी प्रॉडक्ट्सचा आधार घेतात. परंतु ब्युटी प्रॉक्ट्स सोबतच जर त्यांनी आपल्या पेहरावावर लक्ष दिले, तर नक्कीच आपण तरुण दिसाल.
- आपली जीवनशैली नियमितपणे तपासा. पूर्ण झोप घ्या, आहारात बॅलन्स डाएट घ्या. रोज व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवा. जर तुम्ही फिट असाल, तर सर्व प्रकारचे पेहराव आपल्यावर इतरांपेक्षा जास्त चांगले दिसतील.
- जर मनाजोगे कपडे घालायचे असतील, तर कपडे खरेदी करताना त्यांच्या स्टिचिंगवरही लक्ष द्या. जर ते चांगल्याप्रकारे डिझाइन्ड असतील, तर आपण जास्त आकर्षक दिसाल. व्हर्टिकल स्ट्रीम लाइन्ड ड्रेस तुम्हाला तरुण दर्शवतील. अनेक वेळा ३-४ प्रकारचे ट्रेंड्स एकाच ड्रेसमध्ये एकत्र मिसळले जातात. उदा. ट्रेडिशनल कुर्त्यामध्ये अॅम्ब्रॉयडरी, फुल स्लीवजसह कप व बटण, म्हणजे स्लीवज फोल्डही करता येतील. पण खरे सांगायचे तर हे मुळीच चांगले दिसत नाही.
- आपण जेव्हा कपडे खरेदी करता, तेव्हा त्यांच्यासोबतच मॅचिंग बॅग्ज, चप्पल, ज्वेलरी इ.ही खरेदी करा. अनेक वेळा ड्रेस आणि फूटवेअरची स्टाईल मॅचिंग झाली नाही, तर ट्रेंडी आणि नवीन फॅशनच्या कपड्यांचा आनंद लुटता येत नाही. त्याच ड्रेससह जर आपली एक्सेसरीज व फेस मेकअपवरही विशेष लक्ष दिलेत, तर झटपट आपले वय १० वर्षांनी कमी दिसेल. उदा. आपण जीन्स घालत असाल, तर पेन्सील हिल्सचे सँडल ऐवजी प्लॅटफॉर्म हिल्स वापरा, साडीसह पेन्सील हिल्स वापरल्याने आपण जास्त डेलीकेट आणि तरुण दिसाल.
- अनेक महिला शॉर्ट स्कर्ट घालतात आणि सोबतच टिकलीही लावतात, तेव्हा समजून जा की पाहणाऱ्याला कळून येते की त्यांना मॅचिंगचे नॉलेज नाहीए. त्यामुळे असे करणे टाळा.
- जर आपल्याला शॉर्ट स्कर्ट घालण्याची आवड असेल, तर जरूर वापरा. जर आपले वय जास्त असेल, तर खूप फ्लेयर असलेले स्कर्ट न वापरता, स्ट्रेटकट वापरा. त्याबरोबर फ्लॅट किंवा हिल्स, ज्यात आपल्याला कंफर्टेबल वाटेल ते वापरा. त्यामुळे तुम्ही स्लिम व अॅक्टिव्ह दिसाल.
फेस मेकअप आहे पेहरावाचा भाग
या सर्वानंतर जर आपल्याला फेस मेकअप आवडत असेल, तर जरूर करा. तोही आपल्या पेहरावाचा महत्त्वाचा भाग आहे.
आयशॅडो जर ड्रेसच्या मॅचिंगच्या नादात गडद लावलीत, तर खूप कृत्रिम वाटेल. त्याऐवजी हलक्या रंगाचा नॅचरल दिसणारा आयशॅडो लावा आणि लिपस्टिकही सॉफ्ट रंगाची लावा किंवा मग केवळ लिपग्लॉसही लावू शकता. तो आपल्या ओठांना मॉइश्चराइज करण्याबरोबरच चमकदारही ठेवेल. या सर्वामुळे आपण भडक नव्हे, तर तरुण आणि फ्रेश दिसाल.