घरच्या जबाबदाऱ्यांबाबत पुरुष किती जागरूक

* निभा सिन्हा

वसुधाने ऑफिसमधून येताच पती रमेशला विचारले की, अतुल आता कसा आहे? आणि ती अतुलच्या खोलीत निघून गेली. तिने त्याच्या डोक्याला हात लावला, तेव्हा जाणवले की तो तापाने फणफणला आहे.

ती घाबरून ओरडली, ‘‘रमेश, याला तर खूप ताप आहे. डॉक्टरकडे न्यावे लागेल.’’

रमेश खोलीत येईपर्यंत वसुधाची नजर अतुलच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या औषधावर पडली, जे त्याला दुपारी द्यायचे होते.

ताप वाढण्याचे कारण वसुधाच्या लक्षात आले. तिने रमेशला विचारले, ‘‘तू अतुलला वेळेवर औषध दिले होतेस का?’’

‘‘मी वेळेवरच औषध आणले होते, पण तो झोपला होता. मी १-२ वेळा हाका मारल्या, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी औषध इथेच ठेवून निघून गेलो. मी विचार केला की तो उठेल, तेव्हा स्वत:हून घेईल. मला काय माहीत, त्याने औषध घेतले नसेल.’’

आधीच वैतागलेली वसुधा चिडून म्हणाली, ‘‘रमेश, औषध घेणे आणि घ्यायला लावणे यात फरक असतो. तुला काय माहीत म्हणा या गोष्टी. कधी मुलांची देखभाल करशील, तेव्हा कळेल ना.’’ मग तिने अतुलला २-३ बिस्किटे खायला घालून औषध दिले आणि त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवू लागली. अर्ध्या तासानंतर त्याचा ताप थोडा कमी झाला, त्यामुळे लगेच डॉक्टरकडे धावाधाव करण्याची गरज पडली नाही.

खरे म्हणजे, वसुधाचा १० वर्षांच्या मुलगा अतुलला ताप होता. तिच्या सुट्टया संपल्या होत्या, त्यामुळे रमेशला मुलाच्या देखभालीसाठी सुट्टी घ्यावी लागली होती. ऑफिसला निघण्यापूर्वी वसुधाने रमेशला पुन्हा-पुन्हा समजाविले होते की, अतुलला वेळेवर औषध दे, पण ज्या गोष्टीची भीती होती, तीच घडली.

७५ वर्षीय विमला गुप्ता हसत म्हणते, ‘‘ही कहाणी तर घराघरांतील आहे. मागच्या आठवडयातच मी माझ्या सुनेबरोबर शॉपिंग करायला गेले होते. तेव्हा दोन वर्षांच्या नातीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आजोबांवर सोपविली होती. नातीला सांभाळण्याच्या नादात आजोबांनी ना वेळ पाहिली आणि ना ही घरातील आवश्यक गोष्टी लक्षात ठेवल्या. ते घराला सरळ कुलूप लावून नातीला सोबत घेऊन पार्कमध्ये निघून गेले. तेवढया वेळात मोलकरीण येऊन माघारी निघून गेली होती. आम्ही घरी परतलो, तेव्हा भरपूर खरकटया भांडयांबरोबरच आवरण्यासाठी किचन आमची वाट पाहत होते. त्यांनी एक काम केले. मात्र दुसरे बिघडवून ठेवले.’’

या गोष्टी वाचताना तुम्ही असा विचार तर करत नाहीए ना की, अरे इथे तर आपलेच रडगाणे सांगितले जातेय. हो, बहुतेक महिलांची ही तक्रार असते की पती किंवा घरातील एखाद्या पुरुष सदस्याला काही काम सांगितल्यास समस्या वाढतात. शेवटी असे का घडते की पुरुषांकडून केली जाणारी घरातील कामे बहुतेक महिलांना आवडत नाहीत. त्यांच्या कामात शिस्त नसते किंवा ते जाणीवपूर्वक ते काम अर्धवट सोडतात?

पुरुषांच्या पद्धती अन् प्रवृत्तीमध्ये भिन्नता

याबाबत अनुभवी असलेल्या विमला गुप्ताचे म्हणणे आहे की खरे तर स्त्री-पुरुषांच्या काम करण्याच्या प्रवृत्ती आणि पद्धतीमध्ये फरक असतो. बहुतेक पुरुषांना लहानपणापासून घरातील कामांपासून दूर ठेवले जाते, तर मुलींना घरातील कामे शिकविण्यावर भर दिला जातो. अशा वेळी पुरुषांना अशी कामे करण्याबाबत आत्मविश्वास नसतो आणि ते ऑफिसप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी कामे उरकण्याचा प्रयत्न करतात. खास करून घरसंसाराच्या कामांबाबत त्यांना जे सांगितले जाते, ते आपली डयुटी समजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्या कामाबाबत विशेष काळजी घेत नाहीत.

याउलट स्त्रिया स्वभावानेच काम करण्याबाबत अपेक्षेपेक्षा जास्त प्रामाणिक असतात. त्या केवळ कामच करीत नाहीत, तर त्याच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींबाबत जास्त जागरूक असतात.

बेफिकीर व आळशी

दूध गॅसवर ठेवून विसरून जाणे, दरवाजा उघडा ठेवणे, टीव्ही पाहता-पाहता झोपी जाणे, पाणी पिऊन फ्रिजमध्ये रिकामी बॉटल ठेवणे, सामान इकडे-तिकडे पसरवून ठेवणे, आणखीही अशा अनेक छोटया-मोठया गोष्टी असतात, त्या पाहून म्हटले जाते की पुरुष स्वभावानेच बेफिकीर, स्वतंत्र आणि निष्काळजी असतात. पण प्रत्यक्षात असे नाहीये की ते घरातील काम योग्य पद्धतीने करू शकत नाहीत.

तज्ज्ञांच्या मतानुसार, वास्तविकता ही आहे की, त्यांनी काही हालचाल न करताच सर्व काही मॅनेज होते. त्यामुळे ते आळशी बनतात आणि घरातील कामे करण्यास टाळाटाळ करू लागतात. एक महत्त्वपूर्ण सत्य हेही आहे की काही पुरुषांना घरातील कामे करणे कमीपणाचे वाटते. ते तासंतास एका जागी बसून टीव्हीवर रटाळ कार्यक्रम पाहू शकतात, पण घरातील कामे करत नाहीत.

दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण

ही गोष्ट अनेक पुरुषांनी मान्यही केलीय की, घर आणि ऑफिस मॅनेज करणे आपल्या आवाक्यातील गोष्ट नाही, पण महिला नोकरदार असो किंवा गृहिणी, आजच्या काळात त्यांचा एक पाय किचनमध्ये तर दुसरा बाहेर असतो. गृहिणी महिलांनाही घरातील कामांबरोबरच बँक, शाळा, वीज-पाण्याचे बिल भरणे, शॉपिंगसारखी बाहेरील कामे स्वत:लाच करावी लागतात. तर याच्या तुलनेत पती क्वचितच घरातील कामांत त्यांना मदत करतात. जर महिला नोकरदार असेल, तर कामाचा भार जरा जास्तच वाढतो. त्यांना आपल्या ऑफिसच्या कामांबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेटकेपणाने पेलाव्या लागतात. महिलांना आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांपासून कधीही मुक्त होता येत नाही. दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्यामुळे नोकरदार असूनही त्या नेहमी घरसंसाराच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या असतात.

अनुभव अन् परिपक्वता

मीनल एक उच्च अधिकारी आहे. तिचे स्वत:चे रूटीन खूप व्यस्त असते. तरीही ती सांगते, ‘‘सकाळचा वेळ कसा पळतो हे तर विचारूच नका. तुम्ही कितीही उच्च पदावर कार्यरत असाल, पण घरातील सदस्य आपणाकडून मुलगी, पत्नी, सून आणि आईच्या रूपात अपेक्षा ठेवतातच. याउलट पुरुषांकडून कमी अपेक्षा ठेवल्या जातात. अशा वेळी मग नाइलाज गरज म्हणून म्हणा किंवा महिलांना मल्टिटास्कर बनावेच लागते. अर्थात, एका वेळी अनेक कामे करणे उदा. एका बाजूला दूध उकळतेय, तर दुसऱ्या बाजूला वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले जात आहेत, मुलांचा होमवर्क घेतला जात आहे, तर त्याच वेळी पतीची चहाची फर्माइश पूर्ण केली जात आहे. ही कामे करुनच महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक अनुभवी आणि परिपक्व होतात.’’

एका संशोधनानुसार, स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतो, त्यामुळे त्या एका वेळी अनेक कामे पूर्ण करू शकतात.

जॉर्जिया आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, महिला जास्त अलर्ट, फ्लेझिबल आणि ऑर्गनाइज्ड असतात. त्या चांगल्या लर्नर असतात. अशा प्रकारचे संदर्भ देऊन ही गोष्ट सिद्ध केली जाऊ शकते की पुरुषांमध्ये घरातील जबाबदाऱ्या निभाविण्याची क्षमता स्त्रियांपेक्षा कमी असते.

आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आधुनिक काळात पत्नी जर नोकरी करून पतीला त्याच्या बरोबरीने आर्थिक मदत करते, तर पुरुषांचीही जबाबदारी बनते की त्यांनीही घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात स्त्रीला तिच्या बरोबरीने स्वत:ला घराप्रती जागरूक व निपुण सिद्ध करावे.

हिवाळा : फनी दिसण्याचा मोसम

* मोनिका गुप्ता

हिवाळा सुरू होताच महिलांच्या पोशाखात विशेष असा बदल येऊ लागतो. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी महिला अनेक प्रकारचे उपाय करून पाहतात. काही तर या सीजनला फॅशन सीजनच समजतात. काही महिला असे काही कपडे परिधान करतात की त्यांना पाहून कडाक्याच्या थंडीतही आपल्याला घाम येऊ लागतो आणि हसू आवरता आवरत नाही.

तर मग या, काही महिलांनी परिधान केलेल्या काही अशाच खास पोशाख पद्धतींविषयी जाणून घेऊया, ज्या पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक महिलेला सुंदर दिसावे असे वाटत असते आणि याची सर्वाधिक उदाहरणे थंडीच्या मोसमात पाहायला मिळतात. बदलत्या मोसमातसुद्धा यांना स्वत:ला इतरांहून वेगळे दाखवायचे असते. कधी कधी त्यांचा हा वेगळा लुक फनी लुक बनतो.

आता हेच पहा ना, आजच्या युवा मुलींच्या डोक्यावर कानटोपी, गळयात मफलर, लाँग जॅकेट, पण नजर जेव्हा त्यांच्या पायावरील पातळ चुडीदार किंवा सलवारवर जाते तेव्हा तुम्हाला घाम येणे निश्चित असते. तुम्ही हाच विचार करत राहता की अरे ही कोणती फॅशन आहे? डोक्याला थंडी वाजते, शरीर, हात सर्वाना थंडी वाजते, पण पायांना थंडी वाजत नाही.

अशा अनेक अंदाजात तुम्हाला महिलांचा अजब फनी लुक पाहायला मिळत असतो.

बारीक स्त्रीसुद्धा दिसू लागते जाडी

आता ज्या महिला अतिशय बारीक असतात, त्यांच्यासाठी तर फुग्यात हवा भरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. स्वेटरच्या ओझ्याखाली या बिचाऱ्या दबून जातात. स्वेटरवर स्वेटर, जे त्यांना जाड दाखवण्यासाठी पुरेसे असतात, पण कधी यांच्या गोलमटोल शरीरावरून नजर हटवून त्यांच्या चेहऱ्यावरही लक्ष द्या. अरे, शरीरावर तर स्वेटरचा थर चढवलात, पण चेहऱ्याचे काय. जरा विचार करा जेव्हा शरीर जाडजूड दिसतं आणि चेहरा मात्र बारीक तेव्हा ते किती फनी दिसत असेल.

ओळखणे कठीण आहे

काही महिला यादरम्यान स्वत:ला अशा काही झाकून घेतात की त्यांना ओळखणं मुश्किल होऊन बसते. इतकेच कशाला कुणी पती आपल्या पत्नीला, कुणी बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला ओळखण्याआधी १० वेळा विचार करेल. जरा कुठे थंडी पडू लागली की या स्वत:ला अशा काही झाकून ठेवतात की जणू काही थंडीचा सर्वाधिक परिणाम यांच्यावरच होत आहे.

मफलर वुमन

थंडीचा मोसम येताच सोशल मिडियावर दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल हे सर्वप्रथम निशाण्यावर असतात. कोणी त्यांना आले मफलर मॅन किंवा एक मफलर पुरुष अशा फनी टोपणनावांनी संबोधतात.

इतकेच नाही तर केजरीवाल यांची मफलर घालण्याची स्टाइल हल्ली फॅशन आयकॉन बनली आहे. काही महिला मोठया प्रमाणावर केजरीवाल मफलर परिधान करताना दिसून येतात. जर तुम्हाला वाटत असेल की केजरीवाल मफलर स्टाइल आहे तरी काय तर तुम्हाला आम्ही येथे सांगतो. खरंतर थंडीच्या मोसमात केजरीवालजी मफलर जरूर परिधान करतात. त्यांची मफलर घालण्याची स्टाइल फार वेगळी आहे. ते डोक्यापासून मानेपर्यंत मफलर गुंडाळून घेतात. हा केजरीवाल मफलर लुक इतका फेमस झाला आहे की सोशल मिडियावर याचे मिम्सही बनू लागले आहेत.

अनेक महिला आणि पुरुष या केजरीवाल मफलर अंदाजात दिसू लागले आहेत. ते स्वत:ला मफलरमध्ये असे काही गुरफटून टाकतात की जणू काही मफलर हटवला तर थंडी यांच्या मानगुटीवरच येऊन बसेल.

मोजे आणि चपलांची लढाई

थंडीपासून रक्षण करण्याचे आपण सर्व उपाय अजमावून पाहतो आणि हेच उपाय करताना आपण कधी कधी स्वत:लाच एक फनी लुक देत असतो.

आता तुम्ही कामावर जाणाऱ्या स्त्रियांकडेच पाहा ना. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला पूर्ण पॅक करून घेतात, पण कधी तुम्ही त्यांच्या पायांकडे पाहिले आहे का. विश्वास ठेवा तुम्ही आपले हसू रोखू शकणार नाही.

मोजे आणि चपलांची लढाई पाहायला फार मजा येते. आता या असे मोजे घालतात, ज्यामुळे यांची बोटे चपलांमध्ये सरकतच नाहीत. पूर्ण रस्ताभर ही लढाई सुरू असते आणि कधी कधी या लढाईत महिला पडता पडता स्वत:ला सांभाळताना दिसतात.

थंडीत नो मॅचिंग

थंडीसुद्धा कमालच करते. कधी तुम्हाला आळसाच्या रजईत स्वत:ला झाकून ठेवते तर कधी रंगबेरंगी कपडयात लपेटून टाकते.

थंडीपासून बचाव करण्याचे अनेक बहाणे शोधले जातात. ज्या महिला स्वत:ला नेहमी फॅशनेबल ठेवत होत्या, ज्या नेहमी प्रत्येक गोष्ट मॅचिंग करून घालत होत्या, तुम्ही पाहू शकता थंडी येताच हातमोजे वेगळया रंगाचे, जरा नीट लक्ष द्याल तर कळेल की मोजेही रंगीबेरंगी दिसतात. मग दिवसा थोडे गरम होऊ लागल्यावर जेव्हा या महिला आपला स्वेटर काढतात, तेव्हा तुमच्या लक्षात येते की यांची साडी वेगळी आणि ब्लाउज वेगळया कलरचा आहे. म्हणजे थंडी हा असा मोसम आहे जो काहीही करवून घेऊ शकतो.

मंकी कॅपची जादू

तुम्ही थंडीत पुरुषांना मंकी कॅप घालताना पहिले असेलच. पण जरा विचार करा, हीच मंकी कॅप जर महिलांनी परिधान केली तर ते कसे दिसेल. हा विचार करूनच हसू येऊ लागते की महिला आणि मंकी कॅप किती फनी लुक दिसेल जेव्हा महिला मंकी कॅपमध्ये दिसू लागतील.

बाहेर तर महिला मंकी कॅप घालत नाहीत, पण जेव्हा त्या घरी असतात तेव्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी मंकी कॅपची जादूच कामी येते.

खरंतर मंकी कॅप डोक्यापासून मानेपर्यंत थंडीपासून संरक्षण देते आणि महिला जेव्हा घरात असतात, तेव्हा मंकी कॅप घालून थंडीपासून तर स्वत:चा बचाव करतातच, त्याचबरोबर क्युट आणि फनी लुकमध्येही दिसून येतात.

काय आहे सोशल मिडियाचे व्यसन

– गरिमा पंकज

अनेकदा एकटेपणा किंवा कंटाळा घालवण्यासाठी आपण सोशल मिडियाचा आधार घेतो आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. कालांतराने ही सवय कधी आपणास व्यसनाच्या जाळयात अडकवते हे कळतदेखील नाही. त्यावेळी मनात असूनही आपण यापासून दूर राहू शकत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे सोशल मिडियाचे व्यसनही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक स्तरावरही नकारात्मक प्रभाव पाडते.

अमेरिकन पत्रिका ‘प्रिव्हेंटिव मेडिसिन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधानानुसार जर आपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब, इंस्ट्राग्राम आदींवर एकटेपणा घालवण्यासाठी जास्त वेळ घालवत असाल तर परिणाम उलट होऊ शकतो.

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, तरुण जितका जास्त वेळ सोशल मिडियावर घालवतात आणि सक्रिय राहतात, त्यांना तितकेच जास्त समाजापासून अल्प्ति राहावेसे वाटेल. यासंदर्भात संशोधनकर्त्यांनी सोशल मिडियावरील सर्वात लोकप्रिय ११ वेबसाईट्सच्या वापराबाबत १९ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या १,५०० अमेरिकी तरुणांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचे विश्लेषण केले.

अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्रमुख लेखक ब्रायन प्रिमैक यांच्या मतानुसार, ‘‘आपण सामाजिक प्राणी आहोत, पण आधुनिक जीवनशैली आपल्याला एकत्र आणायचे सोडून आपल्यातील अंतर वाढवत आहे. मात्र आपल्याला असे वाटते की सोशल मिडिया सामाजिक अंतर संपवण्याची संधी देत आहे.’’

सोशल मिडिया आणि इंटरनेटचे काल्पनिक जग तरुणांना एकटेपणाचे शिकार बनवत आहे. अमेरिकेची संघटना ‘कॉमन सैस मिडिया’च्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलांनाही जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडिया आणि व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधायला जास्त आवडते. १३ ते १७  वर्षे वयोगटांतील १,१४१ किशोरवयीन मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. ३५ टक्के किशोरवयीन मुलांना व्हिडिओ मेसेजद्वारे मित्रांशी संपर्क साधायला जास्त आवडते. सोशल मिडियामुळे मित्रांना भेटताच येत नाही, हे ४० टक्के मुलांनी मान्य केले. तर फोन किंवा व्हिडिओ कॉलशिवाय राहूच शकत नाही, असे ३२ टक्के मुलांनी सांगितले.

इंटरनेटच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक विकासावर अर्थात सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सातत्याने काल्पनिक जगात रमणारे किशोरवयीन खऱ्या जगापासून अलिप्त होतात. यामुळे ते निराशा, हताशपणा, उदासिनतेची बळी ठरू शकतात.

सोशल मिडियाचे जाळे हळूहळू मोहजालात अडकवून आपले किती नुकसान करत आहे, हे लक्षात घ्या. आजकाल घरात जास्त कुणी नसल्याने आईवडीलच मुलांचे मन रमावे यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. त्यानंतर एकटेपणामुळे कंटाळलेली मुले स्वत:च स्मार्टफोनमध्ये आपले जग शोधू लागतात. सुरुवातीला सोशल मिडियावर नवेनवे मित्र जोडणे त्यांना खूपच आवडते, पण हळूहळू या काल्पनिक जगाचे वास्तव समजू लागते. याची जाणीव होते की जग जसे एका क्लिकवर आपल्यासमोर येते, तसेच एका क्लिकवर गायबही होते आणि आपण राहतो एकटे, एकाकी, खचून गेलेले. त्याचप्रमाणे जी मैलो न् मैल दूर राहूनही आपल्या मनासह विचारांवर ताबा मिळवतात अशी खोटी नाती काय उपयोगाची?

एकदा का कोणाला सोशल मिडियाची सवय लागली की तो सतत आपला स्मार्टफोन विनाकारण चेक करत राहतो. यामुळे त्याचा वेळ फुकट जातोच, शिवाय काहीतरी चांगले करण्याची क्षमताही तो गमावून बसतो.

माणूस सामाजिक प्राणी आहे. समोरासमोर बोलून जे समाधान, आपलेपणा आणि कुणीतरी सोबत असल्याची सुखद जाणीव होते, ती सोशल मिडियावर तयार होणाऱ्या नात्यांमधून कधीच होत नाही. शिवाय सोशल मिडियावर असता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. सातत्याने खूप काळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्याही निर्माण होतात.

आरोग्यावर होतो परिणाम

सतत स्मार्टफोनचा वापर केल्याने झोप कमी येते. दृष्टी कमजोर होऊ लागते. शारीरिक हालचाल कमी होत असल्याने अनेक प्रकारचे आजार जडतात. स्मरणशक्तीही कमी होते.

आजकाल लोकांना प्रत्येक समस्येचे तात्काळ उत्तर हवे असते. त्यांना इंटरनेटवर प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर मिळते. यामुळे ती सारासार विचार करण्याची क्षमता गमावू लागतात. बुद्धीचा वापर कमी होत जातो. हे एखाद्या नशेप्रमाणे आहे. लोक तासन्तास अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करत राहतात, पण साध्य काहीच होत नाही.

एक तास फक्त स्वत:साठी

– अमरजीत साहिवाल

एका प्रसिद्ध लेखकाच्या मते तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी २४ तासांपैकी जर १ तासही स्वत:साठी काढू शकला नाहीत तर तुमच्याकडे काय राहील? रुक्ष हात, वाढलेली नखे, कोमेजलेला चेहरा, ना टिकली, ना काजळ.

आपण स्त्रिया दिवसभरातून आपल्यासाठी एखादा तास तर नक्कीच काढू शकतो. जिथे मंद संगीताचा स्वर, गझलचा आनंद किंवा शेरोशायरी असेल, थोडेसे लोळणे असेल, हातापायांची मालीश असेल, फोनवर गप्पा मारणे असेल किंवा मग थोडेसे वाचन. फक्त हा वेळ केवळ तुमचा आणि तुमचाच असायला हवा.

सीमाला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की रात्री १२ वाजता परदेशात राहून तिने जो मेसेज तिच्या वहिनीला पाठवला, तिने त्याला त्वरित उत्तर दिले. तिला आश्चर्य यासाठी वाटले की ती स्वत: घरकाम करते आणि नोकरीलाही जाते. मग तिला माझ्या मेसेजचे उत्तर द्यायला वेळ कसा मिळाला? विचारल्यावर समजले की कामावर जाण्यापूर्वी तिने १५-२० मिनिटांचा वेळ इ मेल, फेसबूकसाठी राखून ठेवला आहे, जेणेकरून काही क्षण आपल्या आवडीचे काम म्हणजे मित्रमैत्रिणींना हायहॅलो करून ऑफिसला फ्रेश होऊन जाता येईल आणि अधिक चांगल्याप्रकारे काम करता येईल.

कुल्लू खोऱ्यात राहणाऱ्या रीनाला एक दिवस आपल्या मैत्रिणीसोबत व्यास नदी किनारी घालविण्याची संधी मिळाली. हवेत हलकासा गारवा होता. सुंदर सजवलेला चहाचा ट्रे घेऊन कमलाबाई आल्या. सोबतच दुसऱ्या ट्रेमध्ये आरसा, नेलकटर, कॉटन बड्स आदी वस्तूही होत्या.

रीनाने हसतच विचारले, ‘‘सकाळी सकाळी चहासोबत ब्युटी ट्रीटमेंटचाही प्रोग्रॅम आहे का?’’

बाई नम्र स्वरात म्हणाल्या, ‘‘होय, चहाचा घोट घेण्यापूर्वी १० मिनिटे आपल्या शरीरासाठी दिली तर त्यात काय वाईट आहे? तुम्ही काहीच करत नाही का? आमच्या उषा मॅडम तर रोज सकाळी १५-२० मिनिटे याच कामासाठी देतात. या वेळेत त्या अंडे, मधाचा लेप लावतात. फेशियलही होते आणि चहा पिण्याचा आनंदही घेता येतो. त्यानंतर नदी किनारी दगडावर बसून पाण्यात पाय सोडून आरामही करतात आणि थंड पाण्यात चेहराही धुतात.’’

आता रीनाला आपल्या मैत्रिणीच्या उषाच्या तजेलदार त्वचेचे रहस्य समजले.

हे वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला नवीन काहीच वाटणार नाही. प्रत्येकाला माहीत असते की आपण स्वत:साठी थोडा वेळ नक्की काढायला हवा, पण अनेकदा इतर काय म्हणतील, असा विचार आपण करतो. हिला पाहा, घरसंसार, कामकाज सोडून स्वत:साठी वेळ काढून खोली बंद करून बसली आहे.

पण कोणी काहीही म्हटले म्हणून काय झाले? नैराश्यग्रस्त होण्यापेक्षा, तणावात राहण्यापेक्षा थोडा वेळ स्वत:साठी काढणे कधीही चांगले. ‘‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’’ हे लक्षात ठेवूनच वागा :

झोपायला जा

नोकरदार स्त्री असो किंवा गृहिणी, अनेकदा झोप पूर्ण होत नसल्याची तिची तक्रार असते. यामागचे कारण असते ते मुले, रात्री उशिरा होणारे जेवण, ऑफिसची ड्युटी किंवा घरातील ज्येष्ठांना हवे नको ते पाहणे. जेव्हा तुम्हाला थोडा वेळ मिळेल तेव्हा लगेच झोपायला जा किंवा सोफ्यावरच थोडी विश्रांती घ्या. एका डुलकीमुळे बरेच ताजेतवाने वाटेल, मग पुन्हा कामाला लागा.

शॉपिंगची यादी बनव

बऱ्याचदा स्वयंपाकघरात किंवा घरी काम करत असताना अचानक असे लक्षात येते की अमुक एक सामान संपले आहे. तेव्हा पती किंवा मुलांना त्वरित ते सामान आणण्यासाठी विनंती करणे भाग पडते. म्हणून वेळ मिळाला की काळजीपूर्वक खरेदीची यादी बनवा. असे केल्याने केवळ वेळच वाचणार नाही तर पैशांचीही बचत होईल.

आवडी पूर्ण कर

प्रत्येकाला काही ना काही आवड असतेच. पण काही असे घडते की छंद जोपासता येत नाही. अशावेळी स्वत:लाच दुषणे दिली जातात. परिस्थितीला दोष देत स्वत:ची समजूत काढली जाते. पण असे करू नका. स्वत:साठी काढलेल्या त्या एका तासात छंदाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ तुम्हाला पुस्तक, मासिके, वृत्तपत्रातील काही चांगल्या विचारांची कात्रणे कापून संग्रहित करायला आवडत असतील तर त्यासाठी वेळ द्या. डायरी फक्त याच कामासाठी वापरा. म्हणजे वाढदिवस, मॅसेज अॅनिव्हर्सरीसाठी कुणाला शुभेच्छा द्यायच्या असल्यास आपल्या हाताने छानसे कार्ड बनवून त्यावर ते सुंदर विचार तुम्ही लिहू शकता. म्हणजे आपल्या आवडीनुसार आपला वेळ असा घालवा, जेणेकरून काहीही कंटाळवाणे वाटणार नाही, फक्त आनंद मिळेल.

स्वप्न पाहा

होय, उघडया डोळयांनी स्वप्न पाहा. हा हक्क सर्वांना आहे. झिरो फिगरची अभिनेत्री करिना कपूर ९० किलो वजन कमी करू शकते तर तुम्ही आणि आम्ही का नाही? गरज आहे ती फक्त दृढनिश्चयाची. तुम्हीही स्वत:ला वेळ द्या.

सुसंवाद कायम ठेवा

मित्र, मैत्रीण, वहिनी, नणंद किंवा जवळच्या नातेवाईकांसह संबंध बिघडले असतील तर स्वत:साठी राखून ठेवलेल्या त्या तासाभरातील काही वेळ हे संबंध सुधारण्यासाठी द्या. फोन करा, मेसेज पाठवा, ई-मेल, व्हॉट्सअप करा किंवा सोशल मिडियाचा वापर करा. फक्त प्रयत्न एवढेच असायला हवेत की तुम्ही संबंधात गोडवा आणून त्यांना सुंदर करायला हवे.

पुढील दिवसाचे प्लॅनिंग करा

कामाला जात असाल, कामातील क्षमता वाढवायची असेल तर दुसऱ्या दिवसाचे शेड्युल चेक करा. ते अपडेट करा. त्यावर फोकस करा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. हे सर्व नियोजनबद्धरित्या करण्यासाठी स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. २४ तासांतील काही क्षण स्वत:साठीही राखून ठेवा. प्रयत्न करून पाहा. कामाचा दर्जा पहिल्यापेक्षा उत्तम होईल.

दिसण्याकडे लक्ष द्या

काहीही घालण्यापेक्षा किंवा कपडयांसोबत मॅचिंग ज्वेलरी मग ती कॉस्च्युम ज्वेलरी का असेना, चप्पल, स्कार्फ योग्य पद्धतीने घातल्याने थोडा नाही तर बराच फरक पडतो. तुम्ही नोकरदार असाल तर याकडे लक्ष देणे जास्तच गरजेचे आहे. रिकाम्या वेळेत ज्वेलरी बॉक्स चेक करत राहा. काही तुटले असेल तर त्याकडे लक्ष द्या. मॅचिंग क्लिप्स, पिना, हेअर अॅक्सेसरीज अधुनमधून नीट लावून ठेवा. उद्या जे घालणार आहात, त्याची तयारी आधीच रिकाम्या वेळेत अवश्य करून ठेवा. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढेल, ज्यामुळे तुमचे कामही अधिक चांगले होईल.

कामावर, घरी, घराबाहेर तुमचे, तुमच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होईल, त्यावेळी मोकळया वेळेत आरामात खुर्चीवर टेकून गुलाबजल टाकलेल्या पाण्यात पाय बुडवून निवांत बसल्याचा आंनद याची जाणीव करून देईल की तो १ तास स्वत:साठी खूप छान असतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें