म्युच्युअल फंडात कधी आणि कशी करावी गुंतवणूक

* ममता शर्मा

आपण सर्वजण आपल्या दैनंदिन खर्चादरम्यान छोटी-मोठी बचत करत असतो, पण फायदा तेव्हाच होतो जेव्हा बचतीसोबतच गुंतवणुकीची सवय लावली जाते. गुंतवणुकीचा विषय निघताच बहुतेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, पण वास्तव असे आहे की, जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनुभव नसेल तर तो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. फायनान्शियल प्लॅनर, अनुभव शाह यांच्या मते, नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत धोका किंवा जोखीम नसते असे नाही, पण तरीही शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा यात कमी जोखीम असते.

काय आहे?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील फरक जाणून घ्या. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा याचा अर्थ असा होतो की, तुम्ही सार्वजनिक कंपनीचे शेअर्स जेव्हा त्यांची किंमत कमी असते तेव्हा विकत घेता आणि किंमत वाढल्यावर त्याची विक्री करता, पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे म्हणजे तुमचा फंड व्यवस्थापक तुमची रक्कम ही रोखे, शेअर्स, डिबेंचर यासारख्या विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवतो. अशा स्थितीत, म्युच्युअल फंडांचा परतावा हा रोख्यांवर झालेल्या नफ्यावर अवलंबून असतो.

धोका

म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना धोका किंवा जोखीम असते, पण जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा हा धोका थोडा कमी होतो. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुमचे पैसे वेगवेगळया प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवले जातात. जर एका उपकरणाची कार्यक्षमता खराब असेल तर दुसऱ्या उपकरणाची कार्यक्षमता चांगली असू शकते. त्यामुळे धोका कमी होतो. इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, जर शेअर बाजार खाली जात असेल तर त्याच प्रमाणात तुमचाही तोटा होतो. एकूणच, तुमच्या गुंतवणुकीसाठीचा नफा हा एकाच कंपनीच्या समभागांच्या नफ्यापुरता मर्यादित असतो.

नवीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम

जे पहिल्यांदाच गुंतवणूक करतात आणि ज्यांना शेअर बाजाराचा अनुभव नसतो, अशा गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड अधिक चांगला ठरतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर, त्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी फंड व्यवस्थापकावर असते. गुंतवणूकदाराला काळजी करण्याची गरज नसते, मात्र गुंतवणूकदाराला वेळोवेळी त्याच्या व्यवस्थापनासाठी शुल्क भरावे लागते, तर इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करायची झाल्यास त्यासाठी आधी पुरेसे संशोधन करणे आवश्यक असते.

गुंतागुंत

म्युच्युअल फंडांच्या तुलनेत इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूपच क्लिष्ट, गुंतागुंतीचे तसेच खूप वेळखाऊ असते. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना प्रत्येक क्षणी बाजाराची स्थिती आणि शेअर्सच्या किंमतीवर लक्ष ठेवावे लागते, मात्र म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या बाबतीत, हे काम फंड व्यवस्थापकाद्वारे केले जाते.

विविधीकरण

एक चांगला गुंतवणूकदार तोच असतो जो नफा मिळविण्यासाठी केवळ एका प्रकारच्या गुंतवणूक पर्यायावर आणि क्षेत्रावर अवलंबून नसतो. विविध क्षेत्रांमध्ये आणि गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे याला डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरण असे म्हणतात. म्युच्युअल फंडात, गुंतवणूकदाराला विभागीय विविधीकरणाचा पर्याय मिळतो, तर इक्विटी शेअर्सच्या बाबतीत असे होत नाही.

सावधगिरी

* म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही पर्यायामध्ये गुंतवणूक करताना लोक निष्काळजीपणे कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असल्याचे अनेकदा दिसून येते. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे स्वाक्षरी करण्यापूर्वी पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

* कागदपत्रे जमा करताना पत्त्यासंदर्भात पुरावा देताना तुमचा कायम निवासाचा पत्ता द्या. सर्व प्रकारच्या पत्रव्यवहारात याचा उपयोग होतो.

* म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना निधीचे व्यवस्थापन करणे ही फंड व्यवस्थापकाची जबाबदारी असते. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची काळजी घेऊ नये, उलट तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेत राहा. जर तुम्ही त्याच्या कामगिरीवर समाधानी नसाल तर फंड व्यवस्थापक बदलण्याचा विचार करा.

म्युच्युअल फंडाचेही अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, कर्ज, इक्विटी, लिक्विड म्युच्युअल फंड इ. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे आणि तो वेगवेगळया स्थितीत कसा कार्य करेल हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते.

आरोग्य विम्याचे आहेत अनेक फायदे

* गरिमा पंकज

कोरोना महामारी अजूनही मुळासकट संपलेली नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोना किंवा त्यासंबंधित गुंतागुंतीचा आजार झाल्यास आणि त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास, एकूण खर्च रूपये १० लाखांपासून ते रूपये १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो. कोरोना व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे आजार आहेत जे लोकांना त्रासदायक ठरतात आणि त्यांच्या उपचारात त्यांची सर्व बचत संपून जाते. त्यामुळेच आरोग्य विम्याचे महत्त्व नाकारता येत नाही.

कोरोना काळात आपल्या सर्वांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की, अचानक उद्भवलेल्या आजाराशी सामना करण्यासाठी, योग्य उपचार तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी रूपये २-३ लाखांचा साधा आरोग्य विमा काढायला काहीच हरकत नाही. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती आजारी पडल्यावर याचे महत्त्व अधिकच समजते. कोरोना काळात असा आजारी पडण्याचा प्रकार तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळाला असेल. म्हणूनच तुमच्याकडे कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चांगली पॉलिसी घ्या.

जर तुम्ही एम्प्लॉयी ग्रुप इन्शुरन्स कव्हर अंतर्गत येत असाल तरीही, तुम्ही स्वत:साठी किमान रूपये २५ ते रूपये १० लाखांचा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. जरी तुम्ही विमा घेतला असेल तरी सध्याच्या परिस्थितीनुसार त्यात  बदल करणे आवश्यक आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही एका विमा कंपनीतून दुसऱ्या विमा कंपनीकडेही जाऊ शकता. अधिक सुविधा देणारी कंपनी निवडू शकता.

चला, याविषयी जाणून घेऊया :

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना

जवळपास प्रत्येक विमा कंपनी मूलभूत आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च, औषधांचा खर्च, डॉक्टरांचे शुल्क आणि चाचण्या इत्यादींचा सहभाग असतो. प्राथमिक आरोग्य विम्याचे २ प्रकार आहेत – पहिला वैयक्तिक आणि दुसरा फॅमिली फ्लोटर. वैयक्तिकमध्ये तुम्हाला फक्त कव्हरेज मिळते तर फॅमिली फ्लोटरमध्ये संपूर्ण कुटुंबाला कव्हरेज मिळते.

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना सहसा एखादी व्यक्ती, तिचा जोडीदार आणि त्यांच्या मुलांना संरक्षण देते. परंतु, काही विमा कंपन्या विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्याचे आई-वडील, भावंडे आणि सासू-सासऱ्यांनाही संरक्षण देतात. फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्याचा एक फायदा म्हणजे संपूर्ण कुटुंबाला थोडया प्रमाणात संरक्षण मिळते.

मर्यादा/उपमर्यादा असलेली योजना घेऊ नका

अनेक आरोग्य विमा योजनांमध्ये रुग्णालयातील खोलीच्या भाडयावर मर्यादा घालण्यात आली आहे. अशा मर्यादा असलेली पॉलिसी घेणे टाळा.

उपचारादरम्यान तुम्हाला कुठे ठेवायचे, हे तुमच्या हातात नसते. असे असले तरी कोरोना काळात आपण पाहिले आहे की, अचानक एखादा गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यानंतर कित्येक आठवडे रुग्णालयात राहावे लागते. त्याशिवाय विलगीकरणात म्हणजे वेगळया खोलीत क्वारंटाईनमध्ये राहण्याचीही गरज भासते. अनेकदा जो बेड किंवा रूम मिळेल ती घ्यावी लागते. आपण असे म्हणू शकत नाही की, स्वस्त बेडवर शिफ्ट करा.

आजीवन नूतनीकरण सुविधा

आयुष्यात कधीही नूतनीकरण करता येईल अशी पॉलिसी घ्या. खरेतर वृद्धापकाळात उपचारासाठी पैशांची जास्त गरज असते, कारण वृद्धापकाळात रोगांचे आक्रमण अधिक होते. सहसा या वेळेपर्यंत ती व्यक्तीही सेवानिवृत्त झालेली असते. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात. आरोग्य विमा काढताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना कवच

तुम्ही कोरोनाच्या उपचारासाठी स्वतंत्र पॉलिसीही घेऊ शकता. आयआरडीएआरच्या सूचनेनुसार विमा कंपन्यांनी कोरोना विशेष पॉलिसी उपलब्ध करून दिली आहे. यालाच कोरोना कवच म्हणतात. यासाठी विम्याची रक्कम रूपये ५० हजार ते रूपये ५ लाखांपर्यंत आहे. कोरोना कवच पॉलिसी कमी कालावधीसाठी म्हणजे साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांसाठी असू शकते.

घरी उपचार घेतल्यावरही विम्याचा फायदा

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या या युगात अनेक कंपन्या घरी राहून उपचारांवर होणारा खर्चही भागवत आहेत. याशिवाय अनेक विमा कंपन्या सरकारने स्थापन केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेण्यावर होणारा खर्च भरून काढत आहेत. विमा घेताना तुमची कंपनी ही सुविधा देत आहे की नाही, हे तपासा.

महामारीला कव्हर करा

बहुतेक आरोग्य विमा पॉलिसी कोरोनासारख्या साथीच्या आजारांना कव्हर करतात. हे प्रामुख्याने त्या पॉलिसीवर अवलंबून असते. अशा काही पॉलिसी आहेत ज्यात महामारीचा समावेश नसतो. तुम्ही पॉलिसी दस्तावेज वाचून त्यानुसार पॉलिसी घ्या ज्यामध्ये हे सर्व समाविष्ट असेल.

गुंतवणूक सल्लागार मनीषा अग्रवाल सांगतात की, कोणतीही पॉलिसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

कॅशलेस पॉलिसी अधिक उत्तम

अशी विमा पॉलिसी घ्या जी कॅशलेस सुविधा देत असेल. कॅशलेस विमा पॉलिसीचा फायदा असा की, पॉलिसीधारकाला रुग्णालयाचे बिल भरावे लागत नाही, उलट तो त्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो.

आरोग्य विमा पॉलिसी घेताना हेही तपासून पाहा की, तुम्ही राहता त्या शहरातील मोठया आणि सुसज्ज रुग्णालयांचा कॅशलेस रुग्णालयांच्या यादीत समावेश आहे का? यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

दावा निकाली काढणे

ज्या कंपनीचे दाव्याचे प्रमाण चांगले आहे, म्हणजेच जे जास्तीत जास्त लोकांचे दावे निकाली काढत आहेत आणि जे तुमच्या अपेक्षित सर्व गरजा पूर्ण करणार आहेत.

रिफिल लाभ पर्याय

जर तुमची रूपये ५ लाखांची पॉलिसी असेल आणि ते पैसे एखाद्या आजारपणात खर्च झाले आणि ३ महिन्यांनंतर तुम्हाला दुसरा आजार झाला तर अशी पॉलिसी घ्या ज्यामध्ये रिफिलचा पर्याय असेल, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या आजारासाठीही पैसे मिळतील.

बहुतेक पॉलिसींमध्ये हा फायदा समान व्यक्ती समान रोग आणि भिन्न व्यक्ती पण एकाच रोगासाठीही उपलब्ध आहे.

सह-पेमेंट टाळा

काही पॉलिसीमध्ये, सह-पेमेंटचीही तरतूद असते, म्हणजेच पॉलिसीधारकाला एखाद्या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या काही टक्के रक्कम भरावी लागते. काही अशा योजनाही आहेत जिथे ६० वर्षांवरील लोकांसाठी खास सह-पेमेंटचा पर्याय असतो, म्हणजे संपूर्ण रक्कम कंपनीकडून दिली जात नाही तर तुम्हाला यातील काही खर्च करावा लागतो.

टॉप अप योजना

सध्याची परिस्थिती पाहाता अनेक कंपन्यांनी टॉप-अप योजना आणल्या आहेत. म्हणजेच समजा तुमचा रूपये ५ लाखांचा विमा असल्यास दीड-दोन हजारांच्या छोट्या रकमेतूनही हजारांच्या तुम्हाला अतिरिक्त रूपये ५ लाख टॉपअप मिळेल. म्हणजेच आधीच चालू असलेली पॉलिसी रूपये ५ लाखांची आहे आणि तुम्ही रूपये ५ लाखांचा टॉपअप घेतला तर तुम्हाला एकूण रूपये १० लाखांचे विमा संरक्षण मिळेल. साहजिकच अशी योजना फायददेशीर ठरते.

प्रत्येक विमा कंपनीचे स्वत:चे नियम असतात. त्यामुळे आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्यात किती आणि काय कव्हर केले जाईल हे जाणून घ्या. चाचणी खर्च आणि रुग्णवाहिकेचा खर्च यासारख्या जास्तीत जास्त गोष्टींचा समवेश असलेली पॉलिसी घ्या, जेणेकरून तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

हे तर तुम्हीही करू शकता

* नसीम अंसारी कोचर

दिल्ली, मुंबई, बंगळुरुसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेल्या मध्यम व उच्च वर्गातील विभक्त कुटुंबांची संख्या सतत वाढत आहे. अशा कुटुंबातील महिलांकडे शिक्षण, वेळ आणि पैशांची कमतरता नाही. नवरा कामावर आणि मुले शाळेत गेल्यावर त्यांच्याकडे खूप मोकळा वेळ असतो. याच मोकळया वेळेचा, शिक्षण आणि स्वत:मधील क्षमतेचा वापर करुन बऱ्याच महिलांनी मोठमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाप्रकारे, त्यांनी पैसे कमावण्यासाठी पतीची मदत तर केलीच, सोबतच घरी राहून आणि घरातील कुठल्याही कामाकडे दुर्लक्ष न करता, कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून आपल्या मोकळया वेळेचाही सदुपयोग केला.

जेवणाने मिळवून दिला रोजगार

दिल्लीच्या कैलास कॉलनीत राहणाऱ्या सरन कौर ६० वर्षांच्या आहेत. त्यांना ३ मुलगे आहेत. तिघेही आता सेटल झाले आहेत. मुलांचा अभ्यास, नोकरी आणि लग्न लावून देण्यामागे सरन कौर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंजाबमध्ये लग्न झाल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. नवऱ्याला नोकरी नव्हती. घरामधील पुढच्या खोलीत त्यांनी किराणा दुकान सुरू केले. त्यावेळी सरन कौर यांच्या कुटुंबात नवरा, सासू, दीर आणि वहिनी असे सर्वजण होते.

पुढे सरन कौर यांना मुले झाली. कुटुंब मोठे होत गेले तसे किराणा दुकानातून मिळणाऱ्या पैशांतून घरखर्च चालवणे कठीण होऊ लागले. तेव्हा सरन कौर यांनी नवऱ्याला घर चालवायला मदत करायचे ठरविले. त्यांना स्वयंपाक करायची आवड होती. पंजाबी खाद्यपदार्थ बनवण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांनी कैलास कॉलनीच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळविली. त्यानंतर मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात स्थायिक झाल्यामुळे जे वृद्ध एकाकी पडले होते आणि ज्यांना वयोमानुसार स्वयंपाक करणे शक्य नव्हते, अशा वृद्धांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली.

यातील बरेचसे ज्येष्ठ नागरिक हॉटेलमधून जेवण मागवत होते किंवा नोकरांनी शिजवलेल्या अन्नावर दिवस कंठत होते. सरन कौर यांनी त्यांना अत्यल्प दरात घरुन जेवण पाठवून देईन, असे सांगितले. हळूहळू कॉलनीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी सरन कौर आपल्या घरी बनवलेले ताजे आणि गरमागरम जेवण पोहचवू लागल्या. त्यांच्या हातच्या जेवणाचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि यातून भरपूर पैसा मिळू लागला.

आज सरन कौर यांच्यकडे एक मोठे स्वयंपाकघर आहे, जिथे १०-१२ नोकर काम करतात, जे दररोज सुमारे ३०० डबे तयार करतात. डिलिव्हरी बॉय आहे, जो वेळेवर ग्राहकांना डबे नेऊन पोहाचवतो. आता सरन कौर यांच्या ग्राहकांमध्ये केवळ वृद्ध लोकच नाहीत, तर इतर शहरांमधून येणारे आणि येथे पेईंगगेस्ट म्हणून राहणारे तसेच ऑफिसमध्ये काम करणारे लोकही आहेत. या ग्राहकांना हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाडयांवरचे मसालेदार आणि सोडा मारलेले जेवण जेवण्याऐवजी घरात बनवलेला भातडाळ, भाजी, चपाती, कोशिंबीरी, दही जास्त चविष्ट, पौष्टिक वाटते.

गुड अर्थगुड जॉब

दिल्लीच्या छतरपूर येथील एका फार्म हाऊसमध्ये सुरू झालेल्या ‘गुड अर्थ’ कंपनीचे वर्कशॉप पाहून मी थक्क झाले. या कंपनीने स्वत:ची ओळख स्वत:च तयार केली आहे. येथे तयार होणाऱ्या वस्तू सुंदरता, कलात्मकता आणि महागडया किंमतीमुळे श्रीमंत वर्गांत खूपच लोकप्रिय आहेत.

‘गुड अर्थ’च्या मालक अनिता लाल या अशा मोठया उद्योगपतींपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवून स्वत:मधील सर्जनशीलतेला नवीन आयाम तर दिलाच, सोबतच शेकडो महिलांसाठी रोजगाराचा मार्गही खुला करुन दिला. त्यांच्यातील आवड, धैर्य, जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासाने तसेच त्यांच्यातील प्रतिभेने ‘गुड अर्थ’सारख्या कंपनीचा पाया रचला.

आज देशभरातील ‘गुड अर्थ’च्या सर्व शोरूममध्ये विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, कपडे, दागिने इत्यादींची विक्री होते. या वस्तूंवरील लक्षवेधी कलाकृती, कोरीव काम, आकर्षक रंगसंगती, नजाकतीने केलेले नक्षीकाम हे या वस्तू, कपडे, दागिने बनवणाऱ्या महिलांच्या उच्च सर्जनशीलतेची ओळख करुन देतात.

‘गुड अर्थ’च्या वस्तूंवर मुघलकालीन चित्रकला, राजस्थानी लोककला, लखनौ आणि काश्मिरी भरतकामाचा जे अतिशय सुंदर नजारा पहायला मिळतो, त्यामागेच कारण हे अनिता लाल यांना देशातील विविध परंपरागत कलेबाबत असलेली ओढ, प्रेम हेच आहे. भारतातील कलात्मक वारसा जिवंत ठेवून आणि त्याला नव्या रंगात सादर करुन पुढे घेऊन जाणाऱ्या अनिता लाल यांनी २० वर्षांपूर्वी हा व्यवसाय तेव्हा सुरू केला जेव्हा स्वत:च्या मुलांना त्यांनी आयुष्यात सेटल केले होते. मुले आणि कुटुंब यांना त्यांनी आपल्या जीवनात सर्वाधिक प्राधान्य दिले.

सुरुवातीपासूनच त्या स्वतंत्र विचारांच्या होत्या. त्यांची स्वत:ची अशी एक विचारसरणी होती, क्षमता होती आणि कौशल्यही होते. आईवडिलांचा पाठिंबा त्यांना सतत मिळाला. स्वत:चे शिक्षण, क्षमता आणि कौशल्यानुसार जे काही करायचे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य त्यांना घरातून मिळाले होते.

त्या सांगतात की, ‘‘घरात कोणीही जुनाट विचारांचे नव्हते आणि आम्हा मुलींनाही मुलांप्रमाणे शिक्षण, प्रेम आणि संगोपन मिळाले, त्यामुळे माझ्या कामात कधीच कुठला अडथळा आला नाही. माझ्या कुटुंबाकडून मिळालेले प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज मी एक यशस्वी उद्योजक आहे.’’

अनिता सांगतात, ‘‘आम्ही आमच्या महिला कामगारांसाठी कधीही कोणतेच कठोर नियम केले नाहीत. त्या त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या कामाचे तास स्वत:च ठरवतात. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि स्वातंत्र्य आहे. मला असे वाटते की, स्त्रीची पहिली जबाबदारी तिचे घर आणि मुले आहेत. मीसुद्धा माझी मुले मोठी झाल्यानंतरच माझा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. म्हणूनच, ‘गुड अर्थ’मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही महिलेसाठी तिचे घर हेच पहिले प्राधान्य आहे.

‘‘माझा विश्वास आहे की, जीवनही चांगल्या प्रकारे जगता यावे आणि कामही नीट करता यायला हवे. यासाठी महिलांनी मानसिकदृष्टया तणावमुक्त असणे गरजेचे आहे. आपण त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी मिळून प्रयत्न केले तरच त्या तणावमुक्त राहू शकतील.

सरन कौर, अनिता लाल यांच्यासारख्या स्त्रियांकडे पाहिल्यानंतर असे निश्चितच म्हणता येईल की, सशक्त आणि सकारात्मक विचारसरणीच्या स्त्रिया या स्वत: तर सक्षम होतातच, सोबतच इतरांनाही सक्षम बनवत आहेत.

स्त्री सक्षमीकरणामुळे केवळ एक कुटुंबच नाही तर समाज आणि राष्ट्रही सक्षम होते. महानगरांमध्ये विभक्त कुटुंबात राहणाऱ्या अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्यांचाकडे भरपूर मोकळा वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करुन त्या आपले शिक्षण, छंद आणि स्वत:मधील क्षमतेला जगासमोर आणू शकतात आणि त्याद्वारे कुटुंब, समाज आणि देशाला अनमोल असा ठेवा आपल्या कार्यातून देऊ शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें