* ममता शर्मा
आपण सर्वजण आपल्या दैनंदिन खर्चादरम्यान छोटी-मोठी बचत करत असतो, पण फायदा तेव्हाच होतो जेव्हा बचतीसोबतच गुंतवणुकीची सवय लावली जाते. गुंतवणुकीचा विषय निघताच बहुतेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, पण वास्तव असे आहे की, जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनुभव नसेल तर तो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. फायनान्शियल प्लॅनर, अनुभव शाह यांच्या मते, नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत धोका किंवा जोखीम नसते असे नाही, पण तरीही शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा यात कमी जोखीम असते.
काय आहे?
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील फरक जाणून घ्या. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा याचा अर्थ असा होतो की, तुम्ही सार्वजनिक कंपनीचे शेअर्स जेव्हा त्यांची किंमत कमी असते तेव्हा विकत घेता आणि किंमत वाढल्यावर त्याची विक्री करता, पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे म्हणजे तुमचा फंड व्यवस्थापक तुमची रक्कम ही रोखे, शेअर्स, डिबेंचर यासारख्या विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवतो. अशा स्थितीत, म्युच्युअल फंडांचा परतावा हा रोख्यांवर झालेल्या नफ्यावर अवलंबून असतो.
धोका
म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना धोका किंवा जोखीम असते, पण जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा हा धोका थोडा कमी होतो. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुमचे पैसे वेगवेगळया प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवले जातात. जर एका उपकरणाची कार्यक्षमता खराब असेल तर दुसऱ्या उपकरणाची कार्यक्षमता चांगली असू शकते. त्यामुळे धोका कमी होतो. इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, जर शेअर बाजार खाली जात असेल तर त्याच प्रमाणात तुमचाही तोटा होतो. एकूणच, तुमच्या गुंतवणुकीसाठीचा नफा हा एकाच कंपनीच्या समभागांच्या नफ्यापुरता मर्यादित असतो.
नवीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम
जे पहिल्यांदाच गुंतवणूक करतात आणि ज्यांना शेअर बाजाराचा अनुभव नसतो, अशा गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड अधिक चांगला ठरतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर, त्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी फंड व्यवस्थापकावर असते. गुंतवणूकदाराला काळजी करण्याची गरज नसते, मात्र गुंतवणूकदाराला वेळोवेळी त्याच्या व्यवस्थापनासाठी शुल्क भरावे लागते, तर इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करायची झाल्यास त्यासाठी आधी पुरेसे संशोधन करणे आवश्यक असते.