* नसीम अंसारी कोचर
दिल्ली, मुंबई, बंगळुरुसारख्या महानगरांमध्ये स्थायिक झालेल्या मध्यम व उच्च वर्गातील विभक्त कुटुंबांची संख्या सतत वाढत आहे. अशा कुटुंबातील महिलांकडे शिक्षण, वेळ आणि पैशांची कमतरता नाही. नवरा कामावर आणि मुले शाळेत गेल्यावर त्यांच्याकडे खूप मोकळा वेळ असतो. याच मोकळया वेळेचा, शिक्षण आणि स्वत:मधील क्षमतेचा वापर करुन बऱ्याच महिलांनी मोठमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाप्रकारे, त्यांनी पैसे कमावण्यासाठी पतीची मदत तर केलीच, सोबतच घरी राहून आणि घरातील कुठल्याही कामाकडे दुर्लक्ष न करता, कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून आपल्या मोकळया वेळेचाही सदुपयोग केला.
जेवणाने मिळवून दिला रोजगार
दिल्लीच्या कैलास कॉलनीत राहणाऱ्या सरन कौर ६० वर्षांच्या आहेत. त्यांना ३ मुलगे आहेत. तिघेही आता सेटल झाले आहेत. मुलांचा अभ्यास, नोकरी आणि लग्न लावून देण्यामागे सरन कौर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंजाबमध्ये लग्न झाल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. नवऱ्याला नोकरी नव्हती. घरामधील पुढच्या खोलीत त्यांनी किराणा दुकान सुरू केले. त्यावेळी सरन कौर यांच्या कुटुंबात नवरा, सासू, दीर आणि वहिनी असे सर्वजण होते.
पुढे सरन कौर यांना मुले झाली. कुटुंब मोठे होत गेले तसे किराणा दुकानातून मिळणाऱ्या पैशांतून घरखर्च चालवणे कठीण होऊ लागले. तेव्हा सरन कौर यांनी नवऱ्याला घर चालवायला मदत करायचे ठरविले. त्यांना स्वयंपाक करायची आवड होती. पंजाबी खाद्यपदार्थ बनवण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांनी कैलास कॉलनीच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळविली. त्यानंतर मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात स्थायिक झाल्यामुळे जे वृद्ध एकाकी पडले होते आणि ज्यांना वयोमानुसार स्वयंपाक करणे शक्य नव्हते, अशा वृद्धांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली.
यातील बरेचसे ज्येष्ठ नागरिक हॉटेलमधून जेवण मागवत होते किंवा नोकरांनी शिजवलेल्या अन्नावर दिवस कंठत होते. सरन कौर यांनी त्यांना अत्यल्प दरात घरुन जेवण पाठवून देईन, असे सांगितले. हळूहळू कॉलनीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी सरन कौर आपल्या घरी बनवलेले ताजे आणि गरमागरम जेवण पोहचवू लागल्या. त्यांच्या हातच्या जेवणाचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्याकडे ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि यातून भरपूर पैसा मिळू लागला.