‘‘गावात महिलांसाठी शिक्षण, जनजागृती गरजेची’’ – पायल मेमाणे

* सोमा घोष

२३ वर्षीय अभिनेत्री पायल मेमाणेने अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची इच्छा होती. त्यासाठी तिला घरच्यांचाही खूप पाठिंबा मिळाला. हसतमुख आणि विनम्र पायल लावणी आणि कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मराठी इंडस्ट्रीत रियालिटी शो ‘अप्सरा आली’मधून पदार्पण केले, ज्यात तिच्या नृत्याचे खूपच कौतुक झाले आणि तिला अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या सोनी मराठीवरील ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरची दत्तक मुलगी दिशाची भूमिका साकारत आहे. ही तिची सर्वात मोठी आणि मुख्य भूमिका आहे, जी साकारताना ती खूपच आनंदी आहे. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान तिच्याशी गप्पा मारता आल्या. त्या खूपच मनोरंजक झाल्या. त्याच गप्पांमधील हा काही खास भाग.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. मी एक नृत्यांगना आहे आणि लहानपणापासूनच माझ्या आईलाही नृत्याची खूप आवड होती. म्हणूनच तिने मला लहान वयातच नृत्याची शिकवणी लावली. हळूहळू शाळा आणि महाविद्यालयात मी माझ्या या कलेचे सादरीकरण करू लागले.

तुला कुटुंबाचा कितपत पाठिंबा मिळाला?

माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझे वडील पुण्यात नोकरी करतात. माझ्या यशामुळे त्यांना अत्यानंद होतो. माझ्या चित्रिकरणात काही अडचण आल्यास दोघेही तिथे येऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहातात. सुरुवातीला पुण्यातून ऑडिशनसाठी मुंबईला आईसोबत ६ वाजता जायचे आणि संध्याकाळी पुण्याला परत यायचे. वडिलांनी माझ्यावर कधीच कुठले निर्बंध लादले नाहीत, उलट मला खूप प्रोत्साहन दिले, कारण मुंबईत राहाणे महागडे असते. आता या मालिकेमुळे मला एकटीलाच राहावे लागत आहे, पण माझे आई-वडील रोज फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करतात. चांगले काम मिळवण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. कसदार अभिनय करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली, कारण मी एक नृत्यांगणा आहे, अभिनेत्री नाही.

तू या क्षेत्रात कशी आलीस?

मी २०१८ मध्ये एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. तो माझा पहिला शो होता, नंतर टीव्हीवरील मालिकांसाठी मी ऑडिशन दिले आणि हळूहळू अभिनयात उतरले. नृत्यातून मी या क्षेत्रात प्रवेश केला. मला टीव्हीवरील मालिकांमधील अभिनयाबद्दल फारशी कल्पना नव्हती. कॅमेऱ्यासमोर कसे उभे राहायचे तेच कळत नव्हते. सुरुवातीच्या काळात मी अनेक मालिकांमध्ये अतिशय छोटया भूमिका साकारल्या. त्यामुळे मला हळूहळू अभिनय समजू लागला आणि त्यानंतर आता ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ ही मालिका माझी मुख्य भूमिका असलेली प्रमुख आणि मोठी मालिका आहे.

लावणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे, तुला त्यातून काय     शिकायला मिळते?

लावणी हा महाराष्ट्राचा जुना नृत्य प्रकार आहे. मराठीत त्याला ‘तमाशाचा फड’ म्हटले जाते. पूर्वी लावणी गावोगावी सादर केली जात असे, परंतु आज ती मनोरंजनाचे माध्यम झाली आहे. यात अदांना नजाकतीने सादर केले जाते आणि ही कला सादर करणारे खूप मोठमोठे कलाकार आहेत. मलाही लावणी करायला खूप आवडते. लावणीकडे आनंदी राहण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते.

या मालिकेमधील तुझा अनुभव कसा आहे?

मला ही मालिका करताना खूप छान वाटते, कारण यात माझी भूमिका खूप भावनिक आहे. यामध्ये माझी आई ट्रान्सजेंडर आहे आणि जग तिच्यासोबत खूप वाईट वागते. आईवर होणारा अन्याय दूर करून तिला न्याय मिळवून देण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. आईची कोणतीही समस्या मी माझी समस्या मानते. यात माझ्यासोबत सर्व अनुभवी आणि दिगग्ज कलाकार आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमची टीम खूप चांगली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

खूप जास्त मिळतीजुळती आहे, कारण माझी आई कविता मेमाणे माझ्यासाठी खूप खास आहे. सध्या मी चित्रिकरणासाठी घरापासून दूर राहात असल्यामुळे मला माझ्या आईची खूप आठवण येते. ज्याप्रमाणे मालिकेमधील दिशा आईचे रक्षण करणारी, तिची काळजी घेणारी आहे, तशीच मी माझ्या आईची खूप काळजी करते. तिला कोणी काही बोलले किंवा तिला काही झाले तर त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो.

हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे का?

संधी मिळाली तर मला नक्कीच तिथे काम करायला आवडेल. हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे.

हिंदी वेब सीरिजमध्ये खूप अंतर्गत दृश्य असतात. तू ती किती सहजतेने करू शकतेस?

अंतर्गत दृश्य करण्यासाठी एखाद्याचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक असते. तुमची सादरीकरणाची पद्धतही योग्य असायला हवी. कथेची गरज असेल तर अशी दृश्ये करायला काही हरकत नाही, पण चित्रपटाला मसालेदार फोडणी देण्यासाठी अंतर्गत दृश्य करायची असतील तर ते मला मान्य नाही.

हिंदी चित्रपटात काम करायचे झाल्यास कोणत्या सहकलाकार किंवा दिग्दर्शकासोबत तुला काम करायला आवडेल?

अभिनेता विकी कौशल हा माझा बालपणीचा क्रश आहे. मी त्याची खूप मोठी चाहती आहे. चित्रपट कुठलाही असो, तो माझा सहकलाकार असेल तर मला खूप आवडेल. याशिवाय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी फॅशनेबल आणि खवय्यी दोन्ही आहे. आईने बनवलेले मांसाहारी पदार्थ मला खूप आवडतात. मी जंक फूड फार खात नाही. गोड पदार्थांमध्ये मला रसगुल्ले किंवा गुलाबजाम खूप आवडतात.

मला फॅशन आवडते. मी स्वप्निल शिंदे आणि मनीष मल्होत्रा यांना फॉलोअप करते. माझ्या लग्नात मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घालायला मला आवडेल.

महिला दिननिमित्त तुझा संदेश काय आहे?

अजूनही मुलींना मुलांइतके स्वातंत्र्य मिळालेले नाही. गावाकडच्या मुलींना अजूनही संपूर्ण शिक्षण मिळत नाही. दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी, असा विचार करून आईवडील तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करायला बघत नाहीत. त्यामुळे मुलीचे घर ना तिचे माहेर असते ना सासर, कारण माहेरी तिला दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी तर सासरी दुसऱ्याच्या घरून आलेली मुलगी समजले जाते. मुलीचे खरे घर नेमके आहे तरी कुठे? मला सर्वांकडूनच या प्रश्नाचे उत्तर खरोखर हवे आहे. शहरात नाही, पण गावात महिलांसाठी शिक्षण आणि जनजागृती गरजेची आहे.

आवडता रंग – काळा, लाल, पांढरा.

आवडता पोशाख – वन पीस, जीन्स-टी शर्ट.

आवडते पुस्तक – चेतन भगतचे ‘द गर्ल इन रूम 105’.

आवडते पर्यटन स्थळ – काश्मीर, पॅरिस.

वेळ मिळाल्यास – नृत्याचा सराव, कुटुंबासह वेळ घालवणे.

आवडते परफ्यूम – जाराचे आर्किड.

स्वप्नातील राजकुमार – सहकार्य करणारा, चांगली व्यक्ती आणि प्रेमळ.

जीवनातले आदर्श – जीवनात चांगली व्यक्ती बनणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलांसाठी काम.

स्वप्न – खूप मोठी आणि चांगली अभिनेत्री बनणे.

हरीहरन आणि साधना जेजुरीकरांची ‘दूरीयां…’ गझल रसिकांच्या भेटीला

* सोमा घोष

मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात करून आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीनं गायलेली एक सुमधूर गझल नुकतीच रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. प्रकाशनानंतर अल्पावधीतीच या गझलला संगीतप्रेमींची पसंती मिळत असून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर या गाण्यावर प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.

साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली ‘दूरीयां…’ हि गझल नुकतीच समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकच्या बॅनरखाली अंधेरीतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हरीहरन यांच्या साथीने साधना जेजुरीकर यांनी आपल्या सुमधूर गायकीच्या आधारे गझलमधील शब्दरचनांना अचूक न्याय दिला आहे. ‘दूरीयां…’बाबत हरीहरन म्हणाले की, आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण ‘दूरीयां…’ गाताना एका वेगळ्या प्रकारचं आत्मीक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना यांचा अद्भूत संगम संगीतप्रेमींच्या मनाला भिडणारा असून, मला स्वत:ला आनंदाची अनुभूती देणारा ठरला आहे. ही गझल ऐकताना आणि पाहताना रसिकांनाही याची प्रचिती येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘दूरीयां…’ ही गझल खऱ्या अर्थानं आजच्या काळातील संगीतप्रेमींना भावणारी असल्याचं सांगत साधना जेजुरीकर म्हणाल्या की, रसिकांची आवड लक्षात घेऊन ‘दूरीयां…’ची निर्मिती करण्यात आली आहे. कर्णमधूर संगीतरचनेला दर्जेदार निर्मितीमूल्यांची जोड देऊन सादर करण्यात आलेली ‘दूरीयां…’ ही गझल हरिहरन यांनी आपल्या गायकीनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. या गझलच्या निमित्तानं त्यांच्यासारख्या आघाडीच्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी आहे. संगीतप्रेमींही ‘दूरीयां…’वर नक्कीच भरभरून प्रेम करतील याची खात्रीही त्यांनी दिली.

मदन पाल यांनी लिहिलेली ‘दूरीयां…’ गझल संगीतकार कैलाश गंधर्व यांनी संगीतबद्ध केली आहे. या गझलचा व्हिडिओ कैलाश पवार यांनी दिग्दर्शित केला असून, प्रमोदकुमार बारी यांनी कोरिओग्राफी केली आहे. हरीहरन, साधना जेजुरीकर, हरीश वांगीकर आणि ऐश्वर्या माने यांच्यावर या गझलचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. पिकल म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणाऱ्या ‘दूरीयां…’ची सिनेमॅटोग्राफी प्रतीक बडगुजर यांनी केली असून अक्षय हरीहरन संगीत निर्माते आहेत. दिग्दर्शक कैलाश पवार यांनीच ‘दूरीयां…’चं एडिटींगही केलं आहे.

नवी मालिका – ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘प्रतिशोध’ या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल  बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.

प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.

‘प्रतिशोध’ – झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या  संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. अशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवली. अरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. त्यातच आता ही थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची.

१६ जानेवारी पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

थरारकरीत्या भोसले किलवरला शोधणार, खरा किलवर जगासमोर येणार!!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तुमची मुलगी काय करते?’. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेताघेता ती रंजक वळणावर येऊन पोचली आहे. आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतली रंजकता कायम राहिली. आता मालिका शेवटापर्यंत येऊन पोचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे आपल्याला पाहायला मिळेल.  या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे.  प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेची लोकप्रियता यातूनच आपल्याला समजते आहे.

‘तुमची मुलगी काय करते?’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली असून या आठवड्यात ती शिगेला आहे. १५ जानेवारी रोजी रविवारी १० वाजता महाएपिसोड पाहायला मिळणार आहे.

पाहायला विसरू नका, ‘तुमची मुलगी काय करते?’ थरारक आठवडा आणि १५ जानेवारी, रविवारी रात्री १० वाजता महाएपिसोड. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

जीओ स्टुडिओजच्या “मी वसंतराव” ह्या चित्रपटाचा समावेश

* सोमा घोष

संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानला जातो. जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक सिनेमांमधील यादित भारतातील कांतारा, गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे खरंच खूप गौरवाची बाब आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ”मी वसंतराव’ या चित्रपटावर आम्ही तब्बल ९ वर्षं काम केले आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्करसारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे.

गायक-अभिनेता राहुल देशपांडे म्हणाले की, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे  कारण, यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठीदेखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हेदेखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.

‘असा ये ना…’ हे गुलाबी गाणं रसिकांच्या भेटीला

* सोमा घोष

मराठी संगीत क्षेत्रात कायम नवनवीन प्रयोग होत आहेत. गीतलेखनापासून संगीत दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर विविध प्रकारची संगीत निर्मिती होत आहे. आजच्या सिंगल्सच्या काळातही मराठी सिंगल्सचा खूप बोलबाला आहे. आजवर बऱ्याच सिंगल्सनी रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. हिच परंपरा पुढे सुरू ठेवत रसिकांना मंत्रमुग्ध करणारं ‘असा ये ना…’ हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. या गुलाबी गाण्यात प्रेक्षकांना एका छोट्याशा हळूवार प्रेमकथेचाही अनुभव घेता येईल.

धरणी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुनीता नायक यांनी ‘असा ये ना…’ या गाण्याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मोहन नामदेव राठोड यांनी सांभाळली आहे. ‘असा ये ना…’ हे गाणं गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहिलं असून रोहित राऊत आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या सुमधूर आवाजात सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘असा ये ना…’ या सुमधूर गाण्यात रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची अफलातून केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याच्या निमित्तानं अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याची किमया दिग्दर्शक मोहन राठोड यांनी साधली आहे. या गाण्यात प्रेमाचा एक वेगळाच रंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात राठोड यांनी एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी सादर केली आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाच्या स्वप्नातील हे गाणं आहे. या सैनिकाची पत्नी घरी आहे. पती सीमेवर देशाच्या रक्षणाची, तर पत्नी घरी संसार सांभाळण्याची जबाबदारी चोख बजावत असताना ते मनांच्या माध्यमातून दोघे एकत्र येतात आणि त्यातून हे गाणं तयार होतं. या गाण्याचं शूटिंग सातारा येथे करण्यात आलं आहे. मोहन राठोड यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेलं ‘मन काहूर…’ हे गाणं खूप गाजलं आहे. याखेरीज ‘दणका…’ या धमाल गाण्यानं खरोखर दणका उडवला होता. ‘मन धुंद पायवाट…’ हे राठोड यांचं गाणं रसिकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारं ठरलं. याखेरीज ‘मेरा जहां…’ या राठोड यांच्या हिंदी गाण्यानेही संगीतप्रेमींना ताल धरायला लावला आहे. आता ‘असा ये ना…’ हे रोमँटिक साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे.

धरणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबादची असून त्यांनी सर्वप्रथम मराठी गाण्याची निर्मिती करायचं ठरवलं. धरणी प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेलं पहिलं गाणं म्हणजे ‘असा ये ना…’ या गाण्याच्या निर्मात्या सुनीता नायक या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. चित्रपटक्षेत्राची खूप आवड असल्यामुळे त्यांनी मराठीमध्येच काम करायचं ठरवलं. प्रत्येक उत्सवाला एक गाणं स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर रिलीज करायचं आणि नवीन टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं हा निर्मात्या सुनीता नायक यांचा मुख्य हेतू आहे.

 

कामात कुटुंबियांचा खंबीर पाठिंबा – रश्मी अनपट

* सोमा घोष

मराठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री रश्मी अनपटला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नसले तरी तिला मात्र प्रेक्षकांसमोर एखादी भूमिका साकारायला खूप आवडायचे. पुण्याची असलेल्या रश्मीची कामादरम्यान अभिनेता आणि पती अमित खेडेकरशी ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २ वर्षांनी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी मुलगा अभीर झाला. तो वर्षाचा झाल्यानंतरच तिने अभिनयातील कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. तिच्या कामात संपूर्ण कुटुंब तिला पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे तिचा कुटुंबासोबत कामाचा चांगला ताळमेळ बसला आहे. सुंदर आणि हसतमुख रश्मी सध्या सन मराठीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. चित्रिकरणाचा व्यस्त दिनक्रम असूनही तिने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’साठी गप्पा मारल्या. चला, तिच्याच तोंडून तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनयाच्या क्षेत्रात नव्हते. मी वयाच्या १० व्या वर्षांपासून व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली. एक ऐतिहासिक नाटक होते, त्यात मी ५ वर्षांपर्यंत राजाराम महाराजांची भूमिका केली. त्यानंतर दोन वर्षे काहीही केले नाही. बारावीनंतर पुन्हा व्यावसायिक नाटक करू लागले. ग्रॅज्युएशननंतर मुंबईत येऊन मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी काम करू लागले. ८ वर्षांपर्यंत मी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीकडे वळले.

आता या मालिकेत काय काम करत आहेस? त्यात तुझी भूमिका काय आहे?

यामध्ये मी एका महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे, जिथे तिच्याबद्दलचे सर्व निर्णय तिचे वडील घेतात. तिच्या जेवणापासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा दिनक्रम वडिलांनीच ठरवलेला असतो आणि ती आनंदाने त्याचे पालन करते. ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा आहे, ज्यात एक वडील मुलीची काळजी घेणारे, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे आणि मुलीबद्दल मोठे स्वप्न पाहणारे आहेत.

तुझ्या अभिनय कारकिर्दीत कुटुंबाचे सहकार्य किती मिळाले?

सगळयांनी खूप साथ दिली. अनेकदा रात्री जेव्हा मी नाटक संपवून घरी परतायचे किंवा एखाद्या नाटकात काम करायला जायचे तेव्हा माझे वडील मला नाट्यगृहातून घ्यायला यायचे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांचेही मला चांगले सहकार्य मिळत आहे. माझे पतीही मला खूप पाठिंबा देतात. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

टीव्ही इंडस्ट्रीत पहिला ब्रेक मिळण्यासाठी तुला किती वेळ लागला?

पुण्यात राहून मी टीव्हीवरील मालिकांसाठी दोन ते तीन वेळा ऑडिशन दिले होते. नंतर मला प्रोडक्शन हाऊसचा फोन आला. मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, त्यावेळी मी मास्टर डिग्री घेण्यासाठी रांगेत उभी राहून शुल्क भरणार होते. तितक्याच प्रोडक्शन हाऊसचा फोन आल्यामुळे मी गोंधळून गेले. मी काय करू? अभिनय की शिक्षण? शुल्क भरण्याची रांग सोडून मी सर्वात आधी वडिलांना भेटून त्यांचे मत विचारले. त्यांनी मला जे आवडेल ते करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी मुंबईत अभिनयासाठी आले.

मुंबईत आल्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता?

मी अनेक मोठया मराठी कलाकारांसोबत काम केले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा हा प्रवास जवळपास १३ वर्षांचा आहे. मला या काळात कोणताही वाईट अनुभव आला नाही. लोक मनोरंजन क्षेत्राबद्दल खूप काही बोलतात, पण मला कधीच तसे काही जाणवले नाही. मुळात प्रत्येक व्यक्तीसाठी या इंडस्ट्रीचा अनुभव वेगळा असतो. करिअर म्हणून हे क्षेत्र निवडल्याचा मला आनंद आहे.

पती अमित खेडेकरशी तुझी कशी ओळख झाली?

मी जे पहिले मराठी नाटक केले त्यात माझा पतीही अभिनय करत होता. नाटकादरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि दोन वर्षांनी मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले. माझा मुलगा ४ वर्षांचा आहे.

मुलासोबत काम करण्यासाठी तू कसे जुळवून घेतलेस?

गरोदर राहिल्यानंतर काही दिवसांनी मी कामातून ब्रेक घेतला. त्यानंतर मुलगा एक वर्षाचा झाल्यावर, पुन्हा काम सुरू केले. माझे आई-वडील आणि सासू-सासरे मिळून त्याची काळजी घेत होते. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी अवघड नव्हते. माझा मुलगा अजिबात त्रास देत नाही. त्याला दोन्ही घरातल्या आजी-आजोबांसोबत राहायची सवय झाली आहे.

तू आतापर्यंत कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेस? कोणती भूमिका तुझी सर्वात आवडती आहे? कोणत्या भूमिकेने तुला ओळख मिळवून दिली?

माझ्या पहिल्या मालिकेत मला नकारात्मक भूमिका साकारायची होती. त्यावेळी मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारले होते की, मला अशी भूमिका का मिळाली, मी नकारात्मक दिसते का? त्यांनी हसून मला समजावले की, स्वत:च्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पहिल्याच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार असल्यामुळे मला खूपच निराश झाल्यासारखे वाटत होते. स्वत:पेक्षा वेगळी भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड होते, पण हळूहळू सवय झाली. दिग्दर्शकांनी खूप मदत केली. या मालिकेनंतर मी अनेक सकारात्मक भूमिकाही साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काही ना काही आव्हान असतेच. भूमिका कुठलीही असो ती कलाकारासाठी खूप खास असते आणि ती साकारण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करतो.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेत मी ‘ईश्वरी’च्या मुख्य भूमिकेत होते. या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले. त्या मालिकेमुळे माझी ओळख मिळाली. त्यादरम्यान बाहेर गेल्यावर लोक माझे कौतुक करायचे. एका महिलेने तिच्या मुलीचे नाव इश्वरी ठेवले होते, माझ्यासाठी हे खूपच हृदयस्पर्शी होते. एकदा मी पुण्याला गेले होते, तिथे बाईकवरील एक काका-काकूने मला ओळखले. गाडी थांबवून ते माझ्याशी बोलले आणि रडू लागले. मी घाबरले, विचारल्यावर समजले की, मालिकेत एके दिवशी माझ्या सासूने माझ्या कानाखाली मारले होते. ते पाहून खूप वाईट वाटले, असे काकूंनी रडत सांगितले. ती जखम बरी झाली आहे की नाही, हे मी पाहातेय, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन मालिकांशी प्रेक्षकांचे घट्ट नाते असते. ते अनुभव खूप वेगळे असतात. प्रेक्षकांची आवड हेच तिथे मी काम करण्यामागचे कारण आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.

तुला कधी नकाराचा सामना करावा लागला का? त्यावेळी तू त्याला कशी सामोरी गेलीस?

रिजेक्शन किंवा नकार हा अभिनयाचा एक भाग आहे. कधीकधी त्याला सामोरे जावे लागतेच, कारण कधीकधी चेहरा हा व्यक्तिरेखेला साजेसा नसतो. मी यावर जास्त विचार न करता पुढे जाते. यामुळे अनेकदा तणाव येतो. अशावेळी मी माझ्या पतीने सांगितलेले आठवते. तो म्हणतो की, एक काम झाले नाही तर तर दुसरे खूप जास्त छान होईल. तो तणाव येऊ देत नाही, मीही त्याने सांगितल्याप्रमाणेच वागते. मी नेहमी सकारात्मक विचार करते.

हिवाळयात सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

मी नेहमीच माझ्या आहाराकडे जास्त लक्ष देते. मध्येच भूक लागल्यावर सुका मेवा, फळे खाते, पण मला वडापाव खायला खूप आवडतो. तो मी कधीतरी खाते. मी खवय्यी आहे. मी साधारण डाएट करते. सकाळी उठून गरम पाणी, ब्राऊन ब्रेड, लोणी, पोहे, उपमा इत्यादी खाते. माझ्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती, हिरव्या पालेभाज्या, डाळ इत्यादी असते. पुरेसे पाणी पिते.

आरोग्याची काळजी कशी घेतेस? काही संदेश द्यायचा आहे का?

मी योगासने, व्यायाम करते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स इत्यादींचा माझ्या आहारात समावेश असतो. या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मी जंक फूड खाणे टाळते. मी सर्व महिलांना नैसर्गिक अन्न, तूप, पाणी, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करण्याचा सल्ला देईन.

आवडता रंग – लाल.

आवडते वस्त्र – पारंपरिक साडी.

आवडते पुस्तक – स्वामी, रणजीत देसाई.

वेळ मिळाल्यावर – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्यूम – जाराचे सिक्रेट.

पर्यटन स्थळ – जम्मू आणि काश्मीर, लंडन.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

सामाजिक कार्य – अनाथ आणि वृद्धांसाठी काम करणे.

स्वप्न – समाजासाठी काहीतरी करायचेय.

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असते. शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे. या मालिकेचे विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित होणारी ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्यं, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे. ‘शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस’  असं ब्रीदवाक्य  असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हिनी साकारली आहे. मूळची कोकणातली असलेली रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष ठरेल. तर मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. तर ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ’ असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्‍या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल.

शिक्षणाच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास बयोचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार, हे पाहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका नक्की पाहा.

पाहा, 12 सप्टेंबरपासून सोम.-शनि., रात्री 8.30 वा, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’, सोनी मराठी वाहिनीवर.

 

आत्मविश्वास हीच फॅशन – जानकी पाठक

* सोमा घोष

मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जानकी पाठकने ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते, त्यामुळेच शाळा आणि महाविद्यालयात असताना ती नाटकात काम करू लागली. ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ हा तिचा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटामुळेच लोक तिला ओळखू लागले. जिद्द आणि प्रचंड मेहनतीमुळेच ती इथपर्यंत पोहोचली. शांत आणि हसतमुख स्वभावाच्या जानकीला आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळेच अनेकदा नकार मिळूनही ती हिंमत हरली नाही आणि शेवटी यशस्वी झाली. सध्या ती सन मराठी वाहिनीवरील ‘माझी माणसं’ या मालिकेत गिरिजाची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जानकीने वेळात वेळ काढून गृहशोभिकेशी संवाद साधला. सादर आहे त्यातील काही भाग.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

लहानपणापासून मला चित्रपट पाहायला आणि तसा अभिनय करायला आवडायचे. त्यामुळेच वयाच्या ५व्या वर्षीच मी अभिनेत्री व्हायचे ठरवले होते. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासूनच मला संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनय इत्यादी सर्वच शिकवायला सुरुवात केली होती आणि ते मला प्रचंड आवडायचे. लहानपणी बालनाट्यात काम करण्यासोबतच शाळेतही मी अनेक नाटकांमध्ये काम केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग क्लासेसमधून डिप्लोमा केला. महाविद्यालयातील नाट्य स्पर्धेत भाग घेऊ लागले आणि त्यानंतर हळूहळू व्यावसायिक ऑडिशन देऊ लागले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मी वयाच्या १७व्या वर्षी ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी माझे वडील जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. त्यांनी लिखाणास सुरुवात केली आणि या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले. माझे वडील आणि माझ्यासाठीही तो पहिला मराठी चित्रपट होता. आम्ही दोघांनी मराठी चित्रपट क्षेत्रात एकत्रच पदार्पण केले. आमच्यासाठी हा एक प्रयोग होता, पण समीक्षकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मला पुरस्कारही मिळाले. त्यावेळी मी १७ वर्षांची आणि थोडी गुबगुबीत होते. त्यामुळे त्या चित्रपटाचा मला फार जास्त फायदा झाला नाही.

कोणत्या मालिकेमुळे तू घराघरात पोहोचलीस?

‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ नंतर मी ४ भूमिका केल्या. यातील २ मुख्य भूमिका होत्या. त्यातील एक लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर मला ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट मिळाला. तो माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. तो एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. सध्या मी ‘माझी माणसं’ या मराठी मालिकेत काम करत आहे.

या मालिकेत तू कोणती भूमिका साकारत आहेस?

या मालिकेत मी गिरिजा नावाची मुख्य भूमिका साकारत आहे, जिथे कुटुंबात मी एकमेव कमावती आहे. माझ्याकडे पैसे मागायला सर्व घाबरतात. मी सर्वांना शिस्त लावते. गिरिजा तिच्या कमाईवर खुश आहे आणि सर्वांना चांगले काम करण्यासाठी सतत प्रोत्साहन देते.

वास्तव जीवनात तू गिरिजासारखीच आहेस का?

मी गिरिजासारखी मुळीच नाही. मी खूपच बिनधास्त आहे. फार काळजी करत नाही. गिरिजा मात्र शिस्तप्रिय आहे. पैसे अतिशय विचारपूर्वक खर्च करते. कुठे किती खर्च होणार आहे, तो खर्च किती गरजेचा आहे, याबद्दल ती सतत चर्चा करते. तिच्यातील या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या मालिकेमुळे मला त्या शिकायला मिळत आहेत.

या भूमिकेचा तुझ्या जीवनावर कसा प्रभाव पडला?

आतापर्यंत प्रेक्षकांनी मला चित्रपटांतून पाहिले होते. आता ते मला या मालिकेतून दररोज पाहात आहेत. मी टीव्ही मालिका करत असल्यामुळे प्रेक्षक खुश आहेत. टीव्हीवर काम केल्यामुळे कलाकार त्यांच्या घरातील सदस्य होतो. तिथे जास्त प्रेम आणि आपलेपणा मिळतो, जे चित्रपटात शक्य नसते.

आतापर्यंतच्या कामांपैकी कोणते काम तुझ्या हृदयाच्या जवळ आहे?

‘एकलव्य’ या नावाने मी एक चित्रपट केला, जो पोस्ट प्रोडक्शनवर आधारित आहे. त्याच्या चित्रिकरणावेळी खूपच मजा आली, कारण त्याची कथा खूपच चांगली आहे.

तुला किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष खूपच करावा लागला, कारण माझे वडील या इंडस्ट्रीतले नव्हते आणि त्यांच्यासह माझाही तो पहिला चित्रपट होता. त्यांचा संघर्ष हाही माझा संघर्ष होता. त्यावेळी मी जरा जास्त जाड होते, त्यामुळे पुढे अनेक ठिकाणी मला नकार मिळाला. त्यामुळे मला स्वत:वर बरीच मेहनत घ्यावी लागली. मी कधीच व्यावसायिक रंगभूमीवर काम केले नाही.

तू खूपच फॅशनेबल आहेस. फॅशनबद्दल तुला काय वाटते?

माझ्या दृष्टीने आत्मविश्वास हीच फॅशन आहे. तुम्ही जो कोणता ड्रेस घालता, दागिने किंवा मेकअप करता त्या सर्वांतून तुमचा आत्मविश्वास झळकत असेल तर त्यामुळे तुमचे सौंदर्य अधिकच खुलते. माझी स्टाईल नेहमीच बदलत राहते. चित्रिकरणावेळी मी कधी स्कर्ट तर कधी फ्रॅक घालून जाते. डिझायनर्सच्या ब्रँडला मी फारसे महत्त्व देत नाही. हँडलूम कपडे बनवणारे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडूनच मी कपडे खरेदी करते. घरबसल्या काही गरीब महिला हे कपडे तयार करतात. असे कपडे टिकाऊ फॅशन ठरतात. यामुळे त्यांनाही घरखर्चासाठी काही पैसे मिळतात आणि कलाही टिकून राहाते. ट्रेंड काय आहे, हे पाहाणे मला आवडत नाही.

पावसाळयात सौंदर्याची काळजी कशा प्रकारे घेतेस?

मला दिवसभर शूटिंग करावे लागते. पावसाळयातही सनस्क्रीन लावते. फोन आणि लॅपटॉपमधूनही अतिनील किरणे बाहेर पडत असल्यामुळेच सनस्क्रीन लावावे लागते. मी घरगुती उपाय करते. जसे की, बेसन, दही आणि त्यात थोडी हळद टाकून पेस्ट तयार करते. ती आठवडयातून एकदा १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवते. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुते.

तू किती खवय्यी आहेस?

मी खवय्यी आहे. मला खायला आवडते, पण त्यातही माझी स्वत:ची अशी आवड आहे.

तुला काही संदेश द्यायचा आहे का?

महिलांना मला हेच सांगायचे आहे की, क्षेत्र कुठलेही असो, लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, पण तुमचा स्वत:वर विश्वास हवा. याशिवाय जे मदत करत नाहीत त्यांच्यावर अवलंबून राहू नका. स्वत:चा मार्ग स्वत: निवडा.

आवडता रंग – गुलाबी.

आवडता पोशाख – पाश्चिमात्य.

आवडते पुस्तक – टू किल अ मॉकिंग बर्ड.

पर्यटन स्थळ – देशात गोवा, कन्याकुमारी आणि परदेशात इटली.

वेळ मिळाल्यास – झोपणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्यूम – केरोलिना हेरार्स गुड गर्ल.

जीवनातील आदर्श – योग्य गोष्टीवर ठाम राहणे.

सामाजिक कार्य – प्राणी निवारा केंद्रात काम करणे,  त्यांना आर्थिक मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – करिअरसाठी मदत करणारा.

स्वप्न – खेळ, चित्रपट.

‘फक्त मराठी सिने सन्मान’

* सोमा घोष

मराठी प्रेक्षकांची आवड निवड ही मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी जोडलेली असते आणि तीच आवड ओळखून ‘फक्त मराठी’ ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस आली. बदलत्या काळासोबत बदलत चाललेलं मनोरंजन विश्व यांचा समतोल राखत फक्त मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांना या वाहिनीने एकरूप करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखलेल्या या वाहिनीनेने आता मनोरंजन विश्वाला अजून आपलंस करत ‘फक्त मराठी सिने सन्मान’ हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कोरोना नंतर पूर्वरत झालेल्या मनोरंजन सृष्टीच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच मनोरंजन सृष्टीत असलेल्या मराठी अस्मितेचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन फक्त मराठी वाहिनीने केले होते. गेल्यावर्ष भरात मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरसुद्धा त्यांनी विक्रमी कमाई केली आहे. याच चित्रपटांचा सन्मान ‘फक्त मराठी सिने सन्मान’ मध्ये करण्यात आला आहे. या सोहळ्याचे रंगतदार प्रक्षेपण येत्या २१ ऑगस्ट रोजी फक्त मराठीवर होणार आहे.

फक्त मराठी सिने सन्मान हा कलाकारांपुरता मर्यादित नसून हा सन्मान मराठी मनोरंजन सृष्टीला महत्वाचं योगदान देणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञ आणि पडद्याच्या मागे असलेल्या कलाकाराचा आहे. हा सन्मान सोहळा चित्रपट सृष्टीसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी अशा अनेक चित्रपट कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला चार चांद लावणारी बाब म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालन यांनी विद्याधर भट्टे या हरहुन्नरी रंगभूषाकाराचा केलेला गौरव. विद्याधर भट्टे यांनी रंगभूषा करत अनेक कलावंतांना चरित्र भूमिकेसाठी तयार केले आहे. या रंगभूषेमुळे चरित्र भूमिका करणारा कलाकार त्या पात्राच्या जवळ जाऊ शकला आहे. तर या रंगभूषाकाराने चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान हे अमूल्य असून त्याचाच गौरव फक्त मराठी सिने सन्मानच्या व्यासपीठावर झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्ण काळ दाखवणारे आणि अवघे पाऊणशे वयोमान आहे असं म्हणणारे महाराष्ट्राचे लाडके दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव या सन्मान सोहळ्यात करण्यात आला. हा विशेष सन्मान सचिन पिळगावकर यांची आई आणि कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आला आहे. धर्मवीर, चंद्रमुखी, सोयरीक, लोच्या झाला रे, पांघरूण अशा अनेक चित्रपटांना या सिने सन्मान सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. तर सूत्र संचालकांची नवीन जोडी या सिने सन्मान मराठी पुरस्कार सोहळ्याने दिली ती म्हणजे अमेय वाघ आणि ओंकार भोजने. या दोघांच्या तुफान विनोदी षटकारांनी फक्त मराठी सिने सन्मान उजळून निघाला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर नवतारका प्रियदर्शिनी इंदलकर ही कलाकारांशी गुज गोष्टी करत या सोहळ्याच्या बाबतीत त्यांच्या मनातील भावना जाणून घेत होती. आता त्या भावना आणि गुजगोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर येत्या २१ तारखेला पहायला विसरू नका ‘फक्त मराठी सिने सन्मान’ आपल्या लाडक्या ‘फक्त मराठी’ वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें