* सोमा घोष
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जानकी पाठकने ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते, त्यामुळेच शाळा आणि महाविद्यालयात असताना ती नाटकात काम करू लागली. ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ हा तिचा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटामुळेच लोक तिला ओळखू लागले. जिद्द आणि प्रचंड मेहनतीमुळेच ती इथपर्यंत पोहोचली. शांत आणि हसतमुख स्वभावाच्या जानकीला आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळेच अनेकदा नकार मिळूनही ती हिंमत हरली नाही आणि शेवटी यशस्वी झाली. सध्या ती सन मराठी वाहिनीवरील ‘माझी माणसं’ या मालिकेत गिरिजाची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जानकीने वेळात वेळ काढून गृहशोभिकेशी संवाद साधला. सादर आहे त्यातील काही भाग.
तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
लहानपणापासून मला चित्रपट पाहायला आणि तसा अभिनय करायला आवडायचे. त्यामुळेच वयाच्या ५व्या वर्षीच मी अभिनेत्री व्हायचे ठरवले होते. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासूनच मला संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनय इत्यादी सर्वच शिकवायला सुरुवात केली होती आणि ते मला प्रचंड आवडायचे. लहानपणी बालनाट्यात काम करण्यासोबतच शाळेतही मी अनेक नाटकांमध्ये काम केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग क्लासेसमधून डिप्लोमा केला. महाविद्यालयातील नाट्य स्पर्धेत भाग घेऊ लागले आणि त्यानंतर हळूहळू व्यावसायिक ऑडिशन देऊ लागले.
तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?
मी वयाच्या १७व्या वर्षी ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी माझे वडील जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. त्यांनी लिखाणास सुरुवात केली आणि या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले. माझे वडील आणि माझ्यासाठीही तो पहिला मराठी चित्रपट होता. आम्ही दोघांनी मराठी चित्रपट क्षेत्रात एकत्रच पदार्पण केले. आमच्यासाठी हा एक प्रयोग होता, पण समीक्षकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मला पुरस्कारही मिळाले. त्यावेळी मी १७ वर्षांची आणि थोडी गुबगुबीत होते. त्यामुळे त्या चित्रपटाचा मला फार जास्त फायदा झाला नाही.