* प्रतिभा अग्निहोत्री

‘‘आई, मी धड इकडची होऊ शकणार नाही की धड तिकडची, हे जर मला माहीत असते तर मी कधीच इकडे आले नसते.’ तुझ्याकडून मी नेहमीच असे ऐकत आले की, मुलीला लग्नानंतर सासरी आपले महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर काहीही झाले तरी पतीला आईचा लाडका होण्यापासून दूर ठेवायला हवे. इतकेच नव्हे तर आपल्या घरातही कधी आई मी तुला वडिलांच्या नातेवाईकांचा मान राखताना पाहिले नाही. तू दिलेला हाच धडा गिरवत लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच रवीने मला विचारूनच सर्व काही करावे, असे मला वाटू लागले होते. मात्र रवीचे आईवडिलांशिवाय पानही हलत नव्हते. जेव्हा कधी मी तुला माझ्या सासरच्या समस्या सांगायची तेव्हा तू हेच सांगायचीस की, तू कमावती आहेत. त्यामुळे दडपणाखाली राहण्याची गरज नाही. त्यांना तुझी किंमत नसेल तर कधीही परत ये, माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून मी सासरी क्षुल्लक कारणांवरुन भांडण करू लागले. रवीदेखील किती काळ माझे असे वागणे सहन करणार होता, अखेर आमच्यामध्ये वाद होऊ लागले. माहेरहून मिळालेल्या चुकीच्या शिकवणीमुळे मी स्वत:हून माझ्या पायावर दगड मारुन घेतला,’’ एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली सुवर्णा रडतच आईशी तावातावाने बोलत होती.

‘‘तूच तर सांगायचीस की, रवी तुझे नाही तर त्याच्या आईचेच सर्व काही ऐकतो. ज्या घरात तुझ्या शब्दाला किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे परिस्थिती आणखी बिघडत गेली असती. आम्ही तुला लाडाने वाढवले. तुला काहीच किंमत नाही, हे पाहून आम्हाला वाईट वाटणार नाही का?’’ सुवर्णाच्या आईने स्वत:ची बाजू मांडत सांगितले.

‘‘पण इकडे तरी कुठे मला महत्त्व आहे. तुम्ही सर्व शुल्लक कारणावरुन मला सतत बोलता. तिकडे रवीला माझ्या पगाराबद्दल काही देणेघेणे नव्हते. इकडे मात्र सर्व माझ्या पैशांवरच लक्ष ठेवून असतात. आई, मी मूर्ख होते पण तू तुला तर सर्व समजत होते ना, मग हळूहळू सर्व काही ठीक होईल, असे तू मला समजावून सांगायला हवे होते.’’

सुवर्णा आणि तिच्या आईमध्ये अशाप्रकारे वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागून सुवर्णा लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राध्यापक असलेला नवरा आणि सासूला सोडून माहेरी आली होती. आता ४ वर्षांनंतर तिला असे वाटते की, आईचे ऐकून तिने मोठी चूक केली. ती सासरी परत जाण्याचा विचार करत आहे.

४० वर्षीय सवितासोबतही काहीसे असेच घडले. तिने सांगितले की, ‘‘मी घरातली एकुलती एक मुलगी आहे. आईने माझ्याकडून घरातले कुठलेच काम कधी करुन घेतले नाही. सासरी मी थोरली सून होते. अचानक खांद्यावर जबाबदारी आल्याने मी घाबरले. माझी अडचण जेव्हा आईला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘जास्त काम करायची काही गरज नाही. एकदा केलेस की रोजच करावे लागेल. तू त्या घरातली नोकर आहेस का?’’

आईने माझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल इतके विष भरले होते की मी त्यांना कधीच आपले मानू शकले नाही. त्यामुळेच माझे नवऱ्यासोबत वाद होऊ लागले. सासरी कशीबशी ३ वर्षे राहिल्यानंतर आईवडिलांच्या सल्ल्यानुसार, मी माहेरी परत आले.

सुरुवातीला, जेव्हा पतीने मला परत नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईवडील आणि भावाने त्याला चांगलेच सुनावले. अनेक अटी घातल्या. मी वयाने लहान होती. वहिनी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर सोडून ऑफिसला जायची. मी मात्र स्वत:ला त्या घरची राणी समजायचे. त्यामुळे मला हे सर्व पटायचे नाही. आता वय होत चालले आहे. आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ठीक आहे. मी भाऊ, वहिनी, भाच्यांसाठी एखाद्या नोकराप्रमाणे आहे. जो तो स्वत:च्या मनानुसार मला वागवू इच्छितो. मूर्खपणे आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या त्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, पण आता हे सर्व सहन नाईलाजाने करावे लागत आहे.

अशा प्रकारच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात, जिथे मुलीच्या माहेरच्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे मुलीचा हसताखेळता संसार उद्ध्वस्त होतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या मुलीचे सर्वाधिक हित इच्छिणाऱ्या आईवडिलांच्या मुलीच्या संसारातील हस्तक्षेपामुळेच असे घडते. लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा ते खूपच भावूक होतात. लाडाने वाढलेली मुलगी त्यांच्यापासून खूप दूर जाणार असते. त्यामुळेच त्यांना तिची काळजी वाटू लागते. याच अतिकाळजीतून ते तिला चुकीचे सल्ले देऊ लागतात आणि स्वत:पेक्षा आईवडिलांवर जास्त विश्वास ठेवणारी मुलगी कसलाही विचार न करता त्या सल्लायांनुसारच वागू लागते.

मुलीने काय करावे

कोणताही पूर्वग्रह नसावा : लग्नाआधी मैत्रिणींवर किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून सासरच्यांविषयी कोणताही पूर्वग्रह करुन घेऊ नये. आस्थाचेच उदाहरण घ्या, तिने रोमिलशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी मैत्रिणी आणि आईवडिलांनी समजावले की, ‘‘कायस्थ मुलगी ब्राह्मण कुटुंबात जात आहे. हे ब्राह्मण धर्माबाबत खूपच कट्टर असतात. पूजाविधीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुझे काय होईल?

चांगल्या गोष्टीच सर्वांना सांगा : लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नववधू सासरच्यांबद्दलची प्रत्येक लहानसहान, चांगली-वाईट गोष्ट माहेरच्यांना सांगते. असे करणे चुकीचे आहे. कारण तुम्ही जे सांगता त्यावरुनच माहेरच्या माणसांचे तुमच्या सासरच्यांबद्दल मत तयार होत असते.

सासर आणि माहेरच्यांचे भरभरुन प्रेम मिळालेल्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, ‘‘लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मी माहेरच्यांना नेहमी सासरच्यांबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्याचा असा परिणाम झाला की, लग्नाच्या ५ वर्षांनंतर माझ्या सासरची आणि माहेरची माणसे ही एकमेकांचे चांगले मित्र बनली आहेत आणि मी स्वत: एक सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करुन फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले.’’

फोनचा मर्यादित वापर करा : तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सुखी कुटुंबांना विभक्त करण्यात मोबाईलही कारणीभूत ठरत आहे. कारण आजकाल, दिवसभरातून १० वेळा तरी आई-मुलगी एकमेकींशी फोनवरुन बोलतात. यामुळे मुलीच्या घरात घडणारी प्रत्येक लहानसहान गोष्ट त्यांना माहीत होते. यामुळे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे आणि सल्ला देणे हा ते स्वत:चा अधिकार  समजू लागतात.

एके दिवशी रवी आणि नमितामध्ये शुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्याचवेळी नमिताच्या आईचा फोन आला. नमिताने रागाने, रडतच सर्व सांगितले. ते ऐकल्यानंतर आईला वाटले की जावई आपल्या मुलीवर अन्याय करत आहे. काहीही विचार न करता त्यांनी रवीला फोन करुन चांगलेच सुनावले. यामुळे नमिता आणि रवीमधले नाते घटस्फोटापर्यंत गेले. शेवटी नमिताने बऱ्याच प्रयत्नांनी हे नाते जोडून ठेवले. म्हणूनच, राग आणि भावनेच्या भरात माहेरच्यांशी बोलणे टाळा, जेणेकरून घरातला वाद घरातच राहील आणि तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सोडवाल. कारण एकदा सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही.

समजूतदारपणे वागा : आई-वडिलांचा सल्ला किंवा त्यांच्या मताला विरोध करुन त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐका, पण ते अमलात आणण्यापूर्वी दहादा विचार करा की याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर किंवा पतीच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. असा कोणताच सल्ला ऐकू नका ज्यामुळे तुमच्या पतीच्या कुटुंबाच्या आत्मसन्माला तडा जाईल.

अनिताने सांगितले, ‘‘आजारी नणंदेवर उपचार करण्यासाठी मी तिला घरी घेऊन आले. लहान मुलांची काळजी घेताना तिच्याकडे लक्ष देणे त्रासदायक होते. दरम्यान, माझ्या आईने मला सल्ला दिला की, तुझे घर तुझ्या नणंदेसाठी नवीन जागा आहे. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याकडेच सोडून ये आणि उपचारासाठी दरमहा पैसे पाठव. तू नोकरी कर आणि तुझे कुटुंब सांभाळ.’’

अनिताला आईचा सल्ला अजिबात आवडला नाही. तिने आईला सांगितले की, ‘‘जरा विचार कर, आज जर नणंदेच्या जागी माझी बहीण असती तर तू हाच सल्ला दिला असता का?’’

अनिताचे म्हणणे ऐकल्यानंतर तिची आई निरुत्तर झाली. त्या दिवसापासून तिने तिच्या सासरच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे थांबवले.

पारदर्शकता ठेवा : पतीपासून लपून माहेरच्यांसाठी काहीच करू नका. प्रतिमाचे माहेर गरीब आहे. ती पतीपासून लपवून आई आणि भावाला पैशांची मदत करीत असे. जेव्हा तिच्या पतीला हे समजले तेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यामुळे तिचे माहेर आणि नवरा दोघांसोबतचे संबंध बिघडू लागले. म्हणूनच, आपल्या माहेरच्यांना आर्थिक मदत करण्यापूर्वी पतीला विश्वासात घेऊन सर्व सांगा. लक्षात ठेवा, पती-पत्नीच्या नात्यात पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. एकमेकांपासून लपूनछपून केलेल्या व्यवहारांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सीमा निश्चित करा : सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संसारात कोणी किती हस्तक्षेप करावा, याची सीमा तुम्ही निश्चित करायला हवी. त्या व्यक्तीने याचे उल्लंघन केल्यास त्याला वेळीच रोखा. कारण तुमच्या कुटुंबातील समस्या तुम्ही आणि तुमचा पतीच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. सासरच्या आणि माहेरच्या माणसांशी सारखेच प्रेमाने वागा.

आईवडिलांनी काय करावे : हे मान्य की, आजकाल बहुतेक पालक मुला-मुलीमध्ये फरक करत नाहीत. माहेरी लाडात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात दु:खाची सावली जरी आली तरी ते अस्वस्थ होतात. पण त्यांनी हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, आता त्यांची मुलगी ही कुणाची तरी सून, पत्नी आहे. तिच्या पतीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलाला तितक्याच प्रेमाने वाढवले आहे. त्यामुळे सासरच्या अडचणी तिला स्वत:ला सोडवू द्या. एखाद्या वळणावर सल्ला देणे गरजेचे असल्यास तो तटस्थपणे द्या.

मुलीच्या सासरच्या गोष्टीत अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तिला कोणत्याही विषयावर सल्ला देताना आधी हा विचार करा की, जर हाच सल्ला तुमच्या सुनेला तिच्या माहेरच्यांनी दिला तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

व्हिडिओ कॉलिंग, मोबाइल फोन यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर मुलगी कशी आहे, हे पाहण्यासाठी करा. तिच्या सासरच्यांना नावे ठेवण्यासाठी याचा वापर करु नका.

तुमची आर्थिक स्थिती भलेही मुलीच्या सासरच्यांपेक्षा जास्त चांगली असेल पण तरीही त्यांना तुमच्यापेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच करु नका. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचा मान ठेवला तरच तुमची मुलगीही त्यांचा आदर करायला शिकेल.

मुलीला केवळ पतीचाच नव्हे तर संपूण सासरच्या मंडळींचा प्रेमाने आदरसन्मान करायला, त्यांच्यासोबत जमवून घ्यायला शिकवा. कुटुंबाशी नाते तोडून पतीसोबत वेगळे राहण्याची शिकवण तिला देऊ नका.

अनुजाने लग्नाच्या दोन दिवस आधी आपल्या मुलीला तिचे दागिने दाखवून सांगितले की, तुझे दागिने तुझ्या सासूकडे चूकुनही देऊ नकोस. एकदा दिलेस तर ते परत कधीच मिळणार नाहीत. असा अव्यवहार्य सल्ला देण्याऐवजी आपल्या मुलीच्या मनात सासरच्यांबद्दल प्रेम, आपलेपणाची भावना जागवा, जेणेकरुन तिचे वैवाहिक आयुष्य सुखाचे होईल.

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीला थोडा वेळ द्या. ती कशी आहे, हे सतत विचारत राहून तिला त्रास देऊ नका. त्याऐवजी तिला सासरच्या मंडळींसोबत थोडा वेळ घालवू द्या, जेणेकरुन तिथल्या वातावरणात सहज रुळणे तिला शक्य होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...