* प्रतिनिधी
मी ३० वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. माझं माहेर आणि सासर कानपूरला जवळ-जवळच आहे. मी पती आणि एक वर्षाच्या मुलासोबत दिल्लीत राहते. जेव्हा मी १०-१५ दिवसांसाठी जाते, तेव्हा सासूची अशी इच्छा असते की मी माझा संपूर्ण वेळ त्यांच्यासोबतच घालवावा. माहेरी २-३ दिवस राहण्यावरही त्यांचा आक्षेप असतो. त्यांचं म्हणणं असतं की माहेर जवळच आहे ना मग तिथे राहायला जाण्यात काय अर्थ आहे. फक्त भेटून ये. पण इच्छा असूनही मला असं करता येत नाही. आई आणि भावंडांसोबत २-४ दिवस राहिल्याशिवाय समाधान होत नाही. माझे पती स्वत:च्या आईला काही बोलत नाहीत आणि मलाही.
पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचं लग्न आहे. लग्नाचं निमंत्रण आल्यापासून मी उत्साहात आहे की त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होईल. पण मी तिथे जाऊन राहिल्याने परत सासू आकांडतांडव करेल याची भीती वाटते. सगळी मजाच निघून जाईल.
दादा-वहिनी आतापासूनच आग्रह करत आहेत की मी सर्वात पहिलं पोहोचलं पाहिजे. लग्नाची खरेदी माझ्यासोबतच करणार. इतक्या आग्रहाने बोलवत असल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही आहे आणि जास्त दिवसांसाठी गेले तर सासू वाद घालेल. काय करू कळत नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.
तुमचं माहेर आणि सासर जरी एका शहरात असलं तरी तुम्ही स्वत: दिल्लीला राहता. त्यामुळे माहेरच्यांशीही कधीतरीच भेटणं होत असेल. अशावेळी तुम्ही २-४ दिवस माहेरी जाऊन राहात असाल तर तुमच्या सासूला हरकत असण्याचं कारण नाही. तुम्ही पूर्णवेळ सासरी घालवल्यानंतर माहेरून मात्र एका दिवसात परत ये हे सासूने सांगणं चुकीचं आहे.
तुमच्या सासूचा हा हट्ट तालिबानी आहे. तुमचे पती तुम्हा दोघींच्या वादात पडत नाहीत, तटस्थ राहतात. हे काही प्रमाणात योग्यही आहे. तुम्ही तुमच्या सासूला प्रेमाने समजावू शकता की तुमचं माहेर जवळच असलं तरीही तुम्ही दिल्लीला राहात असल्याने तिथे कधीतरीच जाणं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावासा वाटतो.
तुमच्या दादा-वहिनीची त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत जी अपेक्षा आहे, त्यात तुम्ही त्यांना निराश करणं योग्य नाही. पती तुमच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नसले तरीही तुम्ही तिथे जाऊन सहकार्य केलं पाहिजे.
माहेरासाठी इतकं करणं हे तुमच्या सासूला खटकू शकतं, त्या रागावू शकतात, आकांडतांडव करतील, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. एकदा लग्न पार पडलं की तुम्ही त्यांना समजवू शकता. सासू-सुनांमध्ये अशाप्रकारचे वाद होतच असतात. शेवटी घरोघरी मातीच्या चुली.
मी २८ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. माझं वैवाहिक जीवन सुखी आहे. फक्त एकच त्रास आहे तो म्हणजे माझे पती खूप उधळपट्टी करतात. जराही पैसे वाचवत नाहीत. मी कित्तीतरी वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आपण आपल्या मुलांसाठी पैसे वाचवले पाहिजेत. पण त्यांच्या कानात हवा जात नाही.
आज आमचा पगार चांगला आहे. पण उद्या मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या गरजा वाढतील. त्या आम्ही कशा पूर्ण करणार आहोत. याचाच विचार करून मी माहेरी गुपचूप एक खातं उघडलं आहे. त्यात थोडे-थोडे पैसे जमा करत असते.
अशाप्रकारे मी आतापर्यंत ९ लाख जमा केले आहेत. मुलांसाठी पैसे जमवण्याचं समाधान आहे. पण दुसऱ्या बाजूला ही भीतिही आहे की पतीपासून लपवून पैसे साठवण्यात मी काही चूक तर करत नाहीये ना. त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल.
माझे पती खूपच साधे आणि चांगले आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्यापासून काहीही लपवत नाहीत. मग मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून त्यांचा विश्वासघात तर करत नाहीये ना. कृपया मला या अपराधीपणाच्या भावनेतून सोडवा.
तुमचा विचार अगदी योग्य आहे की उत्पन्न कितीही असलं तरीही भविष्यासाठी थोडीफार तरतूद केली पाहिजे. मुलांसाठी किंवा स्वत:साठीही काहीवेळा असा खर्च करावा लागतो ज्याचा विचार आपण आधी केलेला नसतो. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी केलेली बचत कामी येते. कदाचित तुमचे पती हे आज समजू शकत नाहीयेत. म्हणून तुमचं सांगणं मनावर घेत नाही आहेत. पण वेळेनुसार अनुभवाने त्यांना समज येत जाईल.
तुम्ही त्यांना न सांगता उघडलेल्या खात्याचाच प्रश्न असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण तुम्ही चांगल्या उद्देशानेच हे पाऊल उचलत आहात. त्यामुळे तुम्ही अपराधीपणाची भावना बाळगू नका. पण तरीही त्यांचा मूड बघून तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगू शकता. हे ऐकून त्यांना आनंदच होईल आणि तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं नाही याचं दडपण तुमच्यावर राहणार नाही.