* सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही. गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...