* पूनम अहमद
रेखाने लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे नमूद केले होते की तिचा पती अनिलला इतर महिलांसोबत फ्लर्टिंग करण्याची सवय आहे. आधी तिला वाटलं की लग्नाआधी सगळी मुलं फ्लर्ट करतातच. अनिलची सवय हळूहळू दूर होईल, पण तसे झाले नाही.
रेखाला आश्चर्य वाटत होते की तिच्या उपस्थितीतही अनिल इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांना २ मुलेही होती.
रेखाला वाटायचे, जेव्हा ही अवस्था माझ्यासमोरच आहे, तर मग ऑफिस किंवा बाहेर काय-काय करत असतील. अनिलची कृती पाहून ती विचित्रशा नैराश्यात राहू लागली.
एक दिवस तर खूपच झाले. तिच्याच सोसायटीत राहणारी खास मैत्रीण रीना ही संध्याकाळी त्यांच्या घरी आली. अनिल घरीच होता. जोपर्यंत रेखा रीनासाठी चहा आणते तोपर्यंत अनिल उघडपणे रीनाशी फ्लर्ट करत होता. रेखाला खूप राग आला.
रीना निघून गेल्यावर तिने अनिलला रागाने विचारले, ‘‘रीनाशी इतके फालतू बोलायची काय गरज होती?’’
अनिल म्हणाला, ‘‘मी फक्त तिच्याशी बोलत होतो. ती आमची पाहुणी होती.’’
जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होईल
पुन्हा हा प्रकार घडला, अनिलने तिचे बोलणे नाही मानले. अनिल घरी असतांना जेव्हा केव्हा रीना घरी यायची तेव्हा तो तिथेच टिकून असायचा.
एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने रीनाचा हात मस्करीत पकडला. जेव्हा ती घरी जाण्यासाठी उठली तेव्हा अनिल तिचा हात धरून म्हणाला, ‘‘अहो, अजून थोडा वेळ बसा. इथे सोसायटीतच तर जायचं आहे.’’
रीना तर खजील होत निघून गेली पण रेखाला तिच्या पतीच्या या कृत्याची खूप लाज वाटली. रीना निघून गेल्यावर तिचं अनिलशी खूप भांडण झालं. पण अनिलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
रेखा आणि रीना खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखाने आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल एकांतात तिची माफी मागितली आणि तिला असेही सांगावे लागले, ‘‘रीना, अनिल घरी असतांना तू येत जाऊ नकोस. मला फोन कर, मीच येत जाईन.’’
एक दु:खद परिस्थिती बनते
त्या दिवसापासून रीना अनिलच्या उपस्थितीत रेखाच्या घरी कधीच आली नाही. त्यात आणखीनच दु:खद परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा रीनाने अनेकांना सांगितले की रेखा तिच्या नवऱ्याच्या रुपलोभी स्वभावामुळे सुंदर स्त्रियांना घरी येण्यास नकार देते.
अनिल एका कंपनीत अधिकारी म्हणून होता आणि रेखा साध्या स्वभावाची होती. अनिलच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे तिची प्रतिमा डागाळली. ही गोष्ट रेखा कधीच विसरली नाही आणि दु:खी होत राहिली. दोघांमध्ये वारंवार बेबनाव होत राहिला.
एके दिवशी मुलगीही असे म्हणाली, ‘‘बाबा, माझ्या मैत्रिणी येतील, तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीतच राहा.’’
मुलाचे लग्न झाले. आता सून घरात आली, तेव्हा अनिल कधी बोलता-बोलता नव्या सुनेचा हात धरून बसवायचा, तर कधी तिच्या खांद्यावर हात ठेवायचा. रेखाला हे सर्व सहन होत नव्हते.
एके दिवशी ती खाजगीत कडक शब्दात म्हणाली, ‘‘तुम्ही जर ही सवय कुठल्याही प्रकारे सोडली नाही, तर आता परिणाम खूप वाईट होईल, विचार करा.’’
रीनाशी गप्पा मारताना तिने तिच्या आयुष्यातील या सर्व गोष्टीही सांगितल्या, ‘‘मी अनिलची फ्लर्टिंगची सवय आयुष्यभर सोडवू शकले नाही. मला माहित नाही काय कारण असेल की एवढया वयातही अनिल इतर महिलांशी फ्लर्टिंगची संधी आजही सोडत नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे मी माझ्या माहेरच्या घरीही कधीच शांततेने जाऊन राहू शकले नाही आणि सासरी तर जणू त्यांना त्यांच्या वहीनींसोबत फ्लर्ट करण्याचा परवानाच होता. त्यांच्या या सवयीने मला आयुष्यभर दु:खाने भरून ठेवले आहे.’’
त्याचवेळी आरतीही तिच्या नवऱ्याच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे खूप नाराज आहे. ती म्हणते, ‘‘जर कुठे एखाद्या काउंटरवर मुलगा-मुलगी दोघेही असतील, तर माझा नवरा कपिल मुलीच्या काउंटरवरच अडकतो. माहित नाही की त्याला बोलण्यासाठी किती बहाणे सापडतात.
‘‘हे बघून मला लाज वाटते, जेव्हा मला त्या मुलीच्या डोळयात चिडचिड दिसते. एखाद्या मुलाशी बोलत असताना केवळ कामाबद्दल बोलतो आणि फोन ठेवतो, पण जर एखाद्या मुलीचा फोन असेल तर त्याचा टोनच बदललेला असतो.’’
नातेसंबंधात निर्माण झाला असंतोष
सेक्स रोल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनानुसार पुरुष या कारणांसाठी फ्लर्ट करतात – सेक्स करण्यासाठी, नातेसंबंधात राहण्यासाठी, एखादे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, एखादी गोष्ट ट्राय करण्यासाठी, आत्मसन्मान वाढवण्यासाठी किंवा मग मौजमस्ती करण्यासाठी, कौटुंबिक थेरपिस्ट कासेंडा लेन यांच्या मते, ‘‘पुरुष आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो, परंतु तो उत्साह किंवा अहंकार वाढवण्यासाठी फ्लर्टदेखील करू शकतो.’’
लाइफ कोच आणि लव्ह गुरू टोन्या म्हणतात की फ्लर्टिंग फसवणूक नाही, परंतु फ्लर्टिंग समस्या देऊ शकते, फ्लर्टी जोडीदारासह आत्मसन्मान कमी होऊ शकतो.
अशा परिस्थितीत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुमच्या जोडीदारावर आरोप न करता त्याच्याशी बोला. त्याला सांगा तुम्हाला काय लक्षात येतं? त्याच्या फ्लर्टिंग सवयीबद्दल लोक तुम्हाला काय सांगतात? तुम्हाला काय वाटते? कधीकधी फ्लर्टी पार्टनरला हे जाणवतच नाही की त्याच्या कृतीमुळे त्याच्या पार्टनरला त्रास होत आहे. जर एखादी व्यक्ती आनंदी नसेल तर ती अशा प्रकारे आनंदाच्या शोधात फ्लर्टिंग करू शकते, स्वत:वर लक्ष केंद्रित करा, संपूर्ण परिस्थिती काळजीपूर्वक समजून घ्या.