* शैलेंद्र सिंह
लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पसंत करताना आता त्यांचा भाऊ किंवा बहिणीची पसंत लक्षात घेणेही गरजेचे होऊ लागले आहे.
लग्नानंतर एकमेकांशी जुळवून घेणे सोपे व्हावे, हे यामागचे कारण असते. समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात लवकर मैत्री होऊ शकते, त्यामुळे त्यांची पसंती सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत गरजेची होऊ लागली आहे.
हरदोई जिल्ह्यात राहणाऱ्या प्रतीकने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो गुरुग्राममध्ये नोकरी करू लागला. तिथे त्याचा चांगला मित्रपरिवार झाला, ज्यामध्ये मुले आणि मुलीही होत्या. त्यांच्या ग्रुपमधील अनेक मित्र- मैत्रिणींची मैत्री पुढे प्रेम आणि लग्नात बदलली. प्रतीकची त्याच्याच मित्रपरिवारातील झारखंडमध्ये राहणाऱ्या स्वातीशी ओळख झाली. आपण मेकअप आर्टिस्ट असल्याचे स्वातीने सांगितले होते. स्वाती दिसायला सर्वसामान्य होती, पण तिचे नीटनेटके राहणे, वागणे-बोलणे इतके प्रभावी होते की, प्रत्येक जण तिचे कौतुक करत असे.
प्रतीक आणि स्वातीची ओळख त्यांच्याच एका मित्राच्या पार्टीत झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. काही महिन्यांनंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले.
स्वाती आणि प्रतीक दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाबाबत काहीच माहीत नव्हते. त्यामुळे प्रतीकने त्याच्या कुटुंबाबाबत सर्व माहिती स्वातीला दिली. स्वातीने मात्र तिच्या कुटुंबाबाबत अगदी त्रोटक माहिती दिली. कधीच कोणाशी ओळख करून दिली नाही. प्रतीक मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो, हे स्वातीला माहीत होते. प्रतीकच्या मित्रांकडून तिने त्याच्या नोकरीबाबत सर्व माहिती करून घेतली होती. मात्र प्रतीकला फक्त एवढेच माहीत होते की, स्वाती एका मोठया मेकअप ब्रँडसोबत तिचा व्यवसाय करत आहे.
दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांचे कुटुंबीय एकमेकांना त्यांच्या लग्नात भेटले. तिथे त्यांना समजले की, स्वाती एका साध्या ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. तिचे कुटुंब मजुरी करण्यासाठी झारखंडहून दिल्लीला आले होते. स्वातीला २ भाऊ आणि १ बहीण आहे. तिचे कुटुंब तिच्या आयुष्यात विशेष हस्तक्षेप करत नव्हते.
बदलली आहे वागणूक
दुसरीकडे प्रतीक गावाला राहणारा असला तरी त्याने स्वातीला जे काही सांगितले होते ते खरे होते. गावात त्याचे कुटुंब शेती करायचे. तिथे त्याच्या कुटुंबाला प्रतिष्ठा होती. मुलाचे म्हणणे ऐकून प्रतीकचे कुटुंबीय प्रतीक आणि सुनेला घेऊन गावी आले, जेणेकरून गावातल्या लोकांना समजेल की, त्यांच्या मुलाने लग्न केले आहे. स्वाती आणि प्रतीक गावी जास्त दिवस राहणार नव्हते. प्रतीक हे समजून चुकला होता की, त्याच्या कुटुंबियांची विचारसरणी आणि स्वातीच्या विचारांमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळेच कसाबसा एक आठवडा व्यवस्थित जावा आणि चांगले संबंध ठेवून दिल्लीला परत यावे, असा त्याचा विचार होता.
पती ‘परिवार कल्याण’ नावाची संस्था चालवणाऱ्या इंदू सुभाष यांनी सांगितले की, ‘‘आता मुलींची वागणूक पूर्वीपेक्षा जास्त बदलली आहे. लग्नाची जबाबदारी समजून घ्यायला त्या तयार नसतात. त्यामुळेच त्या नवऱ्यासोबतच त्याचे कुटुंब विशेष करून नवऱ्याच्या बहिणी, त्याची आई आणि इतर जवळच्या नातेवाईकांसोबत चांगल्या वागत नाहीत.’’
जावई शोधण्यापेक्षा अवघड काम आहे सून शोधणे
येथे प्रश्न फक्त स्वाती आणि प्रतीकचा नाही. मुलींची वागणुकीतील सहनशीलता पूर्वीपेक्षा कमी होत चालली आहे, हे सांगणारी कितीतरी उदाहरणे आहेत. आता त्या नवऱ्याच्या कुटुंबापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळेच मुलासाठी मुलीचा शोध घेणे खूपच अवघड काम झाले आहे.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आकांक्षा जैन यांनी सांगितले की, ‘‘लग्नानंतर नवऱ्याच्या कुटुंबाशी कसे जुळवून घ्यायचे, हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे अशी कितीतरी मुले आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन येतात. त्यावेळी आम्ही अनेकदा असा सल्ला देतो की, लग्नापूर्वी होणाऱ्या बायकोची आपल्या कुटुंबाशी विशेषत: आपल्या भावंडांशी ओळख करून द्यायला हवी, जेणेकरून त्यांना एकमेकांशी चांगले संबंध निर्माण करायला मदत होईल.
भाऊ-बहीण त्यांच्याच वयाचे असतात. त्यामुळे ओळख वाढवणे, एकमेकांना समजून घेणे सोपे होते. यामुळे मुलीलाही अनोळख्या घरात एकटे असल्यासारखे वाटत नाही. ती सासरी चांगल्या प्रकारे नांदू शकते. लग्नाआधी केवळ नवऱ्याशीच नाही तर त्याच्या भावंडांशीही बोलायला हवे. हेच योग्य पाऊल ठरेल.’’
लाडात वाढलेल्या मुली
मागील काही वर्षांत मुलींबाबत घर, कुटुंब आणि समाज सर्वच चांगल्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. मुलींना लाडात वाढवले जाते. मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे मुलींच्या स्वभावातही बराच बदल झाला आहे. यामुळे त्या मुलगी बनून आरामात राहतात, पण जेव्हा सून बनून त्यांना सासरी जावे लागते आणि तेथील नियमांप्रमाणे दडपणाखाली रहावे लागते तेव्हा त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ लागतात. अशा वेळी स्वाभाविकपणे आधी नवरा-बायको दोघांमध्ये दुरावा वाढतो आणि त्यानंतर भांडणे वाढू लागतात.
सासरी पतीपत्नीमध्ये होणाऱ्या भांडणांचा परिणाम पतीपत्नीसोबतच त्यांची भावंडे आणि आईवडिलांवरही होतो.
बाराबंकी जिल्ह्यात राहणाऱ्या विकासचे लग्न नेहासोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर विकास नोकरीनिमित्त कानपूरला गेला. नेहाला त्याच्यासोबत जायचे होते पण ती जाऊ शकली नाही. नेहाची सासरी भांडणे होऊ लागली. सुरुवातीला सर्व घराच्या चार भिंतींआड होते. त्यानंतर बाहेरच्या लोकांनाही त्यांच्या भांडणांबाबत समजले. एके दिवशी नेहा रागाने आपल्या आईकडे निघून गेली. तिकडे गेल्यानंतर तिने आपल्या सासरच्या लोकांना जेलमध्ये पाठवायची तयारी सुरू केली. नेहाचा सर्वात जास्त राग तिचा दीर रमेशवर होता. तिने रमेशवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा खटला दाखल केला.
‘पती परिवार कल्याण’ नावाची संस्था चालवणाऱ्या इंदू सुभाष सांगतात, ‘‘लग्नापूर्वी मुलीचे समुपदेशन करणे खूपच गरजेचे असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यावेळी घरातील मोठया माणसांकडून मुलींना नकळत बरीच चांगली शिकवण मिळत होती. आता घरात फक्त आई असते. नातेवाईक केवळ लग्नाच्या दिवशीच येतात. त्यावेळी ते तिला काहीही समजावून सांगण्याच्या मनस्थितीत नसतात. काही सुशिक्षित कुटुंब मुलांचे लग्नाआधी समुपदेशन करतात, जे अनेकदा परिणामकारक ठरते.’’
लग्नाआधी नवरा-नवरी दोघांचेही पालक आणि भावंडांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतले तर लग्नानंतर होणारी भांडणे थांबवता येतील.
महत्त्वाची असते भाऊ-बहिणींची भूमिका
अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे भाऊ-बहिणींनी आपली होणारी वहिनी किंवा भाओजींसोबत मैत्रीचे नाते आधीच निर्माण केलेले असते. त्यामुळे आपलेपणा वाढतो आणि लग्नानंतर कोणालाच परकेपणा जाणवत नाही.
ज्योतीचे लग्न राजकुमारसोबत ठरले होते. लग्नाआधीच तिने आपल्या सर्व नातलगांसोबत चांगले संबंध ठेवले होते. त्यामुळे लग्नानंतर घरात असे काही मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले की, आपले घर सोडून ती नवऱ्याच्या घरी आली आहे, याची तिला कधीच जाणीव झाली नाही. मैत्री असल्याने नणंद आणि दिरासोबत ज्योती हसूनखेळून राहते. ज्योती सांगते की, आमच्यात इतके चांगले नाते आहे की, त्यामुळे मला माझ्या भावंडांची उणीव कधीच जाणवली नाही.
ज्योतीसारखाच काहीसा अनुभव रिताचाही आहे. रिता सरकारी नोकरी करते. त्यामुळे सुरुवातीला कामावर जाणे आणि घरातील कामांचा ताळमेळ साधणे तिच्यासाठी त्रासदायक ठरत होते. मात्र रिताने आपली नणंद आणि दिरासोबत चांगली मैत्री केली. दोघांचे शिक्षण, करियर आणि त्यांच्यासोबत खरेदीला जाणे, अशा सर्व कामांत ती हौसेने पुढाकार घेऊ लागली. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट होत गेली.
रिता सांगते की, नवऱ्याची भावंडे जेव्हा आपल्याच वयाची असतात तेव्हा एकमेकांना समजून घेणे जास्त सोपे होते. समवयस्क लोकांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. एकमेकांना समजून घेणे चांगले असते. मला असे वाटते की, भाऊ किंवा बहिणीसाठी जोडीदाराची निवड करताना घरातील इतर लोकांसोबतच नवरा आणि नवरीच्या भावंडांनीही पुढाकार घेणे गरजेचे असते. यामुळे एकमेकांशी जुळवून घेणे सोपे होते.