* शैलेंद्र सिंह
लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पसंत करताना आता त्यांचा भाऊ किंवा बहिणीची पसंत लक्षात घेणेही गरजेचे होऊ लागले आहे.
लग्नानंतर एकमेकांशी जुळवून घेणे सोपे व्हावे, हे यामागचे कारण असते. समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात लवकर मैत्री होऊ शकते, त्यामुळे त्यांची पसंती सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत गरजेची होऊ लागली आहे.
हरदोई जिल्ह्यात राहणाऱ्या प्रतीकने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो गुरुग्राममध्ये नोकरी करू लागला. तिथे त्याचा चांगला मित्रपरिवार झाला, ज्यामध्ये मुले आणि मुलीही होत्या. त्यांच्या ग्रुपमधील अनेक मित्र- मैत्रिणींची मैत्री पुढे प्रेम आणि लग्नात बदलली. प्रतीकची त्याच्याच मित्रपरिवारातील झारखंडमध्ये राहणाऱ्या स्वातीशी ओळख झाली. आपण मेकअप आर्टिस्ट असल्याचे स्वातीने सांगितले होते. स्वाती दिसायला सर्वसामान्य होती, पण तिचे नीटनेटके राहणे, वागणे-बोलणे इतके प्रभावी होते की, प्रत्येक जण तिचे कौतुक करत असे.
प्रतीक आणि स्वातीची ओळख त्यांच्याच एका मित्राच्या पार्टीत झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. काही महिन्यांनंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले.
स्वाती आणि प्रतीक दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाबाबत काहीच माहीत नव्हते. त्यामुळे प्रतीकने त्याच्या कुटुंबाबाबत सर्व माहिती स्वातीला दिली. स्वातीने मात्र तिच्या कुटुंबाबाबत अगदी त्रोटक माहिती दिली. कधीच कोणाशी ओळख करून दिली नाही. प्रतीक मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो, हे स्वातीला माहीत होते. प्रतीकच्या मित्रांकडून तिने त्याच्या नोकरीबाबत सर्व माहिती करून घेतली होती. मात्र प्रतीकला फक्त एवढेच माहीत होते की, स्वाती एका मोठया मेकअप ब्रँडसोबत तिचा व्यवसाय करत आहे.
दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांचे कुटुंबीय एकमेकांना त्यांच्या लग्नात भेटले. तिथे त्यांना समजले की, स्वाती एका साध्या ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. तिचे कुटुंब मजुरी करण्यासाठी झारखंडहून दिल्लीला आले होते. स्वातीला २ भाऊ आणि १ बहीण आहे. तिचे कुटुंब तिच्या आयुष्यात विशेष हस्तक्षेप करत नव्हते.
बदलली आहे वागणूक
दुसरीकडे प्रतीक गावाला राहणारा असला तरी त्याने स्वातीला जे काही सांगितले होते ते खरे होते. गावात त्याचे कुटुंब शेती करायचे. तिथे त्याच्या कुटुंबाला प्रतिष्ठा होती. मुलाचे म्हणणे ऐकून प्रतीकचे कुटुंबीय प्रतीक आणि सुनेला घेऊन गावी आले, जेणेकरून गावातल्या लोकांना समजेल की, त्यांच्या मुलाने लग्न केले आहे. स्वाती आणि प्रतीक गावी जास्त दिवस राहणार नव्हते. प्रतीक हे समजून चुकला होता की, त्याच्या कुटुंबियांची विचारसरणी आणि स्वातीच्या विचारांमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळेच कसाबसा एक आठवडा व्यवस्थित जावा आणि चांगले संबंध ठेवून दिल्लीला परत यावे, असा त्याचा विचार होता.