* अरुणिमा दूबे

आता ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची झाली आहे जेव्हा किट्टी पार्टीकडे केवळ श्रीमंत घरातील महिलांची हौस म्हणून पाहिले जात असे. आजकाल केवळ महानगरातच नाही तर छोटयाछोटया शहरांमध्येही किट्टी पार्टीचे आयोजन करण्यात येते. मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीही यात मोठया हौसेने सहभागी होतात आणि यामुळे स्वत:चा मोठा सत्कार झाल्यासारखेच त्यांना वाटू लागते.

सर्वसाधारणपणे या पार्ट्यांची वेळ दुपारी ११ ते १ च्या दरम्यान असते, जेव्हा नवरा कामाला आणि मुले शाळेत गेलेली असतात. त्यावेळी गृहलक्ष्मी घरावर निर्विघ्नपणे राज्य करीत असते. प्रत्येक छोटयामोठ्या शहरात मग ती एखादी चाळ असो, सोसायटी असो किंवा एखादी बहुमजली इमारत असो, तिथे कुठल्या ना कुठल्या रुपात या पार्ट्या सुरूच असतात.

या पार्ट्यांचे वैशिष्टय म्हणजे या टाईमपास म्हणजे वेळ घालविण्यासोबतच मनोरंजनाचेही प्रभावी माध्यम असतात. येथे सर्व गृहिणी जमून गप्पा मारण्यासोबतच हास्यविनोद करतात आणि एकमेकींचे कपडे, साजशृंगार बारकाईने न्याहाळून पाहातात. किट्टी पार्टीच्या सदस्यांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी असते की, सर्व जणींमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्याची जणू स्पर्धाच सुरू असते आणि त्याचा भार बिचाऱ्या नवरोबाच्या खिशाला सहन करावा लागतो.

मॅचिंग पर्स, मॅचिंग दागिने, चपला तर प्रत्येक किट्टी पार्टीमध्ये गृहिणींना लागतातच. त्याला नकार देण्याची हिंमत बिचाऱ्या नवरोबात नसते. दर महिन्याला उगाचच वायफळ खर्च कशाला करतेस, असा प्रश्न सौभाग्यवतीला विचारण्याची हिंमत त्याने चुकून जरी केली तर त्याला बरेच टोमणे ऐकून घ्यावे लागतात. जसे की, ती चोपडा प्रत्येक किट्टी पार्टीत वेगवेगळया हिऱ्यांचे आणि प्लॅटिनमचे दागिने घालून येते. मी मात्र परवडणारे खोटे दागिने खरेदी करून कशीबशी वेळ मारून नेते. जर मी जास्तच सुंदर दिसू लागले, चांगले काहीतरी घालून गेले तर सोसायटीत तुमचाच मान वाढेल. सौभाग्यवतीच्या अशा बोलण्यावर उलट उत्तर देण्याची हिंमत नवरोबा करूच शकत नाही. गप्प बसण्यातच खरे शहाणपण आहे, हे त्याला माहीत असते

किट्टी पार्ट्यांमध्ये पैशांची उलाढालही वाढू लागली आहे. पूर्वी या पार्ट्या रू. ५०० ते रू. १,००० पर्यंत होत, आता मात्र त्यासाठी महिला सदस्याकडून रू. २ हजार ते रू १० हजार पर्यंत पैसे घेतले जातात.

तुमचे पैसे कुठे पळून जाणार नाहीत, माझी किट्टी लागल्यावर ते सर्व पैसे पुन्हा घरातच येणार आहेत, असे सांगून दर महिन्याला सौभाग्यवती नवरोबाकडून पैसे घेते. मात्र त्यानंतर तिच्या बोलण्यात आणि वागण्यात बरेच अंतर पडते.

जेव्हा किट्टीचे पैसे सौभाग्यवतीच्या हातात पडतात तेव्हा वर्षानुवर्षे पाहात आलेल्या स्वप्नांना पंख फुटू लागतात. मनातील अनेक सुप्त इच्छा जागृत होतात. जसे की, नेहमी फ्रुट फेशियलवर समाधान मानत होती, यावेळी मात्र डायमंड किंवा गोल्ड फेशियलच करणार. मुलासाठी स्टीलची पाण्याची बाटली घेईन. त्यामुळे पाणी जास्त वेळ थंड राहील. पुढच्या किट्टी पार्टीसाठी प्लाझा ड्रेस घेईन, कारण सध्या तोच ट्रेंडमध्ये आहे. पैंजण जुने झाले आहेत. थोडे पैसे टाकून नवीन घेईन.

एखाद्या कुशल व्यवस्थापकाप्रमाणे ती आपल्या सर्व योजनांना बरोबर कृतीत उतरवते. नवी पाण्याची बाटली बघून नवरोबाने जरी ती कधी घेतली असे विचारलेच तरी ती सडेतोड उत्तर देते. एकवेळ मी माझे मन मारून जगेन, पण मुलाला हवे ते सर्व देण्यासाठी कधीच कंजूषपणा करणार नाही, असे सांगून नवरोबाचे तोंड बंद करते.

आजकालच्या किट्टी पार्टी विविध प्रकारच्या असतात. जसे की, सुंदरकांडमधील किटी पार्टी. या पार्टीत महिला एकत्र येऊन भजन-कीर्तन करतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. हास्यविनोद करतात आणि त्यानंतर एकमेकींना निरोप देतात.

श्रीमंत घराण्यातील महिलांची किटी पार्टी ही थीम म्हणजेच एखाद्या संकल्पनेवर आधारित असते. जसे श्रावणातील हिरवळ. म्हणजे प्रत्येकीला हिरवे कपडे, हिरव्या रंगाचे दागिने घालावे लागतात. नाताळावेळी ख्रिसमस थीम असते. पार्टीत लाल आणि सफेद कपडे परिधान करून आलेल्या महिला सदस्यांचे सांताक्लॉज स्वागत करतो. अशाच प्रकारे व्हॅलेंटाईन थीम, ब्लॅक अँड व्हाईट किटी किंवा लग्नाची थीमही असते. अशा किट्टी पार्टीत महिला सदस्यांना आपल्या लग्नातील कपडे, दागिने घालून जावे लागते.

किटीच्या सदस्यांच्या तऱ्हाही वेगवेगळया असतात. जसे की, पार्टीत सर्वात आधी येणारीसाठी बक्षीस असेल आणि पार्टी दुपारी १२ वाजता सुरू होणार असेल तर बक्षिसाच्या आमिषाला भुलून आणि आपण किती वक्तशीर आहोत हे दाखविण्यासाठी एखादी सदस्या १२ वाजायला २५ मिनिटे बाकी असतानाच आयोजक महिलेच्या दरवाजवरची बेल वाजवते. एकाच डोळयाला लायनर लावून झालेल्या आयोजक महिलेची धावपळ होते. चेहऱ्यावर उसने हास्य आणून ती त्या महिलेचे स्वागत करते आणि तिला बसवून कसाबसा आपला मेकअप पूर्ण करते.

काही आयोजक महिला अशा असतात की, आपला पाहुणचार सर्वश्रेष्ठ व्हावा यासाठी त्या आपला संपूर्ण वेळ आणि भरपूर पैसा किट्टीच्या आधी खर्च करतात. किट्टीच्या आधी त्या घरात नवीन पडदे लावतात. उशांसाठी छानसे अभरे शिवून घेतात. सोबतच घराच्या बजेटची चिंता न करताच ४-५ पदार्थ पार्टीमध्ये ठेवतात, जेणेकरून प्रत्येक सदस्या मुक्तकंठाने तिच्या पाहुणचाराचे कौतुक करेल आणि त्यामुळे तिला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळेल.

किट्टी पार्टीतील काही सदस्या नशीबवान असतात. काहीही झाले तरी त्या खेळात भरपूर पैसे जिंकतात. काही जणींवर जिंकण्याचे भूत चढलेले असते त्यामुळे मेकअप खराब होईल, केस विस्कटतील, अशा कशाचीही पर्वा न करता त्या प्रत्येक खेळ अतिउत्साहात खेळतात. एवढे करूनही नशिबाने साथ दिली नाही तर त्यांची प्रचंड चीडचिड होते आणि याचा परिणाम म्हणजे तेथील एखाद्या  मैत्रिणीशी भांडण होतेच.

किट्टीमध्ये काही नखरेल सदस्याही असतात. खेळ जिंकणे, हे त्यांचे ध्येय मुळीच नसते. त्यामुळेच त्या सौम्यपणे, अतिशय नजाकतीने साडीचा पदर, डोळयांतील काजळ, मस्कारा जपत खेळ खेळण्याची औपचारिकता पूर्ण करतात.

अन्य प्रकारच्याही काही सदस्या असतात, ज्या आपला रक्तदाब खेळ सुरू होण्यापूर्वीच वाढवून घेतात. कपालभारती न करताच त्यांचे पोट आत-बाहेर होऊ लागते. त्या घाबरट स्वभावाच्या असतात, ज्या खेळ खेळायला जाण्याआधी लघुशंकेसाठी जातातच. न जाणो का, पण उगाचच फसलो असे त्यांना सतत वाटत असते. खेळणे त्यांना कधीच जमत नसते. त्यामुळेच हरल्यानंतर सुटलो एकदाचे, असे म्हणत त्या सुटकेचा निश्वास टाकतात.

काही आयोजक उदारमतवादी असतात, मात्र काही प्रचंड कंजूष असतात. त्या कमीत कमी खर्चात किट्टी आटोपती घेतात. पैशांची बचत व्हावी यासाठी त्या कमी पैशांत येतील अशीच बक्षिसे खरेदी करतात.

किट्टी पार्टीदरम्यान जास्त करून काही प्रौढ, सजग महिला असे मत मांडतात की, पुढच्या किट्टी पार्टीला खाणे आणि मौजमजेसोबतच काही समाजहिताचे, कल्याणकारी कार्यक्रमही आयोजित करायला हवेत. पण यावर सर्वांचे एकमत होऊ न शकल्यामुळे पुढील पार्टीपर्यंत त्यांचे हे कल्याणकारी मत हवेतच विरून जाते.

किट्टी पार्टी काही महिलांसाठी त्यांच्या सासवांवर राग काढण्याची मिळालेली संधी असते, कारण घरात सासूविरोधी त्या चकार शब्दही काढू शकत नाहीत. दुसरीकडे काही सासवांसाठी आपल्या सुनांना नावे ठेवण्याची मिळालेली ही सुसंधी असते. काहींना किट्टी पार्टीचे इतके वेड असते की, कितीही अडचणी आल्या, कामवाल्या बाईने दांडी मारली, मुलांची तब्येत बिघडली तरी त्यांना औषध देऊन त्या किट्टीला हजेरी लावतातच.

किटी पार्टीचा एक चांगला फायदा असा आहे की, भारतीय महिलांना किट्टीच्या माध्यमातून थोडया वेळासाठी का होईना, पण स्वत:साठी वेळ मिळतो. त्यानंतर त्या नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या जबाबदारीला सामोऱ्या जातात.

भारतीय मध्यमवर्गीय समाजाची मानसिकता अजूनही किट्टी पार्टीकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहत नाही. ज्या महिला किट्टी पार्टी करतात त्यांच्याकडे स्वच्छंदी महिला म्हणून पाहिले जाते. त्या कुटुंबाची जबाबदारी कितीही समर्पित भावनेतून सांभाळत असल्या तरी त्यांनी स्वत:च्या विरंगुळयासाठी किट्टी पार्टीच्या रुपात वेळ घालविणे या समाजाला मान्य नसते. त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. माझ्या मते हे चुकीचे आहे.

भारतीय गृहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, वर्षाचे बाराही महिने आपले कुटुंब, मुलांप्रती असलेली आपले कर्तव्य यालाच आपले सर्वस्व मानून आपली जबाबदारी प्रमाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यदक्षपणे पूर्ण करतात. जीवनातील काही क्षण कुणाचाही विचार न करता फक्त स्वत:साठी जगण्याचा त्यांना पूर्ण हक्क असतो. त्यामुळेच त्यांना स्वत:साठी मिळालेल्या या काही क्षणांकडे समाजाने कुत्सिक, प्रश्नार्थक नजरेने पाहाणे चुकीचे आहे. सरतेशेवटी या काव्य पंक्तीतून किट्टीच्या कटकटीला पूर्णविराम देते.

घालवायचा आहे,

एक दिवस मला फक्त माझ्यासाठी,

ज्या दिवशी जबाबदारीची जाणीव नसेल,

कर्तव्याचे पारायण नसेल,

कार्यक्षेत्राचे बंधन नसेल,

कुठलाच नाईलाज नसेल,

फक्त मी,

माझे क्षण,

माझ्या इच्छा,

माझी शक्ती,

मनाला वाटेल ते खाईन,

मनाला आवडेल ते घालीन,

संध्याकाळ होताच मैत्रीणींशी गप्पा,

पुन्हा एकदा आहे जगायची इच्छा,

एकत्रच बालपण आणि तारुण्य,

मिळावेत ते क्षण मला,

एक दिवस तरी मनासारखे जगता यावे मला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...