* डॉ. सोनल अग्रवा

स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी अनेक काळापासून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत आल्या आहेत. मात्र, पूर्वी ही सौंदर्यप्रसाधने हळद, लिंबू, मेंदी, चंदन, फुले यांपासून तयार केली जात असत. त्यांच्या वापराने कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता, सौंदर्यवर्धनच होत होते. मात्र, आज बहुतेक सौंदर्यप्रसाधनांत अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो.

याबरोबरच, आज प्रसिद्ध कंपन्यांच्या प्रसाधनांप्रमाणे दिसणारी स्वस्त, नकली प्रसाधने बाजारात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे, काही महिला स्वस्तच्या नादात ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याऐवजी, नकली व सामान्य प्रसाधने खरेदी करून स्वत:वर संकट ओढवून घेतात. या डुप्लिकेट सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये खालच्या दर्जाचा आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.

या, जाणून घेऊ की सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी :

सौंदर्यप्रसाधनांचे संभावित दुष्परिणाम

सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या वेगवेगळया रसायनांच्या प्रभावामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना श्वसन तंत्राची अॅलर्जी होऊ शकते. त्वचेमध्ये लालसरपणा, खाज, फोडया, चकत्या इ. होऊ शकतात. मग अॅलर्जीमुळे सर्दी, डोळयांची जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, एवढेच नव्हे, तर दमाही होऊ शकतो.

अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये कोलतारचा वापर केला जातो, ज्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. त्याचबरोबर, हा कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकतो. याच्या दुष्परिणामाने मूत्राशयाचा कॅन्सर, नॉनहॉजकिन लिंफोमा इ.चीही शक्यता वाढते.

काही चेहऱ्यांवर डाग, मुरमे, डाग घालविणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने संवेदनशील त्वचा असणाऱ्यांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांप्रती संवेदनशीलता उत्पन्न झाल्याने फोडया, मुरमे नष्ट होण्याऐवजी आणखी वाढू शकतात.

टाल्कम, डस्टिंग पावडर, कॉम्पॅक्ट इ.चा वापर केल्याने त्वचेची रोमछिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरमे, सुरकुत्या, चकत्या होऊ शकतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक कोमलता नष्ट होते. त्याचप्रमाणे, त्वचा शुष्क, निस्तेज व अनाकर्षक होते.

निकृष्ट प्रतिच्या लिपस्टिक दीर्घकाळ लावल्यास ओठांची श्लेष्मा पापुद्रे आकुंचित होतात. ओठ काळे, निस्तेज होऊन फुटतात. लिपस्टिकमध्ये असलेली रसायने थोडयाशा प्रमाणात शरीरात जातात, त्यामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतो.

नेलपॉलिशचा जास्त वापर केल्याने, नखांची नैसर्गिक चमक कमी होते. ती कमकुवत, खरखरीत होऊन तुटू शकतात. काही तरुणींना अॅलर्जीमुळे नखांच्या पेरांना फोडया किंवा खाज येऊ शकते.

डोळे हा नाजूक अवयव आहे. काजळ, आयलाइनर, आयशॅडो, मस्कारा, आयलॅशेस, आयब्रो पेन्सिल इ.चा वापर डोळयांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. यांच्यामुळे अॅलर्जी झाल्यास डोळयांना खाज, डोळयांच्या खाली काळी वर्तुळे, त्वचेचा खरखरीतपणा, पापण्यांचे केस कडक होऊन गळणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

टिकलीच्या मागे लावलेल्या अॅडहॅसिव्हमुळे टिकली लावलेल्या ठिकाणी खाज, लालसरपणा, संक्रमण व डाग होऊ शकतात.

सिंदूर व पेन्सिलने लावल्या जाणाऱ्या द्रवरूप गंधामुळेही समस्या निर्माण होतात.

हेअरडाय हासुद्धा रसायनांनी बनलेला असल्यामुळे त्याच्यामुळे अॅलर्जी, केस गळणे, केस लवकर सफेद होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कार्बनिक पदार्थांपासून निर्माण केलेले हेअरडाय दिर्घकाळ वापरल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. केसांना सेट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम्स, जेल, स्प्रे, लोशन, तेल यामध्ये असलेली रसायने, सुगंधसुद्धा केसांच्या मुळांना कमकुवत करू शकतात, तसेच केस लवकर सफेद होऊ शकतात. त्यांच्यातील नैसर्गिक कोमलता व चमक नष्ट होते.

हेअर रिमूव्हिंग क्रीम, लोशन, साबणही पूर्णपणे दुष्प्रभावरहित किंवा सुरक्षित नसतात. त्यांच्या वापरानेसुद्धा अॅलर्जी, काळपटपणा, रूक्षपणा, डाग इ. समस्या उद्भवतात.

सल्ला

सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना कृत्रिम प्रसाधनांऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांच्या वापरावर भर द्या. कृत्रिम, मिश्र रसायनांपासून निर्माण केलेल्या कॉस्मॅटिक्स उत्पादनांचा वापर कमीत कमी करा. प्रतिष्ठित कंपन्यांद्वारे तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचाच वापर करा आणि ती विश्वासनीय दुकानांमधूनच खरेदी करा, जेणेकरून योग्य किमतीला योग्य कॉस्मॅटिक मिळेल. कोलतार मिसळलेली कॉस्मॅटिक्स डोळे व पापण्यांवर लावू नका.

शरीराच्या एका भागासाठी बनविलेल्या कॉस्मॅटिक्सचा वापर दुसऱ्या प्रसाधनांच्या जागी उदा. लिपस्टिकचा ब्लशर म्हणून आणि आयशॅडो ओले करून आयलाइनरप्रमाणे वाप करू नका. अन्यथा अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

जर एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची अॅलर्जी असेल किंवा अन्य काही समस्या असेल तर त्याचा भविष्यात कधीही वापर करू नका. झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करून झोपा.

लक्षात ठेवा की, चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. म्हणून सौंदर्यप्रसाधने केवळ प्रसिद्ध कंपन्यांची किंवा ब्रँडेडच वापरा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...