*प्रा. रेखा नाबर

मुंबईत राहणाऱ्या सुरेशचा विवाह जळगावच्या सुनीतासोबत झाला. विवाहानंतर जळगावमध्ये संथ जीवन व्यतित करणाऱ्या सुनीताची मुंबईतील गतीमान जीवनशैलीत फरफट होऊ लागली. नविन जागा, वातावरण, आप्तजनांचा विरह त्यात जीवनमानांतील आमलाग्र बदल. ती पुरती भांबावून गेली. पदोपदी चुका होऊ लागल्या. सुनीताला धीर देणं दूरच, तिला समजून घेण्याऐवजी सुरेशही तिच्यावर ताशेरे ओढू लागला. तिचा जीव रडकुंडीला आला. हळूहळू स्थिती चिघळू लागली. शेजारच्या दामलेकाकूंना परिस्थितीचा अंदाज आला. आईच्या मायेने त्यांनी सुनीताला मार्गदर्शन केले. सुरेश सुनीता यांच्या संसाराची गाडी सुरळित चालू लागली.

मनीष व मृण्मयी दोघेही आय.टी क्षेत्रांतील नावाजलेल्या कंपन्यांत कार्यरत होते. बाळंतपणानंतर मृण्मयी कामावर रूजू झाली व तिला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क प्रमोशन मिळाले होते व ट्रेनिंगकरता जर्मनीस सहा महिने जाणे आवश्यक होते. ‘‘कसं स्विकारू मी प्रमोशन मनीष? आपला मन्मय अवघा सहा महिन्यांचा आहे. आई एकट्या नाही सांभाळू शकणार.’’

‘‘अशी पॅनिक होऊ नकोस, निघेल मार्ग काहीतरी,’’ मनीष म्हणाला. मनीषने मृण्मयीच्या आईबाबांना येऊन राहण्याची विनंती केली. स्वत:च्या कामाच्या वेळेतसुद्धा आवश्यक तो बदल केला. आईबाबांनी यायचे कबूल केले, तेव्हा मृण्मयी जर्मनीला जाण्यास राजी झाली होती. इकडे या प्रमोशनमुळे मृण्मयी मनीषपेक्षा उच्चपदावर पोहोचणार होती. परंतु त्याने आपला पुरूषी अहंकार आवरला. यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती असू शकतो हे त्याने सिद्ध केले. गृहिणी जी कुटुंबाचा कणा असते, तिच खुश असली की संपूर्ण कुटुंब समाधानी असते.

वानगीदाखल वरील दोन उदाहरणे पेश केली आहेत. परंतु प्रत्येक कुटुंबात परिस्थिती निराळी असते. त्या वातावरणाचा प्रत्येक सदस्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. पूर्वीच्या काळी चूल व मूल हे कार्यक्षेत्र असणाऱ्या स्त्रियांची कुटुंबीयांकडून व स्वत:कडून फारशी अपेक्षा नव्हती. त्या अल्पसंतुष्ट होत्या किंवा परिस्थितीने त्यांना तसे बनवले होते. समाजधुरीणांच्या प्रयत्नांनी त्यांच्या हाती शिक्षणाचे शस्त्र मिळाले. ते हाती धरून त्यांनी चौफेर प्रगती केली. कुटुंबासाठी स्वखुषीने अर्थार्जनांत सहाय्य केले. आजमितीस तिच्यावर संसार व नोकरी किंवा व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी आहे. घराचा उंबरठा सोडून अंबराकडे झोप घेताना ती आपले कौटुंबिक योगदान विसरलेली नाही. अशा आधुनिक स्त्रीच्या मन:स्वास्थाचा जरूर विचार व्हायला हवा. आज स्त्री समाजातं निरनिराळे गट निर्माण झाले आहेत. त्यानुसार त्यांच्या मानसिकतेची जडणघडण आढळते.

अविवाहित या गटांतील स्त्रियांना बऱ्याच प्रमाणांत स्वातंत्र्य असते. घरची आघाडी सर्वस्वी सांभाळावी लागत नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यास बाधा येत नाही. विवाहानंतर मानसिक स्वास्थ्यावर गदा येणार, करिअरवर परिणाम होणार व स्वातंत्र्य गमावणार हे जाणून काही मुली अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात किंवा विवाह शक्य तितका लांबणीवर टाकतात. उशिरा केलेल्या विवाहामुळे उतारवयातील अपत्यप्राप्तीची समस्या मन:शांती धोक्यात आणते.

विवाहित स्त्रियांचे दोन गट पडतात. गृहिणी असणाऱ्या स्त्रिया कायम घरकाम करून कोमेजून जातात. शिवाय ते बिनमोलाचे असल्यामुळे त्यांच्या अस्तित्त्वाची दखल न घेता त्यांना गृहीतच धरले जाते. कुटुंबांतील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास पदरी पडते उपेक्षा. मानसिक स्वास्थ्यावर घाला घालणारी! बाहेरच्या जगाशी संबंध नसल्यामुळे न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्त्रियांनी कुठल्या तरी छंदात मन रमवून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा प्रयत्न केला पाहिजे.

विवाहित मिळवती स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा व मोठ्या संख्येचा घटक आहे. विवाहानंतर हाती येणारी पाळण्याची दोरी समस्यांची री ओढत राहाते. जगाचा उधार करणारी ही स्त्री स्वत:साठी व कुटुंबांसाठी एक आधार मानली जाते. एकत्र कुटुंबांत घरच्या आघाडीची समस्या बिकट नसली तरी सर्वांशी जमवून घेऊन नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरतच असते. स्वातंत्र्य अबाधित राहीले नाही तर मानसिक स्वास्थ्य डळमळू लागते. काही जणींच्या बाबतीत आपल्याला मदत करणाऱ्या संबंधितांच्या उपकाराचे ओझे मनावर दडपण आणते.

विभक्त कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य मिळाले तरी अपत्यांच्या संगोपनाकरिता पाळणाघर किंवा नोकर अपरिहार्य. ‘माय गुतंली कामासी, चित्त तिचे छकुल्याशी’ अशी मानसिक कुतरओढ. नोकरांच्या अनियमित वागण्याचा आपल्या नोकरीवर किंवा व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम व कुटुंबाची बिघडणारी शिस्त या दुहेरी तणावामुळे मानसिक अस्वास्थ्याची पातळी वाढते.

काही स्त्रिया करिअरला प्राधान्य देतात. करिअरच्या यशस्वीतेची चढण चढताना अपत्याचे आगमन तणाव वाढवते. म्हणून अपत्यप्राप्ती लांबवणे अपरिहार्य होते. स्त्रीच्या करिअरला तिच्या सासरघराने महत्त्व न दिल्यास तिच्या मनाची जीवघेणी कुतरओढ चालू होते. करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आवश्यक असते. त्याचा तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशी संबंध असतो. ती अनुकूल नसेल तर गंभीररित्या ताण जाणवून मानसिक स्वास्थ्य धोक्यांत येते.

स्त्रीच्या बाबतीत शारीरिक बदलाचा तिच्या मन:स्थितीवर होणारा परिणामही लक्षात घेण्याजोगा आहे. वयाच्या १२-१३ वर्षांपासून जवळपास ५० वर्षांपर्यत हे बदल जाणवत असतात, हार्मोन्स असमतोलाच्या स्वरूपात. या सर्वाचा तिच्या वागणुकीवर परिणाम होतोच.

गृहिणी असो वा नोकरदार, स्त्रीला तणावमुक्त राहणे कठिण असते. सततच्या अस्वास्थामुळे तिच्या मनावर निराशेचे मळभ पसरते. सकारात्मक विचार करणारी स्त्रीसुद्धा नकारात्मक विचारांकडे वळते. वयाप्रमाणे शारीरिक व मानसिक शक्ती कमकुवत होऊ लागते. मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम म्हणून ती मनोकायिक विकारांची बळी ठरते. अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घरातील प्रत्येक सभासदाने आपापल्या पातळीवर संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...