कथा * सुधा ओढेकर

आपलं ऑफिस संपवून निशा निधीला घ्यायला शाळेच्या पाळणाघरात पोहोचली तेव्हा नेहमी धावत येऊन तिला बिलगणारी निधी नीट चालूही शकत नसल्याचं तिला जाणवलं.

निशाला बघताच तिथली अटेंडंट म्हणाली, ‘‘मॅडम, निधी आज दुखतंय म्हणत होती. डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी हे औषध दिलंय. या गोळ्या दिवसातून दोनदा अन् या तीनदा द्यायच्या आहेत.’’

‘‘तुम्ही मला फोन का केला नाही?’’

‘‘केला होता मॅडम, पण लागला नाही. डॉक्टरांकडे नेलं होतं.’’

‘‘बरं, डॉक्टरांची चिठ्ठी?’’

‘‘मला फक्त हे एवढंच दिलं गेलंय. चिठ्ठी नाहीए.’’

कदाचित तिच्याकडून प्रिस्क्रिप्शन हरवलं असेल म्हणून खोटं बोलतेय. निशाने तरीही शाळेला धन्यवाद दिले. शाळा खरंच चांगली आहे. तिने निधीला उचलून आणून कारमध्ये बसवले. निधी लगेच झोपली. खरं तर शाळा दुपारी अडीचला सुटते. पण घरी कुणी बघणारं, सांभाळणारं नाही म्हणून नाइलाजाने निशा निधीला शाळेच्या पाळणाघरात ठेवते. आपल्या अत्यंत व्यस्त अन् धावपळीच्या आयुष्यात आपण पोरीवर अन्याय करतोय असंही तिच्या मनात येई. मुलीकडे लक्ष द्यायचं तर नोकरी सोडावी लागेल. पण पुन्हा अशी चांगली नोकरी मिळणार नाही ही गोष्टही तेवढीच खरी.

घरी गेल्यावरही निधी झोपलेलीच होती. तिला उचलून निशाने बेडवर झोपवली. कदाचित आता तिचं दुखणं थांबल्यामुळे किंवा डॉक्टरांच्या गोळीमुळे तिला गाढ झोप लागली आहे तेव्हा झोपू दे असा विचार करून निशाने रात्री निधी जेवली नाही तरी तिला तशीच झोपू दिली. रात्री केव्हा तरी झोपेत निधी बडबडत होती. निशाची झोप उघडली. तिने निधीला थोपटलं तेव्हा लक्षात आलं की निधीला ताप आहे. ती झोपेतच बडबडत होती. ‘‘मी घाणेरडी मुलगी नाही. मला पनिश करू नका.’’

निधी असं का बोलतेय ते निशाला कळेना. तिला शाळेत कुणी शिक्षा केली का? कुणी पनिश केलं का? पण का? तिला जे दुखतंय ते कशामुळे? तिने दुसऱ्या दिवशी ऑफिसची रजा टाकली.

निधी सकाळी दहाच्या सुमारास जागी झाली. निशा तिच्या जवळच होती. निशाला मिठी मारून ती रडायला लागली. रडता रडताच बोलली, ‘‘ममा, मी शाळेत जाणार नाही.’’

‘‘का गं, बेटा? शाळेत कुणी तुला काही म्हटलं का?’’ निशाने आश्चर्याने विचारलं.

‘‘मी शाळेत जाणार नाही,’’ पुन्हा ती तेच म्हणाली.

‘‘पण बाळा, शाळेत तर सर्वंच मुलांना जावं लागतं?’’

‘‘नाही, नाही…मी जाणार नाही…’’ ती हुंदके देत रडत म्हणाली.

‘‘बरं बरं…रडू नकोस. तू म्हणशील तेव्हाच तुला शाळेत पाठवेन.’’ निशाने तिला थोपटून शांत करत म्हटलं.

तिने मनात ठरवलं, उद्या सकाळी आधी शाळेत जाऊन टीचरला भेटलं पाहिजे. अत्यंत उत्साहाने शाळेला जाणाऱ्या या पोरीला एकाएकी शाळेचा तिटकारा का वाटू लागला? शिवाय झोपेत ती सारखी पनिश…पनिश म्हणत होती. त्याबद्दलही विचारायचं हे ठरवल्यावर तिचं मन शांत झालं.

निशाने निधीला दूध दिलं, ब्रेकफास्ट दिला. निधी पुन्हा झोपली होती. बेचैन होती. नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चिवचिवत नव्हती. निशाने तिला स्पंज करून कपडे बदलले तेव्हा निधीच्या पॅण्टीवर रक्ताचे डाग दिसले. निशा दचकली. सातव्या वर्षीच पाळी सुरू झाली की काय? अन् सारखं दुखतंय…दुखतंय का म्हणतेय? किती कोमेजलली आहे…निशाने सरळ डॉ. संगीताला फोन केला अन् ती निधीला घेऊन तिच्या क्लीनिकमध्ये गेली.

डॉ. संगीताने निधीला तपासलं अन् अभावितपणे ती बोलून गेली, ‘‘ओह…नो…’’

‘‘काय झालं, डॉक्टर?’’

तिला बाजूला घेऊन खाजगी आवाजात डॉ. संगीता म्हणाली, ‘‘निशा, अगं या पोरीवर रेप झालाय…’’

‘‘रेप?’’ निशा केवढी दचकली.

‘‘पण केव्हा? कुठे? काल तर ती शाळेतच होती. इतर कुठे गेलीच नव्हती,’’ आश्चर्य अन् भीती, काळजी यामुळे निशाला बोलणं सुधरेना.

‘‘पण हे सत्य आहे निशा, केवळ अंदाज नाही.’’

‘‘देवा रे!’’ डोकं धरून निशा तिथल्या खुर्चीवर बसली. काय चाललंय या जगात? इतक्या कोवळ्या, अजाण, निष्पाप पोरीवर बलात्कार? माणुसकीचे वाभाडे काढणारे हे राक्षस…कोण असेल हा सैतान?

‘‘निशा, तू आधी स्वत:ला सांभाळ. शांत हो, आपल्याला या अजाण पोरीला सावरायचं आहे. नेमकं काय, केव्हा, कुठे घडलं याचा छडा लावावा लागेल,’’   डॉ. संगीताने निशाला समजावलं.

निशाने निधीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना होती. ती मुकाट बसून होती. डॉ. संगीताने तिला प्रेमाने विचारलं, ‘‘बाळा, तुला हा त्रास कसा झाला?’’

निधीने उत्तर दिलं नाही. ती गप्प बसली होती. तिला प्रेमाने जवळ घेत निशाने म्हटलं, ‘‘डॉक्टर आण्टी विचारताहेत त्या प्रश्नाचं उत्तर दे ना, तुला कसं दुखलं, त्रास कशामुळे झाला?’’

‘‘नाही मम्मा, मी सांगणार नाही. टीचर मला मारतील.’’

‘‘का?’’

‘‘टीचर म्हणाल्या, तू घरात कुणाला काही सांगितलंस तर मी तुला मारीन. घरी तुझे आईबाबाही तुला रागावतील. तू चूक केली आहेस. तू वाईट, घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट मिळाली आहे. पण ममा, मी काहीच केलं नाहीए गं…खरंच…’’ ती लहानगी पुन्हा रडायला लागली. डॉक्टरही गडबडून गेली.

‘‘बाळा, तू आम्हाला सांग, आम्ही तुला रागावणार नाही, उलट त्या टीचरलाच रागावू. तू न घाबरता सांग. टीचर इथे येणार नाही. मीच तिला रागावणार आहे. सांग, रडू नकोस. मी तर तुला औषध देऊन बरं करणार आहे.’’

डॉ. संगीताने अन् निशाने वारंवार समजावल्यावर निधीने जे सांगितलं ते ऐकून दोघी अवाक् झाल्या. एका स्वीमिंग इन्स्ट्रक्टरचं हे काम होतं.

‘‘निशा, त्या नराधमाच्या विरुद्ध केस कर. निधीचं सगळं बोलणं मी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलंय. तिच्या तपासणीचे रिपोर्ट मी व्यवस्थित तयार करते. मी साक्ष देईन कोर्टात.’’ संतापाने डॉ. संगीता लालेलाल झाली होती.

निशाने रात्री निधी झोपल्यावर दीपकला सगळं सांगितलं. दीपक संतापला. ‘‘मी त्या हरामखोराला असा सोडणार नाही. त्याला तुरुंगातच पाठवतो.’’

‘‘मलाही तुमच्यासारखाच संताप आला होता दीपक, पण मला भीती वाटली. या सर्व प्रकारात आपल्या मुलीची अन् आपलीही बेअब्रू होईल. पोरीला समाजात वावरता येणार नाही. तिच्या बालमनावर विपरीत परिणाम होईल.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय, पण अशाने त्या गुन्हेगाराला बळ मिळतं. आज आपल्या मुलीच्या बाबतीत जे घडलं, ते उद्या आणखीही कुणाच्या बाबतीत घडेल.’’

शेवटी त्यांनी एफआरआय नोंदवली. एका अल्पवयीन मुलीवरील रेपच्या संदर्भात डॉ. संगीता अन् तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

निधीने आरोपीला ओळखल्यावरही शाळा हा आरोप मान्य करत नव्हती. पण मीडिया अन् अनेक पालकांनी मुद्दा लावून धरला. शेवटी त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

दुसऱ्यादिवशी सगळ्या वर्तमानपत्रातून ठळकपणे ही बातमी प्रसिद्ध झाली. यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलच्या सात वर्षांच्या मुलीवर रेप. स्वीमिंगच्या क्लासनंतर मुलगी कपडे बदलायला वॉशरूमकडे केली तेव्हा इन्स्ट्रक्टरही तिच्या मागे मागे तिथे गेला. तिच्या तोंडात बोळा कोंबून त्याने तिला जीवे मारण्याची भीती दाखवून बलात्कार केला. वर पुन्हा कुणाजवळ बोललीस तर खबरदार म्हणून धमकीही दिली. क्लास टीचरने तिला घाबरलेली व रडताना बघितली तेव्हा तिने काय झालं म्हणून विचारलं. ती लहान पोरं फक्त दुखतंय म्हणत होती, रडत होती. क्लास टीचरने प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपलने डॉक्टरांना बोलावून चेकअप करवून घ्या म्हणून सांगितलं.

डॉक्टरने जुजबी काही तरी औषधं देऊन वेळ भागवली. टीचरने मुलीला धमकावलं की याबद्दल घरी काही सांगू नकोस, तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट दिली आहे. घरी बोललीस तर तुझे आईबाबाही तुला रागावतील.

निशा म्हणाली, ‘‘वाचा बातमी, सगळीकडे आपली बेअब्रू होतेय.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. निधीचं किंवा आपलं नाव कुठेही आलेलं नाहीए.? खरं तर त्या क्लास टीचरला, प्रिन्सिपलला अन् त्या नालायक डॉक्टरलाही कोर्टात खेचायला हवंय.’’

‘‘पण आज नाही तर उद्या आपलं नाव बाहेर कळेलच ना?’’

‘‘नाही कळणार. अन् त्या हरामखोर गुन्हेगाराला मी असा सोडणारही नाहीए. मी चांगला वकील मिळवला आहे.’’

‘‘पण यात खूप वेळ जाईल. निधी आता त्या शाळेत जायचं नाही म्हणतेय. तिच्या मनातली भीती कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या शहरात जाऊ.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुम्ही बदली करून घ्या.’’

‘‘ते इतकं सोपं नाहीए.’’

‘‘निधीसाठी काहीही करावं लागलं तरी ते करायला हवं. मी माझ्या ऑफिसमध्ये बोलले आहे. मला दिल्लीला बदली मिळतेय.’’

‘‘ठीक आहे, मीही प्रयत्न करतो.’’

निधीला घेऊन निशा दिल्लीला आली. तिच्या एका मैत्रिणीकडे उतरली. ऑफिसमध्ये जॉइन केलं अन् मग निधीच्या अॅडमिशनसाठी एका प्रसिद्ध शाळेत एकटीच गेली. टी.सी. बघून प्रिसिपॉलने म्हटलं, ‘‘यलो लाइन इंटरनॅशनल स्कूल याच शाळेतल्या स्वीमिंग इन्स्ट्रक्टरने एका लहान मुलीवर रेप केला होता ना? पेपरला वाचलं होतं.’’

‘‘होय मॅडम, आम्हीही वाचलं होतं. माझी इथे बदली झाली आहे म्हणून मी मुलीला घेऊन इथे तिच्या अॅडमिशनसाठी आले आहे.’’

‘‘तुम्ही भाग्यवान आहात. आठवड्यापूर्वीच एक मुलगी वडिलांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या गावी गेली आहे. त्या जागी तुमच्या मुलीला अॅडमिशन देता येईल.’’

‘‘थँक्यू मॅडम,’’ निशाने कृतज्ञतेने हात जोडून नमस्कार करत त्यांचा निरोप घेतला.

‘‘मोस्ट वेलकम!’’

निशा ज्या मैत्रिणीकडे उतरली होती तिचीही मुलगी त्याच शाळेत शिकत होती. तिनेच ही ‘डीपीएस’ शाळा सुचवली होती.

घरी येऊन निशाने निधीला शाळेविषयी सांगितलं तर ती म्हणाली, ‘‘मला शाळेत जायचं नाही.’’

‘‘अगं, पण ही शाळा वेगळी आहे. छान आहे. तुला आवडेल.’’

‘‘मला नाही जायचं…’’

‘‘अगं. शुची पण तुझ्याच शाळेत शिकते.’’

‘‘ती माझ्या वर्गात बसेल?’’

‘‘नाही बाळा, ती थोडी मोठी आहे ना, तिचा वर्ग वेगळा असेल पण तुझ्याबरोबर शाळेत जाईल, तुझ्याबरोबर परत येईल.’’

शुचीने निधीकडे बघून हसत संमतीदर्शक मान हलवली.

निशाने शनिवार, रविवार निधीला मानसिक दृष्टीने तयार करण्यात घालवला. दोन दिवस तिने निधीला अन् शुचीलादेखील आपल्या कारने शाळेत सोडलं. त्यानंतर शाळेच्या बसचे पैसे भरून झाल्यावर शुची व निधी स्कूल बसने जाऊयेऊ लागल्या.

नव्या वातावरणात शाळेच्या एकूणच सेटअपमध्ये निधी लवकरच रमली. शुचीच्या संगतीत हसू, खेळू, बोलू लागली. पण अजूनही ती रात्री मध्येच दचकून जागी व्हायची किंवा ‘मला पनिश करू नका,’ असं म्हणत झोपेतच रडायची. तिला एखाद्या सायकॉलॉजिस्टची गरज होती.

शुचीच्या घरी तरी किती दिवस राहाणार. सुर्देवाने शुचीच्या आईने अलकाने बातमी आणली की त्यांच्याच अपार्टमेण्टमध्ये एक फ्लॅट रिकामा झालाय. घरमालक तिच्या माहितीतले असल्याने निशासाठी तो भाड्याने मिळवण्यात अडचण आली नाही. शनिवार, रविवारच्या सुट्टीत अलकाच्या मदतीने निशाने आपलं बिऱ्हाड बाजलं नव्या फ्लॅटमध्ये नेलं. दीपकने गरजेच्या काही वस्तू टे्रनच्या ब्रेकव्हॅनमधून पाठवून दिल्यामुळे घर आता बऱ्यापैकी सोयिस्कर झालं.

त्यातच समाधानाची गोष्ट म्हणजे दीपकचा फोन आला. ‘‘निशा, शाळेने त्या इन्स्ट्रक्टरला काढून टाकलंय. शिवाय वकिलाला घेऊनच प्रिन्सिपल, क्लासटीचर अन् त्या डॉक्टरलाही भेटलो. जो हलगर्जीपणा प्रिन्सिपल अन् डॉक्टरने केला अन् ‘तू घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली. घरी सांगू नकोस,’ असं धमकावणाऱ्या टीचरलाही कोर्टाचा हिसका देतो म्हटल्यावर डॉक्टर अन् प्रिन्सिपलने स्पेशल शरणागती पत्करून माफीनामा लिहून दिलाय. त्या टीचरलाही नोकरीवरून काढून टाकली  आहे शिवाय ट्रीटमेण्टचा खर्च शाळा देणार आहे.’’

दुसरी चांगली बातमी म्हणजे वकिलाने कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे की मुलगी लहान आहे शिवाय तिला सायकिक ट्रीटमेण्ट व जागा बदलण्यासाठी दिल्लीला पाठवली आहे तेव्हा तिला कोर्टात हजर राहाण्याची सक्ती करू नये किंबहुना तिला कोर्टात गैरहजर राहाण्याची परवानगी द्यावी. डॉ. संगीता साक्ष द्यायला येणार आहेत अन् त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केलेलं निधीचं स्टेटमेण्ट कोर्टात चालणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ऑफिसने दिल्लीला पाठवण्याचं कबूल केलंय. दीड दोन महिन्यांत मी तिथे पोहोचेन.

निशाने दीपकचं अभिनंदन केलं. तो सतत केसच्या मागावर असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अन् एक नि:श्वास सोडला. मनावरचा ताण थोडा कमी झाला होता.

अलका हाउसवाइफ असल्याने शुची अन् निधी तिच्या घरातच शाळा सुटल्यावर राहायच्या. निशा आली की मग त्या आपल्या घरी यायच्या.

निशाने इंटरनेटवरून सायकियाट्रिस्ट डॉक्टर सुभाषचा पत्ता मिळवला व भेटीची वेळ ठरवून घेतली. आधी ती एकटीच डॉक्टरांना भेटायला गेली. निधीची केस त्यांना समजावून सांगितली अन् त्यांच्याकडून मदत हवीय असं म्हटलं.

डॉक्टर चांगले होते. ते म्हणाले, ‘‘उद्या याचवेळी तुम्ही पेशंटला घेऊन या. मुलगी लहान वयात वाईट अनुभवाला सामोरी गेली आहे. आपण हळुवारपणे तिच्या मनातली भीती काढून टाकू. तुमची मुलगी लवकरच पुन्हा अगदी नॉर्मल, आनंदी अन् निर्भर आयुष्य जगू लागेल. मी खात्री देतो. तुम्ही अगदी नि:शंक राहा.’’

‘‘मीही तेवढ्याच आशेने आलेय तुमच्याकडे.’’

दुसऱ्यादिवशी निशा निधीला घेऊन डॉक्टर सुभाषना भेटली. डॉक्टरांनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. निधीला नाव विचारलं. शाळा, वर्ग, मैत्रिणींबद्दल विचारून थोडं बोलतं केलं. मग म्हणाले, ‘‘निधी, अगं तुझी ममा सांगत होती, कधी कधी रात्री झोपेत तू ‘मला पनिश करू नका, पनिश करू नका, मी वाईट मुलगी नाहीए’ असं  म्हणतेस, दचकून उठतेस. तुला कोण पनिश करतं, बेटा?’’

निधीने आईकडे बघितलं.

‘‘सांग बाळा, न घाबरता सांग.’’

‘‘पण तू तर म्हणाली होतीस की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून?’’

‘‘इतर कुणालाच नाही सांगायचं, पण हे तर डॉक्टरकाका आहेत ना? ते आपल्याला बरं करतात. त्यांना सांगितलं तर ते तुझ्या मनातली भीती दूर करतील, भीतीला हाकलून लावतील.’’ निशाने तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं.

‘‘बरं, गुड गर्ल. आता मला सांग की तुला त्या पोहणाऱ्या काकांनी त्रास दिला होता? तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली असं म्हटलं होतं?’’

निधी एकदम रडवेली झाली. ‘‘पण मी घाणेरडी मुलगी नाहीए. मी काहीच केलं नाहीए…मी…’’

‘‘हो ना बाळा, मी तेच तुला सांगतोय, तू घाणेरडी नाहीस, वाईट नाहीस, तू छानच आहेस. चांगली मुलगी आहेस. घाणेरडे अन् वाईट तर ते काका आहेत, ज्यांनी तुला त्रास दिला.’’

‘‘पण मग सुजाता मॅम पण म्हणाली की मी वाईट आहे म्हणून मला पनिश केलं,’’ निधी म्हणाली.

‘‘तुला माहीत आहे का? तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने सुजाता मॅमला शाळेतून काढून टाकलंय. कारण तिने तुला ‘घाणेरडी मुलगी आहेस म्हणून पनिश केलं’ असं दटावलं अन् ‘घरी सांगू नकोस, तुझे आईवडील तुलाच रागावतील असं म्हटलं होतं. म्हणजे सुजाता मॅमलाच शिक्षा झाली. ना? आता ती शाळेत कुणाला त्रास देऊ शकणार नाही.’’

निधीला काय बोलावं ते कळेना.

‘‘बरं मला असं सांग, तू समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला मारलंस, तिला रक्त आलं तर चूक कोणाची?’’

‘‘माझी…’’

‘‘तर मग वाईट कोण?’’

‘‘मी…’’

‘‘बरोबर. पण जेव्हा त्या काकांनी तुला त्रास दिला तेव्हा तुझी चूक नव्हती. म्हणजे तू वाईट नाहीस, तर ते काका वाईट. खरं ना?’’

‘‘पण ममाने मला कुणाला काही सांगू नकोस असं का म्हटलं?’’

‘‘आई बरोबर म्हणाली, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात ना, त्या पुन:पुन्हा बोलायच्या नाहीत. छान, छान नवं काही तरी करायचं, नवं काही तरी बोलायचं, कळलं?’’

‘‘हं!’’

‘‘तर आता निधी एक खूपच छान शहाणी मुलगी आहे. तिला कुणीही पनिश करणार नाही. ठीक आहे?’’

‘‘ओ. के.’’

‘‘निशा मॅडम, पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा या. मला खात्री आहे. आपण यशस्वी होऊ. लवकरच सगळं छान होणार आहे.’’

डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघी घरी परतल्या. त्याच रात्री दीपकचा फोन आला,  यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. इतरही अनेक शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येत आहेत. निशाच्या मनात आलं, आता काहीही केलं तरी निधीच्या बाबतीत घडलेली घटना बदलली जाणार नाही. खरं तर, ‘‘तुम्ही सीसी कॅमेऱ्याच्या नजरेत आहात,’’ या वाक्याला अर्थच नसतो.  ती एक तऱ्हेची जाहिरात होते. कॅमेरा आहे याची जाणीव लोकांना नको, पण कॅमेऱ्याने आपलं काम बजावायला हवं.

निधीची केस कोर्टात शेवटच्या टप्प्यात होती. वकील फार चांगला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून दीपकही दिल्लीला ऑफिसमध्ये जॉइन झाला होता. डॉ. सुभाषच्या ट्रीटमेण्टमुळे निधी आता त्या घटनेच्या प्रभावातून बाहेर पडली होती. शाळेत तिचा परफॉर्मन्स छान होता. टीचर तिच्यावर खूष होत्या. आपापल्या ऑफिसच्या कामात निशा अन् दीपकनेही प्रमोशन्स मिळवली होती. एकूण सगळं छान चाललं होतं. पण मध्येच एक बलात्काराची बातमी पेपरला आली अन् निशाचं भावविश्व पुन्हा ढवळून निघालं.

बातमीत म्हटलं होतं की सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासताना त्यात काही माणसं दिसताहेत. पण त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने तपासावर मर्यादा येताहेत.

अशा कॅमेऱ्यांचा उपयोगच काय? निशाने तिरमिरीत वृत्तपत्रांसाठी पत्र लिहायला घेतलं :

महोदय,

आपल्याकडे सिनेमात दाखवतात तसं किंवा एरवीही पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येतात. तो आवाज गुन्हेगारांना पळून जाण्याचाच इशारा असतो. अपराधी तेवढ्यात निसटतो. तसेच जागोजागी असलेले सी.सी. कॅमेरे लावले आहेत, तिथे आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात असेही फलक लावले आहेत. ही सूचना गुन्हेगाराला सावध करते. त्या भागात वावरताना तो शिताफीने कॅमेऱ्याची नजर चुकवतो किंवा चेहरा अन् शरीर झाकून घेतो. मग गुन्हे घडतील अन् गुन्हेगार तावडीत न येता मोकाट फिरतील.

खटकणारी आणखी एक बाब म्हणजे, ‘आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात’ असे फलक जागोजागी दिसतात. कुठे कॅमेरे चालू असतात तर कुठे महिनोंमहिने बंद पडलेले असतात. ते नीट करायला हवेत एवढीही जाणीव प्रशासनाला नसते. असे अर्धवट उपाय काय कामाचे? शासनाला गंभीरपणे या बाबतीत विचार करायला हवा.

पत्र लिहून तिने दिल्लीतल्या सर्वच प्रमुख व दुय्यम वर्तमानपत्रांना पाठवली. काही छापूनही आली, पण सहा महिने होऊनही बलात्काराच्या केसमध्ये आरोपी सापडले नाही. निधीच्या केसमध्येही अपराध्याला अजून शिक्षा झालेली नाही ही खंत होतीच. केसचा निकाल कधी लागेल कुणास ठाऊक.

निधी अन् शुचीने ज्युडो कराटेचा क्लास सुरू केला होता. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या संस्था आता अधिकच सक्रिय होत्या. शाळेतर्फेही मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न केले गेले होते. काळोख्या ढगाला रुपेरी किनार दिसू लागली होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...