* वीना श्रीवास्तव
समोरच्या त्या बंगल्याची साफसफाई अन् रंगरंगोटी सुरू होती. चारी बाजूंनी उगवलेलं गवत व झाडंझुडपं यामुळे तो बंगला भयाण वाटायचा. कितीवर्षापासून एक गंजलेलं कुलुप मुख्य दरवाजावर दिसायचं. आज जी बंगल्याचं तेज आणि वैभव झाकोळलेलं असलं तरी कोणे एके काळी तो बंगला नक्कीच फार सुंदर असावा. ऊन, पाऊस, वादळ, वारा सोसून बंगल्याच्या भिंती काळपटल्या होत्या. खिडकी दरवाजांची कळा गेली होती. पण भक्कम कडी कोयंड्यांच्या आधारे अजूनही दारं खिडक्या जागेवर होती.
कोण येणार आहे इथं रहायला? तनीषाची उत्सुकता चाळवली गेली होती. कुणी विकत घेतलाय का बंगला? इतका भव्य बंगला विकत घेणारा कुणी पैसेवालाच असणार. पण हल्ली तर लोकांना अर्पाटमेंट अन् फ्लॅटमध्येच रहायला आवडतंय. मग ही कोण वल्ली असणार जी या जुन्या वाड्याला नटवून सजवून इथं मुक्कामाला येणार आहे?
मनांत उत्सुकता हिंदोळत असतानांच एक तरूण तिच्याच घराकडे येताना दिसला. त्यालाच विचारावं का कोण येतंय इथं रहायला? पण नको, असेल कोणी चक्रम किंवा पुरातत्त्ववेत्ता जो इथं येऊ घातलाय, खरं तर या बंगल्याला काही ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्त्व नाहीए, एवढं तिला ठाऊक होतं. पण कुणाला काय आवडेल हे आपण कसं ठरवणार?
‘‘माफ करा,’’ तो तरूण तिच्या गेटाशी उभा होता.
तिनं दचकून बघितलं...तो तिच्याशीच बोलला का? तिनं इकडं तिकडं बघितलं.
‘‘हॅलो, मावशी, मी तुमच्याशीच बोलतोय.’’ त्यानं म्हटलं. आपल्यासाठी त्यानं मावशी संबोधन वापरावं हे तिला जरा खटकलं. मी खरंच इतकी वयस्कर दिसते का? वय पन्नाशीला आलंय हे खरं असलं तरी दिसते तर अजून पन्नाशीचीच. बांधाही अटकर आहे. कुठं तरी केसात एखादा चंदेरी तार दिसतो पण बाकी केस काळेभोरच आहेत.
तिला थोडं विचित्र वाटलं पण ती गेटाकडे गेली. तो तरूण दिसायला देखणा अन् शालीन दिसत होता. ‘‘माझं नाव अनुज पंडित आहे. मला पाणी मिळेल का? आता घरात काम सुरू केलंय. पाण्याची लाइन आज सायंकाळपर्यंत सुरू होईल. पण आत्ताच्या गरजेचं काय?’’