कथा * शकिला हुसेन

अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इमरानशी लग्न होऊन फक्त तीन वर्षच झाली होती. इमरानच्या बाइकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी एक लाख रूपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उध्वस्त झालं होतं. इमरान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत पाच सहा तास गेले.

इमरानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहिण कहकशा तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन् आत जुबेदाच्या आत्येसासूनं लोखंडी अडकित्त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरूवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, ‘‘का फोडताय तिच्या बांगड्या?’’

‘‘आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात.’’ आतेसासू म्हणाली.

जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, ‘‘तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा. मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते.’’

पण म्हातारी आत्येसासू हटूनच बसली. ‘‘बांगड्या फोडण्याची पद्धत असते.’’

शेवटी जरा कठोरपणे  कहकशां म्हणाली, ‘‘तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन् फोडल्या काय? काय फरक पडतो?’’ तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन् तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या.

यावरूनही आत्येसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली, ‘‘तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे, हे मान्य. पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत. त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात.’’

फुणफुणंत सासूबाई गप्प बसल्या.

जुबेदाला विधवेचा वेष म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. ‘‘आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही. कारण तू आता इद्दतमध्ये आहेस (इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडे चार महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरूषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही.)’’

जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरूणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती.

जुबेदाच्या अश्रुंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते.

इमरान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन् हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रूजू झाले.

इमरान सकाळी नऊला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले.

सायंकाळी दोघं घरी परतल्यालर जुबेदानं तिच्यासाठी व इमरानसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला. ‘‘सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी रूमा काय काय करेल? दोन लहान मुलं आहेत तिला. त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हाताराम्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा. समजलं का?’’

जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रूना भाभीनंही कामात मदत केली. पटकन् जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा. कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इमराननं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा अन् रूना दोघींनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डबा दोघी मिळून करायच्या. सकाळ सांयकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं.

प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेंशन तिच्या हातात असायची. स्वत:साठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची. इमरान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खूष असायची. तरीही जुबेदाला घालूनपाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.

जुबेदा नाजुकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इमरान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे.

जुबेदाला सर्व कळत होतं. पण इमरानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशीही प्रेमानं वागे, तिला यथायोग्य मान देई. रूना तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्शा असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा.

आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता. लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अजून मूळबाळ नाही झालेलं, यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची. अपमान करायची. ‘‘रूनाला पाच वर्षांत दोन मुलं झाली. ही एक दुल्हन बघा…वांझ आहे की काय. वाळलेल्या खोडासारखी…फळ नाही, फूल नाही…घरात मुलं खेळायला हवीत. त्याशिवाय घराला शोभा नाही.’’

सासूनं स्वत: कधी रूनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडं फार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखाद्या खास पदार्थ शिजवणं या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन् फुकटचे सल्ले देण्यातच जायचा.

अम्माचे टोमणे ऐकून इमरानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. ‘‘दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीए. मूल नक्की होईल, उगीच टेन्शन घेऊ नका.’’

दोन महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरूवात झाली. ‘करामत पीर’कडे जायचं. त्या पीराचा एक एंजट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबाचा ‘चढावा’ म्हणून घेऊन जायचा.

अम्मा सतत ‘करामती पीर’ची पिरपिर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे. दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अम्मानं हुकुम दिला, ‘‘चल, जुबेदा, पटकन आवर. आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करतेय तुला मूल नसणं. पीरबाबा एक ताईत देतील. त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल.’’

हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं, ‘‘अम्मा, माझा विश्वास नाहीए या सगळ्यावर. मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाहीए माझा.’’

हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली, ‘‘या शिकलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा पीरबाबावर विश्वास नाहीए. अगं, त्या शेजारच्या सकीनाला, पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं, तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत. बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल.’’

आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली, ‘‘अम्मा माझा जर विश्वासच नाहीए या गोष्टींवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिलीय की माझ्यात दोष नाहीए. मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून, सर्व तापसण्या करून आलो ना? शेवटचं सांगते, पीरबाबाकडे जाणार नाही.’’

अम्मानं रागानं इमरानकडे बघितलं. तो प्रेमानं अन् शांतपणे अम्मीला म्हणाला, ‘‘अम्मी, माझाही विश्वास नाहीए या सगळ्यांवर. जुबेदावर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस.’’

झालं! अम्माला तर अश्या मिरच्या झोंबल्या. इमरान-जुबेदा एकीकडे आणि अख्ख कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले. शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली अन् आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इमरनाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. दीड दोन महिन्यांत पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं…

कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाइस बळेबळे खायला लावल्या. दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता.

तिसऱ्या दिवशी सियूम होता (मृत्यूनंतरचा तिसरा दिवस). त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचित जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला.

सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इमरानचा एक्सिडेंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसण्याचे उल्लेख, तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती. सियूमच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा…या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली. थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं.

तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली, ‘‘अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला (सहानुभूती दाखवायला) येतील. तिनं इथंच बसायला हवं.’’

‘‘तिला घेरी येतेय. तिला बसवत नाहीए. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला.’’ कहकशांनं नम्रपणे म्हटलं.

त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली. फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वान्नांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही पन्नाससाठ लोक होतेच. खर्च भरमसाट होत होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती.

कहकशा त्यानंतर स्वत:च्या घरी गेली. सियमनतंर ती घरी गेली अन् फारोहाच्यावेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती.

इमरानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सूती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्येसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषणं देऊ लागल्या. ‘‘किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे…इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन् घराबाहेर पडते आहे.’’

सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, ‘‘तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीए. मी मौलाना साहेबांना बोलावतो. तेच तुला समजावून सांगतील.’’

मौलाना आले. जुबेदाला एका पदद्याआड बसवलं गेलं. कहकशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं, त्याचा मथितार्थ असा, ‘‘पति निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाही बाहेरच्या पुरूषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरूषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोलीबाहेर पडायचं नाही.’’

मौलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, ‘‘एक मिनिट! मला काही सांगायचंय, ते नीट ऐकून घ्या.’’

खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, ‘‘मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्धा अन् जाणत्या आलिमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यू ट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का? त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही ही ऐका. उत्तर असं आहे, ‘‘अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वत: कफील असेल (कमवती/नोकरी करणारी) तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते. त्या परिस्थितीत तिला साडे चार महिन्यांची इद्दत पूर्ण करणं गरजेचं नाहीए.

आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही.

पडद्याआडून अत्यंत मर्यादशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली. ‘‘तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाइलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिसिंपलपासून शिपाईदेखील महिलाच आहेत. तेव्हा पुरूषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते.’’

इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मौलवींनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरूवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिंसिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिंमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती.

एक दिवस जुबेदा शाळेतून परतली, तेव्हा रूना भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रूनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर रूनानं जुबेदाशी बोलणंच बंद केलं. काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला. ‘‘हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त सत्तावीस वर्षांचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरूषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील? आम्ही काय आज आहोत, उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरूण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन् दुसरं लग्न करून घे.’’

मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, ‘‘अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा, तुम्ही हीनाच्या (नणंदेच्या) लग्नाची काळजी करा. तिचं लग्नांचं वय होतंय.’’

सासू गोडीत म्हणाली, ‘‘जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना? सुभान आहे ना? इमरानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरूषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण.’’

जुबेदा एकदम संतापलीच. ‘‘अम्मा, किती वाईट बोलताय तुम्ही? मला हे अजिबात मान्य नाही. सुभानभाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे. रूना भाभीचा संसार उध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका.’’ काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन:पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते. ‘‘सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’’ त्याला काय? सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला?

रूनासारखी समर्पित बायको, दोन गोजिरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? रूना भाभी तिच्याशी का बोलत नव्हती, ते तिला आता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती. घाबरलीही होती. इमरान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार…त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल. त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो…तिनं त्या क्षणी निर्णय घेतला. ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती.

शाळेच्या प्रिंसिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अन् सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मियता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर रहावंस हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरूण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिंसिपल माझी कलीगच होती. तुला होस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग.’’

जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिसिंपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवालाही गेला.

कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, ‘‘जुबेदा, तुझी जॉइनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी अरशदबरोबर येईन अन् कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून, तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ.’’

जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सूटकेस, महत्त्वाची कागदपत्र अन् इतर काही सामान अशा दोन सूटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन् अरशद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासूसासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिंसिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉइन करायचंय हे पटवून दिलं.

ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, ‘‘ तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत.’’

सासूसासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका.’’

जुबेदाला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की दोन तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत. तिचा आत्मविश्वास अन् शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते.

रूना भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, ‘‘भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा.’’

‘‘मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं!’’

माझी काळजी करू नका भाभी. मी कामात स्वत:ला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन् मी लग्नच करणार नाही असंही नाही, पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल.

सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...