कथा * प्रा. रेखा नाबर

दादा अमेरिकेला जाणार हे समजल्यावर सर्वांपेक्षा म्हणजे अगदी त्याच्यापेक्षासुद्धा जास्त आनंद मला झाला. का माहिती आहे? मला आता त्याचे जुने कपडे, बुट वापरावे लागणार नाहीत या कल्पनेने. तोपर्यंत कायम मी त्याचे वापरून जुने झालेले कपडे, बूट आणि पुस्तकेसुद्धा वापरत होतो. फक्त दिवाळीला आई मला कपडे घेई. जुन्या वस्तू वापरणे मला नकोसे होई. त्याबद्दल मी तक्रारसुद्धा करत असे.

‘‘आई, कायम मी दादाच्या जुन्या वस्तू का वापरायच्या?’’

‘‘बाळा, तो तुझ्याहून दोनच वर्षांनी मोठा आहे. तुम्ही मुलं भराभर वाढता. एक वर्ष वापरले की कपडे मला घट्ट होतात, मग त्याला नवीन कपडे शिवून आधीचे कपडे मी स्वच्छ धुवून ठेवते. ते नव्यासारखेच असतात. मग वापरायला काय हरकत आहे. बूटांचंही तसंच आहे ना? पुस्तकं म्हणशील तर अभ्यासक्रम बदलला नाही तर तिच पुस्तकं तुला उपयोगी पडतात. बाईडिंग करून किंवा छान कव्हर घालून देते की नाही तुला? उगाच कशाला पैसे खर्च करायचे? शहाणा आहे ना माझ्या सोन्या? तुलासुद्धा घेऊ नवीन वस्तू.’’

असेच मधाचे बोट लावून आई मला नेहमी गप्प करीत असे. मला कधीच नवीन वस्तू वापरायला मिळाल्या नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी इतरांचे नवे कोरे युनिफॉर्म, नवी कोरी पुस्तके, त्यांचा निराळा गंध यांनी मी हरखून जाई. आतल्या आत हिरमुसला होई. मला त्यांचा हेवा वाटे. या आनंदापासून मी कायमचा वंचित राहणार ही बोच सलत राही. जुनी पुस्तके वापरण्याचा मला इतका वीट आला होता की एस.एस.सी. झाल्यावर मी सायन्सला अॅडमिशन घेतलं. कारण त्यावर्षी दादा बारावी कॉमर्सला होता. अकरावी सायन्सला मला प्रथमच नवी पुस्तके वापरण्यास मिळाली. परंतु तिथेही माझे नशीब आडवे आले. केमिस्ट्री प्रॅक्टिकलला मला चक्कर येऊ लागली. अंगावर पुरळ उठू लागली. घरगुती औषधांचे उपाय थकल्यावर बाबांनी मला डॉक्टरकडे नेले.

‘‘बाबासाहेब, याला केमिकल्सची अॅलर्जी आहे. केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स जमणार नाहीत त्याला.’’

‘‘म्हणजे हा सायन्सला शिकू शकत नाही.’’

‘‘बरोबर आहे तुमचं.’’

आर्ट्सला स्कोप नाही या सबबीवर बाबांनी मला कॉमर्सला पाठवलं. पुनश्च येरे माझ्या मागल्या. दादाची अकरावीची पुस्तके, गाईड्स यांच्या सहाय्याने अभ्यास केला. लहान केल्याबद्दल निसर्गाला मी मनोमन दोष देऊ लागलो. दादा बी. कॉम झाल्यावर एम.बी.ए.ला गेला. मी सीएची कास धरली. मला वाटले, ‘‘चला, जुन्याची यात्रा पुस्तकापुरती तरी संपली. कपडे आहेतच पाचवीला पुजलेले. एम.बी.ए. झाल्यावर दादाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच एका विख्यात मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्याच कंपनीने त्याला अमेरीकेला पाठवण्याचे ठरवले होते. त्याच्या जाण्याची मीसुद्धा उत्साहाने तयारी करत होतो. तो अमेरिकेला गेला. मी सीए यशस्वीरित्या पास झालो. मला नोकरीचे वेध लागले. इंटव्ह्यूसाठी बोलावणीसुद्धा येऊ लागली.’’

‘‘आई, मला आता इंटरव्ह्यूला जावं लागणार. नवीन कपडे शिवायचे म्हणतोय.’’

आईने मला दादाचे कपाट उघडून दाखवले. कपड्यांची चळतच होती. ‘‘हे बघ, तुझ्या दादाचे केवढे कपडे आहेत ते. बहुतेक तुझ्याचसाठी ठेवले असणार. एक दोनदाच वापरले असावेत. सूटसुद्धा आहेत. कोरे करकरीत असल्यासारखेच वाटतायत. तरीपण तुला पाहिजे असले तर लाँड्रीत देऊन आण.’’

आईच्या बोलण्याचा मतितार्थ मला कळला. मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला. दादा अमेरिकेला गेला तरी जुन्याचे लेणे माझ्यासाठी ठेवून गेला होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो. मला नोकरी मिळाली. आईने आनंद व्यक्त केला. ‘‘बघितलंस? दादाच्या कपड्यांचा पायगुण? पहिल्या फटक्यात नोकरी मिळाली, आनंद होईल त्याला.’’

एकतर जुन्या वस्तू वापराव्या लागतात. त्याचे दु:ख आणि वर आईचे असे ताशेरे. म्हणजे माझ्या गुणवत्तेला मोलच नाही. आईचा दादाकडे असलेला कल माझ्या मनात सल धरू लागला होता. या जुन्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा जोरकस प्रयत्न मी पहिल्या पगारातच केला. चांगले चार कपड्याचे जोड शिवून घेतले.

अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर दादाला मुली सांगून येऊ लागल्या. थोडक्यात वधूपित्यांच्या उड्याच पडत होत्या. महिन्याभराने तो भारतात हजर झाला. त्याला लग्न करूनच जायचे होते. आम्ही निवडलेल्या चार मुलींमध्ये तसूभरही कमतरता नव्हती. तो स्वत: सर्वांना भेटला. त्यांच्याशी संवाद साधला आणि आपली वाग्दत्त वधू मुक्रर केली. शर्मिला देशमुख. बी. कॉम झालेली शर्मिला आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. श्री. देशमुखांचा स्पेअरपार्ट्सचा कारखाना होता. दिसायला अतिशय मोहक वागण्यात शालीन अशी शर्मिला कोणाच्याही मनात भरण्यासारखीच होती.

‘‘काय पक्या, तुला वहिनी पसंत आहे का?’’

‘‘म्हणजे काय दादा? शर्मिला टागोरलासुद्धा मागे टाकील एवढी सुंदर आहे. सालस आणि गुणीसुद्धा आहे. अशी वहिनी कुणाला आवडणार नाही? तुमचा जोडा तर छान शोभून दिसतोय.’’

लगेचच साखरपुडा उरकला. लग्न तीन आठवड्यांनी करण्याचे ठरले. त्यानंतर एका महिन्याने ती दोघं अमेरिकेला जाणार होती. हा प्लॅन दादानेच ठरवला होता. तो शर्मिलाच्या सहवासाचा एकही क्षण वाया घालवत नव्हता. दोघेही आपल्या प्रणयाच्या विश्वात मशगुल होते. सर्वत्र आनंदी आनंद भरून राहिला होता. खरेदीची रणधुमाळी दोन्ही घरी चालू झाली.

त्याने मला जबरदस्तीने खरेदीला नेले आणि आश्चर्य म्हणजे स्वत:सारखा सूटसुद्धा माझ्यासाठी खरेदी केला. लग्नाच्या दिवशी सकाळी घालण्यासाठी शेरवानीच्या सेटसुद्धा दोघांसाठी सारखाच खरेदी केला.

‘‘दादा, लग्न तुझं आहे. माझ्यासाठी एवढा साज कशासाठी?’’

‘‘तुसुद्धा लवकरच बोहोल्यावर चढशीलच की, त्यावेळी घाई नको.’’

‘‘साहेबांचा खिसा चांगलाच गरम दिसतोय.’’

‘‘पूर्ण तयारीनिशी आलोय. शर्मिलाला अमेरिकन डायमंडचा सेट तिकडूनच आणलाय. उद्या आईबाबांनासुद्धा खरेदीसाठी घेऊन जाणार आहे. माझे जुने कपडे वापरावे लागतात म्हणून कुरकुर करायचास ना? चल, तुला खुश करून टाकतो.’’

लग्नाच्या दिवशीचा धुमधडाका तर अवर्णनीयच होता. शर्मिला सजून मांडवात आली आणि सर्व नजरा तिच्यावरच खिळल्या. उर्वशीच अवनीतलावर उतरल्याचा भास होत होता. तिच्या पप्पांनी म्हणजे आबासाहेब देशमुखांनी कार्य दृष्ट लागेल इतक्या उत्कृष्टपणे साजरे केले. रोषणाई, मानपान, खाणेपिणे, कुठेही कमी पडू दिले नाही. सगळीकडे आनंदाची लाटच लहरत होती. शर्मिलावर तर सगळेच खुश होते. आत्याने आईला सल्ला दिला, ‘‘वहिनी, प्रसाद आणि प्रकाश अगदी रामलक्ष्मणच, प्रसादसाठी शर्मिला आणलीस तशी प्रकाशसाठी उर्मिला आण बरं का.’’

मी तर मनोमन ठरवून टाकले की आपल्या पत्नीचं नाव उर्मिलाच ठेवायचे. शर्मिलाला मॅचिंग. लग्नातील विधी चालू असताना दादा शर्मिलाच्या कानात कुजबुजत होता व ती सलज्ज प्रतिसाद देत होती. चेहऱ्यावरचे मधाळ स्मितहास्य तिच्या मोहकतेत भर घालीत होते. दोघेजण अगदी ‘मेड (मॅड) फॉर इच अदर’ वाटत होते. वरात आली आणि तिच्या आगमनाने घर अनोख्या सुगंधाने भरून गेले. सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पाडल्यावर नवदाम्पत्य बंगळुरूला मधुचंद्रासाठी रवाना झालं. एका आठवड्याने ते परत येणार होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी दोघेही अमेरिकेला जाणार होते. दादाने सगळा कार्यक्रम आधीच ठरवला होता. शर्मिलाच्या आगमनाने आईला मुलगी मिळाल्याचा अपार आनंद झाला होता.

‘‘पोरीने, किती पकटन जीव लावला. आठ दिवसांसाठी गेली तर इतकं सुनं सुनं वाटतंय. कायमची गेली तर काय अवस्था होईल हो?’’

‘‘फार लाघवी पोर आहे. पण आपण तिला नाही ठेवून घेऊ शकत.’’

पोहोचल्याबरोबर लगेच दादाचा फोन आला. नंतरचे दोन दिवससुद्धा दोघेही फोनवर भरभरून बोलले. नंतर तो काळाकुट्ट दिवस उगवला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी घरीच होतो. दुपारी तीनच्या सुमाराला माझा मोबाइल वाजला.

‘‘हॅलो.’’

‘‘मी…मी…शर्मिला. प्रकाश, एक भयंकर घटना घडलीय.’’

ती रडत रडत तुटक बोलत होती. घाबरल्यासारखी वाटत होती.

माझाही थरकाप उडाला.

‘‘शर्मिला, शांत हो. रडू नकोस. काय झालंय ते सांग. दादा कसा आहे? तू कुठून बोलतेस?’’

‘‘प्रसाद नाही आहे.’’

ती जोरजोरात हुंदके देऊ लागली. तणाव आणि भीती यांनी माझा समतोल ढळला. मी अक्षरश: ओरडूनच विचारलं.

‘‘नाही आहे? म्हणजे नक्की झालंय तरी काय? प्लीज लवकर सांग गं. माझं टेन्शन वाढतंय. तू आधी रडणं थांबव.’’

काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे आईबाबांच्या लक्षात आले. ते कावरेबावरे झाले.

‘‘अरे, प्रसाद अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस? तुला सोडून कसा गेला? तू जाऊ कसा दिलास? हे बघ. शांत हो, सगळं सविस्तर सांग. आपण मार्ग काढू. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर? काळजी करू नकोस पण आम्हाला कळू दे काय झालंय ते. मी येईन तिकडे. सावर स्वत:ला आणि सांग सगळं.’’

तिला जरासा धीर आला.

‘‘प्रसाद कोडईकॅनालला जाण्याची तिकिटं काढण्यासाठी सकाळी दहा वाजता बाहेर पडला. दोन दिवस तिकडे राहून मुंबईला परतण्याचा प्रस्ताव त्यानेच मांडला. उशीर झाला तर जेवून घ्यायलाही सांगून गेला. दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. मोबाईल स्विच ऑफ येतोय. आता जेवावं असा विचार करत असताच रूम बॉय एक लिफाफा घेऊन आला. मला वाटलं आत बिल असेल. उघडून पाहिलं तर ‘मी अमेरिकेला परत जात आहे,’ असं लिहून प्रसादने सही केली होती. माझ्यावर आभाळ कोसळलं. डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी बेशुद्ध पडणार होते. कसंबसं बळ एकवटलं. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे दागिनेसुद्धा नाहीसे झाले आहेत. रात्री कपाटात ठेवले होते. माझ्याकडे पर्समध्ये थोडेसे पैसे आहेत. अगदी असहाय्य केलीय मला. काय करू मी आता? आबांनासुद्धा काही कळवलं नाही.’’

ती परत रडू लागली. मीसुद्धा परुता हादरून गेलो होतो. स्वत:ला सावरून तिला धीर देणे आवश्यक होते.

‘‘आबासाहेबांना कळवलं नाहीस ते योग्य केलंस. शर्मिला, तू धीर धर. रडू नकोस, तू एकटी नाही आहेस, आबासाहेबांना कसं कळवायचं ते मी बघतो. प्रसंग फारच कठीण आहे. आपण त्यातूनही मार्ग काढू.’’

‘‘तू हॉटेलमध्येच थांब. उपाशी राहू नकोस. मी सर्वांशी बोलतो आणि तिकडे येतो. बहुतेक रात्रीपर्यंत येऊ शकेन. नाहीतर उद्या सकाळी नक्कीच. काळजी घे हां. ठेवतो फोन.’’

आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितल्यावर बाबा तर शरमेने काळे ठिक्कर पडले. आई अक्षरश: धाय मोकलून रडू लागली.

‘कुसंतानपेक्षा नि:संतान बरं’ असं म्हणायची वेळ आणली नालायकाने. असे म्हणतच ती बेशुद्ध झाली. तिला आम्ही दोघांनी कसेबसे सावरले. मी त्यांना दागिन्यांविषयी काहीच सांगितले नव्हते. मलाच लाजिरवाणे वाटत होते.

‘‘आईबाबा, आबासाहेबांना काहीच माहीत नाही. आपणच त्यांना कळवलं पाहिजे. मी समक्षच जाऊन सांगतो.’’

‘‘आम्ही येऊ का?’’

‘‘नको बाबा. आईची येण्याची परिस्थिती नाहीए आणि एकटं राहण्याचीसुद्धा. तेव्हा मी एकटाच जातो. अवघड वाटतंय. पण हा दुर्धर प्रसंग मलाच निभावून न्यावा लागणार असं दिसतंय.’’

मी दबकतच त्यांच्या घरात प्रवेश केला.

‘‘या प्रकाशराव, शमू आणि प्रसाद केव्हा येतायत?’’

‘‘नाही…नाही…मी…मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो.’’

‘‘बोला ना काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘हो…हो…कठीण प्रॉब्लेम. दादा अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काय? काल संध्याकाळीच शमूचा फोन आला होता. काही बोलली नाही आणि असं अचानक का ठरवलं.’’

‘‘नाही. तो एकटाच गेला.’’

‘‘आणि आमची शमू?’’

मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी जमदाग्निचा अवतार धारण केला. ते रागाने थरथरत होते व मी भीतिने. त्यांनासुद्धा दागिन्यांविषयी काही सांगितले नाही.

‘‘हरामखोर साला. माझ्या एकुलत्या एका पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली. समोर असता तर गोळी घालून ठारच केला असता. पण मी त्याला सोडणार नाही.’’

त्यांना सावरण्यासाठी काकी पुढे आल्या.

‘‘तुम्ही जरा शांत व्हा. आधी पाणी प्या बघू. प्रसंग आला आहे खरा. त्याला तोंड तर दिलं पाहीजे ना? प्रथम आपण शमूला सावरलं पाहीजे. काय प्रसंग गुदरला आहे माझ्या बाळावर. कुठे आहे ती?’’

‘‘ती बंगळुरूलाच आहे हॉटेलमध्ये. मी तिला आणायला जातो आहे. तसं मी तिला फोनवर सांगितलं आहे.’’

‘‘नको, आम्ही दोघं जातो. तुम्ही आईबाबांजवळ थांबा. आपण शमूशी बोलू या का?’’

मी शर्मिलाच्या मोबाइलवर फोन लावला.

‘‘मी प्रकाश बोलतोय. आबासाहेबांच्या घरून. बरी आहेस ना तू? थांब बोल त्यांच्याशी.’’

‘‘शमू बेटा, रडू नकोस. धीर धर. त्याच्यावर धाय मोकलून रडायची वेळ आणतो की नाही बघ. आम्ही दोघं तुला आणायला तिकडे येतोय. शेवटच्या फ्लाईटने निघतो. काळजी घे.’’

आता क्रोधाची जागा करूणेने घेतली होती. त्यांचे डोळे पाझारू लागले. काकी व्याकूळ होऊन त्यांना वरवर धीर देत होत्या. आई तर अंथरूणालाच खिळळी होती. डोळ्यांतील पाण्याला खिळ नव्हता. इतक्या जणांना दु:खाच्या खाईत लोटणाऱ्या उलट्या काळजाच्या माझ्या भावाची मला मनस्वी किळस आली. शर्मिलाला घेऊन आल्याचे आबासाहेबांनी आम्हाला कळवले आणि ती तिघेही आमच्या घरी आली.

‘‘शर्मिला, काय झालं हे बाळा?’’ असे ओरडून आई पुन्हा बेशुद्ध झाली. बाबा केविलवाणे होऊन हात जोडू लागले.

‘‘आबासाहेब, आम्ही तुमचे अनंत अपराधी आहोत. असला अवलक्षणी कार्टा जन्माला घातल्याची शरम वाटते मला.’’

आबासाहेब एव्हाना शांत झाले होते. काकी आणि शर्मिला आईची समजूत घालत होत्या.

‘‘बाबासाहेब आपल्या सर्वांचंच हे दुर्भाग्य आहे. पण तुम्ही नका अपराधी वाटून घेऊ. मी त्याला पातळातून धुंडून काढीन आणि शिक्षा देईन. प्रकाश, त्याला अमेरिकेत कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्ग आहे का?’’

‘‘ऑफिसचा नाही, पण तो राहत असलेल्या अपार्टमेंटचा नंबर आहे माझ्याकडे.’’

‘‘जरा बघतोस प्रयत्न करून?’’

फोन लावला तर दादाने ते अपार्टमेंट तीन महिन्यांपूर्वीच सोडल्याचे कळले.

‘‘म्हणजे हरामखोराने पूर्वीपासूनच हा कट रचला होता. यात आमच्या मुलीचा मात्र बळी गेला. नवीन बिझनेस चालू करण्यासाठी माझ्याकडून पाच लाख रूपये घेऊन गेला.’’

‘‘माझ्याकडे याच कारणास्तव पैसे मागितले. पी.एफमधले दोन लाख रुपये होते, ते मी दिले त्याला.’’

मी गौफ्यस्फोट केला.

‘‘शर्मिलाचे बंगळुरूला नेलेले दागिनेसुद्धा नाहीसे झालेत.’’ आबासाहेबांना राग अनावर झाला.

‘‘नीच, अमानुष. तुमची दोन मुलं म्हणजे दोन विरूद्ध ध्रुव आहेत. आता मीसुद्धा हकिकत पेपरात प्रसिद्ध करणार. अमेरिकेत माझे काही हितसंबंधी आहेत. त्यांनाही कळवणार. त्यांची चांगली नाचक्की करतो सगळीकडे. आम्हाला फसवतो काय?’’

आता समाजात छी थू होणार या कल्पनेने की काय बाबा धास्तावल्यासारखे झाले.

‘‘आबासाहेब, आमच्या मुलाच्या हातून अक्षम्य गुन्हा झाला आहे. पण कृपा करून आपण सबुरीनं घ्या. या परिस्थितीतही मागचा पुढचा विचार करायला हवा. मेंदूला अगदी झिणक्षिण्या आल्यात. तुम्ही पाहताच. हिची परिस्थिती किती नाजूक झालीए ते. शिवाय शर्मिलाच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला हवा ना? एक आठवड्याचा अवधी द्या आम्हाला. काही तोडगा निघतो का बघतो. नाहीतरी अवहेलना आणि मानहानी सहन करावी लागतेच आहे. ती जगजाहीर होईल.’’

आबासाहेबांनी एक आठवडा थांबण्याचे कबूल करून खरोखरच कृपा केली होती.

‘‘कार्ट्याने तोंडाला काळं फासलं हो. पोरीच्या आयुष्याची होळी केली.’’

‘‘बरोबर आहे तुझं. आपण तिचे शतश: अपराधी आहोत. कधी न भरून येणारी जखम आहे ही. आबासाहेब भले माणूस आहेत म्हणून एक आठवडा तरी थांबायला तयार झाले. आपणच सावरून, समतोल विचार करून तिच्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. तेव्हा तू जरा धीराने घे आणि काय सुचतंय ते बघ.’’

आईला बाबांचे म्हणणे पटले. तिचा जीव शर्मिलासाठी तीळतीळ तुटत होता. तिने विचाराला चालना दिली असावी. कारण ती बाबांच्या बरोबर चर्चा करू लागली. तपशील कळला नाही. तरी दुसरा कोणता मुद्दा यावेळी विचारांत घेणे शक्यच नव्हते. हे मी जाणून होतो. आई पूर्ववत झाली आणि मला जरा हायसे वाटले, शर्मिलासुद्धा येऊन आईला भेटून गेली. आश्चर्य म्हणजे दोघींनीही मनावर कौतुकास्पद संयम ठेवला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो तर आईबाबा नुकतेच देशमुखांकडे जाऊन आल्याचे कळले.

‘‘बाबा, आबासाहेबांनी बोलावलं होतं का?’’

‘‘नाही रे, सहज भेटून आलो. ही फार दिवस त्या दोघांना भेटली नव्हती आणि शर्मिलालासुद्धा पहाविशी वाटत होती.’’

‘‘ठिक आहे ना सर्व?’’

‘‘आहे ते ठिकच म्हणायचं. पण पुढचा विचार करणं आवश्यक आहे,’’ आईने त्यांना थांबवलं.

‘‘प्रकाश, आताच आलास ना? हातपाय धुवून घे. चहा टाकते. खाऊन घे.’’ आईचे अचानक थांबवणे मला खटकले. चहापाणी झाले. आम्ही तिथे बोलत बसलो. मला जाणवत होते की आईला काहीतरी सांगायचे आहे. पण तिला अवघड वाटते आहे. फार अस्वस्थ वाटत होती.

‘‘आई, काय झालं? काही सांगायचं आहे का? गोंधळलीस का?’’

‘‘अगं, सांग आता. का उगाच टेन्शन वाढवतेस?’’

‘‘प्रकाश, म्हणजे बघ…म्हणजे मला…आम्हाला वाटतंय म्हणून मी सुचवते. पण तू विचार कर हं!’’

‘‘कसला विचार करू आणि सुचवतेस काय? माझ्याशी बोलताना अशी चाचरेतस कशाला?’’

शेवटी धीर करून बाबांनीच गौप्यस्फोट केला.

‘‘प्रकाश, आम्हाला वाटतं, तू शर्मिलाचा पत्नी म्हणून स्विकार करावास,’’ सर्वांगातून विजेचा प्रवाह जात असल्याचा भास मला झाला आणि मी जवळजवळ किंचाळलोच.

‘‘कसं शक्य आहे, बहिनीप्रमाणे असणारी वहिनी आणि पत्नी? छे, मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही असं सुचवता तरी कसं?’’

‘‘प्रकाश बाळा, हे सुचवताना अगदी जिवावर येतंय. माहिती आहे की तुझ्या स्वत:च्या वैवाहिक जीवनाबद्दल काही कल्पना असतील. उच्चशिक्षित आणि पगारदार असल्यामुळे तुला सर्वगुणसंपन्न वधू मिळेलही. परंतु आपण शर्मिलेचा विचार करू या. काहीही अपराध नसताना तिच्या आयुष्याची परवड होणार आणि आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी पहावी लागणार, अर्थाअर्थी आपणच त्याला कारणीभूत आहोत ना? असलं अवलक्षणी कार्ट जन्माला येणं हे दुर्दैवच.’’

परत ती हुंदके देऊन रडू लागली.

‘‘आई, मला विचार करायला वेळ हवा. हेच बोलायला तम्ही देशमुखांकडे गेला होता वाटतं? काय म्हणाले ते?’’

‘‘आम्ही बोललो त्यांना. लगेच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनाही विचार करायला वेळ लागेल ना? करतील ते फोन. तुझा विचार घ्यायला सांगितलाय त्यांनी.’’

माझ्या पायाखालची जमिनच सरकली. वज्राघात होत असल्याची जाणीव झाली. मेंदू अगदी सुन्न झाला होता.

‘‘आई, मी जरा मोकळ्या हववेर फिरून येतो.’’

‘‘अरे, यावेळी कशाला जातोस?’’

लांबवरच्या बागेत फिरून आल्यावर किंचित हलके वाटले. मी येईपर्यंत आईबाबा चिंतातुर होते. जेवणावर वासना नव्हतीच. चार शिते चिवडल्यासारखे केले व बिछान्यावर पडलो. विचाराला चालना देणे आवश्यक होते. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात होण्याआधीच चूड लागू पाहत होती. दादाचे जुने कपडे आणि पुस्तके वापरणारा मी आता त्याने त्यागलेली पत्नी…छे छे, शक्यच नाही ते. फेटाळूनच लावला पाहिजे हा प्रस्ताव. मेंदूला मुंग्या डसल्यासारखे वाटू लागले. परंतु मन:चक्षुसमोर सतत डोळे गाळून अंथरूणाला खिळलेली आई, नामुष्कीच्या शरमेने अगतिक झालेले बाबा, जमदाग्निचा अवतार धारण करणारे आबासाहेब, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणारी ती दु:खी माऊली काकी आणि आपल्या आयुष्याच्या वैराण वाळवंटातील वाळूप्रमाणे शुष्क झालेली शर्मिला दिसू लागली. दहा डोळे आशाळभूत नजरेने माझा मागोवा घेत असल्याचा भास झाला. आपण उष्ट्या ताटाचा धनी होणार या कल्पनेने अंत:करण पिळवटून निघाले.

दादाचे ड्रॉईंग छान होते. शाळेत असताना तो उत्तम चित्रे काढीत असे, अगदी हुबेहुब. चित्र पुरे झाले की ते मित्रांना दाखवायला तो घेऊन जाई, सगळे सामान तसेच ठेवून. घर नीटनेटके ठेवण्यावर बाबांचा कटाक्ष. आई मला विनवणी करी. ‘‘प्रकाश, राजा आवरून ठेव रे ते सामान. हे आले आणि पसारा बघितला तर उगाच चिडचिड करतील. बेसनाचे लाडू केलेत. देते तुला लगेच.’’

‘‘आई, त्याला सामान जागेवर ठेवून जायला काय होतं? बेसनाच्या लाडवाची लालूच दाखवून तू मला काम करायला लावतेस. त्याने बिघडवायचं आणि मी निस्तरायचं असा अलिखित नियम केलायस का तू?’’

आईचा तो अलिखित नियम माझा पाठपुरावा करीत होता. जीवनाच्या या टप्प्यावर त्याने केलेली अक्षम्य चूक मलाच निस्तरावी लागणार होती. निव्वळ तो माझा भाऊ होता म्हणून अभावितपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.

‘‘बालपण नको रे बाबा.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...