*गरिमा पंकज
अलीकडेच इकॉनॉमिस्ट सुरज जेकॉब आणि अँथ्रोपोलॉजिस्ट श्रीपर्णा चट्टोपाध्याय यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात जवळपास १४ लाख लोक घटस्फोटीत आहेत. हे एकूण लोकसंख्येच्या ०.११ टक्के आहे आणि विवाहित लोकसंख्येच्या साधारण ०.२४ टक्के आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की वेगळे झालेल्या लोकांची संख्या घटस्फोटीतांपेक्षा ३ पट जास्त आहे. पुरुषांच्या तुलनेत घटस्फोटीत आणि पतिपासून वेगळया राहणाऱ्या महिलांची संख्या कितीतरी जास्त आहे. पुरुष अनेकदा दुसरा विवाह करतात उलट घटस्फोटीत महिला एकटया राहतात.
लव्हमॅरेज असो वा अरेंज्ड मॅरेज, अनेकदा परिस्थिती अशी निर्माण होते की सुरूवातीला एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे पतिपत्नीसुद्धा दूर होतात. प्रेमाच्या धाग्यांनी बनलेले हे पतिपत्नीचे नाते जेव्हा अचानक तुटते, तेव्हा भावनिक दृष्टया हळवे असलेले स्त्री-पुरुष अत्यंत संतापलेले असतात. लक्षात घ्या की लग्नाच्या वेळी तुमचा जोडीदार जवळ असूनही दूर आहे असे जाणवते का? त्याच्या मिठीत असूनही तुम्हाला पूर्वीप्रमाणे प्रेमाची जाणीव होत नाही? जोडीदार कारणं सांगून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे का? जर असे असेल तर सांभाळा आणि तयार राहा कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला. तुम्ही दोघेही लक्षात ठेवा काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुमचं नातं कमकुवत होत असल्याकडे इशारा करत आहेत :
जवळ असूनही एकमेकांसोबत नाहीत
ऑफिसमधून आल्यावर तुम्ही भले एकाच खोलीत बसले असाल, पण एक व्यक्ती आपल्या लॅपटॉप वा कम्प्युटरवर आणि दुसरा टीव्ही वा मोबाईलमध्ये व्यस्त असेल, पार्टीत सोबत गेले असाल, पण एकजण या कोपऱ्यात तर दुसरा दुसऱ्या कोपऱ्यात मित्रांसोबत व्यस्त असेल तर याचाच अर्थ एकत्र एखाद्या कार्याचा आनंद घेण्याएवजी आपापल्या जगात व्यस्त राहू लागला असाल तर हा तुमच्या वाढत्या दुराव्याचा परिणाम आहे.
भांडणे सोडून दिले आहे
जर तुम्ही एकमेकांशी भांडणे सोडून दिले आहे तर हेसुद्धा वाढत्या दुराव्याचे लक्षण आहे. जर भांडणानंतर तुम्ही दोघे त्या विषयावर काहीच चर्चा करत नसाल वा जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसाल तर असे वर्तन नाते तुटण्याकडे इशारा करते. अनेकदा जोडप्यांमध्ये होणारे भांडण त्यांच्यातील जवळीक वाढवायचे काम करते. पण असे तेव्हा होते, जेव्हा दोघे भांडणाच्या मुळापर्यंत पोहोचतात आणि एकमेकांची बाजू ऐकून आणि समजून घेऊन मनातील कलूषित भाव दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रकारचा प्रयत्न केला जात नसेल तर समजून घ्या की वेगळे व्हायची वेळ आली आहे.
अनेक कारणं आहेत मन तुटण्याची
अमेरिकेतील कपल थेरपिस्ट कॅरी कोल सांगतात की काही गोष्टी नात्यात दरी निर्माण आणण्यासाठी पुरेशा असतात, जसे नेहमी आपल्या जोडीदारावर टीका करणे, त्याला सुनावत राहणे, वाईट शब्दप्रयोग करणे वा स्वत:ला सुपीरियर दाखवण्याचा प्रयत्न करणे. एखाद्या वादात मोकळेपणाने बोलण्याऐवजी बोलणे बंद करणे इत्यादी. जर तुम्हीही एकमेकांशी असे वर्तन करत असाल तर तुमच्यातही दुरावा निर्माण झाला आहे असं समजा.
मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आहात
अनेकदा आपण आपल्या मनाचा आवाज ऐकत नाही. हा आवाज अत्यंत मंद आणि शांत असतो, जो बाह्य जगाच्या कोलाहलात दुर्लक्षित होतो. अनेकदा मन सांगत राहते की आता मी आपल्या जोडीदारावर प्रेम करत नाही किंवा तो माझ्यापासून दूर गेला आहे. पण तर्काच्या अभावामुळे आपण याकडे लक्ष देत नाही आणि वास्तवापासून दूर पळत राहतो. पण नंतर कळते की तुमच्या मनाचा आवाज बरोबर होता आणि तुमचा जोडीदार खरेच दूर गेला आहे.
जोडीदाराचे नियंत्रण असहनीय
जर दोघांपैकी एका जोडीदाराला दुसऱ्याच्या नियंत्रणात राहणे घुसमटल्यासारखे वाटत असेल आणि सतत सांगूनही त्याचे म्हणणे ऐकले जात नसेल तर त्याला स्वत:लाच पराभूत झाल्यासारखे वाटते. असे नातेसंबंध फार काळ टिकत नाहीत.
बॉडी लँग्वेजमध्ये बदल
जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता वा प्रेम करत असता तेव्हा रात्रंदिवस त्यालाच बघू आणि अनुभवू इच्छिता. पण जेव्हा कोणी तुमचे मन दुखावते किंवा त्याच्या मनात आपल्यासाठी प्रेम उरत नाही तेव्हा त्याचा सामना करणे वा त्याच्या डोळयाला डोळा भिडवणेसुद्धा टाळतो. प्रेमात माणूस जवळ जाण्याची आणि बोलण्याची कारणं शोधत असतो, पण दुरावा वाढल्यास एकमेकांपासून दूर जाण्याचे कारण शोधायला लागतो. जे जोडपे भावनिकरित्या जोडलेले असते त्यांची शारीरिक भाषा वेगळीच असते. जसे की नकळत एकमेकांसमोर मस्तक डोकवणे, गाणे गुणगुणणे, एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांचे बोलणे लक्ष देऊन ऐकणे इत्यादी. पण जेव्हा नाते संपण्याच्या मार्गावर पोहोचते, तेव्हा ते बोलणे कमी आणि वाद जास्त करू लागतात. एकमेकांच्याजवळ बसण्याऐवजी समोरासमोर बसतात आणि एकमेकांची काळजी घेण्याऐवजी एकमेकांना टाळू लागतात.
डोळयाला डोळे भिडवणे कमी होते
तुम्हाला त्याच गोष्टी पाहायला आवडतात, ज्या तुम्ही पसंत करता. जाहीर आहे की प्रेमात नजरभेट होणे आणि तसेच बघत राहणे अनेकदा होत राहते. पण जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांकडे बघताच नजर हटवता, डोळयाने बोलणे सोडता तेव्हा समजून जा की तुम्ही दोघे ब्रेकअपकडे जात आहात.
या बाबतीत १९७० मध्ये सोशल सायकोलॉजिस्ट जिक रुबीनने जोडप्यांमधील नेत्रपल्लवीच्या आधारे त्यांच्या नात्याची खोली मापण्याचा प्रयत्न केला. जोडीदारांना खोलीत एकटे सोडले, ज्या जोडीदारांमध्ये अतिशय प्रेम होते, ते बराच वेळ आपल्या जोडीदाराकडे पाहत आहेत असे आढळले, उलट कमी प्रेम असणाऱ्या जोडीदारांमध्ये असे बॉण्डिंग आढळले नाही.
अन्य कुणाशी भावनिक बंध जुळणे
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी नसाल तर तुमचे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी भावनात्मक पातळीवर संबंध जुळतात आणि तुमचे अफेअर असण्याची संभावना वाढते. तसेही आजकालच्या तांत्रिक युगात ऑनलाईन फ्लर्टिंगसारखे पर्याय उपलब्ध आहेत आणि स्मार्ट फोन्स व मीडियमार्फत जोडीदाराला न सांगता एखाद्यासोबत सतत संबंध ठेवणे शक्य आहे.
जर तुम्हीसुद्धा अशा संबंधात फसले असाल आणि आपला आनंद साजरा करणे वा त्रास व्यक्त करण्यासाठी जोडीदाराऐवजी इतर कोणत्या माणसाचा खांदा शोधू लागला असाल तर समजून घ्या की या नात्याबाबत गंभीरतेने विचार करायची वेळ आली आहे.
इतरांमध्ये जास्त व्यस्त राहणे
अनेकदा आपण जोडीदाराबाबतच्या दुराव्याला दुसऱ्या कोणाशी जवळीक वाढवून कमी करू इच्छितो. विशेषत: स्त्रिया जर आपल्या रिलेशनशीपमध्ये आनंदी नसतील तर हे दु:ख विसरण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या आयुष्यात सुरु असलेल्या प्रश्नांमध्ये व्यस्त होतात.
एकमेकांशी शेअरिंग करायला काही नसतं
जर तुम्ही आयुष्यातील विशिष्ट क्षण आणि घटना वा प्रगतीशी निगडीत प्रसंग सर्वात आधी जोडीदारासोबत नाही तर इतर कोणासोबत शेअर करू लागला आहात आणि जोडीदारासोबत घरातील काम वा मुलांच्या गोष्टींशिवाय बाकी काही तुमच्याकडे उरलेच नाही तर समजून जा की तुम्ही एकमेकांपासून दूर होत आहात.
उत्तम प्रतीचा वेळ घालवायची इच्छा नाही
जर तुम्ही जोडीदारासोबत बऱ्याच काळापासून एकत्र रोमँटिक चित्रपट बघायला, आवडत्या ठिकाणी डिनर करायला, समुद्रकिनाऱ्यावर बसून वेळ घालवण्याची योजना टाळत असाल, आणि जर तुम्ही दोघेही आपला जोडीदार येण्याची उत्कंठेने वाट पाहत नसाल आणि तो आल्यावरही तुम्ही वेगवेगळया खोलीत व्यस्त राहत असाल तर समजू की नात्यातील आकर्षण तुमच्यासाठी कमी होत चालले आहे.
एकमेकांच्या बोलण्याकडे कमी लक्ष देणे
चांगल्या नात्यासाठी एकमेकांचे बोलणे ऐकणे आणि त्याकडे लक्ष देणे सर्वात आवश्यक असते, पण जेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की कितीही बोललो तरी काहीही बदल होणार नाही तर हे नाते कमकुवत होण्याचे लक्षण आहे, कारण नाते बळकट असण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि ऐकणे आवश्यक असते. यामुळे नाराजी आणि राग लगेच दूर होते.
भविष्याचे स्वप्न जोडीदाराविना
जर अनेकदा तुम्ही आपल्या उज्वल भविष्याच्या स्वप्नात जोडीदाराला त्याची जागा देऊ शकत नसाल तर याचा अर्थ तुमच्यातील भावनिक दुरावा वाढत आहे.
विश्वासाची कमतररता
सायकेलॉजिस्ट जॉन गॉटमॅनला जवळपास ४ दशकपर्यंत केलेल्या अभ्यासात असे आढळले की जी जोडपी दीर्घ काळ नाते निभावत आहेत, ते ८६ टक्के काळ एकमेकांत गुंतलेले असतात. असे ना केवळ प्रेमामुळे तर एकमेकांवरील विश्वासामुळेही होत असते. ते गंभीर मुद्दयांवर एकमेकांचे मत जाणून घेण्याचा आणि मदत घेण्याचा प्रयत्न करतात. पण जर संबंध कमकुवत असतील तर विश्वासही तुटू लागतो.
अर्धवट वरवरचे हास्य
जर तुम्ही दीर्घ काळ एकमेकांकडे बघून हसणे वा थट्टामस्करी करणे विसरला असाल, तर समजा की तुमचे नाते तुटणार आहे. सहज आणि आपुलकीचे हास्य नात्याच्या प्रगल्भतेचा पुरावा असते. एकमेकांशी कोणत्याही अटीविना प्रेम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य अगदी सहज उमटते.
मतभेद जेव्हा वादाचे स्वरूप घेते
आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीबाबत मतभेद असणे स्वाभाविक असते, पण हे मतभेद जेव्हा सामान्य न राहता अनेकदा भांडणाच्या स्वरूपात संपू लागते आणि दोघांमध्ये कोणीच नमते घेण्यास तयार नसते, तेव्हा समजून जावे की नाते आता टिकू शकत नाही.
जेव्हा दोघांनी प्रयत्न करणे सोडून दिले असेल तर
तुमचे नाते कितीही सहज का असेना, तुम्ही नेहमीच यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करायला हवा. चूक झाली तर लगेच क्षमा मागणे, जोडीदाराला सरप्राईज देणे, आपली चांगली बाजू समोर आणणे आणि लहानसहान गोष्टींमध्ये आपल्या जोडीदाराचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणे यासारख्या गोष्टींमुळे नाती तुटत नाहीत. जर तुमच्या जोडीदाराने असे प्रयत्न करणे सोडून दिले आणि नेहमी त्यांच्याच चुकांवर लक्ष केंद्रित करणे सुरु केले असेल तर समजून जा की तो तुमच्यापासून दूर जात आहे.
स्तुती करणे बंद करणे
बळकट नात्यासाठी वेळोवेळी एकमेकांची स्तुती करणे अतिशय मह्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना ग्राह्य धरू लागता, एकमेकांची स्तुती करणे बंद करता तेव्हा हळूहळू दोघांमध्ये तक्रारी वाढू लागतात, ज्या तुम्हाला ब्रेकअपकडे घेऊन जातात.
जॉन गॉटमॅनने २० वर्षं २०० जोडप्यांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे एक निष्कर्ष काढला आहे की कोणत्याही नात्याचे यश जोडप्यांच्या आपसातील वाद आणि भांडण सुंदर पद्धतीने सोडवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. कधीच न भांडणे सुंदर नात्याची ओळख नसते तर परत एक होणे नात्याला आणखी बळकट आणि सखोल बनवते. पण जेव्हा नात्यात इतका दुरावा येतो की परत एक होणे अशक्य असते, नात्यात राहून कोंडमारा होतो, तेव्हा तर गोडव्याने हे नाते संपवणेच उत्तम.