कथा * नीरजा श्रीखंडे

‘‘प्रेरणा वहिनी, कुठं आहेस तू?’’ अंबुजनं डोक्यावरचं हेल्मेट काढून बाजूला ठेवलं अन् हातातला पुडा डायनिंग टेबलवर ठेवला. भिजून आला होता तो, शर्ट जरा झटकला अन् म्हणाला, ‘‘आत्तासाठी मी जेवण बाहेरून आणलंय, तू आता काहीही करत बसू नकोस.’’ तो आपल्या खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आला तोवर प्रेरणाही तिच्या खोलीतून हॉलमध्ये आली होती.

ती एवढ्यातच कानपूरहून एक इंटरव्ह्यू देऊन परतली होती. रात्रीचे आठ वाजले होते. प्रेरणाचा नवरा पंकज त्याच्या नोकरीच्या टूरवर गेलेला होता. म्हणूनच प्रेरणानं अंबुजच्या मदतीनं हा इंटरव्ह्यूचा घाट घातला होता आणि तो पारही पाडला होता. पंकज असता तर त्यानं तिला जाऊच दिलं नसतं. तो चिडला असता, रागावला असता. अंबुजनंच पेपरला जाहिरात बघितली होती. त्यानं तिला त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून दिला होता. तिला कानूपरचं तिकिट काढून देऊन गाडीतही बसवून आला होता. इथून तो सतत फोनवर तिची चौकशी करत होता. प्रेरणा कानपूरहून नोकरी पक्की करूनच आली होती. ही बातमी ऐकून अंबुजही आनंदला होता. पंकजला मात्र तिनं ही बातमी अजून दिली नव्हती, कारण त्याचा फोन लागत नव्हता.

‘‘अरे, तू भिजून आला आहेस? मी घरी पटकन् काही तरी केलं असतं रे…मला ठाऊक आहे गेले तीन चार दिवस तू फक्त ब्रेड, सूप, दूध एवढ्यावरच आहेस. बाहेरचं जेवण तुला आवडतही नाही,’’ प्रेरणानं म्हटलं.

अंबुज फक्त हसला. प्रेरणानं म्हटलं, ‘‘मी आधी चहा करते. आल्याचा चहा तुलाही चालेल ना,’’ तिच्या हातचा चहा त्याला आवडतो हे ती जाणून होती.

‘‘हो वहिनी, तू गेल्यापासून चहा प्यायलोच नाहीए. मला काही तुझ्यासारखा चहा जमत नाही आणि माझ्या हातचा चहा मला आवडतच नाही,’’ भाबडेपणानं अंबुज म्हणाला.

‘‘माझ्या धाकट्या जावेनं आता लवकरात लवकर घरात यायला हवंय. ती आली की तुझ्या आवडीच्या चहापासून सगळं तिला शिकवेन मी. मग तुझे हाल नाही होणार,’’ प्रेरणानं चहाचा कप त्याच्या हातात देत म्हटलं.

अंबुज थोडा लाजला. मग पटकन् विषय बदलत म्हणाला, ‘‘ते सोड, तुला नोकरीवर कधीपासून जावं लागेल?’’

‘‘विषय बदलू नकोस. मला एक सांग, जाण्याआधी मी तुला काही मुलींचे फोटो अन् त्यांची माहिती देऊन गेले होते, त्यातली कुणी आवडली का?’’

‘‘नाही, मला असं फोटो पाहून लग्न करायचं नाहीए. हा विषय संपला,’’ अंबुजनं म्हटलं अन् लगेच त्यानं विचारलं, ‘‘कधी जॉईन व्हायचंय तुला?’’

‘‘त्यांनी एक महिन्याचा अवधी दिलाय. पण आधी तुझ्या दादांना कसं राजी करायचं हे बघायला हवं. नोकरीपर्यंत तर तू पोहोचवलंस. इंटरव्ह्यू उत्तम झाला. नोकरीही मिळाली. पण जर दादांनी नकार दिला तर सगळंच पाण्यात जाणार. माझं ते ऐकणार नाहीत याची मला खात्री आहे. तूच बघ त्यांना कसं राजी करायचं ते.’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘मी दादाला राजी करेन वहिनी, त्याची काळजी करू नकोस…नोकरी करणं यात वाईट काय आहे?’’

‘‘तेच तर मी म्हणतेय, पण त्यांच्या डोक्यात काही तरी कल्पना आहेत…त्यांना दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत किंवा त्यांनी स्वत:चा बिझनेस सुरू करून त्यात स्थिरथावर होईपर्यंत तरी मी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करू शकते. सध्या मला ते तीस हजार रुपये पगार देताहेत. आपलं त्यात चांगलं भागू शकेल. आपण कानपूरलाच शिफ्ट होऊयात. तुला काय वाटतं?’’

‘‘कल्पना चांगली आहे पण…’’

‘‘आता पण बीण काही नको भाऊजी. दादांना समजवा, तिथं माझ्या बाबांचा एक प्लॉट आहे, त्यांनी तो माझ्या नावे केला आहे. तो आपल्या कामी येईल. तिथं काही बिझनेस सुरू करता येईल. तुम्ही दोघं भाऊ ऑटोमोबाइल इंजिनियर आहात. दोघं मिळून छान काम सुरू करा. नाहीतरी दादांना ही नोकरी फारशी पसंत नाहीच आहे. तूच त्यांना हे पटवू दे. तुझं ते नक्की ऐकतील.’’

‘‘बरोबर म्हणतेस तू, अगं, पण हे तुला आधी का सुचलं नाही?’’

‘‘मागे एकदा मी पंकजशी बोललेही होते, पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही…’’

‘‘ठीकाय, मी बोलतो दादाशी.’’

‘‘ते आल्या आल्या नको बोलूस हं! त्यांना जरा येऊन सेटल होऊ दे मग…’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘हो, हो…तसंच करेन…पण वहिनी, नोकरीची ट्रीट तर आधीच द्यावी लागेल…’’

‘‘ऊ!’’ प्रेरणानं हसून मान्य केलं.

लग्न होऊन प्रेरणा या घरात आली, तेव्हा अंबुज तिचा दिर तर होताच पण धाकटा भाऊ किंवा मित्र हेच नातं त्या दोघांमध्ये अधिक होतं. प्रेरणा त्याच्याहून दोन वर्षं मोठी होती अन् पंकज प्रेरणाहून सात वर्षांनी मोठा होता. दोघांमध्ये वयाचं अंतर होतंच, पण वडिलांच्या मृत्यूनंतर अचानर अंगावर आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला अकाली प्रौढत्त्व आलं होतं. हसणं, खिदळणं, सिनेमा, नाटक. टीव्ही, हॉटेलिंग असे प्रकार त्याला अजिबात जमत नव्हते, आवडतही नव्हते. मरण्यापूर्वी आईनं, त्यांचे कौटुंबिक मित्र घनश्याम यांच्या मुलीशी, प्रेरणाशी लग्न करण्यासाठी त्याला राजी केलं होतं.

आईनं म्हटलं, ‘‘हे बघ पंकज, खूप जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेस तू. वडिलांचं आजारपण निस्तरलंस, माझी सेवा करतोस, धाकट्या बहिणीचं लग्न करून दिलंस, धाकट्या भावाचं शिक्षणही होतंय, तोही आता नोकरीला लागेल. आता तुला लग्न करावंच लागेल.’’

‘‘आई…पण…’’

आईनं पुढे बोलूच दिलं नाही, ‘‘तू फक्त हो म्हण, मी लगेच घनश्यामना फोन करते.’’ अन् पुढे सगळं रीतसर घडलं.

प्रेरणानं नववधू बनून माप ओलांडले अन् घरात प्रवेश केला. पंकजचा मितभाषी अन् गंभीर स्वभाव यामुळे ती त्याच्यापासून थोडी दूरच असायची, पण समवयस्क अन् खेळकर, हसऱ्या धाकट्या दिराशी मात्र तिची लगेच मैत्री झाली. घरात ती धाकटी होती, इथं तिला अंबुजच्या रूपात धाकटा भाऊ मिळाला. अंबुजलाही ती आईच्या मायेनं काळजी घेणारी अन् बरोबरीनं वागणारी ताई वाटायची. अत्यंत मनोज्ञ अन् निर्मळ नातं होतं. दोघांमध्ये प्रेरणाला हलके फलुके विनोदी सिनेमे आवडायचे. पंकजला गंभीर विषयावरचे सिनेमे आवडायचे. तो म्हणायचा, ‘‘प्रेरणा, तू अन् अंबुज जा, सिनेमा बघून या. मी आलो तरी मी एन्जॉय करू शकणार नाही अन् त्यामुळे तुमचाही विरस होईल,’’ त्यामुळे प्रेरणा अन् अंबुज जास्त काळ एकत्र राहत.

मुळात पंकजचा स्वभावच वेगळा होता. आपण बरं आपलं काम बरं. फारसे मित्रही नव्हते त्याला. अंबुजचं दादावर खूप प्रेम होतं. दादानं केलेला त्याग त्याला ठाऊक होता. म्हणूनच तो दादाचीही खूप काळजी घ्यायचा.

वहिनीच्याबरोबर शॉपिंगला जायचा. तिला तिच्या मैत्रीणीकडे स्कूटरवरून पोहोचवायचा. एकूण तसं बरं चाललं होतं.

कधी कधी प्रेरणा म्हणायची, ‘‘मी जर दोनतीन वर्षांनी लहान असते ना, तर आईंनी माझं लग्न अंबुडबरोबरच ठरवलं असतं. कारण आमच्या स्वभावात खूप समानता आहे. पण पंकजशी मला जोडून ठेवण्याचं काम अंबुज करतो आहे. त्याच्यामुळे मला पंकजलाही सांभाळायचं कसं हे समजलं आहे अन् आमचा संसार चांगला चालला आहे.’’

शेवटी एकदाचं प्रेरणा अन् अंबुजच्या प्रयत्नांना यश आलं अन् कानपूरला शिफ्ट व्हायला पंकज तयार झाला.

‘‘दादा, इथं सगळीकडे आईच्या आठवणी विखुरल्या आहेत. त्यामुळे पदोपदी तिची आठवण होते. वहिनीही सैरभैर होते…आपण तिथंच काहीतरी करूयात,’’ निघताना अंबुजनं म्हटलं.

कानपूरला भाड्याचं घर घेतलं. प्रेरणानं नोकरी सुरू केली. प्रेरणाच्या वडिलांच्या पत्र्यावर शेड घालून दोघं भाऊ कामाला लागले. ‘‘कार एव्हरी सोल्युशन’’ नावाचं त्यांचं गॅरेज खूपच छान चालायला लागलं. मोटर पार्ट्सची फॅक्टरी घातली. त्यानंतर ‘ग्रीन कॅब’ आणि कार डेकोरचा बिझनेसही सुरू झाला. तीन वर्षांत तर उत्तम जम बसला. पंकजही आता खुलला होता. मोकळेपणाने बोलू हसू लागला होता. दोघं भाऊ मेहनत करत होते.

‘‘वहिनी, आमचं काम आता छान सुरू आहे. तुझ्या प्रेरणेनंच हे सर्व झालंय. तू खरी प्रेरणा आहेस, आता तू नोकरी सोड. आता मला ‘काका’ म्हणणारी एक गोड छकुली घरात येऊ दे,’’ प्रेरणाला सोफ्यावर बसवत अंबुजनं म्हटलं.

‘‘तसंच होईल अंबुज, आधी माझ्यासाठी जाऊ आण. एकदा ती घरात आली की मग मी आराम करणार. मग आपल्या घरात तुला काका म्हणणारी छकुली येईलच आणि तुला बाबा म्हणणारा छकुलाही आणूयात,’’ प्रेरणानं हसंत हसंत म्हटलं.

एव्हाना ते भाड्याचं घर सोडून स्वत:च्या घरात राहायला आले होते.

‘‘केवढं मोठं अन् सुंदर घर आहे…घरात राहायला माणसं मात्र तिनच आहेत. घरातल्या माणसांची संख्या वाढायला हवी. सण, समारंभ, उत्सव साजरे व्हायला हवेत. आता अंबुज तू लग्नाला नाही म्हणू नकोस. इतकी स्थळं सांगून येताहेत, लग्न व्हायला हवं…’’ अंबुजकडे रोखून बघत प्रेरणा म्हणाली.

अंबुज थोडा गडबडला होता. प्रेरणानं म्हटलं, ‘‘मला ठाऊक आहे. तुला सुरूची आवडते. खरं ना? मी अन् पंकज आजच त्यांच्या घरी जाऊन बोलणी करतो…अरे? लाजतोस काय?’’ प्रेरणाला गंमत वाटली अन् हसायलाही आलं. अंबुज खरोखरच लाजला होता.

प्रेरणाच्या लग्नानंतर सहा वर्षांनी सून म्हणून सुरूचीनं घरात प्रवेश केला. प्रेरणाला एक मुलगी झाली. सुरूवातीला सर्व ठिकठाक होतं. पण हळूहळू सुरूचीच्या कुरबूरी  वाढायला लागल्या. तिला प्रेरणाचं वर्चस्व सहन होईना. अंबुज प्रत्येक काम प्रेरणाला विचारून करतो, तेही तिला खटकायचं. कुठंही ती दोघं बाहेर जायला निघाली की प्रेरणासोबत असायचीच. प्रेरणा अन् अंबुजच्या नात्याचा अंदाज नव्हता. सुरूचीला अन् त्यातून हलंके कान अन् संशयी स्वभाव त्यामुळे ती सतत चिडचिडलेली असायची. तिला त्यांची जवळीक सहन होत नव्हती.

त्याबाबतीत तिनं अंबुजला हटकलंही होतं, पण अंबुजनं तिलाच समाजावलं, ‘‘मनातलं कलुष काढून टाक. तुला वाटतं तसं काही नाहीए. स्वच्छ मनानं आमच्या नात्याकडे बघ. ती माझी आई, ताई आणि मित्र आहे.’’

अंबुजसमोर सुरूची गप्प असायची, पण प्रेरणाला सतत टोमणे मारायची. घरात कलह नको म्हणून प्रेरणा तिकडं दुर्लक्ष करायची. अंबुजपासूनही ती आता थोडी दूर राहात होती. सुरूची व अंबुजना अधिकाधिक एकत्र राहता यावं म्हणून प्रयत्न करायची.

सुरूचीनं आता आपला मोर्चा पंकजकडे वळवला. एकदा संधी साधून तिनं पंकजला म्हटलं, ‘‘दादा, तुम्ही फार सरळ अन् भाबडे आहात. कामातच इतके मग्न असता की घरात काय घडतंय त्याकडे तुमचं लक्ष नसतं.’’

पंकजनं विचारलं, ‘‘तुला काय म्हणायचं आहे?’’

सुरूचीनं मनातलं सगळं विष बाहेर ओकलं. तिची भाषा, तिचे आरोप ऐकून पंकज तर भडकलाच. इतकं घाणेरडं मनात तरी कसं येतं तुझ्या? अगं, अंबुज तिचा धाकटा भाऊ अन् मित्र आहे. आमच्या घरात तिनंच आनंद आणलाय. तिही त्याला मान देते. तो तर तिला आईच्या जागी मानतो. ती दोघं घरातली जबाबदारी बघतात. म्हणूनच मी बिझनेस इतका वाढवू शकलो. खरं तर आम्हाला तुझ्या मदतीची अपेक्षा होती. तू प्रेरणाच्या जोडीनं घरातली जबाबदारी घे, जेणेकरून अंबुज धंद्यातली मोठी जबाबदारी घेऊ शकेल.’’ त्याचा चढलेला आवाज ऐकून प्रेरणा तिथं आली. पंकजला इतका संतापलेला बघून ती घाबरली.

‘‘काय झालं, पंकज?’’ तिनं विचारलं.

अंबुजही तेवढ्यात आला. सुरूचीनं दादाला नको ते सांगितलं असणार, ते सहन न होऊन दादा भडकला हे त्यानं ओळखलं.

‘‘सुरूची, आधी दादा वहिनीची क्षमा माग. अशी संशयी पत्नी मला नको,’’ तो सुरूची जवळ जात म्हणाला.

‘‘अंबुज, तिच्यावर ओरडू नकोस, ती आपल्या घरात नवी आहे. तिला सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. तुझं अन् माझंही थोडं चुकलंच. सुरूची अन् तू एकमेकांना समजून घेण्याच्या काळात मी सतत तुमच्यासोबत राहणं योग्य नव्हतं. खरं तर तुमच्या लग्नानंतर मी पंकजला म्हटलं होतं की यांना वेगळं घर करू देत. त्यांना त्यांचं लाइफ, त्यांची प्रायव्हसी मिळू देत.’’ प्रेरणानं म्हटलं.

‘‘होय सुरूची, होय अंबुज, प्रेरणानं मला खरंच म्हटलं होतं. पण मीच तिला समजून घ्यायला कमी पडलो. प्रेरणानं हट्ट धरला अन् तुमच्या लग्नाच्या वाढदिवसालाही गिफ्ट म्हणून फ्लॅट घेतला. तुम्ही दोघांनी सुखी व्हावं ही तिची इच्छा होती, आहे. म्हणूनच तिनं दोन बिझनेसही अंबुजच्या नावानं वेगळे करून दिलेत हे बघ…’’ पंकजनं म्हटलं.

त्यानं कपाटातून सगळी कागदपत्रं काढून सुरूचीच्या समोर ठेवली. ‘‘सुरूची, तुझा नवा फ्लॅट सुसज्ज आहे. ही त्या घराची किल्ली अन् हा तुमचा बिझनेस…अगदी आजही तुम्ही वेगळे होऊ शकता. फक्त एकमेकांवर प्रेम करा, आनंदात राहा,’’ पंकजचा कंठ दाटून आला.

‘‘दादा, वहिनी, मला क्षमा करा. मी फार फार चुकले. तुमचा मोठेपणा, निर्मळ मन, त्याग, कष्ट, हे सगळं समजून घ्यायला मी कमी पडले. मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा.’’ सुरूचीनं अक्षरश: त्या दोघांचे पाय धरले.

अंबुज पाणावलेल्या डोळ्यांनी हे सर्व बघत होता. ‘‘अंबुज भाऊजी, रडायचं नाही. आपण जवळच आहोत. मनात येईल तेव्हा आपण एकमेकांकडे जायचं. मदतीला धावायचं.’’ प्रेरणानं म्हटलं अन् मग सुरूचीला जवळ घेत ती प्रेमानं म्हणाली, ‘‘माझा बंधुसखा असला तरी पती तुझाच आहे, त्याची हृदयस्वामिनी तूच आहेस. मलाही तू प्रिय आहेस…मनातलं किल्मिष काढून टाकलंस हे छान झालं.’’

सगळ्यांचेच चेहरे प्रसन्न हास्यानं उजळले होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...