* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...