* मीता प्रेम शर्मा
विकास सिंह जेव्हा घरी एक पिल्लू घेऊन आले तेव्हा त्याची पुजाऱ्याकडून पूजा आणि नामकरण करण्यात आले. पुजाऱ्याने त्याचे नाव हॅप्पी असे ठेवून सांगितले की या प्राण्याच्या आगमनाने घरातील सुख-समृद्धी, आनंद वाढेल.
सध्या वर्तमानपत्र आणि वेबसाईट्सवर आणखी एका अंधश्रद्धेचा प्रसार होऊ लागला आहे, जिथे प्राण्यांचे पालक प्राण्यांची जन्मकुंडली बनवून नामकरण सोहळा पार पाडतात. किती हास्यास्पद आहे की आतापर्यंत माणूस कुंडली, ग्रहदशेच्या चक्रव्युहात अडकला होता. आता प्राणी, पक्षी (जे कोणी पाळीव आहेत) तेदेखील या चक्रव्युहात अडकत आहेत.
खेदाची गोष्ट अशी की सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्गही स्वसंमतीने, आनंदाने या अंधश्रद्धेच्या जाळयात अडकत आहे आणि याला मान्यता देत आहे.
फ्रिलान्सर विभूती तारे यांनी आपल्या पाळीव प्राण्याची कुंडली बनवून नामकरण सोहळा व पूजाविधी केला. त्यानंतर पार्टीचे आयोजन केले. लेखक म्हणजे समाजाला योग्य मार्ग दाखवण्याची ताकद असलेली मनमोकळया विचारांची व्यक्ती. जर तेच हा मार्ग अवलंबलत असतील तर जनजागृती कोण करणार?
ज्योतिषी, पुजाऱ्यांची चांदी
बुद्धिजीवी वर्ग या कार्यात सहभागी होत असेल तर पुजारी नवनव्या शक्कला लढवून भावनिक भ्रम निर्माण करण्यात यशस्वी होणारच. आतापर्यंत पालक आपल्या मुलांची कुंडली, जन्मपत्रिका बनवून त्याच्या निरर्थक, न दिसणाऱ्या भविष्यात डोकावत होते. मुलाचा जन्म होताच पुजारी, ज्योतिषाचा सल्ला, पूजा, होमहवन इत्यादी न जाणो केव्हापासून सुरू आहे. यात मुलाचा जन्म मूळातच खराब नक्षत्रात झाल्यास पूजा, दान-दक्षिणेचे प्रमाण वाढवून भावनिक खेळ खेळला जातो. आता पाळीव प्राणीही या जाळयात अडकत आहेत.
पाळीव प्राण्यालाही आपल्या मुलांप्रमाणेच कुठलेही कष्ट किंवा त्रास होऊ नये यासाठी नवनवी शक्कल लढवली जात आहे.
भावनिक गंडा घालून जोमात धंदा करणारे पुजारी
कुंडलीनुसार नामकरण केल्याने पाळीव प्राणी घरात येताच घरात आनंद, समृद्धी येते. पाळीव प्राण्यांचे नामकरण करणारे पुजारी दीपक गंगेले यांचा असा दावा आहे की ते पाळीव प्राण्याचा जन्मदिवस आणि जन्मतारखेनुसार, त्याचे असे नाव ठेवतात जे पालक आणि पाळीव प्राणी दोघांसाठीही शुभ आणि आनंद घेऊन येणारे असते. त्यांच्या मते माणूस आणि प्राण्याच्या नामकरणात विशेष फरक नसतो. दोघांसाठीही कुंडली बनवून ग्रहांचा अभ्यास केला जातो.
माझ्या परिचयातील सारिकाने तिच्या पाळीव प्राण्याचे विधिवत नामकरण करून पुजाऱ्याकडून पूजाविधी करून घेतला. पुजाऱ्याने त्याचे ऑस्कर असे नाव ठेवून दावा केला की हे नाव कुटुंबासाठी फलदायी ठरेल. धन मिळेल, प्रगती होईल इत्यादी. त्यानंतर दोन महिनेही होत नाहीत तोच पायऱ्यांवरून पडल्याने ऑस्करचा पाय मोडला. जो ठीक करायला बराच वेळ आणि पैसा गेला.
जेव्हा तो वर्षाचा झाला, तेव्हा तिसऱ्या माळयावरील गच्चीतून त्याने खाली उडी मारली. त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांना सहा महिने लागले. डॉक्टरांच्या फेऱ्या, ऑस्करची सेवा यामुळे सारिका व तिचे पती दु:खी, नाराज झाले. ऑस्करला सोडून देणेही शक्य नव्हते. त्याला होणाऱ्या त्रासामुळे ते दु:खी झाले. आता येथे पुजाऱ्याच्या भविष्यवाणीला काय अर्थ राहिला?
हे स्पष्ट आहे की पुजारी भावनांचा खेळ खेळतात. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जास्तीत जास्त पैसे उकळण्याचे मार्ग अवलंबतात.
पाळीव प्राण्याची कुंडली
लिसा स्टारडस्टने सांगितले की कुंडलीमुळे पाळीव प्राण्याचे व्यक्तिमत्त्व, मन:स्थिती, वागणूक इत्यादीचा अंदाज येतो. इतकेच नाही तर तो काय विचार करतोय, त्याला कसे वाटतेय, कोणत्या आजारांपासून त्याला दूर ठेवावे लागेल आदी सर्व कुंडलीवरून माहीत करून घेणे सोपे असते, कारण तो बोलू शकत नाही पण त्यालाही भावना असतात. प्रत्येक पाळीव प्राण्याचीही रास असते.
पुजारी दीपक गंगेलेही ज्योतिषाबरोबरच राशी भविष्यालाही तितकेच महत्त्व देतात. प्रत्येक गोष्टीसाठी पुजारी फी उकळतात.
शोधलेला आणखी एक मार्ग
पाळीव प्राणी, पक्ष्याची जन्मतारीख, वेळ, दिवस माहीत नसेल आणि तुम्हाला त्याला घरी आणायचे असेल तर त्यासाठीही एक मार्ग आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, ज्या क्षणी प्राण्याला घरी आणले जाते, ती वेळ त्याची कुंडली बनविण्यासाठी निश्चित केली जाते. त्याच वेळेनुसार आकडेमोड करून नामकरण केले जाते.
पुजारी, ज्योतिषी असा दावा करतात की माणूस ज्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या नक्षत्रावर जन्माला येतो आणि त्याचा स्वभाव, वर्तन, नशीब, समृद्धी सर्व त्यानुसारच ठरते. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्याचीही ग्रहदशा त्याच्या जन्म नक्षत्रावरच अवलंबून असते.
म्हणूनच मनासारखी परिस्थिती आणि सुखी भविष्यासाठी योग्य नामकरण आवश्यक असते, कारण ते पाळीव कुटुंबातील एक भाग बनते आणि त्याच्या ग्रहांचा प्रभाव कुटुंबावर पडतो.
आचार्य अजय द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, पालक आणि पाळीव प्राणी या दोघांच्या कुंडली जुळल्यास कुटुंबाचे जीवन निरोगी व सकारात्मक होते. त्या पाळीव प्राण्याचा रंग, जात, नाव इत्यादीही ठरविले जाते.
आणखी एक पाऊल
जॉकी, टॉमी अशा जुन्या नावांऐवजी आता ‘अवनी’, ‘अथर्व’, ‘अग्नी’, ‘मोक्ष’ इत्यादी सांस्कृतिक नावे ठेवली जात आहेत. या नावांच्या प्रभावामुळे प्राणी अधिक बुद्धिवान आणि ऊर्जावान होईल, कुटुंबासाठी शुभ ठरेल असे सांगून पुजारी पालकांना सुखी भविष्य दाखवून आपल्या धर्माचे दुकान व्यवस्थित पुढे चालवत आहेत.
या गोष्टींवरून हे स्पष्ट होते की नवनवीन शक्कला लढवून आणि नवनवीन अंधश्रद्धा निर्माण करून धर्माची ही दुकाने त्यांची विश्वासार्हता वाढविण्यात यशस्वी होत आहेत. अनुयायी मात्र अंधश्रद्धेमुळे विवेकहीन होऊन कुंडली, ग्रहदशेला फसून पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवित आहेत. यामुळे आपण केवळ धर्माच्या ठेकेदारांचेच अनुकरण करत राहू. हे थांबविण्यासाठी अंधश्रद्धेचा पडदा बाजूला सारवाच लागेल.
आतापर्यंत धर्माच्या ठेकेदारांनी माणसाभोवती जन्मपत्रिका, कुंडली इत्यादींचेच जाळे विणले होते. आता पाळीव प्राणी, पक्षीही या चक्रव्युहात अडकत आहेत. बुद्धिजीवी वर्गच जर त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी पुजाऱ्यांच्या जाळयात अडकला तर सर्वसामान्य वर्गही त्यांचेच अनुकरण करेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण पुढे जाण्याऐवजी मागे का जात आहोत? आजच्या युगात जिथे ग्रहांचे वास्तव समोर आले आहे, तिथे सुशिक्षित वर्गाला हे दुष्टचक्त्र संपुष्टात आणण्याच्या दिशेने पाऊल उचलावेच लागेल.
या कुंडल्यांमुळे हे सिद्ध होते की माणसाची कुंडली बनविणे हीदेखील शुद्ध फसवणूक आहे. ती शतकानुशतके हिंदू समाजावर लादली जात आहे. आता यात नवीन अध्याय जोडले जात आहेत, कारण अंधश्रद्धाळू लोकांना हजारो प्रकारच्या अंधश्रद्धा स्वीकारण्यास भाग पाडणे खूप सोपे आहे.