* श्री प्रकाश
आम्ही भारतीय पासपोर्टवर जवळपास ६० देशांची सफर व्हिसाशिवाय किंवा इ व्हिसा अथवा व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे करू शकता. व्हिसाशिवाय ज्या देशात तुम्ही जाऊ शकता त्यातील काही आशिया, काही आफ्रिका तर काही दक्षिण अमेरिकेत आहेत.
पाहायला गेल्यास दक्षिण कोरियाची सफर व्हिसाशिवाय करता येत नाही, पण दक्षिण कोरियातील जेजू हे एक असे बेट आहे, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय भारतीय पासपोर्टवर जाऊ शकता. जेजू दक्षिण कोरियातील हवाई बेट म्हणूनही ओळखले जाते. लक्षात ठेवा की तुम्ही व्हिसाशिवाय दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोणत्याही हवाइमार्गे येथे येऊ शकत नाही किंवा येथून दक्षिण कोरियात कुठेही जाऊ शकत नाही. अर्थात हवाइमार्गे अन्य देशातून येऊन कोरियात न थांबता येथे येऊ शकता किंवा येथून बाहेर जाऊ शकता.
तुम्ही मलेशिया, सिंगापूर किंवा अन्य देशातून येथे येऊ शकता. पण हो, जेथून येणार आहात त्या देशाच्या ट्रान्झिस्ट व्हिसाची माहिती अवश्य करून घ्या.
दिल्ली, मुंबई, बंगळुरूवरूनही हवाइमार्गे तुम्ही जेजूला येऊ शकता.
जेजू हे दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडे वसलेले सुंदर बेट आहे. इथले वातावरण अन्य पर्यटनस्थळांपेक्षा वेगळे आणि खूपच शांत आहे. म्हणूनच तर दक्षिण कोरियाचे निवासीही थकवा आणि धावपळीच्या जीवनाला कंटाळून येथे सुट्टी मजेत घालवण्यासाठी येतात.
प्रेक्षणीय स्थळे
नैसर्गिक सौंदर्य : जेजूला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील स्वच्छ वातावरण आणि मोकळया हवेत श्वास घेणे आल्हाददायी आहे.
हलासन : जेजू बेटाची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. बेटाच्या मध्यभागी हलासन ज्वालामुखी आहे, जो आता निष्क्रिय झाला आहे. दक्षिण कोरियातील सर्वात उंच शिखरावरील माउंट हला नॅशनल पार्कची सफर करून आपण याचा आनंद घेऊ शकता. येथे खोल विवर तयार झाले होते, जे आता एक सुंदर सरोवर आहेत. येथे चहुबाजूंना विविध वनस्पती आणि अन्य जीव आहेत.
ह्योपले बीच : जेजू बेटाच्या उत्तर दिशेकडील हे प्रसिद्ध बीच आहे. येथील वाळू पांढऱ्या रंगाची असते. तुम्ही येथील शुभ्र पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.
लाव्हाचा बोगदा : ज्वालामुखीच्या भयानक स्फोटानंतर लाव्हा याच बोगद्यातून बाहेर पडत असे. हा एखाद्या गुहेप्रमाणे आहे. तो १३ किमी लांब असला तरी केवळ १ किमी लांबीचा बोगदाच पर्यटकांसाठी खुला आहे. येथे गेल्यावर सेल्फी काढायला विसरू नका.
रस्त्यावरील सफर : येथे जीपीएसच्या मदतीने कारमधून बेटाची सफर करणे सहज शक्य आहे. अन्य एखादी गाडी किंवा गाडयांचा ताफा तुमच्या आजूबाजूला असेल असा प्रयत्न करा. पायी जाण्यासाठीही पायवाटा आहेत.
याच रस्त्यावर एका ठिकाणी ग्रॅण्डमदर्स रॉक स्टॅच्यू आहे. अशी दंतकथा आहे की एकदा समुद्रात गेलेला मच्छीमार परत आलाच नाही आणि तेथे त्याची वाट पाहत उभी असलेली पत्नी अखेर पाषाणाचा पुतळा बनली. कोरियन लोक आपल्या मुलांना सांगतात की एकटयाने उशिरापर्यंत बाहेर राहू नका नाहीतर तुमची आजीही पाषाणाची मूर्ती बनेल.
सोनेरी टँजेरिनची बाग : कीनू किंवा टँजेरिन फळांच्या बागेत वृक्षांच्या रांगा अनेक मैल दूरवर पाहायला मिळतात. या वृक्षांवरील पिवळया रंगांची असंख्य फळ तुमच्या कॅमेऱ्याला फोटो काढण्यासाठी मोहात पाडतील.
टेडीबिअर संग्रहालय : मुलांच्या आवडीच्या लोकप्रिय टेडीबिअर खेळण्याचे सुंदर संग्रहालय येथे आहे, जे तुम्हाला आकर्षित करेल.
लवलँड येथील सेक्सी मुर्त्या : जेजू बेटावर लवलँड आहे जिथे सुमारे १४० मुर्त्या आहेत, ज्या सेक्स या संकल्पनेवर आधारित सेक्सच्या विविध भावमुद्रेत आहेत.
जेजू येथे जाण्यासाठीची योग्य वेळ : नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा जेजू बेटावर जाण्यासाठी उत्तम आहे.
राहण्याची सोय : जेजूमध्ये तुम्हाला चांगली हॉटेल्स किंवा बजेटमधील हॉटेल्सही मिळतील. वाटल्यास तुम्ही कमी खर्चात हॉस्टेलमध्ये राहू शकता. पण हो, जर तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर मात्र येथे तुमची निराशा होईल.